भोपाळः छतरपूर जिल्ह्यात इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनने आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवातल्या दोन नाटकांना बजरंग दल समर्थक एका गटाने आक्षेप घेतल्याने संप
भोपाळः छतरपूर जिल्ह्यात इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनने आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवातल्या दोन नाटकांना बजरंग दल समर्थक एका गटाने आक्षेप घेतल्याने संपूर्ण नाट्य महोत्सव रद्द करण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना महासाथीमुळे हा नाट्य महोत्सव रद्द केल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पण आयोजकांनी या नाट्य महोत्सवातल्या दोन नाटकांना बजरंग दलाशी निगडीत एका गटाने आक्षेप असल्याने त्यांच्या दबावातून हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
या महोत्सवात प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘पाहिजे जातीचे’ या मराठी नाटकाचे हिंदी रुपांतरीत नाटक ‘जात ही पूछो साधू की’ व ‘बेशर्म मेव जयते’ ही दोन नाटके सादर केली जाणार होती. पण अशा नाटकांतून संस्कृती व धार्मिक अस्मिता-बंधुता यांच्यावर टीका केली जात असल्याचा आरोप बजरंग दल समर्थक गटाचा होता. त्यामुळे या गटाने नाट्य महोत्सव रद्द करण्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला पाठवले होते. या पत्रात हा महोत्सव झाल्यास तर तेथे बजरंग दलाचे कार्यकर्ते तीव्र निदर्शने करतील व त्यानंतर होणार्या परिणामाला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील अशी धमकी दिली होती.
या अगोदर ही दोन नाटके टीकमगढ येथील खजुराहो महोत्सवात सादर करण्यात आली होती.
दरम्यान इप्टाचे छतरपूर जिल्ह्याचे प्रभारी देवेंद्र कुशवाहा यांनी आपल्याला एका व्यक्तीचा फोन आल्याचे सांगून त्यांनी ही दोन नाटके सादर करू नये अशी धमकी दिल्याचे सांगितले. इप्टाचे महासचिव शिवेंद्र शुक्ला यांनी महोत्सव रद्द करण्याअगोदर पोलिसांनी नाट्य कलाकार अथवा आयोजकांशी सल्लामसलतही केली नाही, असा आरोप केला आहे. आम्ही कलाकारांच्या संरक्षणासाठी पोलिसांना पत्रे लिहिली पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही, तुमच्यातील वाद तुम्हीच सोडवा असा सल्ला जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिला, असे शुक्ला यांनी सांगितले.
त्यावर छतरपूर जिल्हा पोलिस प्रमुख सचिन शर्मा यांनी हा नाट्य महोत्सव आम्ही नव्हे तर आयोजकांनीच रद्द केल्याची माहिती दिली.
बजरंग दलाचे छतरपूर जिल्ह्याचे प्रमुख सुरेंद्र शिवहरे यांनी आमचा या दोन नाटकांना विरोध होता असे सांगत भविष्यात असे कार्यक्रम आयोजित केले जात असतील तर त्याला आमचा विरोध कायम राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. हे कसे सांभाळायचे त्याची आमची स्वतःची पद्धत असल्याचे शिवहरे यांनी सांगितले.
मूळ बातमी
COMMENTS