नवी दिल्लीः २०२० या सालातल्या सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींची नावे टाइम मासिकाने मंगळवारी जाहीर केली. या यादीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात
नवी दिल्लीः २०२० या सालातल्या सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींची नावे टाइम मासिकाने मंगळवारी जाहीर केली. या यादीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये उपोषणाला बसलेल्या ८२ वर्षाच्या बिल्किस दादींचा (आजी) समावेश असून त्यांच्या उपोषणामुळे सीएएविरोधात रस्त्यावर उतरलेले अनेक सामाजिक कार्यकर्ते व तुरुंगात डांबलेल्या विद्यार्थी नेत्यांना ऊर्जा व उमेद मिळाल्याचे टाइमचे म्हणणे आहे. बिल्किस यांच्या या अभूतपूर्व आंदोलनावर पत्रकार राणा अय्युब यांनी टाइममध्ये एक स्फूट लिहिले आहे.
सीएएविरोधातील शाहीनबाग आंदोलनात अनेक वृद्ध महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. अत्यंत कडाक्याच्या थंडीतही या महिलांनी आपले उपोषण मागे घेतले नव्हते. या महिलांना नंतर शाहीन बाग दादी असे संबोधले जाऊ लागले आणि संपूर्ण जगातल्या प्रसारमाध्यमांचे या घटनेकडे लक्ष वेधले गेले.
या महिलांपैकी ८२ वर्षाच्या बिल्किस यांनी सीएए विधेयकाला विरोध करताना उपोषणाचा मार्ग धरला पण आपल्या शरीरातल्या धमन्यांमधून जोपर्यंत रक्त वाहत राहील तोपर्यंत या देशातल्या मुलांच्या हक्कांसाठी, या जगातल्या मुलांना न्याय व समतेचा श्वास मिळण्यासाठी आपले उपोषण सुरूच राहील असा निग्रह त्यांनी बोलून दाखवला होता.
बिल्किस यांनी दमनतंत्राला विरोध केला पण त्यांची दखल जगाला घ्यावी लागली, असे टाइमने म्हटले आहे.
मोदींचेही नाव पण अन्य कारणांसाठी
टाइमच्या १०० व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव असून त्यांचे नाव नकारात्मक रित्या नोंदले गेले आहे. मोदींनी २०२० या वर्षांत भारतीय लोकशाहीतील मूलभूत मूल्यांना धक्का लावल्याचा आक्षेप टाइमकडून घेण्यात आला आहे.
भारतातील लोकसंख्येत ८० टक्के हिंदू असून या देशाच्या पंतप्रधानपदावर आलेले बहुसंख्य हिंदूच होते पण मोदींनी चालवलेला देश पूर्वी कोणीही चालवला नव्हता. हिंदू राष्ट्रवादाचा अजेंडा असलेल्या भाजपचे हे एक नेते असून त्यांनी भारतातील विविधता नाकारली व मुस्लिमांना लक्ष्य केले. कोरोनाच्या महासाथीतही त्यांच्या अशा भूमिकेचा प्रत्यय दिसून आला. एक अत्यंत प्रगल्भ वाटणारी लोकशाही आता गर्तेत जात आहे, असे मोदींवर टाइमने भाष्य केले आहे.
टाइमच्या या यादीत अमेरिकेच्या उप-अध्यक्षीय निवडणुकीत उभ्या असलेल्या भारतीय-अमेरिकी व आफ्रिकन वंशांच्या आणि डेमोक्रेट्स पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचेही नाव आहे.
मूळ बातमी
COMMENTS