अहमदाबाद : २०२५ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरचे (५ ट्रिलियन डॉलर) उद्दिष्ट्य गाठेल असे सांगितले जात आहे. पण सध्याच्या भारताच्या अर्थव
अहमदाबाद : २०२५ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरचे (५ ट्रिलियन डॉलर) उद्दिष्ट्य गाठेल असे सांगितले जात आहे. पण सध्याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती पाहता २०२५ साल नव्हे तर अजून २२ वर्षे लागतील. त्यामुळे २०२५चा दावा प्रत्यक्षात येणे शक्यच नसल्याचे विधान रिझर्व्ह बँकेचे माजी गवर्नर सी. रंगराजन यांनी एका कार्यक्रमात केले.
२०२५ सालापर्यंत ५ लाख कोटी डॉलरचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी अर्थव्यवस्थेचा विकासदर दरवर्षी ९ टक्के इतका हवा. सध्या आपली अर्थव्यवस्था २.७ लाख कोटी डॉलरची आहे. आणि ती दुप्पट करण्याचे आपले प्रयत्न आहेत. पण आताच आपली दोन वर्षे वाया गेली आहेत. यंदा विकासदर ६ टक्के तर त्यापुढील वर्षी तो ७ टक्के राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आर्थिक विकासदर वाढण्यास सुरुवात होईल. अशा परिस्थितीत येत्या सहा वर्षांत ५ लाख कोटी डॉलरचा टप्पा गाठणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.
भारताने ५ लाख कोटी डॉलरचे उद्दिष्ट्य गाठल्यास दरडोई उत्पन्नातही वाढ होईल. सध्या दरडोई उत्पन्न १८०० डॉलर आहे ते ३६०० डॉलर होईल. पण तरीही भारत निम्न मध्यम उत्पन्न गटाच्या यादीत राहील. भारताला उच्च मध्यम उत्पन्न गटात प्रवेश करण्यासाठी दरडोई उत्पन्न ३८०० डॉलरच्या घरात नेले पाहिजे. जे विकसित देश आहेत त्यांचे दरडोई उत्पन्न १२००० डॉलर इतके आहे. हे सगळे चित्र पाहता सरासरी ९ टक्के आर्थिक विकासाचा दर भारताने पकडला तर ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी २२ वर्षे लागतील असे ते म्हणाले.
भारताच्या अर्थव्यवस्थेपुढे अनेक गंभीर समस्या असून जीएसटीतून महसूलाचे उद्दिष्ट्य साध्य होताना दिसत नाही. सरकारने अर्थसंकल्पात महसूल वाढीचे प्रयत्न करण्याच्या ज्या घोषणा केल्या होत्या, त्यांना अद्याप यश आलेले नाही. निर्गुतवणुकीतून महसूल गोळा होईल पण ते प्रयत्न अपुरे असून परदेशी गुंतवणूक व निर्यातवाढीवर सरकारने लक्ष दिले पाहिजे असे सी. रंगराजन यांनी सांगितले.
मूळ बातमी
COMMENTS