अंतहिन आक्रोशाचे प्रतिध्वनि

अंतहिन आक्रोशाचे प्रतिध्वनि

कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराला वाचा फोडणारा ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’चा आक्रोश अमेरिकाभर घुमला. त्यानंतर जगभरात त्याचे या ना त्या रुपाने पडसाद उमटत राहिले. अशा समयी नोबेल समितीने आफ्रिकन वंशाच्या अब्दुलरझाक गुर्ना यांना यंदाचा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर करणे हा केवळ सुखद नाही, तर तो समयोचित योगदेखील आहे. गुर्ना यांनी त्यांच्या कादंबरी लेखनातून आफ्रिकन समाजजीवनाचा घेतलेला वेध परिस्थितीचा फास गळ्याभोवती आवळलेल्या आफ्रिकी माणसांतल्या आंतरिक वेदनेला भिडणारा आहे. वैश्विक सत्याचा शोध घेणारा आहे. उर्वरित जगाच्यादृष्टीने अप्रकाशित राहिलेल्या जगात डोकावणार्‍या गुर्ना यांच्या लेखनकार्याचे तसेच ‘मेमरी ऑफ डिपार्चर’ या त्यांच्या चाळीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या कादंबरीचे हे मनोवेधक रसग्रहण...

अज्ञात पूर्वज : आफ्रिकन डीएनए अभ्यासातून रहस्यमय शोध
सुदानमध्ये लोकशाहीची पहाट होणार का?
विलक्षण संशोधक जेन गुडाल

शरीराने उंचपुरे, बोलक्या डोळ्यांचे आणि चेहर्‍यावर हलकेसे मिश्किल भाव असलेले अब्दुलरझाक गुर्ना हे भारतीय वाचकांस एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या कुणा वेस्ट इंडियन क्रिकेटपटूची आठवण करून देतात. त्यांची पहिली कादंबरी ‘मेमरी ऑफ डिपार्चर’1988 मध्ये म्हणजेच त्यांच्या वयाच्या चाळिशीत प्रसिद्ध झाली. या पहिल्याच कादंबरीने जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आलेल्या ‘पॅराडाइझ’, ‘बाय द सी’ या कादंबर्‍या या साहित्याच्या जगतात प्रतिष्ठित असलेल्या बूकर पारितोषिकाच्या यादीत समाविष्ट झाल्या होत्या. आता तर त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या नावावरून लक्षात येतंच की ते इस्लामधर्मी आहे. शिवाय ते आफ्रिकेत जन्मले, वाढले आहेत आणि नंतर अतिशय उदारमतवादी, लोकशाहीची जननी समजल्या जात असलेल्या इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आहेत. या तपशिलांवरून त्यांच्या वैविध्यपूर्ण भावविश्वाचा अंदाज यायला हरकत नाही. या लेखात त्यांच्या पहिल्या कादंबरीचा ‘मेमरी ऑफ डिपार्चर’चा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

आफ्रिकेचे काळेखे जग

या कादंबरीत शिरण्याअगोदर ज्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वातावरणात गुर्ना यांची वाढ झाली त्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. आशियात जन्मलेला इस्लाम लवकरच जगाच्या कानाकोपर्‍यात जसा पसरला, तसाच तो आफ्रिका खंडातही शिरला. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आफ्रिका खंडातील जवळपास सर्वच देशांवर गोर्‍या युरोपियनांनी राज्य केलं. तसेच युरोपियनांनी निग्रो गुलामांचा व्यापारही केला. भारतात जसं झालं, तसंच आफ्रिकेतही झालं. ते म्हणजे गोर्‍या साहेबाला (जो संख्येने कमी होता) निग्रोंवर राज्य करण्यासाठी प्रत्यक्षअप्रत्यक्षपणे तपकिरी (ब्राऊन) कातडीच्या आशियाई लोकांची गरज भासली. महात्मा गांधी इ.स. 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेले होते, ते अब्दुल्ला नावाच्या धनाढ्य मुस्लिम व्यापार्‍याची केस लढण्यासाठी, तिथल्या निग्रो समाजाच्या भल्यासाठी नाही. गांधीजींनी तिथं स्थायिक झालेल्या भारतीयांचं नेतृत्व केलं. आजही जगात माणसाच्या कातडीचे तीन रंग महत्त्वाचे मानले जातात. युरोपियनांची गोरी कातडी, आशियाई समाजाची तपकिरी तर आफ्रिकन समाजाची काळी कातडी. हे वर्गीकरण फक्त रंगापुरते सीमित नसून यानुसार आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक प्रगतीची पातळी मोजली जाते. आज एकविसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकातही गोर्‍या कातडीचा युरोप/ अमेरिका जगाचे नेतृत्व करतो. त्याच्या मागे तपकिरी कातडीचा आशिया आहे आणि सर्वात मागे कृष्णवर्णीय आफ्रिका आहे.

इस्लाम आणि आफ्रिका

आता इस्लाम आणि आफ्रिका यांच्या संबंधाविषयी. अभ्यासकांच्या मते, सातव्या शतकात अरब-मुसलमानांनी उत्तर आफ्रिका जिंकला, तर आठव्या शतकात पूर्व आफ्रिकेत इस्लाम दाखल झाला. ख्रिश्चन धर्माच्या तुलनेत इस्लाम जास्त सहिष्णू असल्यामुळे (उदाहरणार्थ चार बायका करण्याची परवानगी, ब्रम्हचर्य न पाळता धर्मसेवा करण्याची परवानगी आदी.) आफ्रिकेत ख्रिश्चॅनिटीच्या तुलनेत इस्लाम लवकर आणि झपाट्याने पसरला. पूर्व आफ्रिकेत मात्र इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी समोरासमोर आले होते. चौदाव्या शतकात इस़्लामचा वरचश्मा प्रस्थापित झाला. इस्लाममुळे आफ्रिकेत आधुनिक मूल्यं रूजली. शासन व्यवस्थेत इस्लामने आणलेल्या सुधारणांमुळे आफ्रिकेतील राजेमहाराजांनी फारसा विरोध न करता इस्लामचा स्वीकार केला. आफ्रिकेत झालेली धर्मांतरं बरीच शांततेच्या मार्गाने झाली. अठराव्या शतकापर्यंत एकतृतीयांश आफ्रिका खंड मुस्लिम धर्मी झाला होता. त्यामुळे तिथं अरेबिक भाषा मोठ्या प्रमाणात बोल़ली जाते. हे सर्व तपशील अब्दुलरझाक गुर्ना या मुस्लिम लेखकाचं भावविश्व समजून घेण्यासाठी गरजेचे आहेत.

झांझिबारचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास

ज्या झांझिबारमध्ये गुर्ना यांचा जन्म झाला आणि बालपण गेले, त्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवणे क्रमप्राप्त आहे. झांझिबार म्हणजे हिंदी महासागरातील एक बेट असून हे बेट टांझानियाचा स्वायत्त भाग होता. याची राजधानी असलेलं झांझिबार शहर जागतिक वारसा यादीत गेलं आहे. इ.स. 1498

अब्दुलरझाक गुर्ना

अब्दुलरझाक गुर्ना

मध्ये वास्को-द-गामा येथे पोहोचला आणि बरोबर ख्रिश्चन धर्म घेऊन गेला. त्याने मुस्लिम राजांकडून खंडणी वसूल केली. इ.स. 1503 मध्ये झांझिबार पोर्तुगाल साम्राज्याचा भाग झाला. पोर्तुगीज सत्ता पुढे दोनशे वर्षं टिकली. त्याकाळी तेथे स्थानिक स्वाहिली निग्रो आणि बाहेरून आलेले मुसलमान राहात होते. हा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. इ.स. 1698 मध्ये झांझिबार ओमानच्या सुलतानाच्या प्रभावाखाली आले. 1832 मध्ये ओमान आणि मस्कतच्या सुलतानाने राजधानी मस्कत येथून स्टोन सिटी येथे हलवली (भारताच्या इतिहासात तुघलकाने असे केले होते). इ.स. 1886 मध्ये इंग्लंड आणि जर्मनीच्या नजरा झांझिबारकडे वळल्या. पुढच्या काही वर्षांत युरोपियनांनी तिथं आपली सत्ता प्रस्थापित केली. हे तपशील लक्षात घेतले म्हणजे, झांझिबारवर सुरूवातीची काही शतकं मुस्लिमांची आणि नंतरची काही शतकं युरोपियनांची सत्ता होती, हे लक्षात येतं. इथं आपल्याला भारताच्या इतिहासाची आठवण येणं अपरिहार्य आहे.

अरब मुस्लिम आणि निग्रो मुस्लिम

झांझिबार हे पूर्व आफ्रिकेतून होत असलेल्या गुलामांच्या व्यापाराचे केंद्र होते. हा व्यापार मुस्लिम व्यापारी आणि मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हातात होता. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश साम्राज्याने झांझिबारमधील गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली आणि गुलाम मुक्त केले. इ.स. 1890 मध्ये झांझिबार ब्रिटिश साम्राज्याचा भाग झाले आणि 1913 पासून इंग्रजांची थेट सत्ता सुरू झाली. 10 डिसेंबर 1963 रोजी झांझिबार स्वतंत्र झाला. 12 जानेवारी 1964 रोजी ‘प्रजासत्ताक झांझिबार’ची घोषणा करण्यात आली आणि ‘आफ्रो शिराझी पक्षाचं समाजवादी सरकार सत्तेत आलं. या धुमश्चक्रीत सुमारे वीस हजार लोक मारले गेले. ज्यात भारतीय आणि मुस्लिमांचाही भरणा होता. 2012 च्या जनगणनेनुसार झांझिबारची लोकसंख्या 15 लाख होती. ‘वांशिकता’ हा मुद्दा घेतला तर तेथे सुमारे 56 टक्के निग्रो आहेत तर 17 टक्के अरब आहेत. ‘धर्म’ हा मुद्दा घेतला तर तिथं 99 टक्के मुसलमान आहेत! परिणामी झांझिबारमध्ये ‘स्वाहिली निग्रो मुसलमान’ आणि ‘अरब- मुसलमान’ यांच्यात अनेकदा ताणतणाव असतात.

भूतकाळाचे ओझे नाकारणारा नायक

अशा व्यामिश्रतेने व्यापलेल्या झांझिबारमध्ये अब्दुलरझाक गुर्नाचा जन्म 20 डिसेंबर 1948 रोजी एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. ‘मेमरी ऑफ डिपार्चर’ या सुमारे दीडशे पानांच्या कादंबरीत गुर्ना यांनी हसन ओमार या पंधरा वर्षाच्या मुस्लिम मुलाची गोष्ट सांगितली आहे. तोच या कादंबरीचा निवेदकसुद्धा आहे. ही कथा पूर्व आफ्रिकेच्या किनार्‍यावर असलेल्या गावात घडते. कादंबरी वाचतांना हे गाव बंदर असल्याचे सतत लक्षात ठेवले पाहिजे. नायक पंधरा वर्षांचा निवडल्यामुळे लेखकाला काही गोष्टी साधता आल्या. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजुबाजूच्या परिस्थितीकडे नव्या पिढीच्या नजरेने बघता येते, त्यातल्या विसंगतीवर बोट ठेवता येते, आधीच्या पिढीने केलेल्या नैतिक घोटाळ्यांवर टिकाटिप्पणी करता येते. शिवाय योग्य वेळी नायक दुसर्‍या जगात जाऊ शकतो. पंधरा वर्षांचा तरूण जगात कोठेही जाऊन नोकरी वा व्यवसाय करू शकतो, मूळं धरू शकतो, कष्ट करून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. या सर्वांतून तो इतिहासाचे ओझे फेकून देऊ शकतो. गुर्नाचा हसन नेमकं हेच करतो. गुर्नांच्या आयुष्यात आणि हसनच्या आयुष्यात अनेक प्रकारचे साम्य आहे. परिणामी ‘मेमरी ऑफ डिपार्चर’ कादंबरी बर्‍याच अंशी आत्मचरित्रात्मक आहे, असे म्हणता येते.

कौटुंबिक विखुरलेपणाचा शाप

हसनचे कुटुंब कमालीच्या दारिद्र्यात जगत असते. दारूडा, सतत वेश्यागमन करणारा, बायको-मुलांना नेहमी मारहाण करणारा बाप, एवढ्या कुटुंबाचं करताकरता दमछाक होत असलेली आई, आल्या-गेल्याला नेहमी शिव्या घालणारी म्हातारी आजी, दोन बहिणी. त्यातली वयात आलेली मोठी बहीण झाकिया जमेल त्या पुरूषाबरोबर झोपून पैसे कमवून मजा करत असते, तर धाकटी कशीबशी शाळेत जात असते. त्यांचं घर झोपडपट्टीत असतं, जिथं शेजारच्या घरात वेश्याव्यवसाय सुरू असतो. हसनचा मोठा भाऊ सात वर्षांचा असतांना घरात जळून जातो. तेव्हा हसन पाच वर्षांचा असतो. हसनच्या डोळयांसमोर भाऊ जळून मरतो. हसन मदतीसाठी आरडाओरड करतो, पण त्याचा भाऊ वाचत नाही. त्याचे आई-वडील भावाच्या मृत्यूबद्दल हसनला अधूनमधून दोष देत असतात. हसनने नुकतीच शालांत परीक्षा (म्हणजे आपल्याकडची दहावी/ बारावी) दिली आहे. त्याला चांगले गुण मिळाल्यास सरकारी शिष्यवृत्ती मिळेल आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता येईल. शिष्यवृत्ती न मिळाल्यास काहीतरी छोटेमोठे काम करत जगावे लागेल. वडील त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च करू शकण्याच्या अवस्थेत नाहीत. अशा वातावरणात कादंबरीची सुरूवात होते.

स्वातंत्र्योत्तर सूडाचे समाजकारण

वर दिलेला झांझिबारचा इतिहास व्यवस्थित समजून घेतला म्हणजे लक्षात येतं की हसनसारख्या अरब-मुस्लिमांचं जगणं स्वातंत्र्योत्तर झांझिबारमध्ये किती अवघड होतं, याचा अंदाज येतो. कादंबरीची सुरूवात होते, तेव्हा देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले आहे आणि इंग्रज देश सोडून निघून गेलेले आहेत. आता उरले निग्रो- मुस्लिम (लोकसंख्येच्या 56 टक्के) आणि अरब-मुस्लिम (लोकसंख्येच्या 17टक्के). या दोन सामाजिक घटकांत सतत ताण असतो. अरब-मुस्लिमांनी एकेकाळी झांझिबारवर राज्य केलं होतं. असा आधीचा राज्यकर्ता समाज जेव्हा विसाव्या शतकात ‘एक डोकं-एक मत’ या तत्त्वावर चालणारी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारतो, तेव्हा अरब- मुसलमानांसारखा आधीचा सत्ताधारी समाज अल्पसंख्याक तर होतोच; शिवाय बहुसंख्यांकाच्या सूडाच्या राजकारणाची शिकारसुद्धा होतो. हीच अवस्था झांझिबारमधल्या अरब- मुस्लिमांची झाली. देश एक होण्यासाठी, देशात सामाजिक सलोखा नांदण्यासाठी ‘धर्म’ हा घटक पुरेसा नाही, हे डिसेंबर 1971 मध्ये जगासमोर आलं, जेव्हा बांगलादेशचा जन्म झाला. नंतर 1979-1989 दरम्यान इराक आणि इराण या दोन मुस्लिम देशांत युद्ध झालं. आफ्रिका खंडात धर्मापेक्षा ‘वंश’ हा घटक जास्त महत्त्वाचा ठरला.

झांझिबारचा गावगाडा

हसनच्या नजरेतून वाचकाला तेव्हाच्या झांझिबारमधील एक छोट्या बंदराचं गावातल्या गावगाडयाचं दर्शन होतं. यात लहान मुलांना थोडे पैसे देऊन, जवळच्या एखाद्या पडक्या इमारतीत नेऊन त्यांचा लैंगिक उपभोग घेणारे पुरूष दिसतात, रस्त्यावर फिरणारी बेवारस कुत्री, कोंबड्या भेटतात, क्षुल्लक कारणांवरून मारामारी करण्यास सदैव तयार लोक गल्लोगल्ली भटकत असतात. एका टप्प्यावर हसनला शंका येते, की चांगले गुण मिळवलेल्या अरब- मुस्लिम मुलांना शिष्यवृत्ती द्यावी लागेल, या भीतीने सरकार एक तर परीक्षेचे निकालच जाहीर करणार नाही आणि केले तर अनेकांना निष्कारण नापास केले जाईल. अशा निराश अवस्थेत हसन दिवसेंदिवस गावात निरूद्देश भटकत असतो, वेळ मिळेल तेव्हा बंदराकडे चक्कर मारून खलाशी-व्यापारी- बोटी-कोळी-मासेमारी वगैरेंचं जग बघत असतो. हे वर्णन लेखकाने असं काही केलं आहे की, हसनप्रमाणे वाचकांनाही वाटतं की मिळेल ती बोट पकडावी आणि या नरकातून बाहेर पडावं. काही समीक्षकांनी गुर्ना यांनी गावाचं इतकं निराशजनक वर्णन केल्याबद्दल दोषही दिला होता. त्यांचे म्हणणे, गुर्ना यांनी पाश्चात्य वाचक डोळ्यासमोर ठेवून असं बटबटीत लेखन केलं आहे. पण, असा आरोप आपल्याकडील दलित साहित्यावरही झाला होता. आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक सुस्थितीत असलेल्या वाचक/समीक्षकांना गुर्नाच्या लेखनाप्रमाणेच बाबुराब बागुलांचे, नामदेव ढसाळचे लेखन धक्कादायक वाटणे स्वाभाविक होते.

तारुण्याचे दशावतार

तारूण्याच्या उबंरठ्यावर उभे असलेल्या मुलाची स्थिती हसनच्या आईला बघवत नाही. ती त्याला नैरोबीला राहात असलेल्या तिच्या भावाकडे, अहमदकडे जाण्याची सूचना करते. जगभरचे अनेक भाऊ जसं आपल्या बहिणींना आर्थिक व्यवहारात फसवतात आणि वडिलांच्या संपत्तीत वाटा देत नाही, तसंच अहमदने केलेलं असतं. अहमदने हसनच्या आईला कपर्दिकही दिलेली नसते. आज तोच अहमद नैरोबीसारख्या मोठ्या शहरात मोठा बिझनेसमन असतो, ऐषोआरामाचं जीवन जगत असतो. गेल्या अनेक वर्षांत त्याने गरीब बहिणीची विचारपुसही केलेली नसते. हसनची आई त्याला सांगते की, तू मामाकडे आर्थिक मदत निःसंकोचपणे माग. नाही दिली तर ‘माझ्या आईचा हिस्सा दे’, असं सांग. त्यानुसार हसन नैरोबीला येतो.

येथे कादंबरी वेगळ्या वळणावर येते. आतापर्यंत एका छोट्या आणि गरीब गावात लहानचा मोठा झालेला हसन नैरोबीसारख्या शहरात येतो आणि श्रीमंत मामाकडे उतरतो. हसनचे गाव आणि नैरोबी दरम्यानच्या ट्रेन प्रवासात हसनला मोझेस विंयी हा तरूण भेटतो. तो हसनसारखाच अरब-मुस्लिम असतो. या दोन सुशिक्षीत अरबमुस्लिम तरूणांच्या संवादांतून तेव्हाच्या झांझीबारमधल्या तरूणांची मानसिकता काय होती, यावर प्रकाश पडतो. मोझेस हसनला म्हणतो- ‘All this humanities stuff is shit. All we have is African Art, African Literature, African History, African Culture and all that shit. And we cannot even make a screwdriver or a tin of talcum powder for ourselves. It’s technology we need. Now everything we use, we have to get from Europe or America. They even give us money to buy these things. We have to learn to build our own factories, make our own motor cars, weave our own cotton. That’s the secret. Until then, all this stuff is shit.’ नेमके हेच आक्षेप भारतीय नेते ‘मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीवर घेत होते. या शिक्षणपद्धतीमुळे देश म्हणजे ‘कारकुनांचा कारखाना’ झाला आहे, असे आरोप झाले होते.

त्यांच्यातल्या संवादाचा पुढचा टप्पा यापेक्षा धारदार आहे तसेच अंतर्मुख करणाराही आहे. त्यातून तिसर्‍या जगातल्या नवस्वतंत्र देशांची सामूहिक मानसिकता व्यक्त होते. इंग्रज गेल्यानंतर तेथे स्थानिक झालेले भारतीय स्थानिकांच्या रोषाचे बळी झाले. मोझेस म्हणतो-“Indians have money. Let us make use of them first, then we can throw the bastards out. We don’t throw the white man out. We are too afraid of him. We want him to like us. African Art, African Culture. We plead with them, to think of us as a human being. But the Indians, we persecute them and chase out”

ही मानसिकता आपल्या चांगल्याच परिचयाची आहे. हरिगोविंद खुराना, अमर्त्य सेन वगैरे ज्ञानवंत भारतीयांचे जेव्हा पाश्चात्यांनी कौतुक केले, त्यांना नोबेल पुरस्कार दिले; त्यानंतर आपण त्यांच्या आरत्या ओवाळल्या. गोर्‍यांच्या कौतुकासाठी आपलासुद्धा जीव हपापलेला असतो. बहुतांश भारतीय समाज जेवढा प्रेमाने इंग्रजांच्या सत्तेबद्दल बोलतो (‘साहेबाची सत्ता म्हणजे दैवी प्रसाद आहे’) तेवढाच त्वेषाने मुस्लिम सत्तेबद्दल बोलतो.

भारती प्रतिबिंब

तिसर्‍या जगातील भारतासारख्या देशाची झांझिबारसारख्या देशांशी तुलना करता येते. इंग्रज गेल्यानंतर स्थानिक बहुसंख्याक आणि एके काळचा मुसलमानासारखा सत्ताधारी समाज, जो आता अल्पसंख्याक आणि सत्ताहीन झाला आहे, यांच्यातले संबंधं गुंतागुंतीचे असतात. या संदर्भातला एक संवाद फार दाहक आहे. ‘There is a discrimination. People are victimized because thay don’t have a black skin. It’s a revenge. They are paying back what they owe. People are afraid. Harsh things happen. Cruel things are done. I think it’s hurt everybody in the end. I think it is bad for everybody. We all end up being a little less human’. हे वास्तव आजच्या भारतात सर्वत्र दिसते. आपल्या देशात ठराविक धर्मातील मागासलेल्यांना आरक्षण आहे. इतर धर्मातल्या मागासलेल्यांना का नाही?

हसन मामाकडे येतो आणि अनेक अर्थाने त्याचे भावविश्व आमुलाग्र बदलते. नैरोबीसारखे महानगर, मामाचा आलिशान बंगला, नोकर-चाकर पोटभर जेवण! एका प्रसंगी हसन म्हणतो – It was rare pleasure to eat eggs and my mouth watered in anticipation.

यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मामाची एकुलती एक मुलगी सलमा. ही नाजुक, सुंदर, सुशिक्षित मुलगी हसनची समवयस्क असते. तिची आई ती लहान असताना वारलेली असते. सुरूवातीचे काही काळ सोडल्यावर तिची आणि हसनची चांगली गट्टी होते. नेमकं हेच त्याच्या मामाला आवडत नाही. त्याला वाटते की, याप्रकारे हसन आपल्या एकुलत्या एक मुलीशी लग्न करेल आणि सर्व इस्टेट हडप करेल. तो हसनला घरातून हाकलून देतो. पण मामाच्या बंगल्यात महिनाभर राहिलेला हसन गावी परत जातो, तेव्हा वेगळाच पुरूष झालेला असतो.

माघारीचे टके

हसन मामाकडून रिकाम्या हाताने आलेला पाहून त्याचे आईवडील चिडतात. त्यांच्या दृष्टीने तीच एक आशा होती, की ज्यामुळे हसन उच्चशिक्षण घेऊ शकला असता. हसनलासुद्धा वाईट वाटते, पण तो परिस्थितीशी जुळवून घेतो. मधल्या काळात परीक्षेचा निकाल जाहीर होतो आणि हसनला अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळतात. मग हसन बी.एड. कॉलेजात जाऊन डिग्री घेऊन शिक्षक होणार, असे जाहीर करतो. त्याचे हे किरकोळ स्वप्न बघून त्याची आई त्याची खरडपट्टी काढते. ‘या घरात तुझ्या बापासारखा एक अपयशी पुरूष पुरेसा आहे. त्यात तुझी भर नको’ या प्रसंगांनंतरच्या एका प्रसंगात भावूक झालेली त्याची आई म्हणते -”That’s your strength. You hold steady with your silence. You don’t let it weaken. -t the back of it, I can hear the small little noise of your heart beating . Do you understand what I mean?’ You hold steady while, we all tire and weaken, and all the time your heart remains true.” भीषण दारिद्र्यावर मात करता करता दमलेली आई आपल्या तरूण मुलाचं मनोधैर्य टिकवण्याचा प्रयत्न करते. असाच भावूक प्रसंग जॉन स्टाइनबेकच्या ‘ग्रेप्स ऑफ रॅथ’ मध्येही आहे.

गावी परत आल्यानंतर तीन महिन्यांत हसन एका बोटीवर खलाशी म्हणून नोकरी पकडतो आणि गाव सोडतो. कादंबरीच्या शेवटी, तो सलमाला पत्र लिहून स्वतःची खुशाली कळवतो. या प्रत्रात मुंबई आणि मद्रास बंदरांचे उल्लेख येतात. त्या पत्रात सलमाला ‘मी लवकरच तुला घेऊन जायला येईन’ असे आश्वासन असते. इथे कादंबरी संपते.

पारतंत्र्यात गांजलेले समाज

विसाव्या शतकाच्या मध्यावर स्वतंत्र झालेल्या आशिया आणि आफ्रिकेतील देशांसमोर ज्या समस्या उभ्या राहिल्या, त्यांची चर्चा या छोटेखानी कादंबरीत येते. आफ्रिकेतील काही देशांना आधी मुस्लिम आणि नंतर युरोपियन सत्तेखाली अनेक शतकं वावरावे लागेल. अशा समाजांचे प्रातिनिधक चित्रण म्हणून गुर्नाच्या या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. एका समीक्षकाने म्हटल्याप्रमाणे, Memory of Departure is a richly written debut novel that touches all the dilemma of Post-colonial African societies’ हे या कादंबरीचे अचूक मूल्यमापन आहे.

 प्रा, अविनाश कोल्हे, हे निवृत्त प्राध्यापक असून, पुरस्कारप्राप्त कथाकादंबरीकार आहेत.

(‘मुक्त-संवाद नियतकालिकाच्या दिवाळी-२०२१ मधून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0