मुंबईः शहर व उपनगराला बुधवारी पडलेल्या पावसाने मोसमातील उच्चांक तर गाठलाच पण सर्व दिवसभर वादळी वार्याने मुंबईकरांना भयकंपित करून ठेवले. संध्याकाळी तर
मुंबईः शहर व उपनगराला बुधवारी पडलेल्या पावसाने मोसमातील उच्चांक तर गाठलाच पण सर्व दिवसभर वादळी वार्याने मुंबईकरांना भयकंपित करून ठेवले. संध्याकाळी तर कुलाबा परिसरात वार्यांचा वेग ताशी १०७ किमी इतका वाढला होता, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, फांद्या पडल्या, इमारतींवरील पत्रे पडल्याच्या घटना घडल्या. दरम्यान येत्या २४ तासात पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी आणि शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी पावसात अडकले आहेत त्यांच्या निवार्याची सोय रेल्वे स्थानकांच्या लगतच्या मनपा शाळेत केल्याचे वृत्त आहे.
हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी शहरात २१५.८ मिमी, पूर्व उपनगरात १०९.९ मिमी., प. उपनगरात ७६.०३ मिमी पाऊस पडला.
बुधवारी मुंबईत पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची दैना उडाली. अशा ठिकाणी अनेक मोटारगाड्या, दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात बुडालेली दिसत होती. पाण्यात फसलेल्या या वाहनांना काढण्यासाठी काही ठिकाणी क्रेनचा वापर करण्यात आला होता. शहरात ठिकठिकाणी १४१ झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.
रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने सीएसटी ते वाशी व सीएसटी ठाणे ही लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पावसाची परिस्थिती पाहून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. बुधवारी उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून मुंबईला सर्व ती मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले.
COMMENTS