प्लीज – माझा श्वास कोंडतोय..

प्लीज – माझा श्वास कोंडतोय..

जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकाच्या निर्दयी हत्येचे पडसाद जगभरातल्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात उमटले. परंतु या घटनेने वैद्यकीय क्षेत्रालाही हादरवून टाकले, ते मुख्यतः सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कृष्णवर्णीयांना मिळणार्या दुय्यम वागणुकीमुळे. त्या भयावह जगाचे दर्शन घडवणारा ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मधला हा लेख.. राशेल हार्डेमान, पीएच.डी. एम.पी.एच एड्युआर्डो एम. मेडिना, एम.डी. एम.पी.एच रिहा डब्लू. बॉयड, एमडी. एम.पी.एच

जनमताची भाषा (लेखमालेतील अंतिम भाग)
पैशाचा वापर, भ्रम, व्यक्तीपूजा आणि ट्रंप भक्त
वॉशिंग्टनमधल्या घटनेतून भारताने काय धडे घ्यावेत?

मिनेसोटामध्ये कृष्णवर्णीय अमेरिकन्सची संख्या आहे एकूण लोकसंख्येच्या ६ टक्के, पण कोविड-१९च्या रुग्णांमध्ये हे प्रमाण १४ टक्के आहे आणि कोविड-१९मुळे झालेल्या मृत्यूंमध्ये तर ३३ टक्के. जॉर्ज फ्लॉइड मात्र मारला गेला पोलिसांच्या हातून.

 प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

जॉर्ज फ्लॉइड एक कृष्णवर्णीय होता. फोर्जरीच्या संशयावरून त्याला अटक झाली होती. ज्या कथित गुन्ह्याबद्दल त्याच्यावर फिर्यादही नोंदवली गेली नव्हती किंवा साधे आरोपही ठेवले गेले नव्हते, त्यासाठी त्याला न्यायालयात जाण्यापूर्वीच मृत्यूदंड देण्यात आला.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

तो अवघा ४६ वर्षांचा होता.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

आणि त्याच्यावर प्रेम करणारे लोकही होते.

मात्र, जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या विनंत्या आणि फ्लॉइडने केलेल्या विनवण्यांकडे दुर्लक्ष करत, रस्त्यावर त्याला पालथा पाडून तीन पोलिस अधिकारी त्याच्या पाठीवर बसले होते आणि एकाने त्याच्या मानेवर गुडघा रोवला होता.  त्याचा खून केला त्यांनी.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

प्रशिक्षित अधिकारी व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत, भयाने कापणाऱ्या समुदायाच्या साक्षीने फ्लॉइडला कायदेशीर कारवाईचे मूलभूत हक्क नाकारण्यात आले, जीवनरक्षक मदतीची मूलभूत प्रतिष्ठा नाकारण्यात आली.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

त्याला अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी मारून टाकल्यामुळे अमेरिकेच्या शहरा-शहरांमध्ये आणि जगभरात संतापाची लाट उसळली, यातल्या अनेक निदर्शनांचं नेतृत्व कृष्णवर्णीय तरुणांनी केलं. कोविड-१९च्या संसर्गाच्या धोक्याची तमा न बाळगता रस्त्यांवर उतरले आहेत, गेल्या कित्येक वर्षांपासून मानेवर रोवलेल्या अन्यायाच्या गुडघ्याखाली जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कृष्णवर्णीयांच्या तीव्र वेदना मनामध्ये वागवत या आंदोलनाने पेट घेतलाय. “आय काण्ट ब्रीद” या शब्दांचं ओझं आजूबाजूच्या वातावरणालाही पेलेनासं झालंय. ही केवळ मोर्च्याला चेतवण्यासाठी दिलेली घोषणा नाही. ते शतकानुशतकांच्या अन्यायाविरोधात दाद मागणं आहे.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

खरं म्हणजे कृष्णवर्णीयांचा जीव गुदमरतोय, कारण त्यांच्यातल्या कित्येकांचे प्राण पोलिसांच्या हिंसाचारामुळे अकाली हिरावून घेतले जाताहेत.  श्वासांवर, प्राणांवर घातला जाणारा हा घाला अमेरिकेत नित्याचाच आहे. कृष्णवर्णीय अमेरिकनांचं जिणं उद्ध्वस्त केलं जातंय.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

खरं म्हणजे कृष्णवर्णीयांना गुदमरायला होतंय, कारण, हा शोक केवळ जॉर्ज फ्लॉइडसाठी नाही. आम्ही ब्रेओना टेलरसाठी, टोनी मॅकडेडसाठी आणि अमेरिकेत दरवर्षी पोलिस अत्याचारात मृत्युमुखी पडणाऱ्या हजारभर लोकांसाठी शोक करत आहोत. यात कृष्णवर्णीयांचं प्रमाण खूप अधिक आहे.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

खरं म्हणजे कृष्णवर्णीय श्वास घेऊ शकत नाहीयेत, कारण, आम्ही ज्याच्या मृत्यूचा निषेध करतोय तो १००० कृष्णवर्णीय पुरुष-मुलांमधला एक आहे.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

आम्ही आमच्या मुलांना घट्ट जवळ घेतलंय. कारण, कृष्णवर्णीय मुली वयाने मोठ्याच असणार, तेवढ्या निरागस नसणारच आणि श्वेतवर्णीय मुलींच्या तुलनेत त्यांना संरक्षणाची फारशी गरज नसणार हे सगळ्यांनी गृहीत धरलंय. मुलं आमच्या कुशीतून निसटली की त्यांना धोका आहेच हे आम्ही जाणतो. त्यांना धोक्यासाठी सज्ज करताना आम्ही आमचं मुक्याने उद्ध्वस्त होत जाणं त्यांच्यापासून लपवतो, कारण कितीही मार्गदर्शन केलं तरी त्यांना धोका कायम राहणारच आहे हे आम्हाला माहीत आहे.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

खरं म्हणजे कृष्णवर्णीयांच्या या घुसमटीमागे विलगीकरणाची, निम्न उत्पन्नगटाच्या विस्थापनाची, पर्यावरणीय वर्णभेदाची दीर्घ परंपरा आहे. या परंपरेला स्थानिक विभागीकरण कायद्यांची जोड मिळाल्यामुळे आम्हाला एका ठराविक निवासी क्षेत्रामध्ये बांधून ठेवण्यात आलंय. या भागात राहणाऱ्यांना श्वासाद्वारे विषारीवायू आणि प्रदूषकं शरीरात घेण्याखेरीज पर्याय नाही. याचा परिणाम म्हणून कृष्णवर्णीय लोकसंख्येत अस्थमा आणि कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. हवेतल्या सूक्ष्म घटकांशी सातत्याने संपर्क येत असेल, तर कोविड-१९ने मृत्यू होण्याची शक्यताही खूप वाढते असं अलीकडच्या आकडेवारीतून दिसतंय. म्हणूनच कोविड-१९ने मृत्यू होणाचा धोका कृष्णवर्णीय अमेरिकन्समध्ये श्वेतवर्णीय अमेरिकन्सच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

खरं म्हणजे कृष्णवर्णीयांना श्वास घेता येत नाहीये, कारण, आजघडीला आम्ही दोन सार्वजनिक आरोग्य आपत्तींशी लढतोय. नोव्हेल कोरोना विषाणूशी झगडताना दर १,८५० कृष्णवर्णीयांमागे एकाने प्राण गमावले आहेत (https://apmresearchlab.org. opens in new tab). शिवाय मानवजात संसाधने आणि सत्ता आपल्या हातात एकवटण्यासाठी ज्या पद्धतीने वंशभेदाचा वापर करत आहे, त्यामुळे एक खूप मोठा वर्ग संसाधनांपासून वंचित राहत आहे. संसाधनांच्या या अभावाने कित्येक कृष्णवर्णीयांचे प्राण घेतले आहेत.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

आणि कृष्णवर्णीयांमधलं पोलिस अत्याचारात बळी जाण्याचं प्रमाण श्वेतवर्णीयांच्या तुलनेत तीन पट अधिक आहे  (https://mappingpoliceviolence.org. opens in new tab).

या दोन वास्तवांमुळे आज कृष्णवर्णीयांचं आयुष्य धोक्यात आलं आहे. त्यातच मातामृत्यू आणि अर्भकमृत्यूचं प्रमाणही खूप अधिक असल्याने आमचं अस्तित्व जन्मापूर्वीच धोक्यात येत आहे.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

कृष्णवर्णीय समुदाय ज्या प्रकारे शतकानुशतकं अन्याय, विषारी वायूचा संसर्ग, वंशभेद आणि गोऱ्यांच्या वर्चस्ववादी हिंसाचार सहन करतोय ते  अक्षरश: धाप लागावी असंच आहे. आमचे समुदाय काय सहन करतात हे अनेकांना माहीतच नाही किंवा ज्यांना माहीत आहे तेही मौन राखण्याचा पर्याय अवलंबतात. आपले समुदाय इतक्या अन्यायाच्या परिस्थितीत कसे येऊन पोहोचले हे अनेक “नेत्यांना” कळतच नाही आणि पुढे जाण्यासाठी आपण काय करू शकतो हेही त्यांना माहीत नाही. कृष्णवर्णीयांच्या प्रश्नांना जणू काही उत्तरंच नाहीत असं त्यांना वाटतं.

आम्ही या परिस्थितीत येऊन पोहोचलो याचं कारण समाजशास्त्रज्ञ रुहा बेंजामिन यांनी नेमकं टिपलंय. त्यांच्या मते, आम्ही या परिस्थितीत येऊन पोहोचलोय, कारण, ‘वर्णवाद उत्पादनक्षम आहे.’

आमची स्थिती इतकी भीषण आहे, कारण, एतद्देशीयांच्या विस्थापनातून व हत्याकांडांतून निर्माण झालेल्या देशात आम्ही राहतो. कारण, गुलामगिरी आणि मानवजातीच्या वर्णवादी रचनेवर देशाची राजकीय आर्थिक व्यवस्था उभी आहे, कृष्णवर्णीयांच्या श्रमांचं अवमूल्यन, काळ्या वर्णाचा अपमान आणि कृष्णवर्णीयांना मानवतावादी वर्तणूक नाकारली जाणं हे घटक या व्यवस्थेचा भाग आहेत. आम्ही या स्थितीत येऊन पोहोचलो, कारण, आमच्या आयुष्यांवर, आमच्या श्वासांवर घातला जाणारा घाला नफेखोरीसाठी उपयुक्त आहे आणि नफ्याला चटावलेल्या व्यवस्थेतच आम्ही काम करतो.

प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

वंशवादी आरोग्यविषयक असमानतेवरचे उपाय हे त्या असमानतेला पोषक परिस्थितीत रुजवणे आवश्यक आहेत. म्हणूनच कृष्णवर्णीयांच्या आरोग्यासाठी आग्रही भूमिका घेणं अत्यावश्यक आहे. यातच राष्ट्राचं आरोग्यही आहे. आपण रचनात्मक वंशभेद दृढ करणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, कायदेविषयक, शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थांना आव्हान दिलं पाहिजे. कारण सगळी धोरणं अखेरीस आरोग्यविषयक धोरणात सामावली जातात हे कोविड-१९च्या साथीने आपल्याला अत्यंत स्पष्टपणे दाखवून दिलं आहे. हा क्षण करत असलेली तातडीची मागणी पूर्ण करण्यासाठी आरोग्य धोरणात सुधारणा केल्या जाव्यात ही आमची अपेक्षा आहे. कोविड-१९ची साथ पसरल्यानंतर ज्या वेगाने आरोग्यव्यवस्थेची फेररचना करण्यात आली ते बघता, हे बदलही वेगाने केले जाऊ शकतात असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. कोविडच्या साथीमुळे कितीतरी नवीन पद्धती, पेमेंट मॉडेल्स आणि डिलिव्हरी यंत्रणा प्रस्थापित झाल्या. साथीला दिल्या गेलेल्या प्रतिसादामुळे एक गोष्ट तर स्पष्ट झालीये. ती म्हणजे व्यवस्थेमध्ये एका रात्रीत बदल घडवून आणले जाऊ शकतात. बदलण्यासारखे तर खूप काही आहे पण किमान आरोग्य व्यवस्थेत बदल करून रचनाबद्ध वंशभेद नाहीसा करावा आणि कृष्णवर्णीयांच्या व पर्यायाने राष्ट्राच्या आरोग्य व स्वास्थ्याची स्थिती सुधारावी अशी आमची शिफारस आहे.

आरोग्यव्यवस्थेतील वर्णभेदी असमानता दूर केली जावी. आरोग्यासंदर्भातील वर्णाधारित असमानता हा व्यवस्थेतील दोष नव्हे; आरोग्यव्यवस्था काही जणांच्या इच्छेनुसार काम करत असल्याचा तो परिणाम आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेतील आरोग्यविमा बाजारपेठ एक श्रेणीबद्ध (टीयर्ड) तसेच रुग्णांच्या वेगवेगळ्या वर्गांना वेगवेगळी सेवा देणारी वर्णाधारित रचना राबवत आहे. या व्यवसाय प्रारूपाचा परिणाम म्हणून विशिष्ट वर्णांसाठी तसेच एथ्निक समुदायांसाठी आरोग्यसेवेची उपलब्धता वेगळी असते. त्याचे विध्वंसक परिणाम कृष्णवर्णीयांमधील प्रचंड माता मृत्यूदराच्या स्वरूपात दिसतात. विम्याचा अडथळा दूर करून सर्वांना न्याय्य सेवा देण्याची वचनबद्धता वैश्विक सिंगल-पेयर आरोग्यसेवेमध्ये दिसते.

आरोग्यसेवा मनुष्यबळातील एकाच समुदायाचे वर्चस्व नाहीसं झालं पाहिजे. अमेरिकेतल्या आरोग्यव्यवस्थेत अगदी विद्यार्थी, कर्मचारी ते सीईओंपर्यंत गोरेच आहेत. हा वैविध्याचा अभाव म्हणजे अनेकांना वर्णाच्या आधारावर या सेवेपासून दूर ठेवण्याचा परिणाम आहे आणि पुढे याचा परिणाम श्वेतवर्णीय वगळता अन्य वर्गांच्या आर्थिक परिस्थितीवर तसंच त्यांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेवर होत आहे. उदाहरणार्थ, आरोग्यव्यवस्था ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी व्यवस्था आहे आणि यातून समुदायांसाठी सर्वाधिक रोजगार निर्माण होतात. या समुदायांना दिल्या जाणाऱ्या रोजगाराच्या संधी वाढल्या की मालकांद्वारे दिल्या जाणाऱ्या विमासंरक्षणाची व्याप्ती वाढेल, सरासरी वेतन वाढेल, स्थानिक करांना पाठबळ मिळेल आणि निवासी व अन्य प्रकारच्या विलगीकरणाची समस्या दूर होईल. या सगळ्याची परिणती अखेर मोठ्या लोकसंख्येचं आरोग्य सुधारण्यात होईल. रचनाबद्ध वंशभेदाचे आरोग्यावर होणारे परिणाम व्यावसायिक वैद्यकीय स्तरावर अभ्यासले गेले पाहिजेत. २०१६ मध्ये आम्ही क्लिनिशिअन्सना अमेरिकेच्या वर्णवादी मुळांचा अभ्यास करण्याचं, ती समजून घेण्याचं व स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. रचनाबद्ध वर्णभेद आरोग्यावर कसा परिणाम करतो हे क्लिनिशिअन्सनी समजून घेण्याची गरज आहे हे २०२० मध्ये अधिक स्पष्ट झालं आहे. वैद्यकीय शिक्षणसंस्थांमधून आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमधून प्रत्येक क्लिनिशिअनला वर्णभेदाची समस्या हाताळण्याचे शिक्षण दिलं गेलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं. परवाने मंजूर करणे, अधिमान्यता देणे, पात्रता निश्चित करण्याच्या प्रक्रियेत क्लिनिशिअन्सचं हे ज्ञान अत्यावश्यक व्यावसायिक कौशल्य म्हणून तपासलं गेलं पाहिजे.

न्याय्य निष्पत्तीची सक्ती व मापन

आरोग्यव्यवस्थेला अधिमान्यतेसाठी कठोर सुरक्षितता व दर्जाच्या निकषांमधून जावं लागतं, त्याचप्रमाणे रचनाबद्ध वर्णवाद दूर करण्याबाबतच्या तसंच न्याय्य निष्पत्तीबाबतच्या कठोर निकषांचं पालन करणंही त्यांच्यासाठी सक्तीचं केलं पाहिजे.

संरक्षण व सेवा

आरोग्यव्यवस्थेने आपल्या रुग्णांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांची बाजू लावून धरण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारपुरस्कृत नृशंसतेचे बळीही रुग्णच आहेत, मग त्यांना झालेल्या जखमा शारीरिक असतील किंवा मानसिक असतील. त्यांच्या हिताचं रक्षण झालंच पाहिजे. अमेरिकेत पोलिसांचं कौर्य थांबवण्यासाठीही आरोग्यव्यवस्थेने पुढे आलं पाहिजे, कारण, टाळता येण्याजोगे मृत्यू टाळण्याचा हा प्रयत्न आहे. कृष्णवर्णीयांच्या (आणि एतद्देशीय व लॅटिंक्सच्याही) बेसुमार हत्यांबाबत आरोग्यव्यवस्थेने ठाम भूमिका घेतली पाहिजे.

 प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

पोलिसांचा हिंसाचार, कोविड-१९संदर्भातल्या वर्णवादी असमानता आणि रचनाबद्ध वर्णवादाचे अन्य प्रकार अमेरिकेत एकाच वेळी घडत आहे. त्यामुळे आरोग्याची स्थिती अधिक बिकट होत आहे.

 प्लीज- माझा श्वास कोंडतोय.

शवविच्छेदन अहवालात असं दिसलं की, जॉर्ज फ्लॉइडला कोविड-१०ची लागण झालेली होती. यातून हे वास्तव अधोरेखित होतं. कृष्णवर्णीयांच्या आयुष्यांनाही किंमत आहे हे आता आरोग्यव्यवस्थेने नुसतं म्हणून पुरणार नाही, त्यांना ते दाखवून द्यायला लागेल.

कारण, जॉर्ज फ्लॉइडप्रमाणेच अन्य कृष्णवर्णीयांवर प्रेम करणारेही आहेतच.

मूळ लेख न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमधून साभार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0