‘सानताय’च्या आठवणीतला तीआनमेन

‘सानताय’च्या आठवणीतला तीआनमेन

तीआनमेन चौक घटना प्रत्यक्षात अनुभवलेली माणसं सध्या कमी झाली आहेत. असेच एक शिये-सानताय. तैवानमधील एका वृत्तपत्रासाठी ते त्यावेळी छायाचित्रे घेत होते. त्या घटनेला ३१ वर्षे झाल्यानंतर तैपेईमध्ये त्यांची घेतलेली मुलाखत.

चीनमध्ये आता ३ मुलांचे धोरण लागू
रॅपिड टेस्ट कीटसाठी सरकारने मोजली दुप्पट किंमत
शांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का?

चीनबद्दल वाचताना तीआनमेन घटनेचा उल्लेख सर्रास आढळतो. असंच एकदा वाचताना या घटनेचा एक साक्षीदार तैपेईमध्ये राहत असल्याचं समजलं. हा एक फोटोग्राफर आहे. तैपेईमधील

‘इनडीपेनडन्स इव्हीनिंग पोस्ट’ वृत्तपत्रासाठी ते काम करत होते. ऐतिहासिक गोर्बाचेव्ह भेट आणि तीआनमेन चौकातील ही घटना चित्रित करण्यासाठी त्यांना तैवानवरुन बीजिंगला १९८९ मध्ये पाठवलं गेलं होतं. त्या फोटोग्राफरच नाव आहे, शिये-सानताय. सानताय ज्यावेळी बीजिंगमध्ये या घटनेचं चित्रण करत होते, तेंव्हा अचानक त्यांना परत तैपेईमध्ये बोलावलं गेलं. कारण बीजिंगमध्ये मार्शल लॉ लावण्यात आला होता आणि सानताय यांच्या वरिष्ठांना काळजी वाटत असल्याने त्यांनी सानताय यांना परत यायला भाग पाडलं. मात्र ही ऐतिहासिक घटना आपण लोकांपर्यंत पोहचवू शकलो नाही व विद्यार्थ्यांच्या या चळवळीत अप्रत्यक्षरित्या का होईना पण सहभागी होऊ शकलो नाही, याची खंत वाटल्याने सानताय यांनी तैपेईला परत आल्यावर आपल्या नोकरीचा सरळ राजीनामा दिला आणि तोही मोहिमेच्या साऱ्या खर्चासहित. ‘इनडीपेनडन्स इव्हीनिंग पोस्ट’ हे वृत्तपत्र पुढे २००१ साली बंद पडले.

मार्शल लॉ मुळे पत्रकारांवर देखील निर्बंध आले होते आणि त्यामुळे सानताय यांच्या वरिष्ठांना याबद्दल काळजीने घेरल्याने त्यांनी सानताय यांना परत बोलावले, परंतु सानताय यांनी नकार देताच त्यांचा अर्थपुरवठा रोखण्यात आला. त्यावेळी ए.टी.एम. कार्ड किंवा तत्सम सुविधा नसल्याने सानताय यांना नाईलाजाने का होईना सिंगापूरमार्गे तैपेईला परतावं लागलं होतं.

सानताय यांची एक विशेष मुलाखत घ्यावी, असा प्रयत्न करून बघायचं ठरवलं. माझी एक मैत्रीण युनजिये लिआव हिच्या ओळखीतील एकजण सानताय यांना ओळखत होतं. युनजियेने सानताय यांच्याशी संपर्क करून माझ्याविषयी सांगितलं. कोणीतरी आजही या घटनेबद्दल जाणू इच्छितो, कुणाला तरी आजही या घटनेची माहिती जगाला द्यायची आहे, हे ऐकून सानताय यांना देखील बरं वाटलं आणि त्यांनी भेटण्याची वेळ दिली.

साहजिकच सुरवात ३१ वर्षांपूर्वीच्या तीआनमेन चौकातील आंदोलनाच्या विषयाने झाली. आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग हा अतुलनीय होता आणि आजही तो जोश, ते धाडस व्यक्त करताना सानताय यांचा चेहरा उजळून निघतो, मात्र त्याचवेळी आंदोलनाची सांगता ज्या पद्धतीने झाली, जो रक्तपात व्हायचा नव्हता तो झाला आणि आधी बघितलेले उत्साही विद्यार्थी आणि नंतर मोडीत निघालेलं आंदोलन, त्याबद्दलची दहशत हे सारं आठवताना सानताय यांच्या नजरेत एक प्रकारची नाराजीची लकेर देखील उमटते.

शिये-सानताय

शिये-सानताय

नोकरीतील राजीनाम्यानंतर सानताय यांनी काही काळ शांततेत घालवला आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्या काळात तैपेईत अनेक वृत्तपत्रे चालत होती आणि त्यामुळे नव्या नोकरीची चिंता त्यांना कधी वाटलीच नाही. मात्र, जिथे त्यांनी आधी राजीनामा दिला होता त्याच वृत्तपत्राने सानताय यांना पुन्हा आग्रहाने बोलावून घेतलं. फोटोग्राफर तसं कमीच बोलतात मात्र त्यांचे फोटोज बरंच काही सांगून जातात आणि सानताय देखील त्याला अपवाद नाहीत. त्यांचे तीआनमेनचे फोटोज बरंच सत्य सांगून जाणारे आहेत. फोटोमध्ये टिपलेली विद्यार्थ्यांची पेटलेली मनं आणि त्यांच्या डोळ्यातील आशा आजही ताज्याच वाटतात. मात्र ही पेटलेली मनं बंदुकीच्या गोळ्यांनी विझवली गेली हेही एक कटू सत्य त्यातून जाणवत राहतं.

अनेक विद्यार्थी नेते मारले गेले. अनेकजण वेगवेगळ्या देशांमध्ये निघून गेले. अनेक विद्यार्थी तैवानमध्ये आले. अनेक दिवस ते भूमिगत होते. आंदोलनाचे वृत्त बाहेर येऊ नये, असा चीन सरकारने प्रयत्न केला. प काही बातम्या बाहेर आल्या. काही बातम्या बाहेर आल्या नाहीत. नक्की कितीजण मारले गेले. कितीजणांवर कारवाई झाली, याच्या बातम्या बाहेर आल्या नाहीत, असे नेहमी सांगण्यात येते. त्याविषयी विचारले असतं, सानताय म्हणाले, की मध्यमांवर बंधने होती. त्यावेळी चीनमध्ये मार्शल लॉ लावण्यात आला होता. पत्रकारांना अटक करण्यात येत होती. तेंव्हा अनेक विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी संरक्षण दिल्याचे सानताय यांनी सांगितले.

“चीनचे नेते ‘माओ त्से तुंग’ यांचे या चौकामध्ये भव्य तैलचित्र आहे. या चित्राला काळे फासण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची छायाचित्रे मी तैवानला पाठवली. तीच माझी या आंदोलनाची शेवटची छायाचित्रे. यानंतर मी चिनमधून परतलो. मात्र ते दृश्य बघून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मला असे वाटले, की आता काहीतरी भयानक घडणार आहे. आणि पुढचे सर्वाना माहीत आहे”, असे सानताय म्हणाले.

आंदोलन आणि विद्यार्थी हे योग्य मार्गाने जात होते का? असं विचारल्यावर सानताय सांगतात, की नक्कीच विद्यार्थ्यांची ती चळवळ त्यावेळी यशस्वी झाली असती, तर आजच चित्रंच वेगळं असलं असतं.  आज कदाचित तैवान आणि चीनचे संबंध मैत्रीपूर्ण असले असते. खरंतर ते आंदोलन म्हणजे दोन भिन्न व्यवस्थांमधलं युद्धच होतं आणि ही लढाई प्रत्यक्षात अयशस्वी जरी झाली नसली तरी क्रांतीने पेटलेल्या भावनेचा मात्र तो विजयच होता. मी त्या आंदोलनादरम्यान स्वतःची काळजी कधी केली नाही. मात्र त्यावेळची परिस्थिती पाहता त्या विद्यार्थ्यांची मला अधिक काळजी वाटत होती. अनेक विद्यार्थ्यांशी बोलताना एक प्रकारची आपुलकीची भावना तेंव्हा निर्माण झाली होती, असं सानताय आवर्जून सांगतात.

सानताय यांनी ‘हावलिन्ग-१९८९’ हा तीआनमेन चौक घटनेदरम्यान घेतलेल्या छायाचित्रांचा संग्रह काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केला आहे. या विषयाबद्दल असलेली सेन्सॉरशिप आणि सुरक्षितता हे मुद्दे लक्षात घेतलं, तर कधी कधी असुरक्षितपणाची थंड भावना मनाला स्पर्शून जात असल्याचं सानताय सांगतात. त्यांना तसं वाटणं देखील साहजिक आहे, ज्या रीतीने आंदोलनाचा शेवट केला गेला आणि त्याचा उल्लेख पुढे सतत टाळण्यात आला, ते पाहता बऱ्याच जणांच्या मनात असुरक्षिततेची भावना रुजली गेली. मात्र असं असूनही अजून एक जर असं आंदोलन आणि चळवळ होणार असेल, तर मी पुन्हा जायला तयार आहे. चीनमध्ये लोकशाही कधी येईल हे माहित नाही, पण एक आशा ठेवायला काय हरकत आहे आणि तैवानची जनता ही लोकशाही जपणारी असल्याने तैवानने घाबरण्याची गरज नाही असं सानताय म्हणतात.

‘एखाद्या वेळी पोटाची भूक सहन करता येईल पण लोकशाहीची भूक सहन करता येणार नाही’, असं एक विद्यार्थी म्हणाल्याचं सानताय आपल्या ‘हावलिन्ग १९८९’ या पुस्तकात लिहितात. ‘लोखंडाला गंज लागल्यावर जशी त्याची चकाकी कमी होते, तशी आठवणींची चकाकी आणि धार देखील कमी होते, पण म्हणून तीआनमेनचौकातील आंदोलन पूर्णतः विसरून चालणार नाही. विद्यार्थ्यांनी त्यावेळी दाखवलेलं ते धाडस खरंच कौतुकास्पद होतं आणि ते विद्यार्थी जणू या ऐतिहासिक घटनेसाठीच जन्मले होते व ते कायम अजरामर राहतील’, असं सानताय आपल्या पुस्तकात म्हणतात.

लोकशाहीबद्दलचा आशावादी दृष्टिकोन

१९८७ नंतर तैवानमधला मार्शल लॉ संपुष्ठात आल्यावर आमच्या समवयस्क मंडळींनी तीन प्रकारचे सामाजिक, राजकीय बदल अनुभवले असल्याचं ते सांगतात. मार्शल लॉ दरम्यानची बंधने, त्या विरोधात चाललेली चळवळ आणि त्यातून उदयास आलेली एक मुक्त लोकशाही, हे बदल सानताय यांनी पहिले आहेत. तैवानमध्ये आलेली लोकशाहीयुक्त मोकळी व्यवस्था देखील ही सहजासहजी आलेली नसल्याने सध्याच्या आणि येणाऱ्या पिढीने तिचा आदर करत ती पुढं जपली पाहिजे. येणारे दिवस कठीण असले तरी सध्या उभी असलेली ही मोकळी व्यवस्था कायम टिकवणं, हे येणाऱ्या भावी पिढीवर अवलंबून आहे. लोकशाहीला आणि तैवानला प्रगतीच्या वाटेवर नेलं पाहिजे, अशी अपेक्षा सानताय तैवानच्या भविष्याबाबत व्यक्त करतात.

तैवानमधल्या जवळपास ५० टक्क्याहून अधिक लोकांनी तैवानच्या स्वतंत्र देश असण्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इथं लोकशाहीला पुरेपूर वाव आहे, मात्र एवढं असूनही तैवानला मित्र देशांची आणि समविचारी देशांची साथ मिळणं अतिशय महत्वाचं आहे. चीनकडून येणाऱ्या धमक्या, दबाव हे सारं झेलणं कठीण आहे, त्यामुळे जागतिक साथीदार देशांनी तैवानला साथ दिली पाहिजे, जेणेकरून तैवान एक दिवस स्वतंत्र देश म्हणून जगात स्वीकारला जाईल, असा आशावाद सानताय व्यक्त करतात.

‘हॉंगकॉंग’बद्दल विचारल्यावर सानताय जरा भावुक झाले. चीनने ‘हॉंगकॉंग’च्या हस्तांतरणावेळी दिलेल्या  साऱ्या अश्वासनांना तिलांजली देत सध्या ‘हॉंगकॉंग’ची गळचेपी सुरु केली आहे.  ती पाहता चीनवर विश्वास ठेवणं कठीण आहे. ‘हाँगकाँग’वासियांची ही एक मोठी फसवणूक होती असं ते म्हणतात.

सध्याच्या चीनबद्दल सांगताना, चीन भविष्यात कधी तरी एक दिवस बदलेल आणि तो क्षण चीनला जगाशी जवळीक साधणारा ठरेल. भविष्याच्या एका वळणावर चीन कधीतरी एक दिवस तैवानची स्वतंत्र व्यवस्था मान्य करून सलोख्याचे संबंध प्रस्थापित करेल, अशी आशा तैवानचा एक सामान्य नागरिक म्हणून सानताय व्यक्त करतात.

वरद वेणुग्राम हे तैपेईस्थित दक्षिण पूर्व आशियाचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार युनजिये लीआव (Yunjie Liao) यांच्या बरोबर ही मुलाखत घेतली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: