पोर्ट ब्लेअरः अंदमान व निकोबार बेटावरील ग्रेट अंदमान जातीतील १० जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. पोर्ट ब्लेअरमधील ग्रेट अंदमान जातीची लोकसंख्या क
पोर्ट ब्लेअरः अंदमान व निकोबार बेटावरील ग्रेट अंदमान जातीतील १० जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. पोर्ट ब्लेअरमधील ग्रेट अंदमान जातीची लोकसंख्या केवळ ५९ असून आरोग्य खात्याने या जातीमध्ये कोरोनाचे संक्रमण पसरू नये म्हणून आरोग्य खात्याचे एक विशेष पथक पोर्ट ब्लेअर व स्ट्रेट आयलंडवर पाठवले आहे. या बेटांवर ग्रेट अंदमान जातीची अनुक्रमे ३४ व २४ माणसे राहात असून या सर्व जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.
या संदर्भात आरोग्य विभागाचे उपसंचालक व नोडल अधिकारी अविजीत रॉय यांनी सांगितले की, कोरोनाबाधित पाच रुग्ण बरे झाले आहेत अन्य अद्याप उपचार घेत आहेत.
ग्रेट अंदमान जातीची लोकसंख्या कमी आहे पण या आदिवासी जातीचे लोक सामान्य लोकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अंदमान निकोबार ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक विश्वजीत पांड्या यांचे म्हणणे आहे. स्ट्रेट आयलंडवर अन्य कोणालाही जाण्याची परवानगी नाही. पण या बेटावरील लोकांना पोर्ट ब्लेअरवर जाण्याची परवानगी आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे, असे पांड्या यांनी सांगितले.
मार्चपासून गेल्या गुरुवार अखेर अंदमान व निकोबार बेटावर २,९८५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून त्यापैकी २,३०९ रुग्ण बरे झाले आहेत व ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
१८५०च्या दशकात ग्रेट अंदमान जातीची लोकसंख्या ५ ते ८ हजारच्या दरम्यान होती. १९०१मध्ये ताप, सीफीलिस या सारख्या संक्रमित रोगांनी या जातीची लोकसंख्या ६२५ वर आली. १९३१च्या जनगणनेत ही संख्या ९० इतकी आढळून आली होती. ६० च्या दशकात १९ इतकी कमी झाली होती. नंतर ही जाती साथरोगांना बळी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जात होती. त्यांचा अन्य मानवी संपर्कही कमी करण्यात आला होता.
अंदमान व निकोबार बेटांवर ग्रेट अंदमान जातींव्यतिरिक्त जारवा, शोमपेन व ओंगे या मोजकेच संख्या असलेल्या मानवी जाती आहेत, यांचा मानवी संपर्क अजिबात नाही.
मूळ बातमी
COMMENTS