साथींचा इतिहास – प्लेग

साथींचा इतिहास – प्लेग

प्लेगनं इतिहासामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार प्लेगच्या सुरुवातीच्या प्रकारांच्या जंतूंचे अवशेष नवाष्मयुगापासून आढळ

तापमान वाढतेय, पण आपण सगळे थंडच!
जागतिक साथींचा इतिहास – कॉलरा
साथींच्या रोगात मुंबईचा साथी- कस्तुरबा रूग्णालय

प्लेगनं इतिहासामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार प्लेगच्या सुरुवातीच्या प्रकारांच्या जंतूंचे अवशेष नवाष्मयुगापासून आढळतात. म्हणजेच प्लेग हा साधारण ५ हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. तथापि इतिहासात प्लेग साथीचा विळखा संपुर्ण जगाला तीन वेळा पडल्याचे दिसते. त्यांनाच प्लेगच्या तीन जागतिक साथी (३ ग्रेट पॅन्डेमिक ऑफ प्लेग) म्हणून ओळखले जाते.

–  प्लेगची पहिली जागतिक साथ (इ. स.6 वे शतक)

साधारण इ. स. च्या ५४२ सालामध्ये ही साथ युरोपात पसरली. तिची सुरुवात इजिप्तमध्ये झाली असावी, असे मानले जाते. समुद्री व्यापाराच्या मार्गाने ती इ. स. ५४३ मध्ये बायझनटाईन साम्राज्यातील सम्राट जस्टिनियन पहिला याच्या काळात पसरली. याच काळात प्लेगने कॉन्स्टंटिनोपलमध्ये एका दिवसात १० हजार मृत्यू झाले अशी इतिहासात नोंद आहे. या साथीमध्ये युरोपची लोकसंख्या अर्ध्याने कमी झाली असा अंदाज आहे. त्याकाळी मानवी पाप वाढले की साथी येतात असा समज होता. साधारण १ कोटी लोक या साथीत दगावल्याचे इतिहास तज्ज्ञ मानतात.

 प्लेगची दुसरी जागतिक साथ- ब्लॅक डेथ (१४ वे शतक)

ही प्लेगची सर्वात मोठी आणि दीर्घकाळ जगभरात टिकून राहिलेली साथ १३३१ च्या आसपास पूर्व आशिया – चीन मधून सुरू झाली. वातावरणातील बदल, दुष्काळ, सततची युद्धे या कारणांनी साथीला पोषक वातावरण पूर्व आशियात निर्माण झाले होते. युरोपात पसरण्याआधी पंधरा वर्षात आशिया खंडात या साथीने जवळपास २.५ कोटी बळी घेतले.

१३४७ साली ही साथ रेशीम मार्गाने (सिल्क रूट) म्हणजेच व्यापारी मार्गाने कॉन्स्टंटिनोपलला पोहोचली. मंगोल आक्रमणकर्त्यांच्याद्वारे ती युरोपात आणखी पसरली. १३४७ ते १३५२ या वर्षात ती पूर्ण युरोप व जगभरात पसरली. या ५ वर्षात युरोपची आणि मध्यपूर्वेतील देशांची अर्धी, तर इजिप्तची ४० टक्के लोकसंख्या प्लेगला  बळी पडली. या साथीने जगभरात जवळपास २० कोटी लोक मृत्युमुखी पडले.

काही वर्षांपूर्वी फ्रान्समधील मार्सेलिस जवळील आणि लंडन मधील सामूहिक दफनभूमितील उत्खननात शास्त्रज्ञांना मृतांच्या अवशेषातून प्लेगच्या जंतूंचे डी.एन.ए. शोधण्यात यश आले. त्यावरून ‘ब्लॅक डेथ’ साथीचे कारण प्लेगच होते हे सिद्ध झाले.

‘बुबोनिक’ प्लेग या प्लेगच्या एका प्रकारात काखेतील किंवा जांघेतील लसीका ग्रंथी सुजतात. त्यांच्या गाठी तयार होऊन नंतर त्या फुटून काळसर पु मिश्रित स्त्राव तयार होतो आणि नंतर मृत्यू येतो. म्हणून त्याला ब्लॅक डेथ म्हंटले गेले. साधारण १३७७ च्या आसपास युरोप आणि आशिया खंडाच्या सीमेवरील रागुसा नावाच्या राज्यात आशियातुन येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून प्लेग पसरतो, त्यांच्यामधून येणाऱ्या पूर्वेकडील विषारी वायूमुळे प्लेग होतो, हा समज निर्माण झाला. आणि पहिल्यांदा पूर्वेकडून येणारया व्यापाऱ्यांना सुरुवातीला ३० दिवस आणि नंतर ४०  दिवस वेगळे ठेवण्यात आले. ४० दिवस म्हणजेच क्वारंटाईन. आशा प्रकारे बाहेरून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्याची सुरुवात ‘ब्लॅक डेथ’च्या काळात झाली.

प्लेग विषारी वायूमुळे पसरतो, तो पाप वाढले की होतो, असे त्या काळात अनेक गैरसमज होते. पूर्वेकडून येणाऱ्या लोकांच्या श्वासातून, संपर्कातून, जखमेतून विषारी कण, वायू शरीरात जाऊन प्लेग होतो, असे समजले जात होते. त्यामुळे त्यावरील उपाय म्हणून रक्त काढणे, घाम आणणे, उलट्या करवणे, जुलाब देणे असे विष बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जाई. पण प्लेग नक्की कशाने होतो, कसा पसरतो, त्यावरील औषध काय याची कोणतीही उत्तरे तेव्हा माहिती नव्हती.

या साथीमुळे युरोपात सर्वच बाबतीत आमूलाग्र बदल झाले. या साथीमुळे अवघ्या ५-७ वर्षात युरोपची लोकसंख्या अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाली. त्यामुळे त्याचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम दिसू लागले. असे म्हणतात की इटलीमध्ये या साथीत खूप मृत्यू झाल्यामुळे तिथे रेनेसाँ म्हणजेच तत्वज्ञान, विज्ञान, साहित्य याचे नवीन वारे वाहू लागले. लोकांना स्वस्तात घरे मिळू लागली. काही प्रमाणात महागाई कमी झाली. जीवनमान उंचावले. त्यामुळे तापमानवाढ कमी झाली. काही अभ्यासकांच्या मते ‘लिटिल आईस एज’ची सुरुवात त्याचवेळी झाली.

पुढची जवळजवळ ३०० वर्षे वारंवार या साथीचे तडाखे यूरोपच्या वेगवेगळ्या भागांना बसत राहिले. १६६५-६६ या वर्षात लंडनमध्ये ‘ग्रेट प्लेग’ची साथ आली त्यामध्ये जवळपास ७० हजार लोक बळी पडले. युरोपात प्लेगचा शेवटचा मोठा उद्रेक १७२० साली झाला. त्यांनतर प्लेगचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. रेशीम मार्ग (सिल्क रूट) हा व्यापारी मार्ग बंद होणे, वाढत्या शहरीकरणाबरोबर स्वच्छता, आरोग्यसेवा सुधारणे, घरांची रचना बदलल्याने उंदीर, घुशी आदींचा संपर्क कमी होणे, रुग्णांचे विलगिकरण करणे इ. कारणाने त्यांनतर प्लेगचे प्रमाण कमी झाले.

–  प्लेगची तिसरी जागतिक साथ (१९ वे शतक)

साधारण १८५० च्या दशकात चीनच्या युनान प्रांतात या प्लेगची सुरुवात झाली. ही साथ मुख्यतः आशिया आणि भारतीय उपखंडात पसरली. तिचा काळ १८५५ ते १९५९ एवढा मानला जातो. त्यामध्ये जवळपास १.२ कोटी मृत्यू झाले. त्यापैकी १ कोटी मृत्यू फक्त भारतीय उपखंडात झाले. १८९६ ला मुंबई प्रांतात तर त्यांनतर दोन वर्षांनी कोलकाता प्रांतात प्लेगने धुमाकूळ घातला होता.

या काळात प्लेगबाबात अधिक संशोधन केले गेले. १६७६ मध्येच ‘लुवेनहॉक’ने सूक्ष्मदर्शकाखाली पहिला जीवाणू पहिला होता. तरी खऱ्या अर्थाने सुक्ष्मजीवशास्त्राचा विकास १८५० नंतर लुई पाश्चर आणि रॉबर्ट कॉक यांच्या काळात झाला. विविध आजारांसाठी कारणीभूत ठरणारे जीवाणू वेगळे करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. ‘जर्म थेअरी ऑफ डिसीसे’स म्हणजेच संसर्गजन्य आजार हे विविध सुक्ष्मजीवांपासून होतात या थेअरीला मान्यता मिळाली. लुई पाश्चर इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी अलेक्झांडर यरसिन हा १८९४ मधल्या प्लेग साथीच्या नियंत्रणासाठी हॉंगकॉंग येथे आला. त्यावेळी त्याने उंदरांच्या शरीरातून प्लेगचा जीवाणू वेगळा केला. त्याच्याच स्मरणार्थ या जिवाणूंचे नाव यरसिनिया पेस्टीस ठेवले गेले. त्याचदरम्यान जपानी शास्त्रज्ञ किटासाटो यानेही प्लेगचा जीवाणू शोधला. पण प्लेग नेमका पसरतो कसा, हे मात्र १८९८ मध्ये पॉल लुई सिमंड याने सिद्ध केले. ‘ओरिएंटल रॅट फ्ली’, या प्रकारच्या पिसवांकडून, छोट्या किड्यातून हा जीवाणू माणसांमध्ये प्लेग पसरवतो, हे त्याने सप्रमाण दाखवून दिले. उंदरांच्या दोन प्रकारच्या वसाहती असतात. एका प्रकारात प्लेगचे जीवाणू शरीरात असले, तरी उंदीर मारत नाहीत. दुसऱ्या प्रकारात प्लेगचे जीवाणू शरीरात गेले, की ते प्लेगने मरतात. या ‘ओरिएंटल रॅट फ्ली’ पिसवा उंदरांच्या रक्तावर जगतात. एका ठिकाणचे उंदीर मेले, की त्या दुसरीकडे जातात जाताना प्लेगचा जीवाणू ते दुसऱ्या उंदरांच्या गटात पसरवतात. या पिसवांच्या पोटात प्लेगचे जीवाणू झपाटयाने वाढतात. ते त्यांच्या जठराचे तोंड बंद करून टाकतात. त्यामुळे पिसवेला खूप भूक लागते, म्हणून ती प्रचंड रक्त शोषत राहते. पण तरीही भूक भागत नाही, शेवटी ती ते रक्त ओकून टाकते आणि मरते. यामुळेच माणसांना पिसवा चावलेल्या जखमेतून प्लेगचे जीवाणू शरीरात पसरतात.

प्लेगचे लक्षणानुसार दोन प्रकार मानले जातात –

१ –  ‘बुबोनिक’ प्लेग*- हा प्रामुख्याने पिसवांच्या संपर्कातून पसरतो. तीव्र ताप, जांघेत, काखेत गाठी तयार होणे, त्या फुटून पु मिश्रित रक्तस्त्राव होणे. जीवाणू रक्तातून सर्व शरीरभर पसरणे आणि त्यामुळे सेप्टिसेमिया होऊन मृत्यू होतो. या प्रकारात इलाज न केल्यास मृत्युदर ८० टक्के आहे.

२ –  ‘न्यूमोनिक’ प्लेग* – हा प्रामुख्याने माणसांच्या एकमेकांच्या संपर्कातून म्हणजेच श्वासातून, थुंकीतून हवेत येणाऱ्या कणातून पसरतो. यामध्ये सर्दी, खोकला, ताप आणि नुमोनियाची लक्षणे दिसतात. मुख्यतः फुफ्फुसांमध्ये हे जीवाणू वाढतात. २-३ दिवसात न्यूमोनियामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. या प्रकारात इलाज न केल्यास मृत्युदर ९०—९५ टक्के आहे.

१८९४ मध्ये प्लेगचा जीवाणू शोधल्यापासून त्याविरोधात लस तयार करण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरूच राहिले. पण प्लेगचा खरा इलाज सापडला तो १९३० नंतर. ‘पेनिसिलिन’चा शोध आणि त्यानंतर आलेल्या विविध प्रतिजैविके यांचा वापर करून प्लेगवर नियंत्रण आणणे शक्य झाले.

२१ व्या शतकातील प्लेगची स्थिती

आज प्लेगच्या साथी आधुनिक जगातून जवळजवळ नाहीशा झाल्या आहेत. मात्र पेरू, मादागास्कर आणि कॉंगो या भागात मधून मधून प्लेगचा उद्रेक होतो. प्लेगच्या जीवाणूंच्या काही उपप्रजाती प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या (ड्रग रेझिस्टंट) आहेत. १९९५ मध्ये मादागास्कर येथे अशी केस सापडली होती. मादागास्कर मधील शेवटची साथ २०१७ मध्ये आली होती. त्यात हजारो लोक संक्रमित झाले तर १७० लोक मृत्युमुखी पडले.

भारतात १९९४ च्या सप्टेंबरमध्ये सुरत येथे प्लेगची साथ आली. त्यात काही शे लोक संक्रमित झाले तर ५२ लोक मृत्युमुखी पडले. तथापि साथ रोग नियंत्रणाची कोणतीच यंत्रणा नसल्याने, तो प्लेग होता हे काही महिन्यांनी सिद्ध झाले. त्या दोन दिवसात सुरत शहरातून जवळपास 3 लाख लोकांनी स्थलांतर केले. सुदैवाने २ आठवड्यात ती साथ नियंत्रणात आली.

प्लेगचा उपयोग जैविक अस्त्र म्हणूनही केला जाऊ शकतो. मध्ययुगीन काळात चिनी आणि मंगोल लोक प्लेगने मृत झालेल्या व्यक्तींची शरीरे युद्धकाळात शत्रुपक्षाच्या नद्यांमध्ये, शहरांच्या रस्त्यावर सोडून देत असत. त्यामुळे त्याभागात प्लेग पसरावा असा उद्देश असे. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनच्या काही भागात प्लेगच्या जीवाणूने संक्रमित माशा सोडल्या होत्या. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशियाने प्लेगचे जीवाणू असलेले हवेत मारता येणारे स्प्रे बनवले होते, अशी चर्चा होती.

प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या प्लेगच्या जीवाणूंचा उगम किंवा अशा जीवाणूंचा जैविक अस्त्र म्हणून चुकूनही वापर केला गेला, तर ते मानव जातीच्या अस्तित्वापुढे कोविड-१९ पेक्षाही मोठे आव्हान असेल.

डॉ.तृप्ती प्रभुणे, या डॉक्टर असून, वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0