२०११च्या दशकापासून टेक आणि कम्युनिकेशन कंपन्यांनी निवडणुका आणि त्यांच्या कॅम्पेन्स आमुलाग्र बदलल्या आहेत. त्यात संघटित द्वेष पसरवला जातो. मतदारांना बिनदिक्कतपणे मॅनिप्युलेट केले जाते. हे सगळे करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणेच आहे, असे अनेक अभ्यासक आणि विश्लेषक म्हणतात.
२०११ च्या दशकापासून जगभर निवडणुकांचे तसेच मोठ्या राजकीय आंदोलनांचे स्वरूप आमुलाग्र बदलले. त्यात निवडणुकांची स्ट्रॅटेजी करून देणार्या कंपन्या, व्यक्ति यांनी सोशल मीडियाचा वापर वातावरण निर्मितीसाठी फार प्रभावीपणे केला. त्यात विविध गट समुहांवर “सुयोग्य” जाहिरातींचा मारा लक्षणीयरित्या केला आणि जगभरातील राजकीय समीकरणे बदलली, उदाहरणार्थ भारतातील जनलोकपाल आंदोलन, ब्रेक्झिट कॅम्पेन, २०१४ भारतातील मध्यवर्ती निवडणुका, २०१६ ची अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक इत्यादीं.
माहितीची महती
या सगळ्या कॅम्पेन्स किंवा आंदोलनांच्याच्या मुळाशी होती “माहिती” आणि तिचा वापर आणि गैरवापर! माहिती म्हणजेच खर्या-खोट्या बातम्या, सत्य-असत्य माहिती, post truth content, प्रसार तसेच प्रचारकी (propaganda) स्वरूपाचा सगळा आशय.
यातच जगभरातील लोकांच्या खासगी आणि गोपनीय माहितीचाही अंतर्भाव होतो. एकंदरीत ही सगळी माहिती बनली आहे या दशकातील सगळ्यात मोठे आणि विलक्षण ताकदीचे शस्त्र जे सरकार निवडून आणू शकते तसेच पाडूही शकते. हे कसे शक्य झाले याचा इतिहास फारच रंजक आहे.
माहितीचा विस्फोट आणि तिचे लोकशाहीकरण
माहिती आणि तंत्रज्ञान (IT sector) या सेक्टरची जशी भरभराट नव्वदीच्या दशकात सुरू झाली तेव्हा असे म्हटले जात होते की माहिती ही शक्ति (power) आहे त्याचबरोबर साधन-सामग्री (resource) देखील आहे.
या दशकाच्या शेवटच्या काही वर्षात माहितीच्या महाजालाने (world wide web) माहितीचा विस्फोट घडवून आणला. त्यामुळे माहितीचे लोकशाहीकरण तर झालेच कारण सगळे ज्ञान जे ठराविक लोक, संस्था, विद्यापीठे यांच्याकडे होते ते मुक्त झाले. माहितीच्या महाजालाच्या खुलेपणाने ज्ञानाचे, माहितीचे बंद असणारे दरवाजे उघडले आणि खरोखरीच क्रांती झाली.
इंटरनेटमुळे संगणक किंवा आता मोबाईलद्वारे जगभरातील लोक हवी ती माहिती निमिषार्धात मिळवू शकतात. तसेच जे ज्ञान मिळवायचे आहे तिथपर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे जगभरातील लोकांचे अनेक अर्थाने, अनेक बाजूंनी सबलीकरण आणि सक्षमीकरण झाले.
माहितीच्या सेवा, सुविधा आणि व्यापारीकरण
तंत्रज्ञानाला जोड मिळाली ती व्यापार-उदिमाची आणि त्यातील व्यवहाराची. इंटरनेट आणि माहितीच्या महाजालाद्वारे अनेक अतिशय उपयुक्त सेवा व सुविधा मोफत देऊ केल्या. ईमेल, महितीचा शोध, अॅप्स, कोट्यवधी विडियोज, चित्रे, फोटो वगैरे तसेच ‘अ’ पासून ‘ज्ञ’पर्यंत अशा सगळ्या क्षेत्रातील माहिती व ज्ञान आणि इतर अनेक गोष्टी अगदी मोफत आहेत. त्यासाठी कुणालाही एक पैसा मोजावा लागत नाही मात्र इथेच खरी मोठ्ठी मेख आहे.
वरपांगी हे सगळे लोकांच्या उपयोगाचे आणि भल्यासाठी वाटत असेल तरी लोकांनी पाहिलेल्या जाहिराती, त्यांनी घेतलेल्या सेवा आणि सुविधा या सगळ्या माहितीवर सगळ्या मोठ्या आणि महत्तम टेक कंपन्या जसे की गुगल, अॅपल, फेसबुक, अॅमेझॉन वगैरे आणि मोबाईलची सुविधा देणार्या (mobile service providers) कंपन्या जसे जिओ, आयडिया, वोडफोन अशा असंख्य कंपन्या या पडद्यामागे घडणार्या जाहिरातींच्या लिलावातून कोट्यवधी डॉलर्स मिळवतात. असंख्य कंपन्या नुसत्या क्लिक्सवर (clicks) पैसे मिळवतात. तसेच जगातील असंख्य व्यापार उदीमांच्या होणार्या ऑनलाइन व्यवहारावर देखील पैसा मिळवला जातो.
सोशल मीडियाचा उदय आणि त्याचे अनेकधारी शस्त्र बनणे
संगणक व मोबाईल तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे तसेच टेक कंपन्याच्या नाविन्यपूर्ण माध्यमांमुळे सोशल मीडियाचा उदय झाला आणि जगभरातील लोकांना एक मोठे, मुक्तपणे व्यक्त होऊ देणारे अतिशय सक्षम व्यासपीठ मिळाले. सोशल मीडियामुळे माहितीचा ओघ प्रचंड वाढला. जी माहिती ठराविक स्त्रोतांपासून येत होती ती जगाच्या कान्या-कोपरातून, विश्वसनीय किंवा बहुतांशवेळी अविश्वसनीय सूत्रांकडून येऊ लागली. तसेच माणसे, विविध विचारांचे गट, जगभरातील राष्ट्रे, विविध राजकीय-सामाजिक-धार्मिक भूमिकांच्या गटातून विविध स्वरूपाची बव्हंशी गोंधळात टाकणारी माहिती येऊ लागली. त्यामुळे सोशल मीडियाचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे झाले. त्यामुळेच, सोशल मीडिया कधी लोकशाहीवादी आणि उदारमतवादी आहे असे वाटू शकते तर कधी तो वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक विचारांच्या भेदाभेदांनी पूर्णपणे विभाजित झाला आहे असेही वाटू शकते.
एकीकडे राजकीय, धार्मिक विचारांचा प्रसार व प्रचार तर दुसरीकडे ट्रोलिंगची दडपशाही, सामाजिक- राजकीय झुंडशाही, वित्तीय-व्यापारी तसेच विविध प्रकारच्या टोळ्या, गट यांचे दबाव अशा विचित्र आणि विरुद्ध फैरींमध्ये सोशल मीडियावरील वाचक आणि दर्शक सहज बळी पडू शकणारे असल्याने गुंतागुंत फारच वाढली आहे. त्यामुळेच सोशल मीडिया हा आता अनेकधारी शस्त्र तसेच अस्त्र बनला आहे.
माहितीचे बनले डाटा पॉईंट्स
ग्राहकांची यच्चयावत वैयक्तिक, खासगी आणि गोपनीय अशी सगळी माहिती सोशल मीडिया आणि संगणक, मोबाईल द्वारा गोळा केली जाते ती इंटरनेटवरुन. तसेच इंटरनेटवरील सगळे व्यवहार, कोणी किती वेबसाइट्स बघितल्या किंवा कुठली माहिती डाऊन लोड केली, कुणी कोणत्या माहितीचा शोध घेतला, कुणी काय खरेदी केले, कोणती उत्पादने नुसती बघितली ही सगळी माहिती या सगळ्या मोठ्या टेक कंपन्या तसेच अनेक कंपन्या गोळा करत असतात. तसेच कोणत्या जाहिराती बघितल्या जातात, कोणत्या क्लिक केल्या जातात, कोणत्या दुर्लक्षिल्या जातात ही देखील माहिती गोळा केली जाते. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचे राजकीय विचार किंवा भूमिका, धार्मिक विचार, त्यांचे कट्टर असणे किंवा नसणे, त्यांची मत पक्की असणे किंवा नसणे तसेच प्रत्येकाच्या आवडी निवडी, प्रभाव कोणाकोणाचे आहेत, आवडते-नावडते नेते, नट-नट्या, कुठल्या गोष्टींचा राग येतो किंवा कशाने आनंद मिळतो इतके सगळे बारकावे ऑनलाइन असताना टिपले जातात. या सगळ्या माहितीचे अगदी शास्त्रशुद्ध वर्गीकरण केले जाते. आणि त्यातून बनतात ते डाटा पॉईंट्स (data points).
त्यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे मोबाईल फोन हा डाटा ऑन असो किंवा नसो सगळे काही अगदी अभिमन्यूप्रमाणे ऐकत असतो. आणि सगळी माहिती इमाने इतबारे गोळा तर करतोच आणि जोडत असतो आपल्या नकळत. त्यामुळेच युवल नोहा हरारी म्हणतात की तुमच्या पेक्षा कितीतरी जास्त तुम्हाला आणि तुमच्या मनाला तुमची इलेक्ट्रॉनिक उपकरणे – संगणक, मोबाईल ओळखत असतात.
मोठ्या टेक कंपन्या, इंटरनेट सर्व्हिस देणार्या कंपन्या, इ-कॉमर्स कंपन्या इत्यादी सगळे लोकांविषयीची ही सगळी माहिती आणि सगळे डाटा पॉईंट्स विकत असतात, यांची देव-घेव करत असतात. त्यामुळे मुकेश अंबानी यांनी म्हटले होते की “डाटा हे नवे खनिज तेल आहे”. टेक कंपन्या आणि फोन कंपन्या या अधिकाधिक श्रीमंत का होतात आहेत हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असेल.
एक कुप्रसिद्ध स्कॅन्डल – SCL, केंब्रिज अॅनॅलिटिका आणि फेसबुक
SCL ग्रुप नामक कंपनी रिसर्च आणि स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन करणारी कंपनी. तिला समूहाच्या वर्तनावर कसा प्रभाव टाकायचा आणि त्यांची मते बदलायची यात फार रस होता. त्यासाठी ते psychological operations (psyops) करत आणि त्यात बर्यापैकी प्राविण्य मिळवलं होते. पुढे अमेरिकेत मतदानावर काम करण्यासाठी म्हणून त्यांनी केंब्रिज अॅनॅलिटिका ही कंपनी ब्रिटनमध्ये २०१२ साली स्थापली.
२०१५ मध्ये अमेरिकेतील टेड क्रूझ यांची रिपब्लिकन पक्षाच्या निवडणुकीची मोहिम केंब्रिज अॅनॅलिटिका ही ब्रिटिश कंपनी राबवत होती. या कंपनीने फेसबुकचा वापर मतदारांचा कल कुठे जातो आहे याची माहिती मिळवण्यासाठी केला. त्यासाठी त्यांनी मतदारांचे डाटा पॉईंट्स मिळवले. हा डाटा होता खरा विक्रीच्या स्ट्रॅटेजीसाठी. त्याचा गैरवापर करून त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनमधील राजकीय समीकरणे (Brexit) बदलण्याइतकी प्रभावी मोहीम त्यांनी केली.
२०१४ मध्ये केंब्रिज अॅनॅलिटिकाने गैरफायदा घेत ८.७ कोटी जणांचा डाटा फेसबुक प्रोफाइल वरून घेतला. एका क्विझच्या मार्फत हा डाटा त्यांनी मिळवला. आणि त्यानंतर त्याचा वापर संवेदनक्षम तसेच ज्यांना प्रभावित करता येईल अशा लोकांना निवडून त्यांच्यावर जाहिरातींचा मारा (extreme targeted advertising) करण्यात आला. ही सगळी माहिती ‘टार्गेटेड’ (Targeted) या पुस्तकात दिली आहे.
कोट्यवधी मतदारांच्या वैयक्तिक तसेच गोपनीय माहितीचा वापर त्यांची परवानगी न घेता यात केला गेला. पुढे हे सगळे भांडे फुटले आणि तिघांवर कारवाई झाली. त्यात SCLचे दिवाळे निघाले. केंब्रिज अॅनॅलिटिका आणि फेसबुक यांची यथेच्च बदनामी झाली. त्यात फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग याला चौकशीला आणि सरबत्तीला सामोरे जावे लागले. पुढे केंब्रिज अॅनॅलिटिका बंद पडले. फेसबुला दंड भरावा लागला.
वायलीचे राजकारण्यांना मतदारांपर्यंत “सुयोग्य” संदेश पोचवण्याचे तंत्रज्ञान
फेसबुकचे “लाइक” बटन हे माणसांच्या मनाचे प्रवेशद्वार आहे हे चाणाक्ष ख्रिस्तोफर वायली (Christopher Wylie) या मुलाच्या लक्षात आले. तो तेव्हा केंब्रिज विद्यापीठात रिसर्च करत होता. त्याने प्रोग्रामिंगची तंत्रे वापरून लोकांची स्वभाव वैशिष्टे, इतर अनेक गुण विशेष आणि मानसिक मानके ओळखणारी साधने (tools) तयार केली. या सगळ्या साधनांचे प्रयोजन माणसांची स्वभाव वैशिष्टे, गुणविशेष आणि मानके यांचा वापर राजकीयदृष्ट्या अतिशय प्रभावीपणे करता येणे शक्य झाले.
वायली यांनी या साधनांच्या माध्यमातून राजकारणी लोकांना अतिशय सक्षमपणे मतदारांपर्यंत “सुयोग्य” संदेश पोचवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. अर्थात कोण कोणाला कोणत्या कारणांनी मत देईल हे जरी सांगता येत नसले. तरी तज्ज्ञ असे म्हणतात की हे सिद्ध झाले आहे की सोशल मीडिया वापरून मतदारांची संख्या कमी करणे हे शक्य आहे. कारण प्रत्येक निवडणुकीत गोंधळलेले, निराश मतदार असतातच. त्यांना निराशाजनक संदेश, माहिती पाठवून त्यांना मत देण्यापासून परावृत्त केले की हे साध्य होते.
पुढे हेच ख्रिस्तोफर वायली whistle-blower बनले आणि यांनी मतदारांना कसे टार्गेट केले जाते (microtargeting) तसेच डाटामधून “सुगीची माहिती” (mass-harvesting of data) कशी मिळवली जाते याची अगदी सविस्तर माहिती दिली. या सगळ्या विषयावर त्यांनी Mindf*ck नावाचे माहितीचा काळा वापर कसा केला जातो याची माहिती देणारे पुस्तक लिहिले.
The Great Hack या माहितीपटाने उघड केलेली केंब्रिज अॅनॅलिटिकाची कृष्ण कृत्य
केंब्रिज अॅनॅलिटिकाचे आधीचे सीईओ अलेकझांडर निक्स यांनी चॅनल 4 वर सांगितले की प्रत्येक मतदारचे ५००० डाटा पॉईंट्स त्यांच्याकडे होते. एक अमेरिकन मतदार प्राध्यापक डेविड करोल (David Carrol) यांनी स्वत:चे डाटा पॉईंट्स केंब्रिज अॅनॅलिटिकाकडून परत मिळवायचे असे ठरवले. त्यांनी ब्रिटनमधील वकील रवी नाईक (ITN Solicitors) यांची मदत घेऊन ती कायदेशीररित्या ते मिळवले. तेव्हा SCLला १५००० पाउंडाचा दंड झाला तर फेसबुकला ५ लाख पाउंडाचा दंड द्यावा लागला.
केंब्रिज अॅनॅलिटिकाची ब्रिटनी कैझर नावाची माफीची साक्षीदार The Great Hack या माहितीपटात यांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली आहे.
२०१६ मध्ये केंब्रिज अॅनॅलिटिकाने ट्रम्प यांच्या निवडणूक मोहीमेवर काम केले आणि शेवटच्या दोन दिवसात त्यांनी त्यांच्यापेक्षा पुढे असणार्या हिलरी क्लिंटन यांना हरवले. हा त्याचा निकाल सगळ्या जगाने अचंबित होत पाहिला ही वस्तुस्थिती आहे. केंब्रिज अॅनॅलिटिकाने Leave EU म्हणजेच ब्रेक्झिटच्या मोहिमेसाठीही काम केले होते आणि ब्रेक्झिट घडवून आणले गेले हे जगजाहीर आहेच.
कैझर म्हणतात की, “अशा अनेक कंपन्या आहेत ज्या खोटा प्रचार, सोशल मीडियावरील खोटी खाती आणि बॉटस वापरून खोटी माहिती पसरवतात. तसेच द्वेष आणि हिंसा निर्माण होईल अशा स्वरूपाचा आशय पसरवतात.”
निवडणुकात डाटा पॉईंट्सचा वापर – मतदारांना मॅनिप्युलेट करण्यासाठी केला जातो
२०११च्या दशकापासून टेक आणि कम्युनिकेशन कंपन्यांनी निवडणुका आणि त्यांच्या कॅम्पेन्स आमुलाग्र बदलल्या आहेत. त्यात संघटित द्वेषाचा वापर जाणीवपूर्वक केला जातो. मतदारांना बिनदिक्कतपणे मॅनिप्युलेट केले जाते. त्यासाठी नागरिकांच्या डाटा पॉईंट्सचा वापर मोठ्या खुबीने आणि धूर्तपणे केला जातो. हे सगळे करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणेच आहे असे अनेक अभ्यासक आणि विश्लेषक म्हणतात.
असे असले तरी काही अभ्यासकांनी मात्र ब्रेक्झिट आणि ट्रम्प यांचा विजय यात सोशल मीडियाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. असो.
आता पर्यंतच्या सगळ्या माहितीवरून असे म्हणता येईल की सोशल मीडियाचा वापर अतिशय धूर्तपणे खालील वर्गीकरण आणि मतपरिवर्तन करण्यासाठी केला जातो. ते करतांना तो अतिशय शास्त्रशुद्ध आणि सफाईदार असतो. जसे
- मतदारांचे मानसिक (psychographic profiling) म्हणजेच व्यक्तिमत्व, मूल्ये, विचार, वृत्ती आणि जीवनशैली यानुसार वर्गीकरण करणे. यात त्यांचे राजकीय आणि धार्मिक विचार हेही आलेच.
- त्यानुसार त्यांच्यापर्यंत खरी-खोटी माहिती, सत्य असत्य बातम्या सोशल मीडियातून पोचवणे.
- संवेदनशील तसेच अति संवेदनशील लोकांवर राजकीय जाहिरातींचा भडिमार करणे.
- त्यांची दिशाभूल पद्धतशीरपणे करणे किंवा त्यांचे मत परिवर्तन करणे.
- त्यांना भडकवणे, गोंधळात टाकणे किंवा मुद्दाम संभ्रम निर्माण करणे किंवा त्यांना मत देण्यापासून परावृत्त करणे.
टेक तसेच कम्युनिकेशन कंपन्यांचे राजकीय पक्षांशी साटेलोटे आणि ढवळाढवळ
ब्रिटनी कैझर आणि ख्रिस्तोफर वायली यांनी यासंबंधित सगळी माहिती The Great Hack या माहितीपटात दिली आहे. यांच्या मते प्रचाराबरोबरच अपप्रचाराचाही प्रसार करणे हा अनेक टेक तसेच कम्युनिकेशन कंपन्यांच्या कामाचा भाग झाला आहे. ब्रिटनी यांनी संगितले की ब्रिटनमधील निवडणूकात त्यांनी खोट्या बातम्या, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती कशी प्रभावीपणे वापरली. तसेच विरोधकांच्या राजकीय मोहिमांची दडपणूक केली जाते हे त्यांनी जवळून पाहिले. म्हणूनच त्या म्हणतात की सोशल मीडियात राजकीय जाहिरातींवर ठराविक काळासाठी बंदी आणावी.
लोकांची वैयक्तिक, खासगी, गोपनीय माहिती ही एखाद्या अत्यंत शक्तीशाली शस्त्रासारखी आहे असे ब्रिटनी कैझर म्हणतात. त्या असेही म्हणतात की प्रचंड प्रमाणात हा डाटा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे त्याची कुठलीही खातरजमा किंवा छाननी न करता तो मिळालेला आहे. त्यांच्या मते हा फारच गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.
कैझर असेही म्हणतात की टेक कंपन्या आता माणसांचे वर्तन कसे असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे बिनचूकपणे सांगू शकतात. त्यांच्या मते आपण बर्याच अंशी आपले स्वातंत्र्य घालवून बसलो आहोत.
ब्रिटनी कैझर यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्या म्हणतात की केंब्रिज अॅनॅलिटिकाने फेसबुकवरून घेतलेला डाटा पूर्णपणे डिलिट केला असला तरी इतर शंभर कंपन्या तो वापरत आहेत आणि निवडणूकात मतदारांची दिशाभूल करणे आणि त्यांचे मतपरिवर्तन करणे हे जगभर सुरूच आहे. त्यांच्या मते फेसबुकवर अजूनही प्रचंड खोटी माहिती आहे.
त्यांनी असाही दावा केला आहे की केंब्रिज अॅनॅलिटिकाने कमीतकमी ६८ देशातील निवडणूकात ढवळाढवळ केली आहे.
Our Brand Is Crisis सारखे वास्तव जगभरातील निवडणूकात दिसून येते
२०१५ साली Our Brand Is Crisis नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात निवडणुकांसाठी स्ट्रॅटेजी ठरवणारे लोक कसे विरुद्ध पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणारी कॅम्पेन चालवतात. त्याच्या जोडीला देशात कशी सगळी वाईट परिस्थिती आहे, थोडक्यात देश कसा संकटात आहे हे ठसवणारी प्रभावी मोहीम चालवतात. ज्या राजकीय नेत्यासाठी ही कॅम्पेन असते तो अर्थातच खोटी आश्वासनेही देतो. त्यामुळे अनपेक्षित आणि अपेक्षितरित्या त्याची लोकप्रियता वाढून तो जिंकतो. पुढे तोच कसा भ्रमनिरास करतो असेही त्या चित्रपटात दाखवले आहे.
यात अधोरखित करण्यासारखा हा मुद्दा आहे की या चित्रपटात दाखवल्या आहेत तशाच कॅम्पेन जगभरातील निवडणुकात दिसतात. आता तर त्यात सोशल मीडिया नामक माहितीच्या भस्मासुराची भर पडली आहे. त्यामुळे, प्रचंड बदनामीकारक मजकूर, खोटी नाटी माहिती, फेक न्यूज असा भडिमार दिसून येतो. त्यात तर देशोदेशी आता झुंडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे झुंडीची दडपशाही आणि त्यांचे पेड ट्रोल्स यांनी धुमाकूळ घातलेला दिसून येतो.
वरील सगळी धक्कादायक माहिती जाणून घेऊन प्रत्येक मतदाराने जागृत होणे आणि सजग राहणे लोकशाही साठी आवश्यक आहे. अन्यथा फेक न्यूज, खोटी माहिती, अपप्रचाराला बळी पडून मत स्वातंत्र्याचा हक्क आणि अधिकार आपणच गमावून बसू बाकी काही आपल्या हातात नसले तरी.
गायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.
COMMENTS