दशक फुकुशिमा अणुदुर्घटनेचे- भागः१

दशक फुकुशिमा अणुदुर्घटनेचे- भागः१

जपानमध्ये भूकंप व त्सुनामी एकापाठोपाठ येतच असतात. त्यांना याची सवय आहे. पण या साऱ्या संकटांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे.

कुमार स्वामींचा फैसला गुरुवारी
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची बाजारात घसरण

मार्च आणि एप्रिल महिना आण्विक दुर्घटनेबाबतीत आता कुप्रसिद्ध झाले आहेत. ११ मार्च २०११ फुकुशिमा, जपान व २६ एप्रिल १९८६ साली युक्रेनच्या चेर्नोबिल येथे वेगवेगळ्या कारणामुळे अणुऊर्जा निर्मिती केंद्रात मोठ्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यात जीवित व वित्तहानी झाली होतीच पण इतरही अनेक घडामोडी निर्मिल्या गेल्या होत्या.

अणुकेंद्रात अपघात का झाले?

जपानच्या होन्शू प्रांताजवळील समुद्रात ११ मार्च २०११ला एक भूकंप झाला. भूकंपात जमिनीचे दोन तुकडे एकमेकांपासून तुटून दूर जातात. या प्रक्रियेतून जी ऊर्जा निर्माण होते ती कंपनांच्या रूपाने जमिनीतून व वातावरणातून सगळीकडे पसरते. भूकंप जर समुद्राच्या खोल पाण्यात झाले तर तिथले पाणी मोठी उसळी घेऊन भूकंपनांप्रमाणे समुद्रातून सगळीकडे पसरते. यातूनच त्सुनामीचा जन्म होतो. अशीच एक त्सुनामी त्यावेळीही निर्माण झाली व फुकुशिमा अणुकेंद्रावर येऊन थडकली. ही त्सुनामी इतकी ताकदीची होती की समुद्राच्या अशा अजस्त्र लाटांपासून या अणुकेंद्राचा बचाव करण्यासाठी ज्या भिंती उभ्या करण्यात आल्या होत्या त्या साऱ्या ध्वस्त झाल्या. अणुकेंद्रात समुद्राचे पाणी शिरले व तिथली सारी विद्युत यंत्रणा व उपकरणे खराब झाली. त्यामुळे फुकुशिमा डायची अणुकेंद्रात स्फोट घडून आले व अनेक ठिकाणी आगी लागल्या. ११ मार्च २०११ला तीन दूरगामी परिणाम करणाऱ्या गोष्टी एकत्रितपणे  फुकुशिमात घडून गेल्या. त्यात सुमारे १९,००० पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले व त्याच्या कैकपटीने बेघर झाले.

त्याआधी सुमारे २५ वर्षांपूर्वी एका मानवी चुकीमुळे चेर्नोबिल अणुकेंद्रात उत्पन्न झालेल्या ऊर्जेचा निचरा न झाल्यामुळे ती ऊर्जा आतच साठत राहिली. जेव्हा तिचे जमा होणे प्रमाणाबाहेर गेले तेव्हा ही ऊर्जा अणुकेंद्राच्या इमारतीला तोडून भेदून बाहेर पडली. यातील किरणोत्सारी ऊर्जा नंतर साऱ्या युरोपभर पसरली.

अशा अपघाताचे दूरगामी परिणाम

फुकुशिमा डाईची अणुकेंद्रातून जे उत्सर्जन बाहेर पडले त्याला त्सुनामीचा जबरदस्त फटकाच कारणीभूत होता. या त्सुनामीमुळे जपानची सुमारे ८०० किमी इतकी किनारपट्टी प्रभावित झाली होती. या देशात भूकंप व त्सुनामी एकापाठोपाठ येतच असतात. त्यांना याची सवय आहे. पण या साऱ्या संकटांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. इथे उंच इमारतीच्या सुरक्षेसाठी त्याचा पाया अशारितीने रचला जातो की ती संपूर्ण इमारत भूकंपनाबरोबर झुलत राहते. त्यामुळे इमारत पडण्याची शक्यता कमी होते.

त्सुनामीचा धोकाही जपानला नेहमी सतावत असतो. हा पूर्ण देश अनेक छोट्यामोठ्या बेटांपासून बनलेला आहे. त्यांच्या जमिनीची संरचना प्रशांत महासागरात विकसित झाली आहे. भूतुकड्यांच्या स्थलांतरामुळे व इतर अनेक गतिकीय घडामोडींमुळे जपानच्या समुद्रात भूकंप होतात. समुद्रात निर्माण होणाऱ्या भूकंपामुळे त्सुनामी तयार होते. जेव्हा समुद्राच्या अक्राळविक्राळ लाटा जमिनीवर येऊन आदळतात तेव्हा त्याचा मारा इतका जोराचा असतो की विध्वंसाचा नंगानाच समुद्रकिनाऱ्याच्या आत अनेक मैलांपर्यंत खेळला जातो. त्यातून होणारा विनाश भयानकच असतो. रविवारच्या ‘मन कि बात’ मध्ये कसे २००४च्या त्सुनामीत अंदमान व चेन्नईच्या लाईटहाऊस (दीपगृह) मधील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली होती याचा उल्लेख आला होता.

समुद्रातील संरक्षक भिंती

अशा विनाशकारी लाटांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जपानने समुद्रात अनेक संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत. जपानच्या सेंडाई किनारपट्टीवर दर १००-१५० वर्षात एक त्सुनामी येऊन थडकतेच थडकते. अशावेळी या लाटांची सरासरी उंची ४ मीटर इतकी असते. पण २०११ला ही उंची १० मीटर इतकी झाली होती. या लाटेची इतकी दाहकता होती की तिने आणलेल्या पाण्याने सेंडाई प्रांतातील ५०० चौ. किमी जमीन पाण्यात बुडून गेली.

या लाटेच्या तडाख्याने व पाण्याच्या माराने सुमारे १,३०,००० इमारती उध्वस्त झाल्या. त्यामुळे अशा संरक्षक भिंती व खारफुटी जंगलं खरोखरच संरक्षण करण्यास सक्षम आहेत का याच्यावर तिथे वादविवाद सुरु झाले आहेत. अशा भिंती पुन्हा बांधाव्यात का किंवा मोडलेल्या भिंती पुन्हा उभ्या करावेत का याच्यावर पूर्ण गंभीरतेने विचारविनिमय सुरु आहे.

जपानला सुमारे ३५,०० किमीचा किनारा लाभला आहे. आणि यातील अर्धी किनारपट्टी कमी-जास्त उंचीच्या संरक्षक भिंतीने व्यापली आहे. टोहोकू प्रांतात त्सुनामीचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे तिथल्या भिंती अशा उंची व रुंदीने बांधलेल्या आहेत कि जेणेकरून कमाल उंचीच्या लाटा आल्या तरी त्यांना त्या परतवून लावू शकतील. पण या भिंती ८ मॅग्निट्युड भूकंपाला डोळ्यासमोर ठेऊन बांधल्या गेलेल्या होत्या. मॅग्निट्युडचा आकडा भूकंपात एकूण किती ऊर्जा निर्माण झाली हे दर्शवतो. एखादा खडक एका जागेपासून दुसऱ्या जागी, व किती प्रमाणात सरकतो, व या कार्यासाठी किती ऊर्जा खर्ची पडते यावर मॅग्निट्युडचा आकडा ठरतो. त्याप्रमाणे १ मॅग्निट्युडचा भूकंप हा २ मॅग्निट्युड भूकंपापेक्षा ३२ पटीने जास्त ऊर्जा उत्पन्न करतो. उत्तरोत्तर वाढत जाणारा मॅग्निट्युड ३२च्या पटात वाढत जातो.

११ मार्चच्या भूकंपाची तीव्रता ९ मॅग्निट्युड होती   

हा एवढा मोठा भूकंप व त्यानुषंगाने निर्माण होणारी त्सुनामी अपवाद होती का? भूशास्त्रज्ञांना माहित होते की ९ मॅग्निट्युडचा भूकंप व अशा भूकंपाने निर्माण झालेली त्सुनामी अपवाद नव्हती. अशी त्सुनामी काही शंभरेक वर्षांपूर्वी जपानच्या किनारपट्टीवर येऊन आदळली होती. या भूवैज्ञानिकांनी तिथल्या प्रदेशात जमा झालेल्या गाळाचा शास्त्रीय अभ्यास केला होता. त्या गाळात त्यांना विशिष्ट थर आढळले जे फक्त त्सुनामीने आणलेल्या गाळाचेच असू शकत होते.

या गाळाचे नमुने जेव्हा वय शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले तेव्हा ते ८६९ सालातले आहेत हे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या प्रांतात ९ मॅग्निट्युडचा भूकंप आधी झाला होता. त्याच तीव्रतेचा भूकंप पुन्हा २०११ साली झाला. म्हणूनच दर २००-३०० वर्षांनी येणाऱ्या त्सुनामीपासून बचाव करण्यासाठी कार्यक्षम पद्धतीने कसा मुकाबला करायचा याची वैज्ञानिक आखणी सुरु आहे.

जंगल बचाव

जपानमध्ये त्सुनामीपासून बचाव करण्यासाठी किनारपट्टीलगत जंगलांची वाढ करण्यात आली आहे. ही जंगलं त्सुनामीचा वेग व ऊर्जा कमी करण्यासाठी वाढवली जातात. त्यामुळे किनारपट्टीजवळ होणारी हानी कमी होईल ही आशा त्यापाठीमागे असते. पण २०११ सालच्या त्सुनामीत उलटेच झाले. या त्सुनामीत साहजिकच तिथली झाडं उन्मळून पडली, त्याचे तुकडे झाले. लाकडाचे हे ठोकळे मात्र नंतर शस्त्रात बदलले. या ओंडक्यांच्या तडाख्यानेच अनेक लोकं जायबंदी व मृत्युमुखी पडली. या झाडांमुळे फायदा कमी नुकसानच जास्त झाले. मोठी झाडं जेव्हा इमारतींवर जाऊन आपटत तेव्हा त्या इमारतींचा आणखी जास्तच नुकसान होत गेले. पण हे सर्व २०११च्या त्सुनामीत घडले. कमी तीव्रतेच्या त्सुनामीत जेव्हा लाटांची उंची सुमारे ६ मीटर होती तेव्हा या जंगलांनी चांगले काम केले होते. या जंगलांनी वीसेक बोटी अडवल्या होत्या त्यामुळे काही प्रमाणात होणारे नुकसान कमी झाले.

वैज्ञानिकांनी झाडांची वागणूक व त्या संदर्भातील सर्व आकडेवारी जमा केली आहे. त्यांनी प्रतिमानाच्या मदतीने ही झाडं कोणत्या तीव्रतेत कशी वागतील याचे शास्त्रशुद्ध अवलोकन केले. जंगलात जाऊन त्याची शहानिशा केली. त्यातून त्यांना अतिशय उपयुक्त माहिती हाती लागली व एकूण परिस्थितीचे अचूक आकलन झाले. लाटा ज्या जंगलांना भेदून आरपार गेल्या त्या झाडांचा सखोल अभ्यास करण्यात आला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ज्या झाडांचे जमिनीत मूळ ३ मीटरपेक्षा जास्त रोवले गेले होते अशी झाडं उन्मळून पडली नाहीत.

पण उन्मळून पडलेल्या झाडांचा व त्यांच्या खोडांचा वापर काहीजणांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुद्धा केला होता. पाण्यावर तरंगणाऱ्या झाडांच्या खोंडावर व त्यांच्या फांद्यांवर चढून आपला जीव वाचवला. तर उन्मळून न पडलेल्या झाडावर कित्येकजण मदत येईपर्यंत चढून राहिले.

निर्वासित छावण्या व मनोचिकित्सा

जपानने त्सुनामीपासून बचाव करण्यासाठी निर्वासन केंद्र बनवले आहेत. पण ही निर्वासन केंद्र २०११च्या त्सुनामीत बुडून गेली होती. हे का झाले याचा शोध घेतल्यानंतर तिथल्या शास्त्रज्ञांना कळले की ही कमी उंचीवर वसली होती. त्यामुळे याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता ही निर्वासन केंद्र अधिकच्या उंचीवर बांधली जाणार आहेत.

या त्सुनामीतून जी लोकं वाचली होती त्यापैकी ८७० नागरिकांचा मनोचिकित्सेतून अभ्यास करण्यात आला. त्यांना मनोवैज्ञानिकांनी अनेक प्रश्न विचारले. त्यांनी जी उत्तरं दिली त्यातून असे लक्षात आले की त्यांच्यातील सुमारे ६०% लोकांनी धोक्याचा भोंगा वाजल्याक्षणीच सुरक्षित स्थळी जाण्याची लगबग केली. उरलेल्यांपैकी सुमारे ७५% लोकं हातातील काम उरकण्याचा मागे लागले. ही आणि बाकीची सारे या अपघातातून वाचले खरे, पण धोका आ वासून समोर उभा असतानादेखील लोकं इतकी गाफील किंवा निष्काळजी कशी असू शकतात. याचा शोध मनोचिकित्सक घेत आहेत आणि त्यांचे निष्कर्ष हे वैश्विकरित्या लागू करण्यासारखे असतील.

अणुऊर्जा अपघात आणि आरोग्य

या दुर्घटनेचा अभ्यास अनेक अंगाने होतो आहे. फुकुशिमा अणुकेंद्रात अपघात झाल्यानंतर जी ऊर्जा बाहेर पडली त्याची तीव्रता फक्त ५४० पेटाबेकेरेल इतकी होती. किरणोत्सर्जन मोजण्याचे एकक बेक्वेरेल हे आहे. एका बेक्वेरेल मध्ये किरणोत्सारी पदार्थात जी प्रक्रिया निर्माण होते त्यातुन प्रत्येक सेकंदाला एक केंद्रबिंदू (न्यूक्लिअस) ऱ्हास होत राहतो. म्हणजेच, त्या विकिरण पदार्थातून एका सेकंदात एक केंद्रबिंदू कमी होतो. या प्रक्रियेतून जी ऊर्जा उत्पन्न होते त्याला बेकेरेल म्हणतात. या एककाला हेन्री बेक्वेरेल या महान नोबेल विजेत्या वैज्ञानिकांचे नाव देण्यात आले आहे. पेटाबेक्वेरेल हे बेक्वेरेल पेक्षा फारच कमी असते (०.०००००००००००००००१ इतके).

चेर्नोबिलमध्ये जितकी किरणोत्सारी ऊर्जा बाहेर फेकली गेली होती तिच्या दहापट कमी ऊर्जा फुकुशिमा इथून बाहेर पडली होती. पण फुकुशिमा अणुकेंद्रात काही काळ स्फोट होत राहिल्याने तिथल्या प्रशासनाला अधिक किरणोत्सार बाहेर पडण्याची भीती वाटू लागली होती. त्यामुळे त्यांनी या अणुकेंद्राच्या सुमारे २० किमी परिघातील लोकांना त्यांच्या घरातून दूर निघून जाण्याचे आव्हान केले होते. त्यातील काही निर्वासित छावण्यांमध्ये गेले तर काही आपल्या नातेवाईक व मित्रांकडे गेले. पण २० किमी परिघाबाहेरील लोकांना सुद्धा रेडिएशनची भीती वाटू लागली व तेही दूर निघून गेले होते. ११ मार्चला अपघात झाल्यानंतर एकदोन आठवड्याच्या आतच सुमारे १,६०,००० लोकं आपल्या घराबाहेर पडली होती.

हिरोशिमा-नागासाकीचे उदाहरण समोर असल्याकारणाने त्यांना भीती होती की किरणोत्सारी ऊर्जा पर्यावरणात राहिल्याने त्यांना कॅन्सर, टीबी सारखे रोग होतील व त्यांची मुलं वेडीवाकडी जन्मतील. ही भीती कशी अनाठायी आहे हे दर्शवण्यासाठी प्रशासनाने फुकुशिमा इथं पूर्ण शरीराचे किरणोत्सारी संकेतांचे स्कॅनिंग करण्याची मोहीम सुरू केली. स्कँनिंग केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की अपघात क्षेत्रातील लोकांच्या शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त रेडिएशन नाही. पण फुकुशिमा परिसरात ल्युकेमियामुळे काही नागरिक मरण पावले आहेत. हे मृत्यू स्वाभाविक होते की त्यांचा संबंध अणुकेंद्र विकिरणांशी होता हे शोधून काढण्याचे काम सुरू आहे.

पण जेव्हा हा अपघात झाला त्याच्यानंतरच्या एक महिन्याच्या अवधीतच प्रभावित नागरिकांची मृत्यू होण्याची शक्यता सुमारे ३ पटीने वाढल्याचे आढळले. एका निर्वासन छावणीत २५% नागरिक पहिल्या ९० दिवसात मृत्यू पावले. मृत्यूचे कारण न्यूमोनिया होते. याचाच अर्थ हे सारे मृत्यू किरणोत्सर्जनामुळे नव्हे तर अशक्तपणा, कमी रुग्ण देखभाल व घरापासून दूर गेल्याच्या भावनेने ते खचले होते. या कारणामुळं त्यांची प्रतिकारक शक्ती व जगण्याची इच्छा कमी झाली अशी मनोचिकित्सकांची धारणा आहे. यामुळे त्यांच्यातील सहरोग सुद्धा वाढत गेले. मधुमेह व रक्तदाबासारखे रोग त्यांच्यात बळावत गेले. ही लोकं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत होती व एक वेगळ्या प्रकारचा सामाजिक तणाव व दडपण त्यांच्या मनावर होते. त्यामुळे काही नवीन आजार बाधत गेले व जुने आजार बळावत गेले.

फुकुशिमा अपघाताचा दुसरा कोणता दुष्परिणाम झाला हे आपण पुढच्या लेखात पाहूया.

डॉ. प्रवीण गवळी, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन कार्यरत नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0