रोमान्स, ऋषी कपूर यांचे शक्तिस्थान होते. रोमॅण्टिक होणे ही त्यांची अभिनयातली सहजवृत्ती होती…
नव्वदच्या दशकात आमचा एक गीतकार मित्र अचानक वाट्याला आलेल्या यशाने सुखावून गेला होता. परंतु, अल्पावधीतच त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गळेकापू स्पर्धेची आणि रंगाढंगाची कल्पना येऊ लागली होती. एका बाजूला त्याच्या सुपरहिट गाण्यांनी धुमाकूळ घातलेला असताना, एक दिवस तो निराश अवस्थेत, बांद्र्याच्या त्याच्या दुकानात परतला. बहुदा त्याचा भ्रमनिरास झाला होता. कलाकारांमधले राजकारण त्याला पेलवत नव्हते. प्रचंड संतापाने, नैराश्याने तो म्हणाला- साले, सब जंगली लोग है, जंगल का कानून चलता है, यहाँ…
सर्वसामान्य माणसांना-प्रेक्षकांना चित्रपटसृष्टीचा हा बीभत्स चेहरा सहसा दिसत नाही. चित्रपटसृष्टीत आरंभालाही राजकारण आणि स्पर्धा होती, आमचा गीतकार मित्र ऐन भरात होता, तेव्हाही होती आणि आजही असणार आहे, परंतु, या ‘कट थ्रोट’ हिंदी चित्रपटसृष्टी ऊर्फ बॉलिवूडमध्ये आरंभापासूनच सगळ्या प्रकारच्या वृत्ती-प्रवृत्तींच्या कलावंत-तंत्रज्ञांना जागा होती, म्हणजे, इथे एका बाजूला दिलीपकुमार-अमिताभ बच्चनसारखे दर्जेदार नट राज्य करत होते, तिथेच दुसऱ्या बाजूला सुमार नट-नट्यांनाही जागा होती आणि त्यांच्या बी ग्रेड सिनेमांनाही जागा होती. इथे नसिरूद्दीन शहा-ओम पुरीसारखे अभिनयाचे ‘पॉवरहाऊस’ गणले जाणारे नटही आपली जागा राखून होते, तिथे याच चित्रपटसृष्टीत केवळ मेहनत, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता हे गुण असलेले धर्मेंद्र-जीतेंद्रसारखे नटही आपली जागा टिकवून होते. त्याचमुळे सर्वार्थाने सहिष्णू असलेल्या या चित्रपटसृष्टीने ऋषी कपूरसारख्या महत्त्वाकांक्षा नसलेल्या, नंबरांच्या स्पर्धेत न उतरलेल्या परंतु, अभिनयनिष्ठा चोख असलेल्या वारसदारास मानाची जागा करून देणे फारसे आश्चर्यकारक नव्हते.
‘डायनेस्टी’ अर्थात घराणेशाही हा शब्द राजकारण बदनाम झालेला आहे, तर ‘नेपोटिझम’ अर्थात नातेशाही या शब्दाने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेकदा वाद निर्माण केलेत. ऋषी कपूर हे या आज वादाचा विषय ठरलेल्या नातेशाहीचे फलित होते. ‘दी ग्रेट शो मन’ राज कपूरचा थेट मुलगा अशी त्यांची प्रारंभीची ओळख होती. त्यामुळे ज्या वयात सर्वसाधारण घरांमधल्या मुलांना आपल्याला काय करायचंय, हे ठावूक नसतं, आणि त्यांचे आईबापही कावलेले- गोंधळलेले असतात, त्या वयात राज कपूर यांच्या पुढाकाराने ‘मैं शायर तो नहीं…’ अशी साद घालत ऋषी कपूर यांनी रुपेरी पडद्यावर रोमान्स सुरू केला होता. खरे तर कपूर घराण्याची अनुवंशिकतेने मिळालेली तेज:पुंज काया आणि हट्टीकट्टी शरीरयष्टी याचे भांडवल त्यांच्याकडे असले तरीही, त्याच्या व्यक्तिमत्वात राजबिंडे म्हणावे, असे काही नव्हते. उंची-चेहरेपट्टी राजपुत्रासम नव्हती, तरीही एकूण शरीरभाषेतून झळकणारी लोभस प्रणयोत्सुकता ऋषी कपूर या व्यक्तिमत्वाला देखणेपण देऊन जात होती.
‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’ या चित्रपटांनंतर झालेला त्यांचा प्रवास अपेक्षेप्रमाणे अल्लदपणे पुढे सरकला होता. सुरुवातीच्या काही चित्रपटांनी त्यांना ‘रोमॅण्टिक स्टार’ अशी सार्थ ओळख मिळवून दिली होती. त्यांचा पडद्यावरचा प्रणय किंवा त्याची आकारास येत गेलेली प्रणयशैली त्यांचे एक काका शशी कपूर यांच्याप्रमाणे सालस नव्हे, दुसरे काका शम्मी कपूर यांच्यासारखी थोडीशी आक्रमक, थोडीशी धसमुसळा, पण सभ्यतेच्या चौकटी न मोडणारी अशी होती..
खरे तर ऋषी कपूर यांचा उदय आणि बहर नि अमिताभ बच्चन नावाच्या महावादळाची धडक ही एकाच काळातली घटना होती. त्या महावादळाच्या प्रभावात अनेक नट दूर फेकले जाण्याची शक्यता असताना, फार थोडे नट पाय घट्ट रोवून केवळ आपल्या प्रतिभेच्या बळावर ठामपणे उभे होते, त्यात ऋषी कपूर यांचे नाव वरचे होते. अमिताभ बच्चन ‘वन मॅन इंडस्ट्री’ ठरत असताना, ऋषी कपूर आपल्या नेमस्त अभिनय प्रकृतीला साजेशा भूमिका करण्यात दंग होते. त्यांचाही म्हणून एक चाहता वर्ग आकारास येऊ लागला होता. या चाहत्यांनी आजवर जसे त्यांच्या सहजसुंदर अभिनयावर प्रेम केले, तसेच त्यांच्या ट्रेडमार्क ठरलेल्या आकर्षक स्वेट शर्टनाही वेळोवेळी दाद दिली.
राज कपूरांचे घराणे हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे वर्चस्व राखून असले तरीही, आपणच सर्वेसर्वा असावे, आपल्याच घरातला नट पहिल्या स्थानावर असावा, अशी एरवी, जहरी सिद्ध होणारी महत्त्वांकाक्षा या घराण्यातल्या नट-नट्यांमध्ये नव्हती. ऋषी कपूरही त्याला अपवाद नव्हते. नंबर वन-नंबर टू या भानगडीत ते कधी अडकले नाहीत. स्पर्धेत उतरून कोपर-ठोपर रक्तबंबाळ करून घेण्याऐवजी काळाची पावले ओळखून कारकीर्दीच्या ऐन भरात असताना त्यांनी ज्याला हल्ली ‘सेकंड लीड’ म्हणतात, तशा सहनायकांच्या भूमिकाही तितक्याच समरसतेने रंगवल्या. आश्चर्य म्हणजे, महावादळ ठरलेल्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची जोडी एकेकाळी खासच गाजली. ‘अमर-अकबर-अँथनी’, ‘नसीब’, ‘कुली’ यात त्यांनी खऱ्या अर्थाने धमाल उडवून दिली. अर्थातच, रोमान्स हे ऋषी कपूर यांचे शक्तिस्थान होते. रोमॅण्टिक होणे ही त्यांची अभिनयातली सहजवृत्ती होती.
हिंदी चित्रपटांमध्ये, विशेषतः गेल्या शतकातल्या चित्रपटांमध्ये प्रणय करणारा नायक ही एक सरळसोट घटना असे. म्हणजे, नायकाने प्रणयराधन करताना, तिच्यावर चोरून नजर ठेवायची, तिचा पिच्छा करायचा, मग झाडांभोवती गोल फेर धरत गाणी म्हणत राहायची, पण आजच्या तरुणाईच्या भाषेत ‘बकवास अँड बोअरिंग’ भासणाऱ्या या घटनेलाही ऋषी कपूर यांनी बहारदार रंगढंगात पेश केले. प्रेम करणाऱ्या नायकाच्या ठायी असलेला उतावीळपणा (खेल खेल में, कभी कभी) प्रेमात आकंठ बुडून जाण्यातली इर्षा, वाट्याला येणारी हतबलता ( चांदनी), होत असलेला कोंडमारा (सागर, दामिनी, दिवाना) त्यांच्याइतका प्रभावी दुसऱ्या कुणा नटाने अभावानेच पेश केला. किंबहुना, हा गृहस्थ प्रयत्नपूर्वक अभिनय करतोय, असे कधीही प्रेक्षकांना जाणवले नाही. वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला ऋषी कपूर यांनी प्रेमपूर्वक न्याय दिला. त्यातही गंमत अशी की, मोजक्याच काही भूमिका वगळता, त्यांच्या भूमिकांची नावे कधी कुणाच्या लक्षात राहिली नाही, भूमिका कोणताही असो, चित्रपट कोणताही असो, परिचित संवादफेक आणि शरीरभाषेसह ऋषी कपूर म्हणूनच ते वावरले, परंतु तरीही चाहत्यांनी, त्यांचे चाहते नसलेल्या प्रेक्षकांनी त्यांचा स्वीकार केला, याचे एकमेव कारण, त्यांच्या अभिनयातला सहजसुंदरपणा, त्यांचा पडद्यावरचा नैसर्गिक वावर हेच होते.
अर्थातच, रोमॅण्टिक नट म्हणून सद्दी पुढे नेताना, ऋषी कपूर यांना काळाचे भानही होते, आणि चित्रपटसृष्टीतल्या-चित्रपटसृष्टीबाहेरच्या बदलत्या दुनियेचा पुरता अंदाजही होता. नंबरांच्या स्पर्धेत तर ते त्यांच्या भराच्या काळातही नव्हते, त्यामुळे आता पहिला अवतार संपला आहे, याचा अदमास येताच, त्यांनी फारशी खळखळ न करता ‘स्वेच्छा निवृत्ती’चा मार्ग निवडला आणि मुलाच्या, रणबीर कपूरच्या यशाचे साक्षीदार होण्यात स्वतःचा आनंद शोधणे अधिक पसंत केले. मात्र, नट कितीही वय झाले, कशीही परिस्थिती ओढवली, तरीही अंतर्बाह्य नटच राहतो. त्यातले ते नैसर्गिक गुण क्षणभर विश्रांती तेवढी घेतात. पण जसे बोलवणे येते, चेहऱ्याला रंग लागतो, लाइमलाइटचा झोत त्या चेहऱ्यावर पडतो, तसे गुण पुन्हा एकदा उसळी मारून वर येतात. तसेच काहीसे ऋषी कपूर यांच्याबाबतीतही घडले. अभिनय कारकीर्दीला अर्धविराम देऊन त्यांनी ‘आ अब लौट चलें’ च्या निमित्ताने दिग्दर्शनातही स्वतःला आजमावून पाहिले. पण ओढा कायमच अभिनयाकडे राहिला. सुदैवाने, त्यांच्याही वाट्याला पुनरागमनाची संधी आली. जेव्हा ती आली, तेव्हा मल्टिप्लेक्स संस्कृतीच्या अपेक्षा आणि मागणी यानुसार त्यांनी आनंदाने आपल्या अभिनयशैलीत सुखकारक असे बदल घडवून आणले. त्याचा प्रत्यय ‘अग्निपथ’, ‘कपूर अँड सन्स’, ‘औरंगजेब’, ‘तहजीब’, ‘फना’, ‘नमस्ते लंडन’, ‘ओम शांती ओम’, ‘पतियाळा हाऊस’, ‘स्टुडंट ऑफ द एअर’, ‘डी-डे’, ‘शुद्ध देशी रोमान्स’, ‘मुल्क’,’१०२ नॉटआउट’ या त्यांच्या अलीकडच्या काळातल्या चित्रपटांतल्या भूमिकांनी दिला. तोच पूर्वीचा उत्साह, तोच सहजपणा आणि तीच बिनतोड अभिनयनिष्ठा.
स्वेच्छा निवृत्तीनंतरची त्यांची ही दुसरी कारकीर्द हळूहळू का होईना, बहराच्या दिशेने जाऊ लागली होती. जी संधी अमिताभ बच्चनादी त्याच्या समवयस्कांना चालून आली, तशीच संधी नि शक्यता ऋषी कपूर यांच्याबाबतीत दिसत होत्या, परंतु कर्करोगाच्या दुखण्याने अभिनयातल्या या प्रणयकुमाराच्या आकांक्षांना अकस्मात वेसण घातली. महत्त्वाकांक्षा तर त्यांच्यात तशीही नव्हतीच. मात्र, वाढते वय, वाढत्या व्याधींनी सक्तीची स्थळबद्धता त्यांच्यावर लादली. पण म्हणून या काळात त्यांच्यातला सजग माणूस स्वस्थ बसला नाही. त्यांनी स्थानिक नागरी समस्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाजही उठवला आणि आपली राजकीय-सामाजिक प्रश्नांवर प्रसंगी बालिश भासणारी मतेही त्यांनी बेधडकपणे नोंदवली.
कर्करोगासारखे जीवघेणे ठरणारे आजार एका पातळीवर माणसाला शारिरीक पातळीवर खचवून टाकत असले तरीही हेच आजारपण माणसामध्ये मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारे मानसिक बळही पुरवत असते. या अवस्थेत माणूस सर्वार्थाने सगळ्यांपासून मुक्त होत जातो. भय, भीती, अस्वस्था, अस्थिरता मागे पडत जाते, अनेकांना या प्रवासात खराखुरा ‘स्व’ सापडतो.
अखेरच्या क्षणीसुद्धा ऋषी कपूर यांनी हॉस्पिटलमधल्या नर्सेस आणि डॉक्टरांना हसते ठेवल्याचे सांगितले गेले, त्यावेळी ऋषी कपूर यांच्याही बाबतीतही बहुदा हेच घडले असावे. त्यांचे असे साद-प्रतिसाद देणे त्यांच्या पडद्यावरच्या सदा उत्फुल्ल व्यक्तिरेखांना साजेसेही होते. त्या अर्थाने, ‘बॉबी’च्या या ‘इटर्नल’ प्रियकराच्या पडद्यावरच्या आयुष्यात आणि प्रत्यक्ष जगण्यात एकप्रकारची सुखकारक सुसंगतीच होती आणि हीच ऋषी कपूर नावाच्या गुणसंपन्न नि बहारदार नटाची खरीखुरी ओळख होती!
शेखर देशमुख, हे ज्येष्ठ पत्रकार असून, लेखक आणि ग्रंथसंपादक आहेत.
COMMENTS