नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सांगताना देश किंवा मीडियाने धर्म, वंशाचा उल्लेख करू नये असे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे स्पष्ट निर्
नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सांगताना देश किंवा मीडियाने धर्म, वंशाचा उल्लेख करू नये असे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे स्पष्ट निर्देश असताना केंद्र सरकार मात्र तबलिग जमातीचा संबंध देशातल्या वाढत्या कोरोना साथीशी लावताना दिसत आहे. शनिवारी आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी देशात कोविड-१९ रुग्णांची संख्या १४,३७८ इतकी झाल्याची माहिती दिली पण ती देताना ४,२९१ रुग्णांना झालेली कोरोनाची लागण तबलिग जमातीमुळे झाल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
मात्र केंद्र सरकारच्या उलटी भूमिका रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली त्यांनी कोविड- १९ हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैकी काहीही पाहत नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद आणि आचरण हे ऐक्य – बंधुता यांना प्राधान्य देणारे असायला हवे, असे ट्विट केले.
वास्तविक ८ एप्रिलला आरोग्य खात्यानेच एक मार्गदर्शक तत्व जाहीर करत कोरोना साथीचा कोणत्याही समाजाशी वा धर्माशी संबंध जोडू नये असे म्हटले होते. पण आपल्याच मार्गदर्शक तत्वांना तिलांजली देत सरकारकडून कोरोना साथीचा प्रसार मुस्लिम समाजाकडून केला जात असल्याचा आरोप होत आहे. लॉकडाऊन पुकारण्याअगोदर तबलिग जमातीचा कार्यक्रम दिल्लीत झाला होता.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना साथीचा वाढता प्रसार पाहता व त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज, संशय पसरण्याची भीती पाहता या साथीचा संबंध कोणत्याही धर्म, समाज, वंशाशी जोडू नये असे स्पष्ट निर्देश जगातील सर्व देशांना व मीडियाला दिले होते. कोरानाचा संबंध विशिष्ट जमातीशी, समाजाशी जोडल्यास या साथीबाबत माहिती दडपली जाण्याची भीती वाढू शकते. एखादा रुग्ण सामाजिक भेदभावाच्या भयामुळे आपल्याला होणारा आजार लपवू शकतो, याने ही साथ मोठ्या प्रमाणावर फैलावू शकते, आरोग्य व्यवस्थेवर त्याचे परिणाम होऊ शकतात, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली होती.
तबलिग प्रकरणानंतर अनेक हिंदू कट्टरवादी गटांनी मुस्लिम फेरीवाले, मुस्लिम व्यापार्यांकडून वस्तू विकत घेऊ नका अशा मोहिमा हाती घेतल्या होत्या. त्याने सामाजिक सौहार्द बिघडत चालले होते. काही ठिकाणी मुस्लिम विक्रेत्यांना मारहाणही केली जात असल्याची प्रकरणे उघडकीस आली होती.
तर काही मुस्लिम वस्त्यांमध्ये आरोग्य सेवकांकडून तपासणी केली जात असताना या आरोग्य सेवकांच्या हेतूविषयी शंका, संशय व्यक्त करत त्यांना मारहाण केली जात असल्याच्या घटना घडल्या आहेत.
एवढी सामाजिक अस्वस्थता दिसत असतानाही केंद्र सरकारने देशातील एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी देताना त्यातील २९.८ टक्के रुग्ण तबलिग जमातीमुळे असल्याचे व ही साथ देशातील २३ राज्यात पसरल्याची माहिती दिली होती.
लव अग्रवाल एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी तबलिगमुळे प्रत्येक राज्यात कसा कोरोना पसरला याचीही राज्यनिहाय आकडेवारी प्रसारमाध्यमांना सांगितली. तामिळनाडूत ८६ टक्के, दिल्लीत ६३ टक्के, तेलंगणमध्ये ७९ टक्के, उ. प्रदेशात ५९ टक्के व आंध्रात ६१ टक्के केसेस असल्याचे त्यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशात एकच केस आढळली. आसाममध्ये ३५मधील ३२ रुग्ण म्हणजे ९१ टक्के तबलिग संबंधी होते, अंदमान व निकोबार बेटांमध्ये १२मधील १० केसेस म्हणजे ८३ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
अग्रवालांनी उत्तरे टाळली
शनिवारच्या पत्रकार परिषदेत तीन पत्रकारांनाच प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यात एक प्रश्न खासगी रुग्णालयांना कोरोना चाचणीची परवानगी देण्यात आली आहे का, या संदर्भात होता पण या प्रश्नाचे उत्तर अग्रवाल यांनी देण्याचे टाळले. दोन प्रश्न तबलिगी संदर्भात होते. त्यात सरकारने तबलिगला हजेरी लावणार्या रोहिंग्याचा शोध घेण्यासंदर्भात एक परिपत्रक राज्यांना पाठवले होते, त्याच्या संदर्भात होता. त्यावर गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने नंतर माहिती देण्यात येईल असे सांगितले.
मीडियाकडून सरकारचीच री
दरम्यान, खुद्द केंद्र सरकारकडून धर्माचा कोरोना साथीशी संबंध जोडत असल्याचा फायदा घेत काही वृत्तवाहिन्यांनी त्यांचे अजेंडे सुरू केले. एबीपी न्यूजने आरोग्य खात्याची माहिती पुढे तबलिगी जमातीमुळे ३० टक्के कोरोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती प्रसिद्ध केली.
मार्चमध्ये तबलिगच नव्हे अनेक धार्मिक सोहळ्यांचे आयोजन
मार्चमध्ये दिल्लीत तबलिग जमातीचा केवळ सोहळा आयोजित केला गेला नव्हता तर १८ व १९ मार्चरोजी गुजरातेत सोमनाथ मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमाला ५ ते ६ हजार भाविक उपस्थित राहिले होते. पावागड मंदिरात १० हजार तर खोडालधाममध्ये १४ हजार भाविक एका कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे वृत्त अहमदाबाद मिरर या वृत्तपत्राने दिले होते. अहमदाबाद येथील इस्कॉन मंदिरातही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले होते.
मूळ बातमी
COMMENTS