भारतीय घटना समितीने २२ जुलै १९४७ रोजी बैठकीत ‘तिरंगा ध्वज’ हा भारताचा अधिकृत ध्वज राहिल असे जाहीर केले. म्हणून २२ जुलै हा दिवस भारताचा राष्ट्रध्वज मान्यता दिन आहे.
शुक्रवार २२जुलै २०२२ रोजी तिरंगा स्वीकारून ७५ वर्षे झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ पासून ‘स्वराज महोत्सव’पर्यंतचे अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. या निमित्ताने आपण आपल्या तिरंगा ध्वजाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. कारण तो स्वीकारल्याचाही आज अमृत महोत्सव आहे.
राष्ट्रीय आदर्शाचे प्रतीक म्हणून राष्ट्रध्वजाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. १३ व्या शतकाच्या प्रारंभी युरोपमध्ये जी धर्मयुद्धं झाली त्यानंतर प्रामुख्याने राष्ट्रध्वजाचा वापर होऊ लागला. १३ व्या शतकात डेन्मार्क या युरोपातील राष्ट्राने पहिला राष्ट्रध्वज बनवला. त्यानंतर इटलीतील काही राज्यांनी राष्ट्रध्वज बनवला. नंतर हळूहळू ही प्रथा जगभर पसरली. प्रत्येक देश आपापले मानचिन्ह म्हणून राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत तयार करू लागला. स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी स्वीकारला गेला. म्हणून हा दिवस भारताचा राष्ट्रध्वज मान्यता दिन आहे.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात भारतीय राष्ट्रध्वजाचा विचार रुजला. तेही भारतात नव्हे तर परदेशात. कारण राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ साली झाली तरी १९३१ पर्यंत सर्वमान्य असा राष्ट्रध्वज नव्हता. मात्र युरोपात राहून जे भारतीय क्रांतिकारक काम करत होते त्यांना राष्ट्रध्वजाची आवश्यकता वाटत होती. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या भिकाजी कामा म्हणजेच मादाम कामा यांनी १९०७ मध्ये स्वतः तिरंगी ध्वज तयार केला. त्याच्या मधोमध ‘वंदे मातरम’ हे शब्द लिहिले. हा ध्वज त्यांनी सर्वप्रथम जर्मनीत बर्लिन येथे समाजवादी परिषदेत फडकवला. स्वातंत्र्य आंदोलन करत असताना भारताचा म्हणून एक राष्ट्रध्वज हवा ही कल्पना १९३१ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आकार घेऊ लागली. तिला निश्चित रूप देण्यात आले. त्यानुसार ध्वजाची लांबी व रुंदी ३:२ या प्रमाणात ठरवण्यात आली. तसेच केशरी, पांढरा व हिरवा या तीन रंगाचे समान पट्टे निश्चित करण्यात आले. मध्यभागी असलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर निळ्या रंगात चरख्याचे चिन्ह ठेवण्यात आले. हा ध्वज स्वातंत्र्य आंदोलनात अनेक वर्षे वापरण्यात आला.
भारत स्वतंत्र होण्याची निश्चिती झाल्यावर स्वतंत्र भारतासाठी घटना समिती निवडण्यात आली. घटना समितीने राष्ट्रभावना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रध्वजाची आवश्यकता प्रतिपादित केली. कारण राष्ट्राच्या उज्वल परंपरेची आणि तेजस्वी पराक्रमाची स्मृती राष्ट्रध्वजामुळे जनतेच्या मनात कायम असते. राष्ट्रध्वज हा राष्ट्राचा मानदंड असतो. म्हणून भारतीय घटना समितीने २२ जुलै १९४७ रोजी आपल्या बैठकीत ‘तिरंगा ध्वज ‘हा भारताचा अधिकृत ध्वज राहिल असे जाहीर केले.
या तिरंगा ध्वजाच्या मधोमध असलेल्या पांढरा भागात निळ्या रंगातील अशोक चक्र निश्चित केले. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य घराण्यातील सम्राट अशोक याने दक्षिण आशिया ते आजचे अफगाणिस्तान- बंगाल असा प्रचंड प्रदेश आपल्या साम्राज्याचा भाग बनवला होता. मात्र यासाठी झालेल्या हिंसेने अशोकाला पश्चाताप झाला. परिणामी त्याने शांतीचा संदेश देणारा बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सम्राट अशोकाने सारनाथ येथे अर्धशीर्ष सिंहाचा (लायन कॅपिटल ) स्तंभ उभारला. त्यावर शांतीचा संदेश देणारे धम्मचक्र रेखाटले. स्वतंत्र भारतालाही शांतीचीच गरज असल्याने घटना समितीने पूर्वीच्या तिरंग्यातील चरख्याऐवजी धम्मचक्र म्हणजेच अशोक चक्र महत्त्वाचे मानले. या चक्रामुळे कालचक्र आणि त्यासोबत बदलत जाणाऱ्या जगाचेही सूचन होते.
राष्ट्रध्वज हा खादी कापडाचाच असावा हा संकेत आहे. राष्ट्रध्वजाचे रूप, त्याचा वापर, त्याचा सन्मान याचेही महत्त्व मोठे आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१(क ) मध्ये नागरिकांसाठी मूलभूत १० प्रकारची कर्तव्य सांगितली आहेत. त्यापैकी पहिलेच कर्तव्य ‘संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे’ हे आहे. राष्ट्रध्वजात असलेल्या अशोक चक्राला २४ आरे असतात. संयम, समृद्धी, उद्योग, सुरक्षा, व्यवस्था नियम, समता, अर्थ, नीती, न्याय, सहकार्य, कर्तव्य, अधिकार, कल्याण, संघटन, बंधुत्व, प्रेम, मैत्री, सेवा, क्षमा, त्याग, शील, शांती आणि आरोग्य असा त्या २४ आऱ्यांचा अर्थ आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत, ‘केशरी रंग हा त्याग व धैर्य यांचे प्रतीक आहे. शुभ्र पांढरा रंग शांती व सत्य यांचा आदर्श ठेवायला प्रवृत्त करतो. तर हिरवा रंग शौर्य आणि श्रद्धा यांचे द्योतक असून तो निसर्गाशी आणि भूमीशी दृढ नातेही दर्शवतो. पांढऱ्या रंगावरील अशोक चक्र हे गतिमानतेची व विश्वशांतीची गरज स्पष्ट करते.’
राष्ट्रध्वजाबाबतच्या नियमांची ध्वजसंहिताही आहे. आनंद व शोकप्रसंगी तो कोणत्या स्थितीत असावा यापासूनचे सर्व संकेत त्यामध्ये दिलेले आहेत. लोकसत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय दिनी घरं, शाळा, सरकारी-खासगी कार्यालये, सर्व प्रकारच्या घटनात्मक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावला जातो. राष्ट्रध्वजाचा गौरव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे राष्ट्रध्वज फडकावण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या कलम १९ (१) अ नुसार, राष्ट्रध्वज फडकावणे हा नागरिकांच्या महत्त्वाच्या अधिकारांपैकी एक आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी तो फडकावण्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. म्हणूनच ध्वजसंहिता ठरविली गेली आहे.
ध्वजसंहितेच्या पहिल्या भागात राष्ट्रध्वज कसा असावा याबाबत माहिती देण्यात आली आहे. ध्वजसंहितेच्या दुसऱ्या भागात राष्ट्रध्वज कसा ठेवावा तसेच फडकवावा याची माहिती आहे. त्यानुसार राष्ट्रध्वज नेहमी उंच ठिकाणी सर्वांना दिसेल अशा जागी फडकवायला हवा. सार्वजनिक इमारतींवर सूर्योदयानंतर फडकवून सूर्यास्तापूर्वी तो खाली उतरवला पाहिजे. सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज फडकावला जाता कामा नये. राष्ट्रध्वजाला उत्साह आणि स्फुर्तीने हळू-हळू खांबावर चढवण्यात यावा. तसेच त्याच पद्धतीने तो खाली उतरवायला हवा. राष्ट्रध्वजाला केशरी रंग खालच्या बाजूला येईल अशा उलट्या पद्धतीने फडकावणे गुन्हा मानला जातो. फाटलेल्या आणि खराब झालेल्या अवस्थेतील राष्ट्रध्वज फडकावणे गुन्हा ठरतो. राष्ट्रध्वज नेहमी स्वच्छ धुतलेला आणि व्यवस्थित इस्त्री केलेला असावा. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा खांब वाकलेल्या अवस्थेत असता कामा नये. जमिनीला राष्ट्रध्वजाचा स्पर्श होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही जाहिरातीत अंगावर घालण्यासाठी, नेसण्यासाठी किंवा त्याचा चादरीसारखा वापर करता येत नाही. राष्ट्रध्वजाला आकर्षक बनवण्यासाठी त्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर केली जाता कामा नये.
ध्वजसंहितेच्या तिसऱ्या भागात ,देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सशस्त्र दलांचे जवान किंवा संविधानिक पद्धतीने निवडून आलेले लोकप्रतिनिधी, सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी अशा व्यक्तींच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळी नियमानुसार राष्ट्रध्वजातून त्यांचे पार्थिव नेण्यास परवानगी आहे. मात्र, अंत्यविधीपूर्वी राष्ट्रध्वज त्यांच्या पार्थिवापासून वेगळा करणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वजाला सलामी देताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहणे आवश्यक आहे. तर गणवेशधारी सुरक्षा रक्षकांना राष्ट्रध्वजाला हाताने सॅल्यूट देता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांसोबत भारताचा राष्ट्रध्वज फडकावताना तो नेहमी उजव्या बाजूला तर प्रेक्षकांच्या डाव्या बाजूला असायला हवा. संविधानिक पदांवर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांवर समोर लहान स्वरुपातील राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. देशाच्या प्रमुख संविधानिक पदांवर काम करीत असलेल्या किंवा केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यास राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो. त्यासाठी तो आधी पूर्णपणे वरपर्यंत फडकावून नंतर अर्ध्यावर आणला जातो.
आपण सारे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे नागरिक ‘भारतीय’ म्हणून राहू व तसाच वर्तन व्यवहार करू. ‘भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व’ हे मानूनच आपण आपला देश आदर्शपणे घडवू शकतो. हेच राष्ट्रध्वजाच्या आणि स्वातंत्र्याच्याही अमृतमहोत्सवाचेही सांगणे आहे…
प्रसाद कुलकर्णी, हे समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे सरचिटणीस आहेत.
COMMENTS