सेंट पीटर्सबर्ग कामगारांची त्सारला याचिका, २२ जानेवारी १९०५

सेंट पीटर्सबर्ग कामगारांची त्सारला याचिका, २२ जानेवारी १९०५

१ मे: कामगार दिनाच्या निमित्ताने - १०० वर्षांपूर्वी रशियातील कामगारांनी त्यांच्या त्सारला (राजाला) लिहिलेली याचिका, त्यांचा त्सार हा ईश्वरी अवतार असल्याचा भाबडा विश्वास, त्यांचा विश्वासघात व त्यांचे बलिदान आजच्या कामगारांसाठी खूप महत्वाचे असतात. ही याचिका वाचताना तत्कालीन त्सारशाही व आजची लोकशाही व्यवस्था यांची तुलना टाळता येत नाही.

आतिश तासीर यांचे ओसीआय कार्ड रद्द
लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेचे आदेश
चीन नव्हे तर अमेरिकेशी भारताचा सर्वाधिक व्यापार

जगभरातील कामगार चळवळ एक मोठा संघर्ष करून २१व्या शतकात पोहोचली आहे. जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांच्या आजच्या परिस्थितीचं विश्लेषण करत असताना अनेकदा इतिहासाकडे वळावे लागते. कारण शोषित-पीडित जनतेला आज स्वाभाविक वाटणारे अनेक मानवी हक्क हे पिढ्यानुपिढ्या त्यांनी केलेल्या संघर्षातून, बलिदानातून प्राप्त झालेले असतात.

जगभरात व त्याचप्रमाणे भारतात चालू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेला ‘लॉकडाऊन’ सर्वांसाठीच एक अभूतपूर्व अनुभव आहे. सतत ‘घरात राहा – सुरक्षित राहा’ असा संदेश शासनाकडून मिळत असताना असंघटीत, कंत्राटी, रोजंदारी मजूर त्यांच्या घरापासून हजारो मैल दूर अडकले आणि चालत आपापल्या घरी निघाल्याचं हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आपण सर्वांनीच पाहिलं. प्रत्येक नव्या काळात, नव्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेच्या सर्वात तळाशी असणारा कामगार कायमच शासन संस्थेकडून उपेक्षित राहतो, हा अनुभव नवा नाही. एका बाजूला प्रस्थापित व्यवस्थेला, स्वस्तात किंवा शक्य असेल तर फुकट, त्यांचे श्रम हवे असतात. त्या श्रमांच्या जीवावरच तर मोठ्या शहरांतील भांडवलदारी तथाकथित ‘विकास’ दृश्य स्वरूपात अस्तित्वात येत असतो. पण त्याच वेळी माणूस म्हणून त्यांच्या गरजा, त्यांच्या जीवन जगण्याच्या आकांक्षा, दु:ख-वेदना व भाव-भावना आणि त्यांचे मानवी व कामगार म्हणून असलेले हक्क याबाबत शासनकर्ते नेहमीच असंवेदनशील असतात. म्हणूनच आजही मानवी हक्कांसाठी त्यांचा संघर्ष आवश्यक बनतो.

रशिया, १९०५:

२०व्या शतकाच्या सुरुवातीस अतिरिक्त उत्पादनाच्या परिणामी  आलेली जागतिक संकटस्थिती व मंदी रशियातही आली. उत्पादनाची विक्री ठप्प झाली. भांडवलदारांनी उत्पादन थांबवलं. कामगारांच्या पगारात कपात केली. त्यांना कामावरून काढून टाकलं. १९०५ सालचं रशिया-जपान युध्द आणि त्यातील रशियाचा पराभव लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या भयंकर संकटाचा होता. करात वाढ झाली आणि अन्नधान्याच्या किंमती वाढल्या. त्सारशाहीबद्दल असंतोष टोकाला पोहोचला. कामगार व शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु झाली.

शासनाला लोकांचं लक्ष त्सारशाहीविरोधी संघर्षापासून दूर करायचं होतं. १९०४ मध्ये पाद्री गिओर्गी गापोन यानं पीटर्सबर्गमध्ये ‘असेम्ब्ली ऑफ रशियन फॅक्टरी अँड मिल वर्कर्स ऑफ सेंट पीटर्सबर्ग’ ही संघटना स्थापन करून कामगारांना संघटीत केलं. गापोनला पोलिस विभागाची मदत होती, शिवाय जपानी सैन्यातील एका अधिकाऱ्याचं वित्तीय सहाय्य होतं. कामगारांच्या हक्काचं रक्षण करणं आणि त्यांचा नैतिक व धार्मिक दर्जा उंचावणं, हा संघटनेचा उद्देश होता. फक्त रशियन ऑर्थोडॉक्स धर्माचे लोकच संघटनेत पद ग्रहण करण्यास पात्र  होते.  लवकरच हजारो कामगार त्याच्या संघटनेचे सदस्य झाले. पित्याला जशी आपल्या मुलांची काळजी असते, तशी त्सारला आपल्या प्रजेची काळजी आहे, असा विश्वास गापोननं त्यांना दिला. एका कारखान्यातील त्याच्या संघटनेच्या चार कामगारांना नोकरीतून काढून टाकलं. तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांनी संप केला. त्यांना इतर कारखान्यातील कामगारांनी पाठींबा दिला. ७ जानेवारी, १९०४ रोजी शहरातील सर्व कारखाने बंद राहिले.

 ‘रक्‍तरंजित रविवार, १९०५’

‘रक्‍तरंजित रविवार, १९०५’

गापोन यानं त्सारला एक याचिका देण्याचा प्रस्ताव मांडला. हजारो कामगारांनी त्याला मान्यता दिली.  परंतु त्सारनं कामगारांना भेटण्यास नकार दिला. उलट सर्व रस्त्यांवर सैन्य उभं केलं. रक्तपात टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध लेखक मक्सीम गोर्कीच्या नेतृत्वाखाली मंत्र्याशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ झाला. ९ जानेवारी, १९०५ रोजी शहराच्या कानाकोपऱ्यातून १४०००० निदर्शक लोक त्सारची भेट घेण्यासाठी विंटर पॅलेसच्या दिशेनं चालत गेले. सर्वात पुढे चर्चचे बॅनर, येशू ख्रिस्त व संतांच्या प्रतिमा आणि त्सारची चित्रं होती. ते अतिशय आनंदानं “हे ईश्वरा, त्सारचे रक्षण कर…” हे राष्ट्रगीत गात होते. त्यामुळे सैनिक गोळ्या झाडणार नाहीत, असं कामगारांना वाटत होतं. परंतु सैनिकांनी अचानक गोळीबार केला. लोकांना तलवारी, संगिनी, चाबुकांनी मारले. घोड्यांच्या टाचांखाली तुडवले. १००० पेक्षा जास्त लोक ठार झाले, ४००० जखमी झाले. गापोन पळून गेला. ही अतिशय थंड रक्ताने केलेली हिंसा होती. हा प्रसंग इतिहासात ‘रक्‍तरंजित रविवार’ (Bloody Sunday) म्हणून ओळखला जातो. परिणामी लोकांचा त्सारवरील विश्वास उडाला. देशभर असंतोष माजला. त्सारचा निषेध करत संप झाला. या अमानुष हिंसेला प्रतिक्रिया म्हणून युरोपातील फ्रान्स, इटली, जर्मनी, इंग्लंड अशा अनेक देशांच्या रशियन राजदूतावासासमोर निदर्शनं झाली. रशियात क्रांतीचे वादळ घोंघावू लागले.

त्सार निकोलस दुसरा (१८६८-१९१८)

त्सार निकोलस दुसरा (१८६८-१९१८)

नुकतेच २२ एप्रिल रोजी ज्याची १५०वी जन्म शताब्दी जगभरातील श्रमिकांनी साजरी केली, त्या  व्लादीमिर इल्यीच उल्यानव-लेनिन (१८७०-१९२४) या क्रांतिकारी नेत्याचा उदय अशा  स्फोटक परिस्थितीत झाला. १९०६ मध्ये गापोनची खरी भूमिका उघड झाल्यानंतर त्याचा खून करण्यात आला.

सेंट पीटर्सबर्गमधील कामगारांनी त्सार निकोलस दुसरा याला केलेली, गिओर्गी गापोन लिखित याचिका आणि तिचा आशय आजही आपल्याला कामगारांची भीषण परिस्थिती व त्यांच्या शासन संस्थेकडून असलेल्या अपेक्षेबाबत जागरूक करतात.

मूळ रशियनमधून मराठीत अनुवाद:

‘रक्तरंजित रविवार’ (Bloody Sunday), २२ जानेवारी, १९०५ रोजी सेंट पीटर्सबर्गमधील कामगारांची त्सार निकोलस दुसरा याला केलेली, पाद्री गिओर्गी गापोन लिखित याचिका. त्यावर जवळपास १,३५,००० कामगारांच्या सह्या आहेत. (‘द स्टोरी ऑफ माय लाईफ’, फादर गापोन.  चैपमन अँड हॉल, १९०६, लंडन.)

———

हे त्सार,

आम्ही सेंट पीटर्सबर्गचे, विविध कारखान्यांतील, कामगार व रहिवासी, आमच्या बायका व मुले आणि आमचे असहाय्य वृद्ध स्त्री-पुरुष पालक, हे त्सार, न्याय व संरक्षणाच्या शोधात तुझ्याकडे आलो आहोत.

आम्ही दरिद्री झालो आहोत. ते आमचा छळ करतात, असह्य कष्टाचं ओझं आमच्यावर लादतात, आमच्याशी अपमानास्पद वागतात. आम्हाला माणूस समजत नाहीत, आमच्याशी गुलामासारखा व्यवहार करतात, ज्यांनी आपलं कटू प्राक्तन शांतपणे सहन केलं पाहिजे आणि गप्प राहिलं पाहिजे.

आम्ही हे सहन करत राहिलो, परंतु आम्हाला ते दारिद्र्य, हक्कांचा अभाव व अज्ञानाच्या खोल दरीत ढकलत आहेत. हुकुमशाही आणि निरंकुश मनमानी करून गुदमरवत आहेत. आता आमचा श्वास कोंडतो आहे. हे त्सार, आमच्यात आता शक्ती नाही. सहनशक्तीची सीमा गाठली आहे. आमच्यासाठी तो भयानक क्षण आला आहे, जेव्हा असह्य यातना सुरु राहण्यापेक्षा मृत्यू जास्त चांगला असतो.

आणि म्हणूनच आम्ही काम सोडले आहे आणि आमच्या मालकांना सांगितले आहे की जोवर ते आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत, तोवर आम्ही काम पुन्हा सुरू करणार नाही. आम्ही थोडंच मागितलं आहे.  आम्हाला फक्त तेच हवं आहे, ज्याशिवाय हे जीवन नसतं, तर तुरुंग आणि शाश्वत यातना असतं.

आमची पहिली विनंती अशी होती की आमच्या मालकांनी आमच्याबरोबर आमच्या गरजांबाबत चर्चा करावी. परंतु ती नाकारण्यात आली. कायदा आमच्यासाठी तसा हक्क मान्य करत नाही, हे कारण देऊन आमच्या गरजांविषयी बोलण्याचा आमचा हक्क त्यांनी नाकारला. आमच्या या मागण्याही बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत:  दिवसाला कामाचे तास आठ इतके कमी करावेत, आमच्या कामाचं मूल्य आमच्याबरोबर व आमच्या सहमतीने निश्चित करावे, आमच्या व कारखान्यांतील कनिष्ठ व्यवस्थापनामधील गैरसमजांचा विचारपूर्वक निर्णय व्हावा, अकुशल पुरुष कामगार व महिलांचे प्रतिदिन वेतन एक रुबलपर्यंत वाढवले जावे, ओव्हरटाइम रद्द करावा, आमच्यावर काळजीपूर्वक व आमचा अपमान न करता उपचार व्हावेत, प्रशिक्षण वर्ग अशा रीतीने भरवावेत की जेणेकरुन आम्हाला काम करणं शक्य होईल आणि भयंकर वारा, पाऊस आणि हिमवर्षावामुळे आम्हाला मृत्यू येणार नाही.

आमचे मालक व कारखाना व्यवस्थापनांच्या मते हे सर्व कायदाविरोधी आहे. आमची याचना हा गुन्हा आहे,  तर आपली स्थिती सुधारण्याची आमची इच्छा हे दुस्साहस आहे, त्यांच्यासाठी अपमानजनक आहे.

त्सार, इथे आम्ही लाखो जण आहेत, आणि हे सर्वजण केवळ रूपाने, केवळ बाह्यत: माणसे आहेत. प्रत्यक्षात आमच्यासाठी, अगदी जसे सर्व रशियन लोकांसाठी, ते एकही मानवी हक्क मान्य करत नाहीत. अगदी बोलणे, विचार करणे आणि एकत्र जमणे, गरजांबाबत चर्चा करणे आणि आपली स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करणे हेही हक्क त्यांना मान्य नाहीत.

आम्हाला गुलाम बनवले आहे. तुझ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली, त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने गुलाम बनवले आहे. आपल्यापैकी जो कुणी कामगार वर्ग व सामान्य लोकांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी आवाज उठविण्याचे धाडस करेल, त्याला तुरूंगात टाकले जाते, हद्दपार केले जाते. दयाळू अंतःकरण, संवेदनशील आत्मा याबद्दल एखादा गुन्हा असल्यासारखी शिक्षा दिली जाते. पिडीत, हक्कांपासून वंचित, थकलेल्या माणसाला दया दाखवणे म्हणजे घोर अपराध करणे आहे.

सेंट पीटर्सबर्ग कामगारांची त्सारला याचिका

सेंट पीटर्सबर्ग कामगारांची त्सारला याचिका

लोकांच्या हिताची बिलकुल काळजी न करणाऱ्या, एवढेच नव्हे तर त्यांचे हित पायदळी तुडवणाऱ्या  लुटेरे, दरोडेखोरांनी बनलेल्या शासनाच्या अधिकारी वर्गाच्या मनमानीसाठी कामगार व शेतकरी असे सर्व लोक समर्पित केले आहेत. अधिकारी वर्गाच्या शासनाने देशाला संपूर्ण विनाशापर्यंत नेले आहे, त्याच्यावर लज्जास्पद युद्ध लादून आता ते रशियाला पुढे ऱ्हासाकडे नेत आहे. आमच्याकडून गोळा केलेला प्रचंड कर खर्च करण्याबाबत   आम्ही, कामगार व लोक, यांना काहीही बोलता येत नाही. दरिद्री लोकांकडून गोळा केलेले पैसे कुठे आणि कशावर खर्च होतात, हे आम्हाला माहितही नाही.  लोकांना आपल्या इच्छा, मागण्या व्यक्त करण्याची, कर लावणे व त्यांचा व्यय यात सहभाग घेण्याची संधी नाही. स्वत:च्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी युनियनमध्ये संघटीत होण्याच्या संधीपासून कामगार वंचित आहेत.

हे त्सार! ज्या ईश्वरी कायद्यांच्या दयेनं तू राज्य करत आहेस, त्यांच्याशी हे सुसंगत आहे का? अशा कायद्यांनुसार जीवन जगणे खरंच शक्य आहे का? संपूर्ण रशियाच्या आम्हा सर्वांना, कष्टकरी लोकांना मरणंच अधिक चांगलं नाही का?  कामगार वर्गाचे भांडवलदार-शोषक आणि रशियन जनतेचे अधिकारी-लुटेरे, दरोडेखोर जगू देत व  मौज करू देत.

हेच भविष्य, हे त्सार, आमच्यासमोर आहे आणि तेच आम्हाला तुझ्या राजवाड्याच्या भिंतींसमोर एकत्र घेऊन आलं आहे. आम्ही अखेरची मुक्ती शोधत आहोत. तुझ्या लोकांच्या मदतीस नकार देऊ नकोस. त्यांना हक्कांचा अभाव, दारिद्र्य व अज्ञानाच्या कबरीमधून बाहेर काढ. त्यांना स्वत:चं नशीब, स्वत:च घडवण्याची संधी दे. अधिकारी वर्गाच्या असह्य अत्याचारापासून त्यांची सुटका कर. तू आणि तुझी जनता यांच्यामधील भिंत तोडून टाक. तिला तुझ्यासोबत या देशावर राज्य करू दे. तू जनतेच्या सुखासाठी या पदावर आहेस, आणि अधिकारी वर्ग हे सुख आमच्या हातांतून हिसकावून घेत आहेत, ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्हाला फक्त दु:ख आणि  अवमान मिळतो.

क्रोधाविना, लक्षपूर्वक आमच्या मागण्यांकडे पहा. आमच्यासाठी, आणि तुझ्यासाठीही त्या वाईटाकडे नव्हे, तर भल्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या आहेत. हे आमच्यातील दुस्साहस बोलत नाही, तर सर्वांसाठीच असह्य परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या गरजेची जाणीव हे बोलत आहे. रशिया खूप मोठा आहे, त्याच्या गरजा विविध प्रकारच्या व खूप आहेत. एकट्या अधिकारी वर्गानेच हा देश चालवू शकतील असं नाही. त्यात [लोकांचं] प्रतिनिधित्व असलं पाहिजे, लोकांनी स्वत:चीच मदत करण्याची, स्वत:वरच राज्य करण्याची गरज आहे.   त्यांनाच त्यांच्या खऱ्या गरजा माहित आहेत. त्यांची मदत नाकारू नको,  ती घे. आत्ताच रशियन भूमीच्या प्रतिनिधींना, सर्व वर्गांच्या, सर्व स्तरांच्या प्रतिनिधींना, कामगारांच्याही प्रतिनिधींना बोलावण्याची ताबडतोब आज्ञा दे. तिथे भांडवलदारही असूदे, कामगारही असूदे, अधिकारीही असूदे, डॉक्टर व शिक्षकही असूदे. सर्वजण,  मग ते कुणीही असु देत, आपले प्रतिनिधी निवडू देत. निवडीच्या अधिकारात  प्रत्येक जण समान व स्वतंत्र असूदे.  यासाठी अशी आज्ञा दिली जावी की संविधान सभेच्या निवडणुका सार्वत्रिक, गुप्त व समान मतदानाच्या स्थितीत व्हाव्यात.

ही आमची सर्वात महत्त्वाची विनंती आहे. सर्व काही त्यावर आधारित आहे. आमच्या वेदनादायी जखमांसाठी ही प्रमुख व एकमेव मलमपट्टी आहे. त्याशिवाय या जखमा खूप भळभळत राहतील आणि आम्हाला वेगानं मृत्यूकडे घेऊन जातील.

परंतु एकच उपाययोजना आमच्या सर्व जखमा बऱ्या करू शकत नाही. अजून इतरही उपाय आवश्यक आहेत. आणि आम्ही थेट व उघडपणे, पित्यासारखे, हे त्सार, तुला  रशियाच्या संपूर्ण कष्टकरी वर्गाच्या वतीने त्यांच्याबद्दल सांगत आहोत.

आवश्यक आहेत:

 1. रशियन लोकांचं अज्ञान आणि हक्कांचा अभाव या विरोधातील उपाययोजना.
 • राजकीय व धार्मिक विश्वास, संप व शेतकऱ्यांच्या अशांतता यासाठी छळ सहन करणाऱ्यांची त्वरित मुक्तता व परती
 • व्यक्तीचे स्वातंत्र्य, व्यक्तीस मनमानी अटक आणि स्थानबद्धता नसणे, बोलण्याचे व प्रेसचे स्वातंत्र्य, एकत्र जमून सभा घेण्याचं स्वातंत्र्य,  धर्माच्या बाबतीत सद्सदविवेकाचं स्वातंत्र्य ताबडतोब जाहीर करणे
 • राज्याच्या खर्चाने सर्वसाधारण व सक्तीचे लोक शिक्षण.
 • मंत्र्यांची जनतेप्रति जबाबदारी आणि प्रशासकीय कायदेशीरपणाची हमी
 • कोणताही अपवाद वगळता कायद्यासमोर सर्वांना समानता
 • चर्च व राज्य यामध्ये फारकत
 1. लोकांच्या दारिद्र्याविरोधात उपाययोजना
 • अप्रत्यक्ष कर आकारणी रद्द करणे आणि त्यांच्या जागी प्रागतिक आयकर लागू करणे
 • जमीन पुनर्खरेदी देयक रद्द व स्वस्त पत आणि हळूहळू लोकांकडे जमीन हस्तांतरण.
 • सैन्य और नौसेना विभागाच्या खरेदी मागण्यांची पूर्तता रशियातच झाली पाहिजे, परदेशात नाही.
 • लोकांच्या इच्छेनुसार युद्ध बंदी
 • भांडवलाच्या श्रमावरील अत्याचारविरोधात उपाययोजना
 • कारखान्यातील तपास अधिकारी संस्था बंद करा
 • कारखाने व उद्योगांत स्थायी कामगार निवड मंडळांची स्थापना. ती मंडळे प्रशासनाबरोबर प्रत्येक कामगाराच्या दाव्यांचे प्रश्न सोडवतील. या मंडळाच्या ठरावाशिवाय कामगाराला नोकरीतून बरखास्त करणे शक्य होणार नाही.
 • मागणीवर आधारित उत्पादनात असलेल्या व व्यावसायिक कामगारांच्या संघटनांना ताबडतोब स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
 • आठ तासांचा कामाचा दिवस आणि ओव्हरटाईमची मर्यादा
 • श्रमाच्या भांडवलाविरोधी संघर्षास ताबडतोब स्वातंत्र्य
 • ताबडतोब सर्वसाधारण वेतन
 • कामगारांच्या राज्य विम्यासंबंधीच्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात कामगार वर्गाच्या प्रतिनिधींचा ताबडतोब व अपरिहार्य सहभाग

हे त्सार, या आमच्या मुख्य गरजा आहेत, ज्या आम्ही तुझ्याकडे घेऊन आलो आहोत. त्या पूर्ण झाल्यावरच आपल्या मातृभूमीची गुलामगिरी व दारिद्र्य यापासून मुक्तता शक्य होईल, ती बहरणं शक्य होईल, कामगारांना भांडवलदारांच्या व लोकांना लुटणाऱ्या-दडपणाऱ्या अधिकारी वर्गाच्या शासनाच्या निर्लज्ज शोषणापासून  स्वत:च्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी संघटीत होणं शक्य आहे.

या मागण्या पूर्ण करण्याची आज्ञा दे, शपथ घे, आणि मग तू रशियाला आनंदी व महान बनवशील. तुझं नाव आमच्या व आमच्या भावी पिढ्यांच्या हृदयात कायमचं कोरशील. जर तू तशी आज्ञा दिली नाहीस, तर तुझं आमच्या प्रार्थनेला उत्तर नसेल. आम्ही इथेच, या चौकात, तुझ्या राजवाड्यासमोर मरू. आम्हाला इतर कुठे जायला जागाच नाही, आणि कशासाठी जाऊ. आमच्यासमोर दोन मार्ग आहेत: एकतर स्वातंत्र्य व सुखाकडे, किंवा कबरीकडे… दु:खी-पीडित रशियासाठी आमचं जीवन बलिदान असेल. आम्हाला या बलिदानाचा खेद वाटत नाही, आम्ही स्वेच्छेने ते घेऊन येत आहोत!

डॉ. मेघा पानसरे,  या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर  येथे विदेशी भाषा विभागात सहायक प्राध्यापक (रशियन भाषा) आणि प्र. विभागप्रमुख आहेत.

लेखाचे छायाचित्र  – ‘रक्‍तरंजित रविवार, १९०५’ पोलिश चित्रकार वोइचेख कोस्साकनिर्मित चित्र १९२५ .

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0