राम मंदिर देणगीचे २२ कोटींचे चेक बाऊन्स

राम मंदिर देणगीचे २२ कोटींचे चेक बाऊन्स

अयोध्याः शहरातील बहुचर्चित राम मंदिर निर्मितीसाठी आजपर्यंत मिळालेल्या एकूण रकमेतील २२ कोटी रु. रकमेचे धनादेश वठले नसल्याची माहिती पुढे आली आहे. राम मंदिराची निर्मिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निधी समर्पण योजनेंतर्गत सुरू आहे. या ट्रस्टच्या खात्यावर पैसे जमा होत असून आजपर्यंत देशातल्या सर्व राज्यांतून व बाहेरच्या काही देशांतून सुमारे ३४०० कोटी रु. जमा झाले आहेत. या रकमेतील २२ कोटी रु.चे धनादेश वठले नाहीत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र हे धनादेश का वठले नाहीत याची माहिती देण्यात आलेली नाही.

जे धनादेश वठलेले नाहीत त्या संदर्भात एक रिपोर्ट तयार करण्यात येणार असून कोणाचे धनादेश वठलेले नाहीत, त्याची माहिती गोळा केली जाणार असल्याचे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयाचे व्यवस्थापक प्रकाश गुप्ता यांनी सोमवारी सांगितले. धनादेश न वठण्यामागे सह्यांमधील फरक किंवा तांत्रिक चुका असू शकतील असे गुप्ता म्हणाले.

अयोध्येतल्या सर्वाधिक देणगीदारांचे धनादेश वठलेले नाहीत. या जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक धनादेश वठलेले नाहीत.

राम मंदिर निर्माणाला एक लाख रु. पासून ५ लाख रु.पर्यंत देणगी देणाऱ्यांची संख्या ३१,६६३ इतकी असून १,४२८ देणगीदारांनी ५ लाख रु. ते १० लाख रु. इतकी रक्कम दिली आहे. तर ९५० देणगीदारांची रक्कम १० लाख रु. ते २५ लाख रु. दरम्यानची असून १२३ देणगीदारांनी २५ लाख रु. ते ५० लाख रु.ची रक्कम देणगी म्हणून दिली आहे.

१२७ देणगीदारांनी ५० लाख रु. ते १ कोटी रु.पर्यंत देणगी दिली आहे. तर ७४ देणगीदारांनी १ कोटी रु.हून अधिक रक्कम राम मंदिरासाठी दिली आहे.

महत्त्वाची बाब अशी की २०२१ मध्येही २२ कोटी रु. मूल्याचे १५ हजार धनादेश वठलेले नव्हते.

मूळ बातमी

COMMENTS