एक न संपणारा प्रवास

एक न संपणारा प्रवास

‘शब्द’ दिवाळी अंकासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेला लेख ‘साप्ताहिक साधना’ने ७ सप्टेंबर २०१३ रोजी पुनर्मुद्रित केला होता. तोच लेख प्रसिद्ध करीत आहोत. जगातील काही उत्कृष्ट 'लघुत्तम आत्मचरित्रं' निवडायची ठरली तर त्यात या लेखाचा समावेश करावा लागेल, असे ‘साधना’च्या संपादकांनी म्हंटले आहे.

विज्ञान दिनानिमित्ताने विवेकाचा जागर करू या!
दाभोलकरांचे मारेकरी साक्षीदाराने ओळखले
‘व्यापक परिवर्तनाशी ‘अंनिस’ स्वतःला जोडू इच्छिते’

‘मागे वळून बघताना’ या विभागासाठी मी लिहावे, असे संपादकांनी पत्र पाठवले. त्यातील एक वाक्य आहे की, ‘या विभागात असामान्य आणि प्रसिद्ध व्यक्तींना लेखनासाठी निमंत्रित केले आहे.’ आता हे वाक्य स्वाभाविकच माझा अहम्‌ काही प्रमाणात सुखावणारे आहेच. परंतु मी कशाकरता प्रसिद्ध आहे, याचे उत्तर गृहीत धरूनच हे लेखन मला करावयास सांगितले असणार. याचे उत्तर महाराष्ट्रात मला वारंवार भेटत असते.

मी गेली 20 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो, हे खरे; पण गेली 10 वर्षे मी सानेगुरुजींनी चालू केलेल्या ‘साधना’ या साप्ताहिकाचा संपादकही आहे. हे साप्ताहिक सर्वांगाने वाढते आहे. तरीही महाराष्ट्रात नव्या 100 लोकांशी परिचय झाला, तर त्यांपैकी 95 लोकांच्या मनात दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन याची गाठ पक्की बसलेली असते. त्यांपैकी बहुतेकांना ‘साधना’ माहीतही  नसते. त्यामुळे मी ‘साधना’चा संपादक आहे, ही गोष्ट त्यांच्या लेखी अर्थहीन असते.

खरे तर मी अनेक ठिकाणी धडपडत इथपर्यंतची वाटचाल केली. त्या सर्वांत कमी-जास्त यश मला लाभले. उदा.- मी कबड्डीचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो. कबड्डीवरील मराठीतील शास्त्रशुद्ध मांडणीचे एकुलते एक पुस्तक माझ्या नावावर जमा आहे. शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार मला कबड्डीसाठी लाभला आहे. क्रीडा संघटक, क्रीडा स्तंभलेखक, सामन्याचा धावता निवेदक अशा अनेक अंगांनी मी 20 वर्षे मैदानावर मनमुराद रमलो. तीच गोष्ट ‘साधना’ साप्ताहिकाची आहे. व्यसनमुक्तीची एक मोठी संस्था अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबरोबरच मी चालू केली. व्यसनमुक्तीचे हे काम चांगल्या प्रकारे चालू आहे.

मात्र यापैकी कोठल्याही कामासाठी मला मागे वळून बघावयास सांगितलेले नाही, अशी माझी कल्पना आहे. असे का झाले? याचा एक अंदाज बांधता येतो. श्रद्धा – अंधश्रद्धा या विषयांबाबत सर्व वयांत, सर्व स्तरांत, स्त्री-पुरुषांत, सुशिक्षित-अशिक्षितांच्यात, गरीब-श्रीमंतांच्यात एक सनातन कुतूहल आढळते. त्यांच्या या कुतूहलाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्पर्श करणारी म्हणून प्रत्येकाच्या मनाशी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ जोडली गेली असणार. आपल्या देशात सरंजामशाही मनोवृत्ती आहे. त्यामुळे संघटनेपेक्षा व्यक्ती लोकांना लवकर भावते. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन आणि नरेंद्र दाभोलकर असे एक समीकरण तयार झाले आणि त्यातूनच बहुधा या विभागासाठी माझा लेख मागण्याच्या कल्पनेचा जन्म झाला असावा.

‘धारणा व सातत्य’ या दोन गोष्टी आमच्यासारख्यांच्या आयुष्यात दिसतात आणि त्यामुळे ते ‘गर्दीतले न होता व्यक्ती होतात’, असा अंदाज संपादकांनी व्यक्त केला आहे. त्याहीपुढे जाऊन धारणा म्हणजे केवळ बौद्धिक स्पष्टता नव्हे; तर जी मेंदूबरोबरच काळजाला हलवते आणि कृतीसाठी नैतिक रेटा निर्माण करते, असे स्पष्टीकरणही दिले आहे.

मला स्पष्टपणे कबुली द्यावयास हवी की, असे माझ्याबाबत काहीही घडलेले नाही. मी एम.बी.बी.एस. झालो. व्यवसाय करू लागलो. त्याचबरोबर ‘समाजवादी युवक दल’ या नावाने सामाजिक कामही सुरू केले. आम्हीच काही मित्रांनी आमच्या डोक्यातून सुरू केलेले हे संघटन होते. अशा अनेक छत्र्या 70 ते 80 या दशकात महाराष्ट्रात उगवल्या. त्यांना ‘ॲक्शन ग्रुप्स्‌’ असे संबोधले जाई. निर्माण होणे, काही काळ चमकणे आणि अस्तंगत होणे, हीच वाटचाल यांपैकी सगळ्यांच्या वाट्याला आली. यामुळे 71 मध्ये चालू झालेले ‘समाजवादी युवक दल’ 82 मध्ये श्र्वास घेण्याचे थांबले. त्याला गोंडस नाव द्यावे म्हणून ‘समता आंदोलन’ नावाच्या संघटनेत आम्ही विलीन झालो. तेथीलही धडपड दोन वर्षांत थांबली.

अशा वेळी अंधश्रद्धा निर्मूलन कामाचा उदय झाला. त्याला कारण घडली बी. प्रेमानंदांची महाराष्ट्रव्यापी विज्ञान यात्रा. विज्ञान-प्रसाराचे काम करणाऱ्या काही संघटनांनी मिळून महाराष्ट्रव्यापी विज्ञान यात्रा काढली. त्यात जे विविध जथे होते, त्यांतील एक जथा होता बी. प्रेमानंदांचा. बुवाबाजीचे चमत्कार जे आज आम्ही खेडोपाडी पोचवले आहेत, ते त्या वेळी महाराष्ट्रात पहिल्यांदा दाखवण्यात आले. त्याला यात्रेसारखी गर्दी लोटली. मला हे काम महाराष्ट्रात रुजेल आणि उपयुक्त ठरेल, असे वाटले; परंतु ते मी करावे, अशी कल्पना डोक्यात नव्हती. विज्ञान यात्रा संयोजन समितीत राष्ट्रसेवा दल ही एक प्रमुख संघटना होती. त्यांच्या प्रमुखांना मी विनंती केली की, हे काम आपण प्राधान्याने पुढे न्यावे. त्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमात ते तेवढे महत्त्वाचे वाटले नाही. मी तसा मोकळा होतो. व्यवसाय बंद केला होता.

खरे तर मी व्यापक परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ता होतो. माझी संघटनाही बंद पडली होती. अशी मोकळी माणसे कोणी ना कोणी हेरते आणि त्यांना कामाला लावते. माझ्याबद्दल तसे कोणी मला भेटले नाही वा बोलावले नाही. त्यामुळे समोर आलेले एक काम आणि मोकळा वेळ या धारणेतून मी हे काम चालू केले. अनेकांना वाटते, कोणत्या तरी एखाद्या प्रसंगाच्या प्रेरणेतून किंवा आघातातून मी या स्वरूपाच्या वेगळ्या वाटेकडे खेचलो गेलो. पण तसे काही घडलेले नाही. किंबहुना, कार्यकर्ता म्हणून मला ओळखणाऱ्या अनेक मित्रांना माझा हा मार्ग त्या वेळी पटलेला नव्हता; आजही तेवढासा योग्य वाटत नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर असे ‘जादूचे प्रयोग दाखवत’ आयुष्य फुकट घालवणे, हा निव्वळ कालापव्यय होता.

मात्र सातत्याचा जो दुसरा मुद्दा संपादकांनी मांडला आहे, तो मला पूर्णत: लागू पडतो. तरीही ते माझे सातत्य या कार्याच्या ओढीतून आलेले नाही. अगदी प्रारंभापासूनच माझ्यात ही वृत्ती असावी. मी शाळेत असताना क्रीडा मंडळाचा खेळाडू होतो. एखाद्या धार्मिक कर्मकांडाप्रमाणे वर्षातील सर्व म्हणजे, सर्व 365 दिवस मी सायंकाळी क्रीडा मंडळात जायचो. खेळण्याआधी मैदानावर पाणी मारणे आणि अनेक तत्सम हमाल्या आनंदाने करावयाचो. या कालावधीत मी एकदाही  साताऱ्याच्या रस्त्यावर सायंकाळी फिरलो नाही; मग संध्याकाळी 6च्या सिनेमाला जाणे तर दूरच राहिले.

मी ‘साधना’चा संपादक झालो, त्या वेळी अंनिस चळवळीचा व्याप बऱ्यापैकी वाढला होता. त्यामुळे ‘साधना’ची जबाबदारी माझ्यावर सोपवणाऱ्यांच्या मनात शंकेची एक पाल चुकचुकत होती. मंगळवारी अंक छापावयास जाणे, बुधवारी तो छापून आल्यावर त्याचे बाइंडिंग होणे आणि गुरुवारी न चुकता 12 वाजता तो पोस्टात पोचता होणे- या बाबी साप्ताहिकासाठी अपरिहार्य होत्या. हा क्रम बिघडणे म्हणजे अनेक अडचणींना आमंत्रण देणे ठरले असते. माझ्या महाराष्ट्राभरच्या धावपळीत मी हे कसे जमवणार, अशी सर्वांना शंका होती. त्याला आता 10 वर्षे होत आली. या कालावधीत ‘साधना’चे 500 अंक निघाले आणि त्यांपैकी एकाही वेळेला हा क्रम मी चुकू दिलेला नाही.

लेखनासाठी मागे वळून बघावे आणि त्यामधील सावधपणाबरोबरच व्याकुळता, अभिमान, गतानुरंजनाची असोशी यावरही भाष्य करावे, अशी संपादकांची अपेक्षा आहे. मनात सूक्ष्म अभिमान असणारच; पण व्याकुळता नाही, गतानुरंजन तर नाहीच नाही. माझा तो स्वभाव नाही. मला तसे बरेच पुरस्कार लाभले. त्यांपैकी काही तर फारच मोलाचे होते. उदा. – दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा 10 लाख रुपयांचा पुरस्कार मला अमेरिकेत मागच्या वर्षी महाराष्ट्र फाउंडेशनने दिला. त्याच्यासकट एकाही पुरस्कारातील कसलेही मानचिन्ह माझ्या घरात नाही.

मागच्या आठवणींत गुंगणारे मन मला लाभलेले नाही; मात्र सावधपणा लाभलेला आहे. यालाच नेमस्तपणाही म्हणता येईल. मी कधीही ‘आर नाही तर पार’ अशा पद्धतीने क्रीडांगणावर खेळलो नाही, वा समाजकारणात जगलो नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल वा व्यवस्थेबद्दल आडाखे कोसळले, आधीची समज हा निव्वळ भ्रम ठरला, असे माझ्या बाबतीत घडलेले नाही. या संपूर्ण वाटचालीत परिस्थिती व माणसे याबाबत कोसळून पडावे, असे काही माझ्या वाट्याला आलेले नाही. कदाचित असेही असेल की, मी फार मोठ्या खेळी खेळतच नसेन. सर्वस्व पणाला लावतच नसेन. त्यामुळे मला सर्वस्व उद्‌ध्वस्त होण्याची भीतीही भेडसावत नसेल. पण या धडाकेबाजपणावर माझा या अर्थाने विश्वास नाही, की त्या पद्धतीने काम करण्याचा माझा पिंड नाही. चिकाटीने करावयाची दीर्घकालीन वाटचाल आणि साध्य साधनशुचितेचे भान हेच माझ्या कार्यपद्धतीचे स्वरूप आहे.

अपमान जिव्हारी लागला, असा एकही प्रसंग मला आठवत नाही. माझा अपमान दुसरा कोणी करू शकतो, यावर माझा विश्वास नाही. समोरच्या व्यक्तीच्या वर्तनामुळे नाराजी, दु:ख, उदास वाटले असेल; परंतु अपमानित वाटलेले नाही किंवा धमकावणीनेही माझ्यावर काही परिणाम झालेला नाही. नरेंद्रमहाराजांनी जाहीर भाषणात ‘दाभोलकरांचे हात-पाय तोडा’ अशी चिथावणी दिली आहे. ‘दाभोलकर ख्रिश्चन धर्मीयांचे पैसे घेऊन हिंदू धर्म बुडवण्याचे काम करतात’, असे बेताल वक्तव्य अनेकदा केले आहे. शिवसेना-भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या प्रांगणात धरणे धरून ‘महाराष्ट्र अंनिसवर बंदी घाला व दाभोलकरांना महाराष्ट्रातून हाकलून द्या’, अशी मागणी केली आहे. वृत्तपत्रांनी मला यावर प्रतिक्रिया विचारली तर माझी प्रतिक्रिया एवढीच होती – ‘हे त्यांच्या परमेश्वरा, त्यांना क्षमा कर. कारण आपण काय बोलतो, हे त्यांना समजत नाही.’ कायदा होण्यासाठी मी 10 दिवस लातूरला उपोषण केले. घडून येईल अशी वाटणारी गोष्ट घडलीच नाही. अशी कोंडी झाली की- इतरांना प्रश्न पडतो, आता त्यांचे उपोषण सुटणार कसे? कोणाच्या हस्ते ते सोडावयाचे आणि त्या वेळी राणाभीमदेवी थाटात कोणते भाषण करावयाचे. मला यांपैकी कशाचीही गरज वाटली नाही. मी उपोषण सुरू केले होते; मीच ते थांबवले. बस, एवढेच. कायदा होण्यास 16 वर्षे अकारण लागली. मला उदास कसे वाटत नाही, असा प्रश्न महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मला विचारला जातो. कायदा न झाल्याचे दु:ख आहे; मात्र कायदा झाला तरी त्याच्या मर्यादेची जाणीवही आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेने ती जिव्हारी लागणे, त्याचा प्रतिवाद म्हणून जिंकण्याची असोशी मनात पेटणे असे माझ्याबाबत घडलेले नाही. माझा स्वभाव त्या प्रकारचा नाही. मी ज्या कार्यक्षेत्रात आहे, तेथे कामाचा विचार दशकांच्या नव्हे, शतकांच्या कालावधीत करावयास हवा याची मला जाणीव आहे.

अपमान वाट्याला आले नाहीत; सन्मान योग्यतेपेक्षा जास्तच लाभले, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. बेसावधपणी घेतलेला निर्णय घोडचूक ठरू शकते आणि त्याचा फटका जबरदस्तपणे बसू शकतो, हे मी जाणतो. विशेषत: मी ज्या क्षेत्रात काम करतो, ते कमालीचे संवेदनशील आहे. अशी मोठी घोडचूक अजून घडलेली नाही. मात्र माझ्या क्षेत्राच्या संवेदनशीलतेमुळे अथवा माझ्या विरोधकांच्या कावेबाज चलाखीमुळे तसे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक उदाहरण देतो.

‘‘शनिशिंगणापूर येथे घरांना दारे नाहीत; तरीही तेथे चोऱ्या होत नाहीत, हा चमत्कारच नाही का? चमत्कार न मानणाऱ्या तुमच्या समितीचे याबाबत काय मत आहे?’’ असे मला एका वार्ताहराने विचारले. मी त्याला उत्तर दिले. ‘‘चोरी करण्याची जबाबदारी आमची, शिक्षा करण्याची जबाबदारी देवाची. पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी मधे पडावयाचे नाही, अशी चाचणी घेता येईल.’’ खरे तर गमतीत व्यक्तिगतरीत्या दिलेले हे उत्तर, पण त्या वार्ताहाराने मसालेदार शीर्षक देऊन ती बातमी छापली. बातमीचे शीर्षक होते… दाभोलकर म्हणाले, ‘चला शनिशिंगणापूरला – चोरी करायला’ असे आंदोलन आम्ही चालवणार आहोत! यामुळे नगर जिल्ह्यात प्रक्षोभकता निर्माण झाली आणि ती सोसावी लागलीच.

माझे वय आता 62 आहे; परंतु आजतागायत मला थकवा कधीही जाणवलेला नाही. निराशाही जाणवलेली नाही, असे वाटावे अशी काही चळवळीची सदाबहार अवस्था नाही. चढ-उतार, राग-लोभ हे इतरत्र असतात, तसेच माझ्या स्वत:च्या आणि संघटनेच्या वाट्याला आले आहेत. पण स्वत:च्या धारणेची सावली पायाखाली यावी, असा संपादकांनी लिहिलेला थकवा मला कधी जाणवलेला नाही. थोडक्यात, भ्रम आणि त्यांचे निरास माझ्या बाबतीत घडलेले नाहीत. अपमान, घोडचुका, थकवा, संभ्रम याही बाबी वाट्याला आलेल्या नाहीत; याउलट सन्मान आणि मान्यता लाभलेली आहे, अशीच माझी धारणा आहे.

थकव्याच्या क्षणी कुठली व्यक्ती आपल्याला आठवते आणि थबकलेलं पाऊल पुढे टाकून चालत राहण्याचे बळ देते, असा संपादकांचा प्रश्न आहे. प्रश्न थकव्याचा नाही, हे सांगितलेच आहे; मात्र स्वत:च्याच मर्यादा दिवसेंदिवस स्वत:ला फार जाणवतात. कार्याशी एकनिष्ठ राहून जास्त व्यापक बनण्याचा मार्ग दिसत नाही. कोणी दाखवील, असे वाटत नाही. याबाबत अपवाद फक्त म. गांधींचा. गांधी या व्यक्तीने मला फार खुणावले आहे. त्याबाबतचा माझा अभ्यास शून्य म्हणावा एवढाच आहे. पण तरीही गांधींचे विचार व कार्य मला माझी कोंडी फोडायला मदत करू शकेल, असे वाटते. त्याबरोबर हेही जाणवत राहते की, दिसायला अत्यंत सोपा असलेला हा म्हातारा समजून घ्यायला अवघड; त्याच्या वाटेने जाणे तर महाअवघड आहे. आजवरचे सारे संचित सोडून त्या दिशेने बाहेर पडण्याची हिंमत माझ्यातली नेमस्त व्यक्ती दाखवू शकत नाही. असो. तरीही या टप्प्यावर मागे वळून पाहाच, असा आग्रह आहे म्हणून हा लेखनप्रपंच! विषयाला त्यामुळे किती न्याय मिळाला, ते वाचकच ठरवू शकतील.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार महाराष्ट्राला नवा नाही. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा फार बळकट पाठिंबा या विचारामागे आहे. मात्र स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात या विचाराचे जागरण थांबले. ‘किर्लोस्कर’सारख्या मासिकाने 1935 ते 45च्या दरम्यान बुवाबाजीसारख्या घटना आणि दुसऱ्या बाजूला देव-धर्म या कल्पना याबाबत केवढी तरी प्रभावी मोहीम चालवली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माला सतत तपासत होते. संत गाडगेबाबा लक्षावधींच्या जनसमुदायांशी विचारपरिवर्तनाचा जो संवाद करत होते, त्यात अंधश्रद्धा हा एक महत्त्वाचा विषय होता. हे सर्वसाधारणपणे 1956च्या दरम्यान थंडावले.

दुसरीकडे स्वातंत्र्यात मिळणारे शिक्षण, विज्ञानाचा प्रसार आणि आधुनिकता यांनी अंधश्रद्धांचे निर्मूलन आपोआप होईल, असे जनमानसाला वाटत असावे. याच्या विरोधी बाजू हळूहळू जोर पकडत होती. 70 ते 80च्या दशकात मराठीत ‘श्री’ साप्ताहिकाचा खप लाखाच्या घरात पोचला होता. त्यामध्ये भुताचे  खरेखुरे(!) फोटो – रोज थोडे सोने देणारा चिंतामणी… अशा वेगवेगळ्या बाबी तिखट-मीठ लावून छापल्या जात होत्या आणि चर्चा-विषय बनत होत्या. या वातावरणात केरळचे विख्यात बुद्धिप्रामाण्यवादी बी. प्रेमानंदांचा महाराष्ट्र दौरा झाला. त्यांनी जिभेतून त्रिशूळ आरपार काढले. मंत्राने अग्नी पेटवणे, गाडग्यात भूत बंद करणे, रिकाम्या हातातून सोन्याची साखळी काढणे असे अनेक चमत्कार दाखवले. चमत्कार पाहण्याचे आकर्षण जनमानसात आजही टिकून आहे.

येथे एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की, चमत्कारांचे सादरीकरण म्हणजे जादूचे प्रयोग नव्हेत. जादूगार साधन-सामग्री घेऊन येतो आणि जादूचे प्रयोग करतो. कोणताही बाबा असे करत नाही. भाविकांच्याच घरातील कुंकू घेऊन ते त्याचा बुक्का बनवितात आणि हळद घेऊन त्याचे कुंकू बनवतात. कलेचा आविष्कार जादूगार करत असतो. महाराज दैवीशक्तीचा साक्षात्कार घडवत असतात. चमत्काराचे आकर्षण ही बाब संघटनाबांधणीला अनुकूलता निर्माण करते. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन याचा संबंध केवळ चमत्काराशी न ठेवण्याची खबरदारी आम्ही पहिल्यापासून घेतली. चमत्कार सादरीकरण हे समितीचे सामर्थ्य केंद्र होते आणि आहे, परंतु अंधश्रद्धांचे सर्व प्रकार हे समितीने आपला अभ्यासविषय व कार्यविषय बनवले.

वस्तू अचानकपणे जागेवरून हलवणे, कपडे आपोआप जळणे आणि फाटणे, अंगावर बिब्याच्या फुल्या उठणे- असे भानामतीचे प्रकार घडतात कसे, याचा शास्त्रीय उलगडा समितीने केला. बाईच्या अंगात देवीचा संचार होतो कसा, एखाद्याला भूत झपाटते म्हणजे काय, याची मानसशास्त्रीय मीमांसा केली. फलज्योतिष हे विज्ञानाच्या निकषांवर शास्त्र म्हणून कसे टिकू शकत नाही, याची सप्रमाण मांडणी केली. बुवाबाजीचे विविध प्रकार आणि त्यामागची समाजशास्त्रीय चिकित्सा उलगडून दाखविली. या स्वरूपाच्या सर्व प्रकारांबाबत जे अमाप कुतूहल लोकांच्यात असते, त्यामुळे चळवळ जनमानसात प्रवेश करू शकली. परंतु समितीचे वैचारिक काम त्याच्या किती तरी पुढे जाणीवपूर्वक नेण्यात आले.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची चिकित्सा जनमानसात सतत करण्याचे काम समितीने जोखीम पत्करून केले आहे. एकाची श्रद्धा दुसऱ्याची अंधश्रद्धा असते आणि तिसऱ्याला जी बाब निखालस अंधश्रद्धेची वाटते, ती चौथ्याला जीवन-मरणाच्या श्रद्धेची वाटते. अशा बाबतीत समाजात चर्चा सतत चालू ठेवणे, ही बाब सोपी नसते. समितीच्या कार्यात ही वैचारिक घुसळण शक्य झाली आहे. श्रद्धेचा संबंध अटळपणे आणि बहुधा सर्वप्रथम धर्मश्रद्धेशी येतो. यामुळे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हे धर्मश्रद्धा निर्मूलन आहे आणि देव-धर्मविरोधी आहे, असे भासवले जाते.

देव- धर्माची चिकित्सा झाली तर धर्माच्या आधारे असलेली नीती कोसळून पडेल आणि नीतीशिवाय समाज उभाच राहू शकणार नाही. त्यामुळे ‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे नीती निर्मूलनाचे आहे आणि म्हणून त्यापासून सावधान!’ हा प्रचार आमच्या विरोधात सतत केला गेला आणि तो पचवून आम्ही उभे राहू शकलो. वैज्ञानिक दृष्टिकोन हे घटनेत नागरिकांचे कर्तव्य मानले आहे आणि शिक्षणातील महत्त्वाचे मूल्य आहे. मात्र हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय याबाबत सामान्यजनांत नव्हे, तर शिक्षणक्षेत्रातही स्पष्टता आढळत नाही. या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जनसामान्यांना समजेल अशा भाषेतील प्रचार हे समितीच्या प्रबोधनकार्याचे एक वैशिष्ट्य आहे.

विविध स्वरूपांच्या अंधश्रद्धा, त्यामागची मानसिकता, श्रद्धा- अंधश्रद्धा, देव-धर्म-नीती यांची चिकित्सा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, एवढेच कार्य जरी अंनिसने केले असते तरी पुरेसे होते. मात्र या कार्याचा सुसंगत विचार पुढे विवेकवाद, धर्मनिरपेक्षता, जातिनिर्मूलन, सामाजिक न्याय याकडे जातो. ही वाटचालही समितीने काही प्रमाणात केली आहे. थोडक्यात, चमत्कारांच्या आकर्षणापासून सुरू झालेली ही मांडणी व्यापक समाजपरिवर्तनाच्या सर्व आयामांना जाऊन भिडली आहे. या स्वरूपाचे कार्य करणाऱ्या भारतातील कोणत्याही संघटनेचा असा कालोचित विकास माझ्या माहितीत नाही.

कामाचे खरे सामर्थ्य हे केवळ वैचारिक मांडणीत नाही तर त्यासाठी समिती जी प्रचंड उपक्रमशीलता व चळवळ उभी करू शकली, त्यात आहे. पुढे नोंद केलेले उपक्रम हे उघडपणेच सर्व संघटनेचे मिळून आहेत, परंतु त्यामध्ये माझा सहभाग सातत्याने आणि सजगपणे राहिला आहे. भानामतीचे प्रकार हे लोकांच्यात गूढ कुतूहल आणि भीती निर्माण करतात. हे प्रकार कसे शोधून काढायचे व थांबवायचे याची एक पद्धतच समितीने तयार केली आहे. आजपर्यंत भानामतीचे 250 हून अधिक प्रकार समितीने यशस्वीपणे बंद केले आहेत. समितीला शब्दश: एकाही प्रकरणात अपयश आलेले नाही. बुवाबाजीविरोधात संघर्ष समिती शेकडो वेळा लढली आहे आणि स्वत:चे जीव अनेक प्रकारे धोक्यात घालून बुवाबाजीचे प्रकार त्यांनी बंद पाडले आहेत. आदिवासीबहुल जिल्ह्यात डाकीण प्रथा आजही अस्तित्वात आहे. गावात घडणाऱ्या दु:खद घटना कथित डाकिणीने स्वत:च्या प्रभावाने दुष्ट वृत्तीने घडवून आणल्या, असे सारे गाव अंधश्रद्धेुळे मानते. त्या डाकीण स्त्रीला गाव सोडून देशोधडीला लागावे लागते आणि प्रसंगी स्वत:चा जीवही गमवावा लागतो. नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी या प्रथेविरोधात चळवळ चालू केली. त्या वेळी आदिवासी भागातील जनआंदोलने, स्वयंसेवी संस्था, प्रशासन या सर्वांचे एकमत होते की- आदिवासींचा डाकीण प्रथेवर एवढा गाढा विश्वास आहे की, त्याबाबत कार्य चालू करणे म्हणजे त्यांचा जबरदस्त रोष ओढवून घेणे ठरेल. तरीही डाकीण प्रथेविरोधात समितीने संघर्ष चालू केला आणि आज तो अशा एका टप्प्यावर आला आहे की, आता महाराष्ट्रातील आदिवासीबहुल अन्य दहा जिल्ह्यांतही तो चालू करता येईल.

चमत्कार सिद्ध करण्यासाठी समितीचे आव्हान सुरुवातीला 1 लाख रुपयांचे होते. ही रक्कम वाढत-वाढत 2 लाख, 5 लाख, 11 लाख झाली. मागील वर्षी मला अमेरिकेत 10 लाखांचा पुरस्कार मिळाला. ती सर्व रक्कम मी आव्हान रकमेत वाढ करण्यासाठी समितीला दिली. त्यामुळे आता चमत्कार आव्हानाची रक्कम रुपये 21 लाख झाली आहे. प्रत्यक्ष संघर्षाबरोबरच लोकांच्या मनात हे संघर्ष उभे करण्यासाठी अनेक मोहिमा समितीने चालवल्या; ज्यांत मी पूर्ण वेळ सहभागी झालो आहे. ‘शोध भुताचा, बोध मनाचा’ ही मोहीम कोकणात चालवली गेली. चार जथ्यांनी 167 कार्यक्रम केले आणि 3 लाख लोकांपर्यंत आम्ही पोचलो. ‘चमत्कार घडवा- यात्रा अडवा- 11 लाख रु. मिळवा’ असे आव्हान देत ‘चमत्कार सत्यशोधन यात्रा’ संपूर्ण महाराष्ट्रात दोन वेळेला फिरली.

गोवा, बेळगाव व कोकण येथे सर्प यात्रा काढण्यात आली. सर्पदंशावर प्रथम उपचार शिकविण्यात आले आणि सर्पविषयक अंधश्रद्धा दूर करण्यात आल्या. मराठवाड्यातील भानामतीचे प्रकार हे एक वेगळे प्रकरण आहे. स्त्रियांच्या अंगात येते. त्या घुतात, किंचाळतात, गडाबडा लोळतात. काही वेळेला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढतात. हा प्रकार समूहाने घडतो आणि गावात अंधश्रद्धेचा जबरदस्त ताण निर्माण करतो. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात 8 जथ्यांद्वारे आम्ही जवळपास 250 कार्यक्रम करून मराठवाडा पिंजून काढला. मराठवाड्यातील भानामतीचे प्रकार अजूनही बंद झालेले नाहीत, परंतु निश्चितच कमी झाले आहेत.

‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ हा शिक्षकांना अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार देणारा एक आगळावेगळा उपक्रम आहे. शिबिर घेऊन शिक्षकांना एक अभ्यासक्रम शिकवला जातो आणि त्यानंतर शिक्षक तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवितात. विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. गेल्या पंधरा वर्षांत दहा हजारांहून अधिक शिक्षक या शिबिरात प्रशिक्षित झाले आहेत आणि अडीच ते तीन लाख विद्यार्थी या परीक्षांना बसले आहेत. याबरोबरच ‘विज्ञान बोध वाहिनी’ या नावाने समितीने एक सुसज्ज वाहन तयार केले आहे. शाळाशाळांच्यात ते जाते, त्या वेळी जणू काही विज्ञान महोत्सवच साजरा होतो. आदिवासी आश्रमशाळांत आणि अन्य शाळांतही हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे.

समितीने वेगवेगळ्या प्रश्नांवर महाराष्ट्राच्या विविध भागांत परिषदा घेतल्या. लातूर येथे ‘वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद’ झाली. सातारा येथे ‘अंध रूढींच्या बेड्या तोडा’ ही परिषद झाली. सोलापूर येथे परिषद घेऊन महिलांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बारामती येथे वैज्ञानिक जाणिवा व धर्मनिरपेक्षता याबाबतची शिक्षणक्षेत्राची सनद तयार करण्यात आली. विवेक जागर परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक लाख सह्या गोळा करण्यात आल्या, त्या दोन प्रमुख मागण्यांसाठी होत्या. एक म्हणजे, शासनाने व्यसनवर्धक धोरण सोडावे आणि व्यसनविरोधी समग्र नीती स्वीकारावी. तर दुसरी मागणी होती- एचआयव्हीबाधित  नसल्याची तपासणी विवाह-पूर्व सक्तीची करावी. या सह्या नंतर मी आणि चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सादर केल्या. (नेहमीप्रमाणेच पुढे त्याचे काही झाले नाही) प्रबोधनाचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात सादर करणारी महाराष्ट्र अंनिस ही बहुधा एकमेव संघटना असावी. समितीच्या 180 शाखा आहेत. अंनिसच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला मनोरंजनाची झालर असल्याने त्याला चांगली मागणी असते. यामुळे प्रत्येक शाखेने वर्षभरात 10-12 कार्यक्रम केले, तरी संपूर्ण महाराष्ट्रात मिळून वर्षात जवळजवळ 2000 कार्यक्रम होतात.

अंनिसच्या वैचारिक मांडणीत विषयावरची पकड, तर्कशुद्ध युक्तिवाद याची गरज असते; याबरोबरच ओघवते वक्तृत्व व प्रामाणिक कळकळ लोकांपर्यंत पोचली, तर त्याचा चांगला परिणाम घडून येतो. मला याचा लाभ झाला आहे. गेल्या 20 वर्षांत मी हजारो व्याख्याने दिली आहेत आणि ती प्रभावी ठरली आहेत. अनेक ठिकाणी भाषण संपल्यानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होतो आणि तो जिज्ञासापूर्तीऐवजी दाभोलकरांची खुमखुमी जिरवण्यासाठी होतो. या सापळ्यात मी आजपर्यंत तरी कधीही सापडलेलो नाही. विचारलेला प्रश्न माझ्या विषयाशी संबंधित आहे आणि मी नीटपणे त्याला उत्तर देऊ शकलो नाही, असे एकदाही घडलेले नाही.

विविध चॅनेल्सवरून घटनाचक्र, महाचर्चा, आमने-सामने अशा अनेक कार्यक्रमांत थेट फोनवरून येणाऱ्या किंवा सूत्रसंचालकाने ठरवून तिरकसपणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मला द्यावी लागली आहेत आणि ती मी चोखपणे दिली, असाच अभिप्राय मला आजवर मिळालेला आहे. प्रबोधनातला आणखी एक वेगळा कार्यक्रम म्हणजे डॉ. श्रीराम लागू व मी यांच्यात होणारा विवेक जागराचा वाद-संवाद. परमेश्वर ही आद्य अंधश्रद्धा आहे आणि त्याला नकार दिल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन अशक्य आहे, अशी डॉ. लागू यांची एक घाव-दोन तुकडे भूमिका आहे. मी स्वत: नास्तिक आहे. मात्र समितीचे मत असे आहे की, समितीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी नास्तिक असणे ही पूर्वअट नाही. समितीची भूमिका देव व धर्म याबद्दल तटस्थ आहे.

ही तटस्थता म्हणजे डॉ. लागू यांना पलायनवाद वाटतो. मला वाटते की, ही भूमिका भारतीय घटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या आशयाशी सुसंगत आहे. या विषयावर मी आणि डॉ. श्रीराम लागू यांचे 100 हून अधिक वादविवाद महाराष्ट्रात सर्वत्र झाले आहेत. ते गाजले आहेत. विचारप्रबोधनाची हालचाल निर्माण करायला उपयोगी ठरले आहेत.

जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्र शासनाने विधानसभेत मंजूर केला; मात्र अजून तो संमत झालेला नाही. या कायद्याच्या विरोधात मी महाराष्ट्रात सर्वत्र बोललो आहे. हा कायदा हिंदू धर्मविरोधी आहे, असा तद्दन खोटा प्रचार या कायद्याच्या विरोधात करण्यात आला. त्यामुळे या विषयावरील माझे भाषण स्फोटक ठरेल म्हणून त्याला परवानगी नाकारावी, असे अर्ज माझ्या व्याख्यानाच्या ठिकाणी पोलिसांना दिले गेले. पोलीस बंदोबस्तात आणि गोंधळाच्या संभाव्य शक्यतेत या सर्व सभा उत्तमपणे पार पाडल्या आहेत.

देवाच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी होणारी पशुहत्या रोखली जावी, यासाठी महाराष्ट्र अंनिसने सुमारे 150 हून अधिक ठिकाणी यशस्वी सत्याग्रह केले. शनिशिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील शनी देवाच्या चौथऱ्यावर आजही बाईला प्रवेश नाही. यासाठी पंढरपूर ते नगर यात्रा काढून सत्याग्रह करून मी सहकाऱ्यांच्या समावेत तुरुंगात गेलो.

महाराष्ट्रात किमान 1 कोटी कुटुंबांत दर वर्षी गणेशमूर्ती बसवतात. प्रत्येक मूर्ती साधारणपणे दोन किलोची असते. यांपैकी जवळपास सर्व मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसने केलेल्या असतात आणि विषारी रासायनिक रंगांनी रंगवलेल्या असतात. याचा अर्थ, दर वर्षी सुमारे दोन कोटी किलो प्लॅस्टर ऑफ पॅरिस पाण्याच्या स्रोतात टाकले जाते. पाण्याने ते घट्ट बनते आणि त्यामुळे गाळ वाढतो. जिवंत झरे बुजतात. रासायनिक रंग पाणी विषारी करतात. हे सर्व टाळण्यासाठी विसर्जित गणपती दान करा, अशी मोहीम समितीने चालविली. उत्तरपूजा झालेले व विसर्जनासाठी आलेले गणपती दान म्हणून समिती स्वीकारते आणि नंतर पाण्याचे प्रदूषण टाळून ते निर्गत करते. या मोहिमेला सुरुवातीच्या काळात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी 30 ते 40 हजार गणपती जमा होत. मात्र गेली दोन वर्षे हिंदू जनजागरण समितीने याला जोरदार विरोध चालू केला. पाण्याचे प्रदूषण झाले तरी चालेल, पण धार्मिक संकेताप्रमाणे नदीच्या वाहत्या पाण्यातच मूर्ती पडल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. विसर्जनाच्या ठिकाणी तणाव व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला. परंतु तोपर्यंत प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पातळीवर अनुकूलता निर्माण झाल्याने प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने पाऊल पुढे पडले. या साऱ्या वाटचालीत या ना त्या कारणासाठी कोर्टकचेऱ्या होणे अपरिहार्य होते. निर्मला-माता हिच्या सहज योगाच्या कार्यक्रमासमोर निदर्शने करताना तिच्याच भक्तांनी आम्हाला बेदम मारहाण केली आणि पुन्हा आमच्यावरच फौजदारी खटला दाखल केला. त्यानंतर मी त्याबाबत लिहिलेला एक लेख माझ्या पुस्तकात छापला गेला, म्हणून माझ्यावर दिल्ली कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला लादण्यात आला. तो दाखल करणारे माजी आयकर आयुक्त होते.

सनातन भारतीय संस्था यांच्याकडे स्वत:ची तरुण डॉक्टर मुलगी गेल्याची तक्रार समितीकडे आली. त्या व्यक्तीला घेऊन मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याचे वृत्त लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, बेळगाव तरुण भारत या वृत्तपत्रांत आले. समितीच्या मासिकात आलेच. संबंधित वृत्तपत्रांवर खटले न भरता माझ्यावर एकूण 4 दिवाणी आणि 3 फौजदारी अब्रुनुकसानीचे खटले लावण्यात आले. त्यांतील 3 मधून मी निर्दोष मुक्त झालो. उरलेले अजून चालू आहेत. त्यांतील एक खटला एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागणारा अब्रुनुकसानीचा आहे.

समितीच्या कामाचा ताळेबंद मांडण्याची ही जागा नव्हे, हे मला समजले; तरीही मागे वळून पाहताना इतके घडू शकले याचे समाधान आणि अभिमान वाटतोच. कामाला सुरुवात झाली 1985 मध्ये. त्या वेळी त्याला संघटनेचे रूप नव्हते. महाराष्ट्रात विविध ठिकाणी याच जाणिवांनी काम करत असलेल्या विविध गटांचे सैलसर संघटन असे रूप त्याला होते. 3-4 वर्षांत ते चालणे अशक्य झाले.

मी 1971 पासून परिवर्तनाच्या चळवळीत होतो. सामाजिक न्याय, आर्थिक शोषण, भ्रष्टाचार आणि राजकारण असे लढे लढवत होतो. काही कारणाने 1985 मध्ये या कामात आलो. काम एकत्रित होण्याआधीच मतभेदांतून विस्कळीत होण्याची वेळ आली. मला या कामाचे अगत्य प्राधान्यक्रमाने नव्हते. हे काम फार महत्त्वाचे आहे, असेही वाटत नव्हते. त्यामुळे संघटनेत मतभेद होत आहेत, असे दिसताच मी थांबण्याचा निर्णय घेतला. तसे झाले असते, तर कामाचे काय झाले असते, माहीत नाही; पण मी त्या कामात दिसलो नसतो, हे खरे. पुण्याची आमची सहकारी मंडळी म्हणाली, ‘‘आम्हाला काम करण्याची इच्छा आहे; पण तुमच्याकडे वेळ आणि वक्तृत्व आहे, तेव्हा आमच्यासाठी तुम्ही कामात राहा.’’ असे ठरले की, दोन वर्षे काम चालू ठेवायचे. मी समन्वयक म्हणून काम पाहायचे आणि दोन वर्षांनी काम रुजते असे वाटले, तर पुढचा विचार करायचा. हे वर्ष होते 1989.

दोन वर्षांनी 1991 मध्ये संघटनाबांधणी करण्याचा निर्णय झाला. त्या वेळी संघटनेच्या 15-20 शाखा होत्या. पहिली कार्यकारिणी निवडली गेली. मी कार्याध्यक्ष झालो. गंमत म्हणजे, मला कामाचा आग्रह करणारे पुणे केंद्रातील सर्व सहकारी पुढे काम करायचे थांबले आणि मी चालत राहिलो. संघटनेचा असा इतिहास अवघा 17-18 वर्षांचा आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना पोचली आहे. 180 शाखा आहेत. कार्यकर्त्यांचे जाळे आहे. अलीकडेच मला एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणाले, ‘‘तुमचे चांगले चाललेले दिसते.’’ मी विचारले, ‘‘म्हणजे काय?’’ ते म्हणाले, ‘‘तुमची संघटना महाराष्ट्रात पसरलेली आहे, पण संघटनेतील भांडणे-कुरबुरी कोठे ऐकू येत नाहीत.

तुम्ही काही NGO  नाही, तरीही तुम्हाला कधी आर्थिक अडचण असल्याचे जाणवलेले नाही. प्रसिद्धिमाध्यमेही सतत तुमच्या बाजूनेच असतात.’’ त्यांच्या बोलण्याने मी मनातून थोडा नक्कीच सुखावलो आणि थोडा अंतर्मुखही झालो. ही गोष्ट खरीच आहे की, एवढ्या मोठ्या संघटनेच्या मानाने संघटनेत कुरबुरी, भांडणे, झगडे, एकमेकांवर कुरघोडी यांचे प्रमाण नगण्य आहे. गेल्या कित्येक वर्षांत एखादा अपवाद वगळता मला यासाठी कधी वेळ द्यावा लागला नाही. अशा वातावरणात काम  करताना एक आश्वासकता मिळते, ती मला सदैव लाभली आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम व विश्वास याबाबत इतरांना हेवा वाटावा, अशी माझी स्थिती आहे. संघटनेच्या स्थापनेपासून मीच कार्याध्यक्ष आहे आणि ते कार्याध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मीच गेले 3 वर्षे जाहीर करत आहे.

माझ्यासारखी मान्यता कदाचित आणखी कोणाला केवळ या पदामुळे लाभेलच असे नाही, अशीही शक्यता आहे. त्यासाठी आम्ही संघटनेतल्या पाच ज्येष्ठ कार्यकर्त्यांची कार्यकारी समिती बनविली आहे. संघटनेचे सर्व निर्णय त्यांच्यासह आम्ही ठरवतो. जादूटोणाविरोधी कायदा मंजूर झाल्यानंतर मी कार्याध्यक्षपद सोडावे, असे संघटनेत ठरले. त्याला दीड वर्ष झाले. त्या वेळी कायदा होणे लांबणीवरच पडत जाईल, असे वाटले नव्हते; पण ते लांबणीवर पडत गेले आणि माझा कार्याध्यक्षपदाचा कालावधी लांबत गेला. अर्थात पदाशिवायही मी सदैव कार्यरत राहीनच. कामाचे नियोजन, राग न येणे, चिकाटी, उत्तम तब्येत, प्रवास व काम सतत करण्याची क्षमता या मला लाभलेल्या काही देणग्या आहेत. वयपरत्वे चित्र काही बदलेलच; परंतु माझ्याकडून सजग राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. एवढी चळवळ चालवायची म्हणजे आर्थिक क्षमता लागतेच. गेली जवळपास 18 वर्षे चळवळ आर्थिक अडचणीत आली, असे कधीही झालेले नाही, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. संघटनेची वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती त्याला कारणीभूत आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे संघटनेला सर्वोत्तम सामाजिक कार्य पुरस्कार 10 वर्षांपूर्वी लाभला. त्याही वेळेला संघटनेकडे स्वत:चे ऑफिस नव्हते आणि आजही संघटनेचे स्वत:च्या मालकीचे ऑफिस नाही. पण यामुळे काम अडल्याचेही जाणवत नाही. संघटनेच्या सर्व शाखा स्वत:चा सर्व खर्च स्वत: करतात. मध्यवर्ती शाखेतर्फे त्यांना कसलीही आर्थिक मदत आम्ही देत नाही आणि तेही कधी अपेक्षा करत नाहीत. संघटनेच्या शाखांनी कार्यक्रम केल्याने काही मानधन मिळू शकते, स्वयंअध्ययन परीक्षेच्या उपक्रमातून काही निधी उभा राहतो, कार्यकर्त्यांनी संघटनेला स्वत:च्या उत्पन्नातून केलेली अल्प-स्वल्प मदत आणि संघटनेच्या मासिकाच्या वार्षिक अंकाला ज्या जाहिराती त्या-त्या शाखेार्फत मिळतील, त्यामधील 10 टक्के रक्कम याद्वारे शाखा आपली गरज भागवतात.

संघटनेला मध्यवर्तीतर्फे करावयाचे उपक्रम, प्रवास यासाठी लागणारे पैसे दिवाळी अंकाच्या जाहिराती अथवा उत्स्फूर्तपणे आलेल्या देणग्या यांतून उभे राहतात. गेल्या 18 वर्षांत पैशावाचून काम कधीही अडलेले नाही. ‘कोणतेही चांगले काम पैशावाचून अडत नाही,’ या गांधींच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे. कधी पैशाची अडचण आलीच, तरी पैसे मिळवण्यासाठी धडपड करण्याऐवजी कामाची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करावयाचा, अशी खूणगाठ मी मनोनी बांधली आहे आणि सहकाऱ्यांनाही तेच सांगत असतो.

संघटना सतत चर्चेत राहते, ही गोष्ट खरी आहे. यामुळे प्रसिद्धिलोलुपतेचा आरोपही संघटनेवर केला गेला आहे. संघटनेला आणि मलाही जी प्रसिद्धी सर्व माध्यमांनी दिली, ती पुरेशी आहे आणि दीर्घकाळ मिळाली आहे, असे माझे मत आहे. एखाद्या संघटनेला अशी अनुकूलता सातत्याने सुमारे दीड तप लाभत नाही. त्यामुळे ‘यापुढे कधी तरी प्रसिद्धिझोताच्या बाहेरही राहावे लागेल याची मानसिक तयारी ठेवा,’ असे मी सहकाऱ्यांना सतत सांगत असतो.

तीन कारणांनी ही प्रसिद्धी लाभते, असे मला वाटते. पहिली बाब म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलनाची अनेक कामे ही बातमीमूल्य असणारी असतात. त्या वास्तवाला भिडणाऱ्या कायकर्त्यांवर प्रकाशझोत पडतोच. दुसरे असे की, समितीचे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत असे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांचे मत आहे. यामुळे समितीच्या बातमीला ‘चमकेगिरी’ असे स्वरूप दिले जात नाही, कारण ते तसे नसतेच. याबरोबरच ही तिसरी बाबदेखील आहेच की, मी स्वत: आणि माझे ठिकठिकाणचे सहकारी यांनी प्रसारमाध्यमांशी आवर्जून व्यवस्थित संबंध ठेवले आहेत. त्या-त्या वेळी योग्य ती बातमी वा लेख प्रसारमाध्यमांना जातील याची काळजी घेतली आहे. व्यापक अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित कोणतीही बाब घडली की, बहुधा मी कोणत्या तरी प्रमुख वृत्तपत्रासाठी लेख लिहितो आणि तो त्वरित छापलाही जातो.

समितीची आणि माझी व्यक्तिश: कसोटी लागली, ते क्षेत्र मात्र वेगळेच आहे. महाराष्ट्राच्या आजच्या सामाजिक वास्तवाची ज्यांना थोडीदेखील जाण आहे, त्यांना याची कल्पना आहे. कोणतेही संघटन उभे राहिले की, ते कोणत्या जातीचे आहे आणि त्याचे नेतृत्व कोणत्या जातीचे आहे याची चर्चा महाराष्ट्रात होतेच होते. समितीचे संघटनात्मक काम आणि चळवळीतील नाव स्थिरावल्यानंतर ही चर्चा महाराष्ट्रात जोरात घडवली गेली.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डॉ. दाभोलकर हे धर्मबुडवे आहेत आणि त्यांना हद्दपार करा, अशी मागणी एका बाजूला हिंदुत्ववादी संघटना करत असतात यात नवल नाही. परंतु दुसऱ्या बाजूला स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या वा धर्मनिरपेक्ष समजणाऱ्या संघटना, त्यांची प्रमुख नेतेमंडळी, त्यांच्या विचाराला मान्यता देणारी साप्ताहिके यांनी ‘दाभोलकर ब्राह्मण आहेत; त्यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन शक्य नाही. बहुजनांना फसवण्याचा हा बामणी कावा आहे’ – असा प्रचार महाराष्ट्रात सर्वत्र जाहीरपणे आणि मोठ्या प्रमाणात केला.

जातीची मानसिकता ही एक अजब गोष्ट आहे. त्या मानसिकतेचे तर्कशास्त्र चुकीचे असते, पण सुसंगत भासते व भासवले जाते. अशा विखारी प्रचारांनी संघटनेला गंभीर अपाय होऊ शकला असता, तसा तो झालेला नाही आणि त्यामुळे की काय, आता हा प्रचारही बराचसा मावळला आहे. हे घडून आले याचे कारण माझ्या जातीला शोषणाचे जे गुणविशेष चिकटवले जातात, ते मला लागू नाहीत हे नाही; तर त्याचे खरे कारण हे आहे की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व शाखांत विविध जातींचे इतके बहुजन भरले आहेत की, त्या संघटनेला जातीचे लेबल लावणे अशक्य आहे. दुसऱ्या बाजूला संघटनेच्या सर्व स्तरांतील पदाधिकारी निवडीत जात हा मुद्दा चुकूनही डोकावलेला नाही आणि तरीही 35 जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारी कार्यकारिणी आपोआपच बहुजातीय बनलेली आहे. याचा अर्थच असा की, शाखापातळीपासून ते राज्यपातळीपर्यंतचे पदाधिकारी निवडताना जातीचा विचार कधीही झाला नाही. मात्र ज्या सभासदांतून ते निवडले गेले, त्यांच्यातच इतक्या विविध जातींचे लोक आहेत की, निवड कशीही झाली तरी ती बहुजनवादीच होणार.

संघटनेचा विस्तार होणे आणि त्यात भांडणे नसणे, प्रसारमाध्यमांचा सततचा पाठिंबा मिळणे, आवश्यक तेवढा निधी लोकांकडून उपलब्ध होणे आणि जातजाणिवेपासून संघटना मुक्त राहणे- या सर्व बाबी साध्य झाल्या त्या कशा, याचे उत्तर माझ्याकडे नाही. पण मला संभाव्यता वाटतात त्या अशा- एक तर संघटनेत लोकशाही आवर्जून पाळली जाते. दुसरे म्हणजे, कारभार अत्यंत जाणीवपूर्वक विकेंद्रित आहे. कार्यकर्त्याला स्वायत्तता आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, येणारे कार्यकर्ते हे स्वत:च्या आंतरिक प्रेरणेने येतात.

आजूबाजूच्या अंधश्रद्धेने त्यांना घुसमटल्यासारखे वाटत असते, मात्र त्याचा प्रतिवाद करण्याची दिशा त्यांना सापडत नसते; समितीच्या रूपात त्यांना एक संघटित व सामर्थ्यवान दिशा दिसते. यामुळे संघटन सांभाळणे, टिकणे, वाढणे ही त्यांचीच आंतरिक गरज असते. यातूनच भांडणे, जात- विचार, आर्थिक दुरवस्था यांपासून संघटनेला दूर ठेवण्यास तो धडपडतो. मी स्थापनेपासून संघटनेचा कार्याध्यक्ष आहे.

माझे नाव संघटनेशी- नाण्याची दुसरी बाजू या पद्धतीने जोडलेले आहे. परंतु संघटनेला- वरील स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मी खरेच काही विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे हे सारे कुठून येते व कसे घडते, याबद्दल मलाही कुतूहलच आहे. या कार्यात अनेकांचे लाभलेले उत्स्फूर्त सहकार्य ही मर्मबंधातील ठेव आहे. ती उघडी करणे फारसे उचित नाही. खटल्यांच्या वेळी मान्यवर वकील विनामूल्य उभे राहिले. चळवळीच्या अनेक कार्यक्रमांना डॉ. श्रीराम लागू, निळूभाऊ फुले यांच्यासारखे बुजुर्ग ‘वेठबिगारा’सारखे वागले (‘वेठबिगार’ हा त्यांनीच लाडिक तक्रारीच्या स्वरूपात उच्चारलेला शब्द आहे.). माझी पत्नी, भावंडे, मुले या सगळ्यांनी मला खूपच सांभाळून घेतले; ज्यामुळे एकाकीपणाची जाणीव कधी स्पर्श करू शकली नाही.

आता वाटचालीबाबत दोन बाबी. माझी भूमिका अशी आहे की, मी टीकेला उतर देत बसत नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात जात नाही. विचारविरोधकांच्या टीकेला जेवढ्यास तेवढे उत्तर देतो आणि विषय सोडून देतो. अनेकदा अब्रुनुकसानीचा खटला सहज घालता येईल असे आरोप असतात. मी ते काही करत नाही. चळवळ कोर्टकचेऱ्यांत नेऊ नये, असे माझे मत आहे. समविचारी मानले जाणारे मित्र वा संघटना ज्या टीका करतात, त्यांवर तर  मी ‘ब्र’ही उच्चारत नाही. हे माझे वागणे बरोबर का चूक, मला माहीत नाही. पण एक नक्की की, या प्रत्युत्तरात न पडल्याने माझा कधीही तोटा झाला नाही.

माझे असे मत बनले आहे की, प्रदीर्घ वाटचालीनंतर लोकमानसात तुमच्याबद्दल एक प्रकारची मान्यता तयार झालेली असते, शेरेबाजी पद्धतीच्या भडक आरोपांतून त्याला धोका पोचत नाही. माझ्या वाटचालीत मला एकारलेपण आले आहे. अंनिसचे आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे काम यापलीकडे मी सध्या काही म्हणजे काही करत नाही. मी कित्येक वर्षांत कबड्डीच्या मैदानावर गेलो नाही. सिनेमा, नाटक, सहल जवळपास नाहीच. टीव्ही मी पाहत नाही. कुटुंबात असून नसल्यासारखाच. वाचन करतो, तेही गरजेपुरते. हे व्यक्तिमत्त्वाचे उघडपणे बराकीकरण आहे. माझ्या आजूबाजूच्यांना यामुळे त्रास, वैताग येत असणार. पण त्याला सध्या तरी इलाज दिसत नाही. मुख्य म्हणजे मला यामध्ये मजा येते, गंमत वाटते, कंटाळा-थकवा जाणवत नाही. माणसे विचार बदलत असतात आणि कार्यकर्ते माझ्यासारखेच बेभानपणे धडपडत असतात. ही आनंद देणारी, सतत उत्साहित ठेवणारी बाब असते.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य का करावयाचे याबाबत मी सहकाऱ्यांना सतत सांगत असतो की- ‘कृपया समाजाचे देणे लागतो वगैरे वगैरे गोष्टीसाठी अजिबात काम करू नका. डोक्यावर भलती ओझी घेऊ नका. काम करताना निखळ आनंद वाटावयास हवा, तरच आणि तोपर्यंतच कामात राहा.’

चळवळीच्या वाटचालीत धर्मनिरपेक्षतेच्या आशयाबद्दल एक नवा मुद्दा आम्ही उपस्थित केला आहे. आजपर्यंतच्या धर्मनिरपेक्षतेच्या पुरोगामी मांडणीपेक्षा तो वेगळा आहे. प्रशासनाने धर्मनिरपेक्षता अमलात आणावी, हा एक मतप्रवाह आहे. अस्थिर अर्थकारणात धर्मनिरपेक्ष राजकारण अशक्य होते, तेव्हा प्रथम अस्थिर अर्थकारणावर उत्तर शोधावे आणि त्या लढ्यात सहभागी होणाऱ्या श्रमिकांना धर्मनिरपेक्षता सांगावी, असा दुसरा प्रवाह आहे. सध्याची माझी मांडणी अशी आहे की- या देशातील धर्मनिरपेक्षतेची नाळ महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाशी जोडावयास हवी. या समाजसुधारकांनी समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला आणि ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री केला. त्या मार्गाने भारतातील धर्मनिरपेक्षता अधिक आशयसंपन्न बनू शकेल, असे मला वाटते. मात्र आज तरी हे प्रचाराच्या पातळीवर आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन हे सुटे काम नाही, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी ते जोडण्याची आवश्यकता आहे. मात्र जे व्यापक चळवळी चालवतात ते व त्यांची कामे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम यांना जोडणारे हे दुवे आज तरी अस्तित्वात नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन एवढेच आपले एकमात्र काम आहे, या कल्पनेतून येणारा एकारलेपणा कार्यकर्त्यांध्ये येऊ न देण्याची गरज मला जाणवते. हे अवधान आम्ही बाळगत आलो आहोत; मात्र ते अधिक अर्थपूर्ण करण्याची गरज आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात कार्यकर्त्यांवर एक दुर्बीण सतत रोखलेली असते. ती म्हणजे- तुम्ही वागता कसे? कथनी आणि करणी यात अंतर नसावे- हे योग्यच आहे; परंतु ‘बोले तैसा चाले’ अशी वंदनीय पावलेही समाजात कमीच असणार. एक चळवळ म्हणून आमची संघटना आणि एक व्यक्ती म्हणून मी या दिशेने चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, असे मला वाटते. आमची खरी ताकद ही संघटनेच्या या चारित्र्यात लपलेली आहे. समितीचे कार्यकर्ते बोलतात तसेच वागण्याचा प्रयत्न करतात, अशी समितीच्या कार्यकर्त्यांबद्दल लोकधारणा आहे. हे कार्यकर्त्यांना आणि मला पूर्णांशाने जमत नाही, हे खरेच आहे. पण जास्तीत जास्त आचार हा विचाराशी सुसंगत असावा, असा आमचा प्रयत्न असतो. सर्वच ठिकाणी ‘तुम्ही जसे बोलता तसे वागता का’ याबाबत लोकांचा पहारा असतोच. अंनिसबाबत तो जरा जास्तच कडक असतो. यामुळेच अंनिसमध्ये सहभागी होण्यास अनेकांचे मन कचरते. त्यांना स्वत:ला समितीची मते पटत असतात. मात्र ती अमलात आणावयास गेले, तर अतिशय जवळच्या नातेवाइकांनादेखील ती पटवणे त्यांना शक्य होत नाही. पुन्हा संबंधित बाबीत दुसऱ्या बाजूच्या भावना तीव्र असतात. नवस जोडीने फेडायचा असतो आणि पूजाही जोडीनेच घालायची असते. अशा वेळी पूजेला ठाम नकार देण्यामुळे उभे कौटुंबिक स्वास्थ्यच धोक्यात येते. याबाबतचा तत्त्वविचार व व्यवहार ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकारांच्या दोन वाक्यांनी स्पष्ट होतो. पहिले वाक्य आहे- ‘नुसते ज्ञान वाढून उपयोगी नाही, त्याप्रमाणे वागण्याचे धैर्य यावयास हवे.’ दुसरे वाक्य आहे- ‘इष्ट ते सांगेन, शक्य ते करेन.’ मला परिवर्तनाची ही साखळी पुढीलप्रमाणे दिसते. प्रथम विचार, नंतर उच्चार, त्यानंतर प्रचार, त्यानंतर आचार. पुढच्या पायरीवर संघटन म्हणजेच सामुदायिक आचार आणि सरतेशेवटी संघर्ष. जी गोष्ट बदलणे समितीला आवश्यक वाटते, त्या गोष्टींविरोधात संघर्ष. विवेकवादाचा विचार व्यक्तीच्या मनात पेरणे, ही काही सोपी बाब नाही. त्या विवेकाचा उच्चार जरी सातत्याने होत राहिला तरी एक पाऊल पुढे पडते आणि उच्चाराचे प्रचार मोहिमेत हळूहळू रूपांतर होते. ज्या बाबीचा प्रचार होतो, त्याचा आचार त्या-त्या व्यक्तींकडून झाला आणि त्यामुळे त्यांचे संघटनेत रूपांतर झाले, तर फारच छान आणि अशी संघटना परिवर्तनाच्या संघर्षात उतरली तर दुधात साखरच. मात्र हे सर्व टप्पे पार पाडताना व्यक्तीची चांगलीच दमछाक होते. ते स्वाभाविकही आहे. या मार्गावर मी यथाशक्ती चालत आहे. हा एक न संपणारा प्रवास आहे, याची मला जाणीव आहे.

साभार ‘साप्ताहिक साधना’

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0