फुलाफुलावर दव पडल्यावर तू गेल्याचे कळले होते….

फुलाफुलावर दव पडल्यावर तू गेल्याचे कळले होते….

आज सकाळी मेसेज आला अप्पा गेला. आमचा अप्पा म्हणजे उत्तम बंडू तुपे. अप्पाच्या अनेक आठवणी मनात आल्या. अप्पाची अन माझी ओळख खूप जुनी. वामन केंद्रे यांनी

वेतन सहाय्य योजना – शेतकर्‍यांच्या तोंडाला पुसलेली पाने
“मोहब्बत करनेवाला जा रहा है..”
हिजाब, बुरखा, नकाब आणि किताब

आज सकाळी मेसेज आला अप्पा गेला. आमचा अप्पा म्हणजे उत्तम बंडू तुपे. अप्पाच्या अनेक आठवणी मनात आल्या. अप्पाची अन माझी ओळख खूप जुनी.

वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुलवा’ नाटकाविषयी सगळ्यांना ठाऊक आहे. पण जेंव्हा मी महाविद्यालयीन जीवनात असताना ‘झुलवा’ या नाटकात काम केले होते, तेंव्हा हे नाटक उत्तम बंडू तुपे यांनी स्वतः दिग्दर्शित केले होते.

या नाटकामध्ये मी गावातील ‘तांबोळी’ हे पान वाल्याचे पात्र करत होतो. नाटकामध्ये खूप पात्रे होती. या नाटकामध्ये अप्पांनी स्वतः लिहलेल्या गीतांचा समावेश केला होता, जे वामन केंद्रे यांच्या नाटकात नव्हते. ही गीते अतिशय संवेदनशीलपणे लिहिली होती. ‘दरबार सौदंत्तीचा ग सौदंत्तीचा गाजतो, काय गर्जतो त्रिभुवनी डंका! वाजवतो आई येलूच्या रेणूच्या नावाचा आकांदी जोगवा मागतो,’ अशी लोक गीते होती. जोगवा मागण्याची जी प्रथा आहे, त्या प्रथेमध्ये स्त्रीला देवाला सोडणे म्हणजे ‘झुलवा’. एकदा का तिचा झुलवा देवाशी लागला कि ती स्त्री गावातील पुरुषांना उपभोगायला सोडून द्यायची, प्रथा आहे. अशाच एका जोगीणीवर हे नाटक आणि कादंबरी बेतलेली आहे.

वामन केंद्रे यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘झुलवा’चे अनेक ठिकाणी प्रयोग झाले. तरी हे नाटक स्वतःच्या पद्धतीने  बसवावे, अशी आप्पाची इच्छा होती. त्यामुळे अप्पाने स्वतःहा बसविलेल्या या नाटकात मी आणि माझ्या नेस वाडिया महाविद्यालयातील अनेक मित्र या नाटकात काम करत होतो.

आमच्या महाविद्यालयामध्ये बुक लव्हर्स क्लब होता. या क्लबमध्ये ग्रंथालयात दर महिन्याला एका लेखकाला बोलावले जाई व त्या लेखकाच्या पुस्तकावर विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करीत. अशाच एका कार्यक्रमासाठी उत्तम बंडू तुपे आले होते. तेथे आमची ओळख झाली. यातूनच नाटकात काम करू इच्छिणाऱ्यांनी त्यांना संपर्क केला होता.

नाटकाच्या तालमी जवळ जवळ दोन तीन महिने चालल्या. तालमी करत असताना उत्तम बंडू तुपे त्यांचे अनेक अनुभव आम्हाला सांगत. हि जोगवा पद्धत माणसाचे शोषण कसे करते, याचे उदाहरण देऊन माहिती देत. अप्पा अशा जोगत्या मंडळींमध्ये राहिलेले होते. त्यांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले होते. अप्पांचे शिक्षण जास्त झाले नव्हते, तरीही त्यांची शब्दांवरील पकड आणि दृश्य रंगवण्याचे कसब त्यांच्याकडे तुफान होते.

उत्तम बंडू तुपे मुळा रोड वरील एका झोपडपट्टीत राहत असंत. घर अतिशय साधे. वर लोखंडी पत्रा. घरात एक लोखंडी कॉट, काही भांडी त्यात एक मांजर एक कुत्रे असा संसार होता. ते भर वस्तीत मध्यवर्ती ठिकाणी राहत असल्याने सगळीकडे लोक त्यांना ओळखत असत.

त्या घरामध्ये ते आम्हाला बोलावयाचे, जवळ जवळ वीस ते बावीस कलाकार, ते आणि त्यांची पत्नी ज्यांना आम्ही जीजी म्हणत असू, आम्ही एकत्र त्या छोट्याश्या घरात जमायचो. दहा बाय दहा ची खोली असूनही, त्यात एक लोखंडी कपाट होते आणि त्यात भरगच्च पुस्तके होती. तिथेच नाटकाचे वाचन व्हायचे.  नाटकाविषयी आणि इतर अनेक विषयांवर ते आम्हाला माहिती द्यायचे. हलाखीची परिस्थिती असूनही अप्पा स्वतः दूध, साखर आणून आम्हाला सर्वांना प्रेमाने चहा पाजायचे. आम्ही आमचे घरून नेलेले डबे तेथेच खात असू. कधी कधी तर गप्पा मारता मारता मध्यरात्र केव्हा व्हायची, हे देखील कळायचे नाही. जीजी नेहमी म्हणायची, “पोरांनो माझ्या दादल्याच्या हाती सरस्वती हाय, पण लक्ष्मी न्हाई”. कारण एवढे उत्तम दर्जाचे लेखन, दलित साहित्यातील एक महत्वाचे नाव असूनही खूप हलाखीच्या परिस्थितीमध्ये अप्पा व त्यांच्या कुटूंबियांना दिवस काढावे लागत होते. मराठी साहित्य अभ्यासात असताना मी त्यांची इतर पुस्तकेही वाचून काढली होती. त्यातील ‘खुळी’, हे पुस्तक देखील मला महत्वाचे वाटते. उत्तम बंडू तुपे यांचे काट्यावरची पोटं हे आत्मचरित्र लिहलेले आहे तेही आम्ही त्या काळात वाचून काढले.

उत्तम बंडू तुपे यांनी बसवलेल्या आमच्या ‘झुलवा’ या नाटकाचे फारसे प्रयोग झाले नाहीत. माझ्या स्मरणशक्ती प्रमाणे केवळ तीन किंवा चारच प्रयोग आम्ही केले. एक प्रयोग पिंपरी येथे आचार्य अत्रे सभागृहात आणि सदाशिव पेठेतील भरत नाट्य येथे दोन तीन प्रयोग झाले, त्यानंतर हे नाटक आर्थिक अडचणींमुळे आणि काही काही कलाकार नाटक सोडून गेल्यामुळे बंद पडले. परंतु उत्तम बंडू तुपे यांच्याबरोबर जो वर्षभराचा काळ मी घालवला, तो मला खूप काही शिकवून गेला.

‘झुलवा’ नाटक बसवताना ते कलाकारांना अँक्शन करून दाखवत असत तेव्हा शारीरिक हालचालींना रंगमंचावर किती महत्त्व असते हे त्याचवेळी समजले. आज दिग्दर्शक म्हणून काम करताना त्याचा खूप उपयोग होतो. नाटकात ‘परसू’ नावाचे एक पात्र होते. ते साकारणे ही अवघड गोष्ट होती. ना धड पुरुष ना बाई असे ते पात्र होते. त्याची टाळी वाजवण्याची, चालण्याची, बोलण्याची, डोळ्यांची सर्व नक्कल अप्पा स्वतः करून दाखवत असत. या नाटकामध्ये अनेक शिव्या आहेत, परंतु या शिव्या इतक्या वेगळ्या असत की त्यातील शब्द त्यांचे हेल आप्पा सहज करून दाखवत असत.

अंगी लेखन कला असूनही इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये आयुष्य काढावे लागते, याची बोच अप्पांना नेहमी असायची. मात्र अप्पांकडे आत्मविश्वास खूप कमालीचा असे. एखाद्या महत्वाच्या ठिकाणी जायचे, म्हंटले की  अप्पा मस्त पैकी ठेवणीतला एखादा शर्ट पॅन्ट आणि जमलंच तर जुना ब्लेझर अन त्यावर काळाचष्मा घालायचे. अप्पा एखाद्या आफ्रिकन किंवा चिनी देशातील रुबाबदार कलाकार वाटे. स्वतःचे जीवन, स्वतःचे अनुभव, स्वतःचे लेखन याविषयी हा माणूस प्रचंड पॅशीनेट होता भन्नाट होता. इतकी अडचण असूनही ते कधी निराश दिसायचे नाहीत.

अप्पांचे जुने घर शासनाने बांधून दिल्याची बातमी मध्ये समजली. मी अप्पांना फोन केला, तेंव्हा तिकडून अप्पा नुसतेच हुं हुं करत होते. काही तरी बोलायचा प्रयत्न करत होते. त्यांनी मला माझ्या नावावरून कधीच ओळखले नसते. त्यांना माझ्या नाटकातील पात्राचे नाव सांगितले, की ते ओळखायचे. परंतु त्यादिवशी सध्यांकाळी मी परत फोन केल्यावर, त्यांच्या मुलाने सांगितले, की अप्पा पक्षघातामुळे बोलू शकत नाहीत. मी त्यांना भेटायला येईन, असे कळवले मात्र त्याआधीच आज अप्पा गेल्याची बातमी आली.

दलित साहित्य अभ्यासणाऱ्यानीच उत्तम बंडू तुपे यांचे साहित्य वाचावे असे नाही, तर त्यांनी लिहलेले साहित्य, कथा, कांदंबऱ्या या खूप उत्तम दर्जाच्या आणि सर्वांनाच साहित्याचा आनद देणाऱ्या आहेत. या साहित्यामध्ये ग्रामीण जीवन, तेथील भवताल,  माणसे, रूढी, परंपरा व माणसाला माणूस म्हणून जगू द्या असा संदेश नेहमीच दिसत आला आहे.

राहून राहून नेहमी असे वाटते की एवढा संवेदनशील लेखक इतर दलीत लेखंकपासून अलिप्त कसा राहिला. अर्थात उत्तम बंडू तुपे यांची राजकीय भूमिका आम्ही कधी समजावून घेतली नाही किंवा तशी वेळ ही आम्हा कलाकारांवर त्यावेळी आली नाही.

अप्पा गेल्यावर अशा अनेक आठवणी मनात दाटून आल्या आणि मला ‘झुलवा’मधील ओळ आठवली. फुलाफुलावर दव पडल्यावर तू गेल्याचे कळले होते….!

धनंजय भावलेकर, लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: