लेखक नंदा खरे यांचे निधन

लेखक नंदा खरे यांचे निधन

पुणे : आजच्या काळातील महत्त्वाचा लेखक, असे ज्यांच्याबद्दल सार्थपणे बोलले जाते, असे ज्येष्ठ लेखक, कांदबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात दीर्घ

रामजन्मभूमी : विचित्र तर्क असलेला निकाल
देवेंद्र मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री
शेती कायद्याला विरोध; पोलिस उपमहानिरीक्षकांचा राजीनामा

पुणे : आजच्या काळातील महत्त्वाचा लेखक, असे ज्यांच्याबद्दल सार्थपणे बोलले जाते, असे ज्येष्ठ लेखक, कांदबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

मुंबई आयआयटीमधून पदवी घेतलेल्या नंदा खरे यांनी काही काळ अभियंता म्हणून काम केले होते.

टोकदार लेखक अशी ज्यांची ख्याती होती, त्या खरे यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून नंदा खरे ओळखले जात. ‘अंताजीची बऱखर’, ‘उद्या’, ‘बखर अंतकाळाची’ या त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय आहेत.

‘उद्या’ नावाच्या कादंबरीसाठी त्यांना २०२० सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो त्यांनी नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं असं म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता.

नंदा खरे यांनी वृत्तपत्रातही लेखन केले. ठाम वैचारिक भूमिका आणि कोणतीही तडजोड न करणारा लेखक असणारे नंदा खरे यांनी लिहिलेला ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा ग्रंथ वैचारिक लेखनात महत्त्वाचा ठरला आहे.

उद्या, नांगरल्याविण भुई, वाचताना पाहताना जगताना, दगड धोंडे, अंताजींची बखर, बखर अंतकाळाची, वारूळ पुराण, इंडिका, बाजार, ऐवजी, दगडावर दगड विटेवर वीट, संपत्ती, ऑन द बिच, कापूसकोंड्याची गोष्ट, हे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.

नंदा खरे यांच्या विषयी ज्येष्ठ लेखक निळू दामले यांनी लिहिले आहे, “नंदा खरे गेले.
त्यांचं हृदय, फुफ्पुस काम करेनासं झालं होतं, त्यावर उपचार होऊ शकत नव्हते.
खरे सिविल इंजिनियर होते. बांधकाम हा त्यांचा व्यवसाय होता. त्यांनी कोणताही बेकायदेशीर व्यवहार न करता सचोटीनं व्यवसाय केला. गांधी आणि मार्क्स अशा दोघांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यावर होता. ते विचार समोर ठेवून ते आयुष्यभर वागले. विचारांचा धंदा करणाऱ्या राजकीय संघटना आणि पक्षांपासून ते दूर होते. ते विचारी होते, विकारी नव्हते. काम करणाऱ्या आणि विचार करणाऱ्या माणसांमधे ते आनंदी असत, वावरत असत, बाकीचे संग त्यांनी टाळले. त्यांनी लिहिलंय. बरंच लिहिलंय. त्यांची एक स्वतंत्र शैली आणि धाटणी होती. आपण या जगात एकटे पडतोय याची जाणीव त्यांना होती. मुंबईचे चिं.मो. पंडित हे व्यावसायिक इंजिनियर आणि वैचारिक खरेंचे सीनियर होते, गुरु असल्यागत होते. पंडीत वारल्यानंतर खऱ्यांचा एकटेपणा अधिकच गडद होत गेला. पण या एकटेपणातही खरे निराशाग्रस्त झाले नाही. अशा प्रकारच्या माणसांमधे अभावानं आढळणारा विनोद त्यांना सोडून गेला नव्हता. आनंदात असत. सतत काही ना काही तरी करत असत. वि. म. दांडेकरांनी १९७२-७४ च्या दुष्काळाचा अभ्यास करून साप्ताहिक माणूसमधे लेख लिहिले होते. ते एकत्र करून त्याचं एक पुस्तक त्यांनी करायला घेतलं. प्रयोग परिवाराचे दाभोलकर यांचंही एक पुस्तक करण्याच्या खटपटीत होते. त्यांच्या अवतीभोवती खूप माणसं असत. त्यांना न आवडणाऱ्या माणसांना, विचारांना आणि पक्षांना ते पहात आणि खळाळून हसत. परंतू भारतात आणि देशातली परिस्थिती त्यांना दुःखी करत होती. शेवटल्या दिवसात त्यांना साधी हालचालही करता येत नव्हती. पण मित्रांशी फोनवर बोलतांना त्यांचं खळाळून हसणं कमी झालं नव्हतं, त्याही परिस्थितीत काम करण्याची त्यांची इच्छा होती. अशी माणसं आता मिळायची नाहीत.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0