विज्ञान दिनानिमित्ताने विवेकाचा जागर करू या!

विज्ञान दिनानिमित्ताने विवेकाचा जागर करू या!

२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणून २५ वर्षे कार्य करताना डॉ नरेंद्र दाभोळकर यांना त्यांचे टीकाकार, समर्थक, कार्यकर्ते अशा सगळ्या लोकांनी काही प्रश्न सतत पुन्हा पुन्हा विचारले. या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना डॉ. दाभोळकरांनी अत्यंत गोळीबंद स्वरूपात 'प्रश्न तुमचा, उत्तर दाभोळकरांचे' मध्ये उत्तरे दिलेली आहेत.

गोव्याचा चित्तथरारक वाङ्मयीन इतिहास
टोनी मॉरिसन : वेदनेचं महाकाव्य लिहिणारी लेखिका
फॅरनहाईट ४५१ : अतियांत्रिकतेच्या आहारी गेलेल्या जगाचे भयावह चित्र
पानांमधून पुस्तके, वाचन संस्कृती यांविषयी विचारप्रवृत्त करणारे सदर

“पानांमधून”
वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारे सदर

वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल डॉ. दाभोलकर यांचे विचार खालील वेच्यातून स्पष्ट होतात.

‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ याचा अर्थ जगाचा एका वेगळ्या दृष्टीनं अर्थ लावणं. कोपर्निकसनं पहिल्यांदा सांगितलं की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसत असलं, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपण त्याला ‘कोपर्निकस रिव्होल्यूशन’ म्हणतो. कोपर्निकसच्या या शोधामुळे जगाचा केंद्रबिंदू बदलला. त्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक शोध लागत गेले आणि मग हळूहळू ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ ही संज्ञा आकाराला आली. गेल्या शतकात तर हा दृष्टिकोन इतका महत्त्वाचा ठरला की, भारतीय राज्यघटनेतल्या नागरिकांच्या कर्तव्यामध्येही त्याचा समावेश केला गेला; शिक्षणाच्या गाभाघटकांमध्ये, मूल्यशिक्षणामध्ये त्याचा समावेश झाला.  म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अवघ्या चारशे-पाचशे वर्षांपूर्वी जगामध्ये आला आणि धर्माचा इतिहास मात्र या देशामध्ये पाच-सहा हजार वर्षांपासून आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी १९५३ मध्ये लोकसभेत वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. आणि राज्यघटनेत असं म्हटलंय, की It is a duty of every Indian citizen to promote scientific temperament. लक्षात घ्या, ‘पाच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या धर्माचा आणि अध्यात्माचा प्रचार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं काम आहे’ असं राज्यघटनेत म्हटलेलं नसून, ‘नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा’ असं म्हटलेलं आहे. पण म्हणजे नेमकं काय? चार मुद्दे सांगता येतील.

१. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या संज्ञेचा एका शब्दात अर्थ सांगायचा तर, कार्यकारणभाव. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं. त्यामागे देव, दैव, नशीब, प्राक्तन, संचित, प्रारब्ध असं काहीही नसतं.

२. ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. या देशामध्ये असं सांगण्यात आलं की, ‘तू ओबीसी आहेस, तुला एवढंच समजेल. तू दलित आहेस, तुला काहीच समजणार नाही. तू स्त्री आहेस, तुला शिकण्याचा अधिकारच नाही.’

३. जगातल्या सगळ्याच कार्यांमागची कारणं समजत नाहीत. उदा. कॅन्सर का होतो, याचं कारण आज माहीत नाही. पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो. तो असं मानतो की, आम्ही सत्याचा शोध अखंड चालू ठेवू. तो कधीही धर्मासारखा अंतिम सत्यावर उभा नसतो.

४. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा आजतरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला सापडलेला सर्वांत खात्रीचा मार्ग आहे. ग्रंथप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, कुणीतरी कुणाच्यातरी डोक्यावर हात ठेवल्यामुळे मिळालेलं ज्ञान, या सगळ्या ज्ञानाच्या मार्गांना आता नकार मिळालेला आहे. त्यामुळे ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा’ स्वीकार ही मानवी जीवनातली महत्त्वाची बाब आहे आणि या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीची पूर्वअटदेखील आहे. म्हणून अंनिस ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा’ एवढा आग्रह धरते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणून २५ वर्षे कार्य करताना डॉ नरेंद्र दाभोलकर यांना त्यांचे टीकाकार, समर्थक, कार्यकर्ते अशा सगळ्या लोकांनी काही प्रश्न सतत पुन्हा पुन्हा विचारले. अशा वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना डॉ. दाभोलकरांनी अत्यंत गोळीबंद स्वरूपात “प्रश्न तुमचा, उत्तर दाभोळकरांचे” या पुस्तकात उत्तरे दिलेली आहेत.

डॉ. दाभोलकर ‘फलज्योतिषाला’ शास्त्र मानत नाहीत. त्याचे स्पष्टीकरण त्यांनी पुढील प्रमाणे दिले आहे.  “कुठलीही गोष्ट शास्त्र आहे की नाही हे कसं सिद्ध होतं, याचे जागतिक पातळीवर सर्वमान्य असे काही निकष आहेत. ते निकष काय आहेत? आधी गृहीतक किंवा Hypothesis मांडावे लागते आणि ते सिद्ध करावे लागते. त्यानंतर त्याचं सिद्धान्तात रूपांतर होतं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही ज्योतिषाला जाऊन विचारा की, ‘फलज्योतिषाचं गृहीतक काय?’ तर तो तुम्हाला सांगणार नाही, पण मी सांगतो.

१ – आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर सतत आणि अखंड परिणाम होत असतात.

२ –  हे परिणाम तुमच्या जन्माच्या वेळेवर अवलंबून असतात.

३ –  त्यानुसार तुमचं भविष्य कळतं, ठरतं किंवा बदलतं.

आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर परिणाम होतात, असं क्षणभर आपण मान्य करू. समजा, मला ताप आला. मी पाच औषधांचा काढा घेतला आणि माझा ताप गेला, तर त्या पाच औषधांपैकी नेमक्या कुठल्या औषधानं माझा ताप गेला, हे कळणार नाही. बरोबर आहे ना? ते कळण्यासाठी मला प्रत्येक औषध वेगळं घ्यावं लागेल. त्याप्रमाणे माझ्यावर गुरूचा किंवा शनीचा कुठला प्रभाव होतोय, ते ज्योतिषी सांगतात, तेव्हा त्यांनी उरलेल्या ग्रहांचा प्रभाव झाकून ठेवण्याची व्यवस्था करायला पाहिजे ना! त्याशिवाय त्यांना कसं कळलं की, या ग्रहाचा प्रभाव असा, त्या ग्रहाचा प्रभाव तसा? शिवाय, अब्जावधी अंतरावर असलेल्या राशी आणि ग्रहांचा प्रभाव कसा? म्हणजे आकाशस्थ ग्रहगोलांचा प्रभाव कसा असतो, हे त्यांना सांगता येणं शक्य नाही.

दुसरं गृहीतक, जन्माच्या वेळेवर ते अवलंबून असतं. आत्तापर्यंत फलज्योतिषाच्या कोणत्याही मांडणीत जन्माची वेळ सांगितलेली नाही. कारण ती वेळ कुठली ठरवायची आणि तीच का धरायची? मला डॉक्टर म्हणून हे माहीत आहे की, स्त्रीच्या शरीरामध्ये पुरुषबिजानं प्रवेश केल्यानंतर पुढच्या २४ ते ४८ तासांमध्ये स्त्रीच्या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचं मीलन होतं आणि नव्या जगाची-नव्या जीवाची पहिली पेशी म्हणजे एम्ब्रियो तयार होतो. पण ती वेळ तुम्हाला कधी कळते काय? आणि हे मी नव्हे, तर महात्मा फुलेंनी केलेलं आरग्युमेंट आहे. म्हणजे तुम्ही जन्माची वेळ ठरवता कशी? आणि तुम्ही जर म्हणालात की, ‘जन्माला येईल ती वेळ!’ तर मग अब्जावधी मैलांवरून, १०-१० मजली काँक्रीटच्या इमारतींवरून येणारी किरणं बाईच्या चार इंच जाडीच्या पोटाजवळ अडून बसतात होय? त्यांना आत प्रवेश नाही! डिलीव्हरी झाल्यानंतर त्यांचं काय ते सुरू! असं होतं का?

आता तिसरं गृहीतक पाहू- त्यानुसार नशीब ठरतं आणि बदलतं. हा सगळ्यात मोठा आक्षेपाचा भाग आहे. समजा या ठिकाणी तीन टेबलं मांडली. एकावर पुण्यामधल्या अत्यंत दरिद्री मजुराची मुलगी झोपवली- नऊ महिने पूर्ण. दुसऱ्या टेबलावर पुण्यातल्या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी झोपवली- नऊ महिने पूर्ण. तिसऱ्यावर भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस अंबानी त्याची मुलगी झोपलेली आहे- नऊ महिने पूर्ण. आणि एकाच ठिकाणी एका सेकंदाला सिझेरियन ऑपरेशन करून तीनही बालकांना जन्म दिला, तर तिघांचं भवितव्य एक असेल का? नाही ना! ती बिचारी शेतमजुराची लेक दुसऱ्या दिवशी स्वत:चं लेकरू सांभाळत कामाला जाईल, त्याशिवाय ती जगणार नाही. इथला श्रीमंत व्यापारी दहाव्या दिवशी स्वत:ची आलिशान गाडी घेऊन स्वत:च्या लेकीला घेऊन जायला येईल. आणि इथे हेलिकॉप्टर कसं उतरवता येईल, याची अंबानी चौकशी करेल. म्हणजे माणसाचं भविष्य हे ग्रहगोलांच्या गतीवर नव्हे, तर समाजस्थितीवर ठरत असतं. लक्षात घ्या, दोन हजार वर्षं या देशातल्या बायकांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता आणि सावित्रीबाई जन्माला आल्यानंतर काय भराभरा योग बदलले काय? सारांश भविष्य हे शास्त्र नाही, ते माणसाला परिवर्तनापासून रोखतं, म्हणून त्याच्याविरुद्ध आमची लढाई आहे.”

डॉक्टर म्हणतात, “विवेकवादाचा विचार व्यक्तीच्या मनात पेरणे, ही काही सोपी बाब नाही. त्या विवेकाचा उच्चार जरी सातत्याने होत राहिला तरी एक पाऊल पुढे पडते आणि उच्चाराचे प्रचार मोहिमेत हळूहळू रूपांतर होते. ज्या बाबीचा प्रचार होतो, त्याचा आचार त्या त्या व्यक्तीकडून झाला आणि त्याचे संघटनेत रूपांतर झाले तर छानच आणि ती संघटना परिवर्तनाच्या संघटनेत उतरली तर दुधात साखर!”

प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे” 

साधना प्रकाशन

किंमत : ६० रुपये.

पृष्ठे : ६८

(संकलक – मृदगंधा दीक्षित)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0