बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील चक्रीवादळे

बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील चक्रीवादळे

तापमानवाढीमुळे अनेक ठिकाणी पर्यावरणीय बदल घडत आहेत. काही दशकांपूर्वी अरबी समुद्रात अपवादानेच वादळ निर्माण व्हायचे. पण १९९५ नंतर, एका संशोधनानुसार, चक्रीवादळांच्या संख्येत पाचपट वाढ झालेली आहे.

चक्रीवादळामुळे ४६ लाख वीज ग्राहकांवर परिणाम
मुंबईसह कोकण किनारपट्टीवरचे ‘निसर्ग’ संकट
मुंबईत मोसमातील पावसाचा उच्चांक

पूर्वेकडील बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडील अरबी समुद्र हे भारतीय महासागराचे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. पण या दोन्ही सागरात काही मूलभूत फरक आहेत व त्यामुळे या महासागरात होणाऱ्या नैसर्गिक घडामोडी एकमेकांपेक्षा फारच भिन्न असतात. काही आठवड्यांपूर्वी ‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशात उच्छाद मांडला होता. त्यावेळी उत्सुकतेपोटी असा प्रश्न उपस्थित झाला होता की, अरबी समुद्रात अशा प्रकारची वादळ निर्माण होत नाहीत, किंवा फारच कमी प्रमाणात निर्माण होतात. हे असे का घडते?

चक्रीवादळ कसे निर्माण होते?

जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वादळ व समुद्रात झाला तर चक्रीवादळ निर्माण होते. बंगालच्या उपसागरात तापमान विसंगती जास्त असल्या कारणाने तिथे चक्रीवादळ निर्मितीचे प्रमाण अरबी समुद्राच्या तुलनेत जास्त आहे. चक्रीवादळात हवा एका कमी दाब असणाऱ्या बिंदूच्या अवतीभोवती फार मोठ्या गतीने चक्राकार फिरत राहते. अशा वादळांचा वेग प्रती तास ३० ते ५० किमी इतका असू शकतो. हे चक्रीवादळ हवेतल्या कमी दाबाच्या दिशेने नेहमी सरकत राहते. पण जेव्हा हे वादळ जमिनीला  टेकते तेव्हा पाण्याची ऊर्जा न मिळाल्याने ते शांत होऊन जाते. पण तत्पूर्वी आपल्यासोबत आणलेल्या पाणी व पाण्याच्या वाफेला पावसाच्या रूपाने जमिनीवर सांडून जाते. बंगालच्या उपसागरात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत चक्रीवादळ एकापाठोपाठ एक निर्माण होत असतात.

चक्रीवादळ निर्मितीची एक जटील प्रक्रिया आहे. चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी असाव्या लागतात. एकतर समुद्रात योग्य हवा, त्याची दिशा आणि तापमान असणे आवश्यक असते. समुद्राच्या पृष्ठ पाण्याचे तापमान तसेच वातावरणातील ‘ट्रोपोस्फेर’चे (७ ते १२ किमीचा पट्टा) तापमान चक्रीवादळ निर्मितीत खूप मोठे योगदान देत असतात. पण हवेची गती जर जास्त असेल व तिच्यातील ऊर्जा कमी, किंवा अधिक  झाली तरीसुद्धा वादळ निर्माण होण्याची शक्यता कमी होत जाते. समजा एखादे चक्रीवादळ निर्माण होण्याच्या तयारीत आहे, पण हवेची गती जास्त आहे, तर हे वादळ पूर्णत्वास येण्याआधीच हवा त्याला दुसरीकडे उडवून नेते. याच कारणामुळे मान्सूनच्या मोसमात चक्रीवादळ निर्माण होत नाहीत. पावसाळी हंगामात संक्षेपण जास्त व बाष्पीभवन कमी होत असते. त्याचबरोबर हवेची गती सुद्धा जास्त असते. अशा वातावरणात चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण नसते.

बंगाल खाडीतील पृष्ठ पाण्याचे तापमान सामान्यपणे २८ डिग्री सेल्सिअस इतके असते. आणि हे तापमान चक्रीवादळ निर्मितीसाठी अगदी योग्य असते. या तापमानामुळे पाण्याच्या पृष्ठ आणि ‘ट्रोपोस्फेर’ दरम्यान ऊर्जा अभिसरण सहजपणे घडून येते. जमीन व समुद्रातील तापमान विसंगतीमुळे काही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यातील परिसरात आजूबाजूची हवा धाव घेते, व तिथे जर योग्य तापमान असेल, जेणेकरून या हवेत मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ सामावत असेल तर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता कैकपटीने वाढते. चक्राकार फिरणारे वारे जेव्हा जमिनीच्या दिशेने जातात तेव्हा कमी होत जाणाऱ्या ऊर्जेने या वाफेचे बाष्पीभवन होऊन ती पावसाच्या रूपात जमिनीवर कोसळते. जमिनीला जेव्हा चक्रीवादळ स्पर्श करते तेव्हा समुद्रापासून गरम झालेल्या पाण्याची ऊर्जा त्याला मिळत नाही व हे वादळ आपोआप शांत होते.

दक्षिण-पश्चिम वाहणाऱ्या वाऱ्याला फिंडलातर जेट किंवा सोमाली जेट असे म्हटले जाते. या वाऱ्यांचाही वादळनिर्मितीत फार मोठा सहभाग असतो. हे वारे पार दुरून पश्चिम भारतीय महासागरातील विषुववृत्तापासून वाहतात व अरबी समुद्रावरून संचार करत सह्याद्रीला पार करतात व नंतर उपखंडाच्या जमिनीवरून उडत जातात. या साऱ्या प्रवासात हे वारे आपल्याबरोबर समुद्रातील आर्द्रता घेऊन येतात. ही आर्द्रता भारतावर पावसाच्या स्वरूपात शिंपडते. बंगाल खाडीतील वादळ या हवेची दिशा बदलू शकतात व मान्सूनला रोखू शकतात. म्हणून ‘फोनी’ आणि ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबले आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाचा मौसम कधी सुरू होतो?

अरबी समुद्रात चक्रीवादळ सामान्यपणे मे-जून आणि नोव्हेंबर-डिसेंबरला निर्माण होतात. या समुद्राचे तापमान बंगालच्या खाडीतील पृष्ठीय तापमानापेक्षा एकदोन डिग्रीने कमी असते. या समुद्रात हिमालयातील नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळत राहते. बंगालच्या खाडीत सुद्धा हिमालयाच्या नद्या पाणी ओतत असतात. पण अरबी समुद्रात पृष्ठीय गरम पाणी व खालच्या थरातील थंड पाणी अभिसरणाद्वारे एकसंग होण्याचा प्रयत्नात असते. त्यामुळे अरबी समुद्राचे पृष्ठीय तापमान बंगाल खाडीच्या तुलनेत एकदोन डिग्रीने कमी असते. बंगालच्या खाडीत पाणी अभिसरणाची क्रिया तितक्याशा प्रभावीपणे होत नसते. २८ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्याकारणाने अरबी समुद्रावरील वातावरणातील ट्रोपोस्फिअरबरोबर अभिसरण प्रवाह निर्माण होत नाही. चक्रीवादळ निर्मितीचा हा एक महत्त्वाचा दुवा आहे.

बंगालच्या खाडीतील चक्रीवादळाची तीव्रता

जर अटलांटिक व प्रशांत महासागराशी तुलना केली तर बंगालच्या खाडीतील चक्रीवादळं फारच सौम्य असतात. जितका या दोन महासागराचा विशाल विस्तार आहे तितका बंगालच्या खाडीचा नसल्याकारणाने इथे तीव्र वादळ निर्माण होत नाहीत. चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतरचा प्रवास अतिशय अनपेक्षित असतो. या वादळाला जिथून ऊर्जा मिळेल त्या बाजूला ते सरकते. आपण ‘वायू’ चक्रीवादळ आपला मार्ग बदलून गुजरातकडे न जात ओमानकडे कसे गेले, ते पाहिले.

पण कधीकधी प्रशांत महासागरात निर्माण झालेली वादळे बंगालच्या खाडीतील वादळांना जन्म देतात. जर नकाशा पहिला तर प्रशांत महासागर व बंगालची खाडी एकमेकांना जोडल्यासारखी दिसतात. या दोघांच्यात एक लहानशी जमिनीची पट्टीच फक्त दुभाजक असल्यासारखी आपल्याला दिसते. त्यामुळे तिथली वादळ इथे कधीकधी येतात. खरंतर बंगालच्या खाडीतील वादळसुद्धा केव्हातरी अरबी समुद्रात उडी मारतात.

वायू’ चक्रीवादळ अरबी समुद्रात का निर्माण झाले?

जागतिक तापमानात वाढ झाल्याकारणाने पूर्ण ग्रहावर अनेकानेक बदल घडत आहेत. त्याला अरबी समुद्र कसा अपवाद राहणार? या समुद्रावर वाहणारे वारे बंगालच्या खाडीपेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यामुळेच अरबी समुद्रात वादळ निर्माण होत नाहीत. पण गेल्या काही दशकात वाढलेल्या प्रदूषणामुळे इथे अनेक प्रकारचे रासायनिक धुळकण वातावरणात मिसळले गेले आहेत. या क्षेत्रात अनेक प्रकारचे एरोसोल निर्माण झाले आहेत. हे धुळकण काळ्या, तपकिरी रंगांच्या ढगांच्या रूपात आपल्याला अरबी समुद्रात विहरताना दिसतात. त्याचबरोबर प्रदूषणामुळे साचलेल्या धुळकणांचा प्रतिकूल परिणाम इथल्या हवेच्या वेगावर होतो. वाऱ्याचा वेग कमी झाल्याने अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता वाढलेली आहे. काही हवामान संशोधकांच्या मते या ढगांमुळे इथले हवामानसुद्धा बदलत चालले आहे.

कसे? या धुळकणांमुळे सूर्याचा प्रकाश परावर्तित होत असतो ज्यामुळे समुद्र पृष्ठाचे तापमान कमी राहते.

चक्रीवादळाचा प्रभाव कशाप्रकारे समुद्रावर पडतो?

चक्रीवादळात हवेचे व पाण्याचे मंथन होत असते. त्यामुळे वातावरणात व समुद्राच्या पृष्ठीय भागात अनेक गतिशील बदल होतात. २००९साली ‘फयान’ नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले होते. त्यावेळी याबाबतीत काही संशोधन करण्यात आले होते. त्यानुसार, चक्रीवादळानंतर समुद्राच्या पृष्ठावर Chlorophyll चे प्रमाण पहिल्यांदा कमी, पण दोनचार दिवसानंतर मोठ्या प्रमाणावर वाढले. चक्रीवादळाने ताकाच्या रवीसारखा समुद्र घुसळून काढला होता त्यामुळे पृष्ठाखालचे पाणी पृष्ठावर आले व आपल्याबरोबर पोषक तत्व सुद्धा घेऊन आले. या अभिसरण क्रियेमुळे थंड व गरम पाण्याचे मिसळणे घडून येते.

पण कधीकधी ही पोषक तत्वे समुद्रीजीवांसाठी हानीकारकसुद्धा ठरू शकतात. ढगाळलेले वातावरण जेव्हा निघून जाते तेव्हा सूर्यप्रकाश स्पष्टपणे समुद्राच्या पृष्ठावर पोहोचतो. पाण्याची पोषकता वाढल्याने अशा ठिकाणी जैविक क्रिया फार मोठ्या प्रमाणात वाढते. तिथे ‘फायटोप्लँक्टन’ची वाढ सुरू होते. शेवाळासारखी अतिशय सूक्ष्म आकाराची ही वनस्पती असते. यांची जर भरमसाट वाढ झाली तर ते अख्खा समुद्र व्यापून टाकतात. त्यामुळे पाण्यातील सजीवांना ऑक्सिजनची कमतरता भासते. आधीच अरबी समुद्रात काही ठिकाणी पाण्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यात अशाप्रकारची वाढ झाली तर अधिक मोठी हानी होऊ शकते.

पुढे काय?

तापमानवाढीमुळे अनेक ठिकाणी पर्यावरणीय बदल घडत आहेत. काही दशकांपूर्वी अरबी समुद्रात अपवादानेच वादळ निर्माण व्हायचे. पण १९९५ नंतर, एका संशोधनानुसार, चक्रीवादळांच्या संख्येत पाचपट वाढ झालेली आहे. त्यांची तीव्रता सुद्धा वाढलेली आहे. अशीच वाढ बंगालच्या खाडीतसुद्धा दिसून आलेली आहे. या खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या वाढत्या पृष्ठीय तापमानामुळे भारतीय उपखंडातसुद्धा अनेक प्रतिकूल बदल घडत आहेत. येत्या काही वर्षात इथला हिवाळा कमी थंड होत जाणार व पाऊस सुद्धा कमी होणार आहे. आधीच हिवाळ्यातील थंडी कमी होत असल्याकारणाने गव्हाचे उत्पादन कमी होत आहे असा काहींचा कयास आहे.

येत्या काही वर्षात अरबी व बंगालच्या खाडीत चक्रीवादळाचे प्रमाण वाढण्याचे संकेत जाणकारांना मिळत आहेत.

प्रवीण गवळी, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिक’ येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0