कोविड उद्रेक: काँग्रेस, सपाकडून प्रचारसभा रद्द

कोविड उद्रेक: काँग्रेस, सपाकडून प्रचारसभा रद्द

नवी दिल्ली: देशात विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात आहेत आणि त्याच वेळी कोविड रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. सुरुवातीच्या काळात राजकीय पक्

दिल्ली निवडणुका – विकास विरुद्ध विभाजन
दिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष
भाजपमध्ये येण्याची ऑफर आली: मनीष सिसोदिया

नवी दिल्ली: देशात विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात आहेत आणि त्याच वेळी कोविड रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. सुरुवातीच्या काळात राजकीय पक्षांनी ओमायक्रॉनच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले असले तरी परिस्थितीचे गांभीर्य आता काही राजकीय पक्षांच्या लक्षात येऊ लागले आहे.

काँग्रेसने निवडणुका होणाऱ्या राज्यांमधील सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. राजकीयदृष्ट्या सर्वांत महत्त्वाच्या उत्तरप्रदेशातील सभाही काँग्रेसने रद्द केल्या आहेत. समाजवादी पक्षानेही सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. मात्र, भारतीय जनता पक्ष, आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आत्तापर्यंत प्रचारसभांबद्दल काहीही अधिकृत भाष्य केलेले नाही. निवडणुकांची अधिसूचना अद्याप जारी झालेली नसल्याने, राजकीय सभांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादू शकत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आयोगाची जबाबदारी आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू होतो. तोवर प्रचारसभा होऊ द्यायच्या की नाही हा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या लाटेदरम्यान विशाल प्रचारसभांचा कोविड संक्रमणात मोठा हातभार लागला होता. उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत दैनंदिन कोविड रुग्णांची संख्या चार पटींनी वाढली आहे. दिल्ली राजधानी परिसर व लखनौमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

भाजपने प्रचारसभांबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नोएडातील जनसभा रद्द करण्यात आली. मात्र, त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र मणिपूरमध्ये अलीकडेच विशाल सभा घेतली. पंजाबमधील फिरोझपूर जिल्ह्यात बुधवारी होणारी सभा मात्र ‘सुरक्षेतील त्रुटी’मुळे ताफा वेळेत पोहोचू न शकल्याने रद्द झाली. लखनौमध्ये ९ जानेवारी रोजी आयोजित मोदी यांच्या सभेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, कोविडच्या उद्रेकामुळे ती पुढे ढकलली जाईल, अशी चिन्हे आहेत.

दुसऱ्या लाटेपूर्वी भाजपने पश्चिम बंगाल व आसाममध्ये विशाल प्रचारसभा घेतल्या होत्या. यावेळी ‘ओमायक्रोन हा साधा विषाणू संसर्ग असून, कोरोना परतीच्या वाटेवर आहे’ असे विधान आदित्यनाथ यांनी केले आहे.

काँग्रेसच्या प्रचारसभा

काँग्रेसने प्रचारसभा रद्द केल्या असल्या तरी, उत्तरप्रदेशात काँग्रेसच्या ‘लडकी हुँ, लड सकती हुँ’ अभियानात हजारो लोक मास्कही न लावता सहभागी झाल्याचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाल्यानंतर, पक्षाला हे शहाणपण सुचले आहे.

“काँग्रेसने उत्तर प्रदेश व निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या अन्य सर्व राज्यांतील प्रचारसभा पुढे ढकलल्या आहेत. त्या त्या राज्यांतील कोविडविषयक परिस्थितीचा अभ्यास करण्यास आम्ही राज्यांतील नेत्यांना सांगितले आहे. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पुढील निर्णय होतील,” असे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी सांगितले. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना प्रचारसभा घेण्यास बंदी आणावी अशी मागणी उत्तरप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. सभा घेण्यापेक्षा पक्षांना दारोदार जाऊन प्रचार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उत्तराखंड व पंजाबमधील प्रदेश कार्यालयांनी स्थितीचा आढावा घेऊन माहिती दिल्यानंतर या राज्यांतील प्रचारसभांबाबत निर्णय केला जाईल, असेही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

समाजवादी पार्टीनेही ९ जानेवारीला होणारी ‘अयोध्या विजयरथ यात्रा’ रद्द केली आहे. त्याचप्रमाणे बस्ती, गोंडा आणि अयोध्येतील सभाही रद्द केल्या आहेत. उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या अनागोंदी कारभारामुळे कोविड व्यवस्थापनाचे बारा वाजले आहेत, असा आरोप पक्षप्रवक्त्या जुही सिंग यांनी केला आहे.

आपच्या प्रचारसभा

आपचे प्रमुख तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना, उत्तराखंडमध्ये सभा घेतल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी कोविडची लागण झाल्यामुळे पक्षात भीतीचे वातावरण होते. अर्थात पक्षाने अद्याप प्रचारसभांबाबत काहीही घोषणा केलेली नाही.

कोरोनाची लागण होण्याच्या आठवडाभर आधी केजरीवाल यांनी पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये किमान चार मोठ्या सभा घेतल्या होत्या.

कोविड रुग्णसंख्येतील संभाव्य वाढ

दरम्यान, केंद्रीय आरोग्यसचिव राजेश भूषण यांनी ३ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाला ओमायक्रोनबाबत माहिती दिली. पाच राज्यांतील विशाल सभा व रोडशोंमुळे कोविडचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. कोविडच्या दुसऱ्या लाटेतही फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमीळनाडू व पुदुच्चेरी येथील प्रचारसभांमुळेच कोविडचे संक्रमण हाताबाहेर गेले असे तेव्हा म्हटले जात होते. कोविड रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आणि चहूबाजूंनी टीका होऊ लागली तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील प्रचारमोहीम आवरती घेतली. त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने ५०० लोकांहून अधिक मोठ्या सार्वजनिक संमेलनांवर बंदी घातली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0