डिजीटलकरणातले नाटक : कोरोनाकाळ आणि नंतर

डिजीटलकरणातले नाटक : कोरोनाकाळ आणि नंतर

कोरोना महासाथीच्या काळात डिजीटलकरणाच्या माध्यमातून जगभरातला नाट्यव्यवहार खुला होत आहे पण याकडे आपण एक संधी आणि स्वतंत्र कलामाध्यम म्हणून पाहतोय की सध्याच्या लॉकडाऊनमधला निवांतपणा किंवा वेळ घालवण्यासाठीचे माध्यम म्हणून त्याकडे पाहतोय, हा कळीचा मुद्दा आहे.

‘राह्यनोसर्स’ – युजीन आयनेस्को
बजरंग दलाच्या विरोधामुळे इप्टाचा नाट्य महोत्सव रद्द
नाटक – जगण्याची समृद्ध अडगळ

आज भयाण असुरक्षिततेत आणि उद्विग्न अवस्थेत आपण वावरत आहोत.  उद्भवलेल्या परिस्थितीने जगणं प्रभावित केलेय असे म्हणणेही आता गुळगुळीत वाटावं इतका खोलवर प्रभाव दिसून येतोय. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर कोरोनाने आपले जाळे टाकले आहे. एका बाजूला, भीषण यातना सोसत मजूर मैलोनमैल चालत आपापल्या घरी परतत आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, दारिद्र्य वाढत चालले आहे. तर, दुस-या बाजूला सामूहिक कला म्हणून ओळखणारे नाट्यक्षेत्रही यामध्ये सपशेल ठप्प झाले आहे. चालू असणा-या तालमी, प्रयोग, प्रयोगासाठीचा प्रवास, नाट्यगृहे बंद पडली आहेत. नाटकावर पोट असणारे नट, बॅकस्टेज कलाकार न भूतो न भविष्यती अशा असुरक्षिततेला सामोरे जात आहेत.

महामारीच्या काळातही काहींनी रोवून उभं राह्यला सुरुवात केली आहे. रंगकर्मींच्या सुपीक डोक्यातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या ऑनलाइन आयडिया आकार घेत आहेत. समोरासमोर भेटता येत नसल्याने डिजीटल अवकाशात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. कलाकार, लेखकांसाठीच्या कार्यशाळा आयोजन करण्याबरोबर जगातल्या काही भागात नाटकांचे ऑनलाइन प्रयोग, ऑनलाइन नाट्य-उत्सव इत्यादी घडवून आणले जात आहे.

नाटकांच्या ऑनलाइन स्ट्रिमिंगचा व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी प्रयोग २००९ मधेच रॉबर्ट डेलामीर आणि टॉम शॉ यांनी डिजीटल थिएटरचा प्लॅटफॉर्म सुरू करून केला. डिजीटल थिएटरद्वारे वेगवेगळ्या फी आकारून उत्तमोत्तम नाटके दाखवली जातात, नाटकांविषयी चर्चा लोकांपर्यंत पोहचवल्या जातात. यासाठी, डिजीटल थिएटर नाट्यसंघातील कलाकार आणि तंत्रज्ञांबरोबर काळजीपूर्वक काम करून उत्कृष्ट निर्मितीमूल्य असणारे नाट्यप्रयोग आणि चर्चा लोकांपर्यंत आणतात. ‘रॉयल शेक्सपिअर कंपनी’, ‘रॉयल कोर्ट’, ‘यंग व्हिक’ अशा नामांकित कंपन्यांशी डिजीटल थिएटर टाय अप करते.

डिजीटल थिएटरमुळे ज्यांना नाटक बघायला जाणे शक्य नसते त्यांना आपल्या घरातल्या पडद्यावर किंवा मोबाइलवरही नाटक पाहाता येते. काही जण अशा भागात राहात असतात की जिथे नाटकच जात नाही. शिवाय, आर्थिक किंवा सामाजिक कारणांमुळे सुद्धा काहींना नाटके पाहायला मिळत नाहीत अशा वेळेला नाटकांचे डिजीटलीकरण आणि त्यांचे स्ट्रिमिंग वरदान ठरते. थोडक्या रकमेत किंवा अगदी मोफतसुद्धा असे प्रयोग ऑनलाइन पाहाता येऊ शकतात. ‘डिजीटल थिएटर’ या कंपनीने शैक्षणिक संस्थांसाठीसुद्धा यात सहभागी करून घेतले आहे.  यातून संस्थेमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना फायदा होतो.

नाट्यगृहात जाऊन नाटक पाहाणे सर्वांसाठीच सहजशक्य असते असे नाही. बस, ट्रेन किंवा आणखी कुठले तरी वाहन पकडून नाटक पाहायला जा. गेल्यावर बसायला बरी जागा मिळाली तर ठीक नाहीतर खेटून बसून नाटक पाहा. शिवाय, मोबाइलचा त्रास आहेच. मग फुकट आपल्या रंगमंचावरल्या कलाकारांकडे इतक्या जवळून ऑनलाइन बघायला मिळत असेल तर? डिजीटलीकरणातली कला अनेकांना अधिक जवळची आणि परवडणारी वाटू शकते.

नाट्यसंस्था आणि कलाकारांसाठी व्हर्च्युअल प्रयोग वरदानही ठरू शकतो. नाटक उभे केल्यावर त्याच्यासाठी येणारा खर्च. त्यात येणारा प्रवास खर्च. दिवस रात्र बस, रेल्वे, विमान प्रवास करून त्या जागी पोहचा. पोहोचल्यावर प्रेक्षक येतील की नाही ही भीती. शिवाय, जागेचे भाडे. एवढं सगळं करण्यापेक्षा रेकॉर्डेड प्रयोगच लोकांपर्यंत पोहोचवणे सोयीचे असू शकते. जर तांत्रिकदृष्ट्या चांगले रेकॉर्डिंग झाले असेल आणि त्याचे स्ट्रिमिंग तेवढेच प्रभावी असेल तर तो ‘लाइव्ह’ सादरीकरणाइतकाच प्रभावी ठरू शकतो. इंग्लंडमधली ‘नॅशनल थिएटर’ ही कंपनी दर गुरुवारी त्यांची नाटके ऑनलाइन स्ट्रीम करते. अद्ययावत असे तंत्रज्ञान वापरून केले गेलेले रेकॉर्डिंग आणि स्ट्रिमिंग पाहाताना आपले भान हरपू शकते.

*

डिजीटलकरणाच्या माध्यमातून जगभरातला नाट्यव्यवहार खुला होत आहे असे असले तरी महामारीच्या वातावरणात उदासी आहे. डिजीटलीकरणाकडे आपण एक संधी आणि स्वतंत्र कलामाध्यम म्हणून पाहातो की सध्याच्या कोरोना-लॉकडाऊनमधला निवांतपणा किंवा वेळ घालवण्यासाठीचे माध्यम म्हणून त्याकडे पाहातोय हा कळीचा मुद्दा आहे. कोरोना प्रकरण संपेपर्यंत फेसबुक किंवा वॉट्सअप वर सर्क्युलेट करायचे आहे म्हणून काही तरी करू असा विचार त्यामागे आहे? यातून, ‘लॉक डाऊन थिएटर’, ‘कोरोना थिएटर’ किंवा ‘क्वारंनटाइन थिएटर’च्या नावावर समोर मोबाईल ठेवून एखादी कविता किंवा गोष्ट वाचणे किंवा कुठल्यातरी सोलो नाटकातला सीन करून दाखवणे म्हणजे डिजीटल, व्हर्च्युअल थिएटर असे काहीसे होऊ लागले आहे. अर्थात, अशा प्रयोगाचे महत्त्व नाही असे नाही. वाचिक नाट्य परंपरेतील तो एक प्रकार असू शकेल. पण, नाटक म्हणजे निव्वळ शब्दांचे वाचन नसते. नाटक म्हणजे एक डिझाइन असते. त्यामध्ये प्रकाश आणि प्रकाश योजना असते, आवाज आणि संगीत असते. आणि या सर्वातून येणारे एक ‘मॅजिक’ असते हे इथे विसरले जाते.

जिवंतपणा हा नाटकाचा मूळ गाभा असते. तो डिजीटलीकरणात गायब होतो. नाटक पडद्यावर पाहायला मिळते हे ठीक आहे. ‘झुम’ किंवा ‘गुगल मीट’वर हौस म्हणून एखादे सादरीकरण करताना ठीक आहे. एखाद्याचे मार्केटिंग होते, स्वतःला दाखवायची हौस भागून जाते किंवा एखादे म्हणणे मांडले जाऊ शकते. शिवाय, शैक्षणिक क्षेत्रातही याचे महत्त्व असू शकते. शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी. पण, इथे ‘लाइव्ह’ प्रयोगातली उत्स्फुर्तता नसते. रेकॉर्डिंगसाठी प्रयोग करताना उत्स्फुर्तता असू शकते. पण ती रेकॉर्डिंग पाहाणा-याला फील करता येत नाही.

रंगमंचावरल्या कलाकारांचे श्वासोच्छवास स्वतः कलाकार किंवा प्रेक्षक फील करू, ऐकू शकत नाही. नाटक, संगीत, किंवा कुठलेही ‘लाइव्ह’ सादरीकरण श्वासांची देवाणघेवाण असते. रंगमंचावरल्या ‘जिवंत’ सादरीकरणातील ती कळीची बाब असते. डिजीटल सादरीकरणामधे आपण चेहरे पाहू शकतो, आवाज ऐकू शकतो. पण ते फील करू शकत नाही. ‘लाइव्ह’ सादरीकरणातील तीव्रता आणि दृष्य-बदल आपल्याला अनुभवायला मिळत नाही. इथे, रंगमंचावरल्या कलाकारांमधले तिथे असलेल्या स्टेज प्रॉपर्टीमधे असलेले संवादी नाते आपण मिस करत असतो.

कोरोना काळ नॉर्मल होऊ तोवर डिजीटल- डिजीटल खेळू असा एक विचारही या ॲक्टिव्हिटीज मागे आहे. एकतर, ‘नॉर्मल’ असणे हे प्रकरणच बदलले आहे. आता आपण नॉर्मल म्हणजे काय हा प्रश्न विचारायला हवा. बदलत जाणा-या नव्या नॉर्मलचा विचार हवा. सुरुवातीचा ‘कोरोना थिएटर’चा जोश ओसरला असेल किंवा तो जेव्हा केव्हा ओसरेल त्यावेळी आपण नाटकासारख्या लाइव्ह, सामुहिक कला आणि डिजीटलकरण याचा नीट विचार करायला हवा. लाइव्ह नाटक आणि व्हर्च्युअल नाटक यामधल्या गुंतागुंतीच्या  नात्याबद्दल, त्यातल्या ‘नाट्या’नुभवाबद्दलच्या सौंदर्यदृष्टीचा साकल्याने विचार व्हायला हवा.

कोरोनापूर्व काळात जे काही कुणी रेकॉर्डिग केले असेल ते ‘अर्काइव्ह’ म्हणून केले असणार. आपण केलेला प्रयोग भविष्यकाळात बघायला मिळावा या इच्छेने ते रेकॉर्डिंग केले असणार. पण त्या रेकॉर्डिंगला ‘लाइव्ह’ आणायचे असेल ते विचारपूर्वक होणे महत्त्वाचे आहे. कोरोना आपत्तीमुळे हा विचार करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे, चला सगळे करतायत म्हणून करू की आपणही ‘कोरोना थिएटर’ म्हणून करण्यात अर्थ नाही.

समजा, या काळात करण्यासारखे वा बघण्यासारखे एखाद्याकडे काही नसेल तरी हरकत नाही. किंवा काही केले नाही तरी काही बिघडणार नाही. काही दिवस नाटक-बिटक नाही बघितले तरी काही बिघडणार नाही. सहा महिने नाटक बघितलेच नाही किंवा काही साहित्य वाचलेच नाही किंवा लोकांपुढे आलेच नाही तर काही तसे बिघडणार नाही. ‘काहीतरी करूया’ म्हणून ‘व्यक्त’ व्हायची धडपड असेल तर त्यानं काही हाताला लागणार नाही. सहा महिने-वर्षभर कुणी आपलं कार्य पाहिलं नाही तर आपण विसरले जाऊ, नाटक संपेल अशी काहींना भीती असेल तर तो मनाचा खेळ असेल. आतून आणि आपल्या भवतालाशी सहजपणे जुळणारं असं काही येत असेल ते आनंददायी किंवा विचारप्रवर्तक असू शकेल. ते टिकणारं असेल.

थोर नाट्यदिग्दर्शक युजिनिओ बार्बा यांच्याकडे त्यांचा मित्र व्हिडीओ संदेश मागण्यासाठी गेला. पण त्यांनी नम्रपणे सांगितले की मी काही मेसेज वगैरे देणार नाही. लॉकडाऊनकडे नवी पालवी फुटण्याचा काळ म्हणून बार्बा पाहातात. नाटक किंवा साहित्य नसले तरी इतर काहीतरी आपण बघत असतो किंवा वाचत असतो. प्रत्येक ‘लाइव्ह’ आहे ते ‘डिजीटल’ व्हायला हवे असे नाही. किंवा, जवळ बरा मोबाइल कॅमेरा आहे म्हणुन प्रत्येकाने उठून काहीतरी रेकॉर्डिंग करून ते अपलोड करायला पाहिजे असे काही नाही. आपल्या कृतीमागच्या हेतूंबद्दलची स्पष्टता हवी.

अर्थात, ज्यांचे नाटकावर पोट आहे. त्यांच्यासाठी हा काळ खरच कठीण आहे. त्यांनी, डिजीटलकरणाकडे व्यावसायिक कृती म्हणून पाहायला हवे. त्यांनी ऑनलाइन माध्यमातला आपला वावर पेड करायला हवा. त्यांनी ‘कोरोना थिएटर’ व्यावसायिक पातळीवर न्यायला हवे. डिजीटल थिएटरमधेही ‘बॅकस्टेज कलाकार’ असतात त्यांचाही इथे विचार व्हायला हवा. गेल्या काही दिवसात आपण गरजू नाट्यकलाकारांसाठी निधी उभा केला. महामारीचे लॉकडाऊन येऊन-जाऊन असणार आहे. अशावेळी, आपण परत मदत उभी करावी लागली तर ती आपण करायला हवी.

दूरदृष्टीचा अभाव असेल तर कृतीच्या खोलापर्यंत जाणे होणार नाही. त्यामुळे ज्यांना हे नीट लावून धरायचे आहे त्यांनीच यात पडावे हे बरे. जगभरातल्या नामांकित नाट्यसंस्था ज्या शिस्तबद्द रितीने आपल्या नाटकांचे स्ट्रिमिंग करतात ते पाहिले तर त्यावरून आपल्याला बरेच शिकता येईल. इंग्लंडमधील ‘नॅशनल थिएटर’ आठवड्यातल्या दर गुरुवारी त्यांच्या नाटकांची स्ट्रिमिंग करते. त्या मंडळींच्या प्रयोगांचा दर्जा, रंगमंचीय आणि फिल्मींग तंत्रावरची त्यांची हुकूमत अचंबित करून सोडते. तीच बाब जर्मनीमधल्या Schaubuehne थिएटर कंपनीबद्दल. शांतपणे पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की मुद्दा फक्त ‘व्हर्च्युअल रंगभूमीबद्दल’ नाही किंवा कोरोना लॉकडाऊन पुरता नाही. तर, नाटकासाठी लागणा-या साधनसामुग्रीबद्दल आहे. त्याला मिळणा-या समाज आणि सरकारी पाठबळाबद्दल आहे.

उद्या, परवा किंवा काही दिवसात सगळं सुरळीत झालं तरी नाटकाच्या डिजीटलकरणाकडे गांभीर्याने आणि विचारपूर्वक पाह्यला हवे. यातून नवे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. डिजीटल आहे की लाइव्ह यापेक्षा ऑप्शन्स कसे नवे मिळत आहेत याबद्दलची चर्चा होणे महत्त्वाचे आहे. ‘लाइव्ह’ ऐवजी ‘डिजीटल’ असे समीकरण मांडून चालणार नाही. याऐवजी ते असे नाही. हेच चांगले आहे आणि ते नाही असे नाही. ‘लाइव्ह’ नाटक आणि ‘व्हर्च्युअल’ नाटक एकमेकाला पूरक कसे ठेवता येईल याबद्दल विचार व्हायला हवा. ऐवीतेवी नाटकाच्या ‘लाइव्ह’ नाटकाचा प्रेक्षकवर्ग मर्यादित राहीला आहे. मग, डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे थोड्या जास्त लोकांपर्यंत नाटक पोहचवण्याची संधी घ्यायला हवी. एखादा प्रयोग करताना तो नंतर ‘लाइव्ह’ जाणार आहे याची जाणीव ठेवून योग्य ती तयारी व्हायला हवी. या निमित्ताने, नाट्यसंस्था, कलाकार आणि फिल्मींग करणा-या कंपना, कलाकार-तंत्रज्ञ एकत्र मिळून काम करण्याच्या शक्यता अजमावता येतील.

कोरोना लॉकडाऊनमध्ये एक लक्षात आले आहे की नाटक किंवा नाट्यात्म काहीतरी हवे आहे. मागणीचे स्वरूप बदलले आहे. परिस्थिती आणि कलारुपाची गरज म्हणून वेगवेगळ्या माध्यमात आदानप्रदान वाढले आहे. या आदानप्रदानाला कलात्म तसेच व्यावसायिक दृष्टी प्राप्त होण्यासाठी तांत्रिक प्रगतीची जोड द्यावी लागणार. मोठी अडचण आहे ती पारंपरिक माध्यमात ट्रेनिंग घेतलेल्यांना डिजीटल माध्य़माच्या खाचाखोचा समजण्याची. डिजीटल माध्यमाची गरज, त्याचे सौंदर्यशास्त्र समजून घेऊन रुप तसेच तांत्रिक शिक्षणाची पुनर्मांडणी करायला हवी. मग त्यात नट आले, संगीतकार आले, शैक्षणिक केंद्रेही आली. प्रवास सर्वांचा आहे.

आशुतोष पोतदार नव्या पिढीतले मराठी नाटककार आणि लेखक आहेत. ते फ्लेम युनिवर्सिटी, पुणे येथे अध्यापनाचे कार्य करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0