कुंभमेळ्याच्या गर्दीकडे मोदी सरकार, मीडियाचे सोयीस्कर दुर्लक्ष

कुंभमेळ्याच्या गर्दीकडे मोदी सरकार, मीडियाचे सोयीस्कर दुर्लक्ष

मरकज व कुंभ मेळा यांची तुलना करणे भलेही चुकीचे असले तरी कुंभ मेळ्याच्या तुलनेत मरकजची गर्दी ही एक दशांशहून कमी होती व हा कार्यक्रम कोरोना भारतात शिरकाव करण्याच्या अगदी सुरूवातीला झाला होता. कुंभ मेळ्याबाबत मात्र तसे म्हणता येत नाही.

वर्षभरात सरकारने काय केले?- सोनियांचा सवाल
कोणतीही कोविड चाचणी १०० टक्के बिनचूक नाही!
महाराष्ट्र, पंजाबमध्ये कर्फ्यू, राज्यात सर्व जिल्हा सीमाबंद

नवी दिल्लीः उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या निमित्ताने हजारो भाविक जमले आहेत. लाखोंनी भाविक जमवणारा कुंभ मेळा हा जगातील सर्वाधिक मोठा धार्मिक सण म्हणून ओळखला जातो. भारतात कोविडने थैमान घातले असताना, सामाजिक विलगीकरणाची अत्यंत आवश्यकता असताना हा कुंभ मेळा मोठ्या प्रमाणात वाजत गाजत साजरा केला जात आहे. या मेळ्याचे फोटो व व्हीडिओ सोशल मीडिया व प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर लक्षात येते की कोविड-१९ असतानाही सामाजिक विलगीकरण असो की तोंडावर मास्क लावणे असो याचे कोणीही पालन करताना दिसत नाही.

गेल्या मार्चमध्ये कोरोनाचा देशभरात पुन्हा वेगाने संसर्ग वाढला असतानाही केंद्र सरकार व उत्तराखंड सरकारने हा मेळा होऊ नये म्हणून कोणतीही पावले उचलली नाही. हा मेळा दर १२ वर्षांनी होतो असे त्या मागचे कारण सांगितले जात आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांनी हा मेळा सर्वांसाठी खुला असल्याचे जाहीरही केले. खुद्ध तेही या मेळ्यात सामील झालेले दिसून आले. त्यांनी मास्क तोंडावर लावण्याऐवजी मानेवर बांधला होता. हा मेळा होऊ नये असे ज्यांचे प्रयत्न आहेत ते आम्ही उधळून लावू, परमेश्वरावरची श्रद्धा या विषाणूच्या भयावर मात करेल असे विधान त्यांनी २० मार्चला केले होते.

राज्याचे पोलिस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी एएनआयला सांगितले की, कुंभमेळ्यात जर सामाजिक विलगीकरण करण्यास पोलिसांनी सांगितले तर तेथे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे. आम्ही भाविकांना कोविड-१९ संसर्गाची भीती लक्षात घेता काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. भाविकांनी नियम तोडल्यास प्रत्येकाला चलन जारी करणे शक्य नाही. प्रत्येक घाटावर विलगीकरणाचा आग्रह करता येणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले होते.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार कुंभ मेळ्यातील कोविड-१९च्या नियमांचे पालन होते की नाही यासाठी उत्तराखंड पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाणार असल्याचे म्हटले होते. ज्या भाविकांनी मास्क लावलेले नाहीत, त्यांचे चेहरे विविध ठिकाणी लावलेले ३५० सीसीटीव्ही कॅमेरे पकडतील अशी व्यवस्था पोलिसांची आहे. या ३५० सीसीटीव्हींमध्ये १०० हून अधिक कॅमेरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर चालणारे आहेत. या कॅमेर्यांमध्ये मास्क न लावणारे सेन्सरद्वारे पकडले जातील असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हरिद्वारमध्ये २,०५६ कोविड-१९चे रुग्ण आहेत व रविवारी ३८६ नवे रुग्ण आढळले आहेत. ४ एप्रिलला हरिद्वारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८३७ इतकी होती.

ही पार्श्वभूमी पाहता कुंभ मेळ्याला येणार्या प्रत्येक भाविकाला आरटी-पीसीआर निगेटिव्हचा रिपोर्ट बंधनकारक आहे. पण हरिद्वारमध्ये असा कोणताही प्रोटोकॉल नाही की जेथे एखाद्या भाविकाला कोरोनाचा संसर्ग झाल्यास तो जेव्हा आपल्या घरी, राज्यात परतेल तेव्हा त्याची कोरोनाची चाचणी केली जाईल.

हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्याचे शाही स्नान १२ एप्रिल, १४ एप्रिल व १७ एप्रिलला आहे. या दिवशी गर्दी आटोक्यात येईल याचे कोणतेही प्रयत्न प्रशासनाने केलेले नाहीत. उलट रेल्वेने हरिद्वारला पोहचण्यासाठी विशेष २५ रेल्वे सोडल्या आहेत. त्या देशातल्या अनेक भागातून हरिद्वारपर्यंत जात आहेत.

कोरोना प्रोटोकॉलला ज्या प्रकारे धाब्यावर प्रशासनानेच बसवले आहे, त्यावर कोणतेही प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. सर्व राजकीय पक्ष केरळ, पुड्डूचेरी, तामिळनाडू, आसाम, प. बंगालमधील विधान सभा निवडणुकांत मग्न आहेत. बंगालमधील निवडणूका ८ टप्प्यात घेण्यात येत आहेत. एवढे टप्पे ठेवून कोरोनाचे रुग्ण वाढतील ही भीतीही कोणताही राजकीय पक्ष मांडत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सदस्य व सध्या महाराष्ट्र राज्याचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजकीय नेते याला जबाबदार असल्याची टीका केली. येत्या काही दिवसात कोरोनाचा संसर्ग एकदम वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे जनतेचे बेजबाबदार वर्तन असल्याचा आरोप केला. निवडणुका, धार्मिक कार्यक्रम, प्रवास, सामाजिक कार्यक्रम व कार्यालये सुरू केल्यानंतर लोक कोविड-१९चे नियम पाळत नसल्याचे ते म्हणाले. मास्क न घालणे, गर्दी न करणे, सार्वजनिक कार्यक्रम टाळणे यासारखे कोणत्याही उपाय योजना केल्या जात नसल्याचे हर्षवर्धन यांचे म्हणणे आहे.

प्रशासनातील एका उच्चस्तरीय बैठकीत एका अधिकार्याने हरिद्वारमधील कुंभ मेळा आटोपल्यानंतर कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढतील अशी भीती एएनआयशी बोलताना व्यक्त केली होती. पण कुंभ मेळा हा हिंदू धर्माच्या आस्थेचा प्रश्न असल्याने सरकारने या अधिकार्याचे प्रसिद्ध झालेले वक्तव्य खोटी बातमी असल्याचे सांगत ते फेटाळून लावले.

कुंभ मेळ्याबाबत मोदी सरकार ज्या पद्धतीने आस्था दाखवत आहे, उत्तराखंडमधील भाजपचे सरकार जशी प्रशासकीय व्यवस्था तैनात करत आहे, हा मोठा विरोधाभास म्हटला पाहिजे. कारण बरोबर एक वर्षांपूर्वी मोदी सरकारने दिल्लीत मरकजसाठी जमा झालेल्या तबलिगी जमातीवर कोरोनाचा संसर्ग फैलावला म्हणून गुन्हे दाखल केले होते. देशभर हिंदू-मुस्लिम असा वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला होता.

या मरकजसाठी जगभरातून ३,५०० भाविक उपस्थित झाले होते. हा सोहळा वास्तविक सरकारने परवानगी देण्या अगोदर आयोजित करण्यात आला होता. आणि नंतर लॉकडाऊनची घोषणा झाली होती. तरीही भाजपने व देशातील मीडियाने भारतात पसरलेल्या कोरोनाला मरकजमध्ये सामील झालेले तबलिगी जबाबदार असल्याचा प्रचार सुरू केला. देशात अनेक भागात मुस्लीम फेरीवाल्यांवर हल्ले झाले. फेरीवाल्यांना अपमानास्पद वागणुकीपासून त्यांच्यावर शारीरिक हल्ले, पोलिसांचा लाठीमार वगैरे घटना घडल्या. या घटनेचे वर्णन कोरोना जिहाद म्हणून झाले.

आता एक वर्षानंतर कोविड-१९ची परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. तबलिगी जमातीला जबाबदार धरले होते तेव्हा कोरोनाचे रुग्ण काही शेकडो होते. आता देशात १० लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तरीही या पार्श्वभूमीवर देशातल्या सर्वात मोठा धार्मिक सोहळा कुंभ मेळा साजरा केला जात आहे. अनेक टीव्ही चॅनेल्स जे तबलिगीमुळे कोरोना पसरला असे म्हणत होते ते हा कुंभ मेळा कोरोना पसरू शकतो असे म्हणताना दिसत नाहीत. भाजपचे नेतेही कुंभ मेळ्याविषयी अवाक्षर बोलताना दिसत नाहीत.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी तर कुंभ मेळ्याची तुलना मरकजशी होऊ शकत नाही, असा पवित्रा घेतला आहे. लोकांना स्वतःची काळजी घेता येते. ते सॅनिटायजर वापरतात, मास्क वापरतात असे त्यांचे म्हणणे होते.

वास्तविक कुंभ मेळ्यात जमलेल्या गर्दीत भाविकांच्या तोंडावर मास्कच दिसत नाहीत. भाविक सामाजिक विलगीकरणाचे पालनही करताना दिसत नाहीत. प्रचंड गर्दीत सगळे विधी सुरू आहेत.

म्हणून मरकज व कुंभ मेळा यांची तुलना करणे भलेही चुकीचे असले तरी कुंभ मेळ्याच्या तुलनेत मरकजची गर्दी ही एक दशांशहून कमी होती व हा कार्यक्रम कोरोना भारतात शिरकाव करण्याच्या अगदी सुरूवातीला झाला होता. कुंभ मेळ्याबाबत मात्र तसे म्हणता येत नाही. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असे सरकार, वैद्यकीय जगत सांगत आहे, विविध राज्य सरकारने नवे आदेशही काढले आहेत. लॉकडाऊनच्या काही तरतुदीही राबवल्या जात आहे पण कुंभ मेळा हा हिंदूंचा पवित्रा सोहळा असल्याने या सर्व उपाय योजना हिंदूंना लागू नाहीत, अशा थाटात याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0