यूएस ओपनः दिग्गजांची अनुपस्थिती; तरुण तुर्कांना संधी

यूएस ओपनः दिग्गजांची अनुपस्थिती; तरुण तुर्कांना संधी

३१ ऑगस्टला टेनिसची यूएस ओपन ठरल्याप्रमाणे सुरू झाली. अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी त्यात सहभाग घ्यायला नकार दिला असताना ही स्पर्धा होत आहे हे एक विशेष. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकाविनाच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

भाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’
‘राष्ट्रीय सुरक्षिततेशी तडजोड असेल तर खुलासा नको’
५ वर्षांत गरीबांच्या उत्पन्नात ५३ टक्क्यांनी घट

कोरोंनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे लक्षण अजून तरी दिसत नाही. त्यामुळे सगळीकडे समाज व्यवहाराची ‘नवी सामान्य पातळी’ किंवा ‘नवे निकष’(new normal) ठरवून व्यवस्था सुरळीत करणे सुरू आहे. जगभरातील सगळ्या देशात अर्थकारणाच्या दृष्टीने व्यापार-उद्योग व्यवहार सुरू झाले आहेत. त्याचबरोबर स्पर्धात्मक खेळ सुरू होऊ लागले आहेत जसे आयपीएल, फुटबॉल, सॉकर, टूर द फ्रान्स वगैरे.

३१ ऑगस्टला टेनिसची यूएस ओपन ठरल्याप्रमाणे सुरू झाली. अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी त्यात सहभाग घ्यायला नकार दिला असताना ही स्पर्धा होत आहे, हे एक विशेष. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकाविनाच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

फेडरर, नदाल आणि इतर मोठ्या खेळाडूंची अनुपस्थिती

यंदाची यूस ओपन आणखी एका कारणाने वेगळी ठरते आहे कारण रॉजर फेडरर आणि राफाएल नदाल हे सुपर स्टार्स या स्पर्धेत खेळणार नाहीत. फेडररची सर्जरी झाली आहे त्यामुळे तो वर्षाअखेरपर्यंत खेळणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. तर नदाल कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने प्रवास टाळतो आहे.

काही अभ्यासक असेही म्हणतात की त्याला पुढील महिन्यात होऊ घातलेली फ्रेंच ओपन स्पर्धा १२ व्या वेळी जिंकायची आहे आणि त्याचबरोबर फेडररच्या २० ग्रँड स्लॅम चषकांच्या रेकॉर्डची बरोबरी करायची आहे. त्यामुळे तो उत्तम ट्रेनिंग घेतो आहे. कारण काही का असेना यावेळी या तीन अव्वल खेळाडूंतील फक्त नोव्हाक जोकोविच खेळतो आहे. नाही म्हणायला पूर्वीच्या अव्वल चौकडीतील अँडी मरी त्याच्या दुखापती, सर्जरी आणि निवृत्तीनंतर परत खेळू लागला आहे. मात्र तो ही स्पर्धा जिंकू शकण्याची शक्यता यावर्षी तरी खूप कमी आहे.

वावरिङ्का, मॉन्फिल्स, किरगिऑस, निशिकोरी, डेल पॉट्रो यांच्यासारखे अनेक पुरुष खेळाडू यावेळी खेळणार नाहीत.

सिमोना हॅलेप, अॅश्ली बारर्टी सारख्या अनेक मोठ्या महिला टेनिसपटू यावेळी खेळणार नाहीत.

एकंदरीत ३० ते ४० लहान-मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळत नसल्याने नवोदित खेळाडूंना या यूएस ओपनमध्ये खेळायची संधी आहे. ते या संधीचे सोने करतील का हे बघणे रंजक असेल.

जोकोविच जिंकणार की चौकडी बाहेरील खेळाडू यावेळी यूएस ओपन जिंकेल?

सध्या जोकोविच अप्रतिम खेळतो आहे आणि तोच ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकेल असे अनेक टेनिस अभ्यासक आणि विश्लेषक म्हणतात आहेत. तर काहींच्या मते यावेळी या जगप्रसिद्ध चौकडीच्या बाहेरील खेळाडू ही स्पर्धा जिंकेल जसे की डॉमिनिक टिम, दानील मेद्वेदेव, अलेक्झांडर झेरेव किंवा स्टिफॅनोस त्सित्सिपास!

मिलॉश राओनिच हा एक अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. मात्र दुखापतींनी त्याला ग्रासले आणि त्यामुळे तो काही वर्ष खेळू शकला नाही. आता तो परत येऊन उत्तम खेळू लागला आहे. तो देखील ही स्पर्धा जिंकू शकतो असे काही अभ्यासक म्हणतात.

महिलांच्या एकेरीत सेरेना विलियम्स अढळपद प्राप्त करेल?

महिलांच्या एकेरीत देखील यावेळी नाओमी ओसाका, पेट्रा क्विटोव्हा, अॅन्जेलिक कर्बर किंवा एखादी नवी खेळाडू ही स्पर्धा जिंकू शकेल. यावेळीही सेरेना विलियम्स खेळते आहे आणि ती तिचे २४ वे ग्रँड स्लॅम चषक मिळवण्यासाठी खूपच मेहनतीने खेळत आहे. मार्गरेट कोर्ट यांच्या नावावर २४ वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आहे. त्याची बरोबरी सेरेना करू पाहते आहे. यावेळी ती तिचे तिसरे यूएस ओपन विजेतेपद मिळवू शकते का हे बघणे रंजक ठरेल.

एकंदरीत प्रेक्षकांविना यावेळी ही स्पर्धा खेळली जात असली तरी टेनिस रसिक आणि क्रीडाप्रेमी टीव्हीवर सगळ्या मॅचेस बघतात आहेत. सोशल मीडियावर लिहित आहेत. त्यांच्यातील उत्कंठा आणि उत्साह तीळमात्र कमी झालेला नाही जरी दुधाची तहान ताकावर भागवावी लागली असली तरी.

आता दुसरी आणि तिसरी फेरी सुरू झाली आहे आणि महिला खेळाडूंतील एक मोठी खेळाडू -कॅरोलाईन प्लिस्कोव्हा बाद झाली आहे. पुरुषांच्या एकेरीतही तसे होऊ शकते.

शेवटी, टेनिस हा एक खेळ आहे. येथे कोणताही व्यावसायिक खेळाडू कितीही मोठ्या असणार्‍या खेळाडूला हरवू शकतो म्हणूनच त्यात रंजकता, उत्कंठा आणि थरार आहे.

तेव्हा बघूया यावेळी पुरुष आणि महिलांच्या एकेरीचे विजेतेपद नवीन खेळाडूंना किंवा तरुण तुर्कांना मिळते की जुन्या, प्रथितयश खेळाडूंना.

गायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0