२ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ

२ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेमध्ये, शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा केली.

शेतकऱ्यांचा कळवळा की खासगी कंपन्यांना पायघड्या?
२०१६ मधील शेतकरी आत्महत्यांबाबतचा डेटा ३ वर्षांनंतर प्रकाशित
४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असून, त्यासाठी कोणत्याही अटी शर्थी लागू नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सतत चर्चेत येत होता. त्याबद्दल लवकरच पूर्ण अभ्यास करून घोषणा करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले होते.

आज नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ‘महात्मा फुले कर्जमाफी’ योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार असून, मार्च महिन्यांपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रशासकीय कामांसाठी दोन महिने लागणार असल्यामुळे मार्च महिन्यांपासून ही कर्जमाफी योजना सुरू होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार दिलासा देणार असून त्यांच्यासाठीच्या योजनेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली.

कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना बँकेच्या, सरकारी कार्यालयात रांगेत उभे राहावे लागणार नसल्याचे सांगत अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अवकाळी पाऊस, दुष्काळ, हमी भाव, यामुळे राज्यातील शेतकरी वाईट अवस्थेमध्ये आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी शेतकरी संघटनांनी यापूर्वी देखील केली होती. शेतकरी आणि कर्जमाफी हा मुद्दा शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणला होता.

मात्र शिवसेनेने निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी करत सात बारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दोन लाख रुपयांची कर्ज माफीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. संपूर्ण कर्जमाफी जाहीर न केल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0