‘रक्त संकलना’मागचा डावा दृष्टिकोन

‘रक्त संकलना’मागचा डावा दृष्टिकोन

उजवे लोक फारसी-अरबी शब्द मराठी भाषेत असू नयेत या द्वेषभावनेतून भाषा‘शुद्धी’चा आग्रह धरत पर्यायी शब्दनिर्मिती करतात, तर डाव्यांचे पर्यायी शब्द सुचवणे हे भेदभावाला-तुच्छतावादाला विरोध आणि समानतेचा आग्रह यातून येते, हे लक्षात न घेता उजव्यांबरोबरच डाव्यांनाही हास्यास्पद ठरवणे अप्रस्तुत आहे. डाव्यांचे ‘रक्तसंकलन शिबीर’, या 'द वायर मराठी'मध्ये आलेल्या लेखाचा प्रतिवाद करणारा लेख.

सर्वसमावेशक भारतीयत्वाचे खरे शत्रू कोण?
डाव्यांचे ‘रक्तसंकलन शिबीर’
भारताने रक्तदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे

‘डाव्यांचे ‘रक्तसंकलन शिबीर’’ हा लेख वाचला. लेखकाच्या मते ‘रक्तदान’ या शब्दाला ‘रक्त संकलन’ म्हणणे हा डाव्या पुरोगामी लोकांच्या विक्षिप्तपणाचा नमुना असून, डाव्यांना ‘अज्ञ जनांस उपदेश करण्याचा विकार’ असल्याचाही लेखकाचा आरोप आहे.

लेखकाच्या दृष्टिकोनापेक्षा ‘रक्त संकलन शिबिरा’च्या संयोजकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. लेखकाने संयोजकांचा उल्लेख ‘डावे’ असा केल्याने – डाव्यांमध्ये अनेक रंगछटा असल्या तरी – इथेही तोच शब्द वापरला आहे. लोकशाहीवादी-इहवादी (Democratic-secular) समाजातील नागरिकांनी आपण ‘दान’ करतोय, ‘पुण्य मिळवतोय’ असा धार्मिक चौकटीत विचार करण्याऐवजी ‘एक सामाजिक जबाबदारी निभावतोय’, या दृष्टिकोनातून रक्त देण्याच्या कृतीकडे बघणे आवश्यक आहे, असे संयोजकांना वाटते.  लोकशाहीवादी समाजातील नागरिकांची विचार करण्याची पद्धत आणि भाषाही इहवादी असायला हवी. धार्मिक चौकटीतील विचार अनेकदा लोकशाही मूल्यांशी विसंगत असू शकतात. उदा. धर्मात मान्यता आहे, म्हणून जातीव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे, सती प्रथेचे किंवा तलाक प्रथेचे समर्थन लोकशाही व्यवस्थेत मान्य होणार नाही. शिवाय, माणसाने माणसाचा निखळ माणूस म्हणून विचार आणि स्वीकार करावा यासाठी धार्मिक (आणि जातीय, वांशिक इ. इतरही) चौकटी अडथळा ठरतात. धर्मवादी राजकारण लोकशाहीच्याच विरोधात असते, याचा अनुभव आपण घेत आहोत. सध्याच्या धार्मिक विद्वेष पसरवून राजकीय सत्तेची पोळी भाजून घेण्याच्या काळात तर धार्मिक चौकटीपलीकडे जाऊन विचार करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच, ‘दान’ हा शब्द टाळावा अशी भूमिका होती.

‘भारतीय माणसाच्या मनात अगदी सहजपणे दानाची भावना उत्पन्न होऊ शकते’ असा लेखकाचा दावा आहे. शिवाय, ‘देणाऱ्यालाच काहीतरी (पुण्य वगैरे) मिळणार आहे अशा गोष्टी दानात येतात’ असेही लेखक म्हणतात. इथे ‘भारतीय’ हा शब्द त्यांनी खूप ढोबळ अर्थाने वापरलेला दिसतो. ‘भारतीय’ ही एकसाची ओळख आहे का? ‘भारतीयत्व’ कोणाच्या नजरेतून परिभाषित केले जाते?  ‘दान’ देऊन ‘पुण्यप्राप्ती’ची चैन कुठल्या ‘भारतीयां’ना परवडत असेल? दलितांना? भटक्यांना? आदिवासींना? स्त्रियांना? गरीबांना? विकिपीडियावर दान देणाऱ्या पुरातनकालीन व्यक्तींच्या यादीत फक्त पुरुषच आहेत (ते ही हिंदूच!), स्त्रिया का नाहीत, असा प्रश्न लेखकाला का पडू नये? लेखकाकडे किंवा इतर कोणाकडे असलेल्या ‘दानशूर’ व्यक्तींच्या यादीत स्त्रिया, दलित, आदिवासी, भटके यांची किती नावे आहेत? नसतील तर का नाहीत? हे सगळे लोक ‘भारतीय’ नाहीत का? हे सारेच प्रश्न विचारणे आवश्यक आहे. आदिवासी समुदायांची संस्कृती वेगळी असते आणि अनेक गोष्टी सामूहिक मालकीच्या असतात. तिथे ‘दान करून पुण्य मिळवण्याची’ संकल्पना अस्तित्वात नाही. लेखक त्यांची गणना भारतीयांमध्ये करतात का? आदिवासींमध्ये खाजगी मालमत्ता हा कळीचा मुद्दा नसल्यानेच कदाचित दान देण्या-घेण्याची प्रथाही नसावी. मुळात, ‘भारतीय’ नावाची एकच एक ओळख आहे, असे भासवत इतर ओळखी दुय्यम ठरवणे, हा देखील सत्ताधारी वर्गाच्या वर्चस्वाच्या राजकारणाचा भाग असतो, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळेच, लेखक ‘भारतीयांची नैतिक मूल्ये’, ‘भारतीयांच्या जीवनाचा आशय’ असे शब्द सरसकटपणे वापरतात, तेव्हा ‘कोणत्या भारतीयांच्या? गोमांस खाणाऱ्या की गायीला पूज्य मानणाऱ्या? वेदप्रामाण्य मानणाऱ्या की नाकारणाऱ्या? द्रविडांच्या की ईशान्येमधल्या? गौरींना नैवेद्य म्हणून पुरणपोळी करणाऱ्या की मटण-वडे करणाऱ्या? शैव, वैष्णव, वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, बौद्ध, शीख, मुसलमान, ख्रिश्चन की आणखी कोणाच्या?’ यासारखे प्रश्न विचारणे क्रमप्राप्त आहे.

उघडच आहे की दानातून ‘पुण्य’प्राप्तीची संधी संसाधनांपासून वंचित असलेल्यांच्या तुलनेत पुरुष, उच्चजातीय आणि मालमत्ताधारकांनाच सर्वाधिक उपलब्ध होती आणि दान स्वीकारणाऱ्यांमध्ये वंचितांचा समावेश होता. म्हणजेच, समाजात विषमता असणे, ही दान हे पुण्यकर्म ठरण्यासाठीची पूर्वअट असते, असे विधान करता येईल. ही विषमता न्याय्य ठरवण्यात, ‘दाना’ला पुण्यकर्म मानणाऱ्या धर्मसंस्थेची मोठीच भूमिका होती/आहे, हे देखील विसरून चालणार नाही. धर्माच्या शिकवणुकीनुसार गरीब, दलित असणे हे गेल्या जन्मीचे पाप, त्यामुळे  ‘मी गरीब-दलित आणि पर्यायाने संसाधनांपासून वंचित का?’ हा प्रश्न विचारण्याचीही सोय नाही आणि परिणामी, या जन्मी दान करून पुण्य मिळवण्याची संधीही नाही!

लेखकाच्या मते, ‘‘ब्लड डोनेशन’ हा शब्द, रक्त देणारा सर्वात महत्त्वाचा आहे, याची नोंद घेतो’.  याचाच अर्थ, रक्त घेणारा दुय्यम, कमी महत्त्वाचा आहे, असाच होतो ना? आणि तरीही लेखक यात उतरंड नाही असा दावा नंतरच्याच परिच्छेदात करतात! खरे तर यात उतरंड नसलीच पाहिजे. देणारी व्यक्ती जितकी महत्त्वाची आहे, तितकीच घेणारी व्यक्ती, संकलन-जतन करणारी व्यक्ती-यंत्रणाही महत्त्वाची आहे. ती यंत्रणाच नसेल तर रक्त देण्याच्या कृतीलाही काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे, ‘देणारा सर्वाधिक महत्त्वाचा’ असे समजायचे तरी काय कारण आहे? जर रक्त गोळा करणाऱ्याच्या बाजूने भेदभाव नसावा, तर तो देणाऱ्याच्या बाजूने तरी का असावा? हा विचारही ‘रक्त संकलन’ शब्द वापरण्यामागे होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याच्या डाव्यांच्या मागणीला पर्याय नाही हे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले. रक्तसेवा-प्रणाली हा सार्वजनिक आरोग्यसेवेचा एक महत्त्वाचा घटक आहे; सार्वजनिक रुग्णालयांमधे पुरेसा रक्त-साठा असणे ही रक्त-पुरवठा प्रणाली प्रभावी करण्याची पहिली पायरी आहे. पुरेसा रक्त-साठा हवा असेल तर नियमितपणे रक्त गोळा, अर्थात संकलित करणे गरजेचे आहे, या भूमिकेतून हे `रक्त-संकलन शिबिर’ आयोजित केले होते.

या निमित्ताने लेखकाने डाव्यांवर ताशेरे ओढत ‘ही (डावी) मंडळी लोकांपासून तुटत चालली आहेत’ असा निष्कर्ष काढला आहे. नेमके ‘कोणत्या’ लोकांपासून डावे तुटत चालले आहेत, हे लेखकाने स्पष्ट केलेले नाही. वस्तुत: डाव्यांनी भारतात (आणि जगभरातच) लोकांबरोबर अनेक चळवळी, लढे, कामे उभी केली आहेत. अन्न, आरोग्य, शिक्षण, रोजगार, निवारा, विस्थापन-स्थलांतर, हिंसाचार इ.मुद्द्यांवर तसेच कामगार-कष्टकरी, बालके, युवा, विद्यार्थी, स्त्रिया, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, वेश्या, वेगळी लैंगिकता असलेल्या व्यक्ती इ. गटांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या डाव्यांच्या संघटनात्मक-संस्थात्मक स्वरूपातील कामांमध्ये अक्षरशः करोडो लोक सहभागी आहेत. या कामाचा राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी उपयोग का होत नाही, हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. उजव्यांनीही यापैकी अनेक मुद्द्यांवर-गटांबरोबर काम चालवलेले आहेच, असा आक्षेप यावर उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र, डाव्यांचे काम हे मुक्तिदायी स्वरूपाचे आणि उजव्यांचे ‘जैसे थे’वादी असते, हा यातील मोठाच फरक आहे. उजव्यांचे ‘समरसते’च्या नावाने दलितांबरोबरचे, ‘वनवासी’ संबोधन वापरत आदिवासींबरोबरचे आणि अभाविपचे विद्यार्थ्यांबरोबरचे काम ही याची उदाहरणे आहेत. शिवाय, उजवे लोकांबरोबर ‘जोडण्या’साठी कोणकोणते मार्ग वापरतात, हे ही सर्वांना माहिती आहेच. डाव्यांची विचारसरणी प्रस्थापितांच्या विरोधी असल्याने त्यांना संसाधनांची, मनुष्यबळाची चणचण भासण्यापासून ते प्रसारमाध्यमांमध्ये अवकाश मिळवण्यापर्यंत अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. इतके असूनही डाव्यांनी विविध क्षेत्रांमध्ये मूलभूत काम आणि वर्चस्व निर्माण केले आहे. डाव्यांची सत्ता असली की केरळ होतो आणि उजव्यांची असली की उत्तरप्रदेश, ही प्रतिमाने आपल्यासमोर आहेत. ‘नर्मदा बचाओ आंदोलना’च्या तोडीचे उजव्यांनी चालवलेले आंदोलन लेखक सांगू शकतील? ‘हमाल पंचायत’, ‘कष्टाची भाकर’, `जन आरोग्य अभियान’,  ‘रेशनिंग कृती समिती’, ‘महिला किसान अधिकार मंच’, ही डाव्यांनी उभ्या केलेल्या कामाची केवळ प्रातिनिधिक उदाहरणे होत. असे असूनही ‘डावे लोकांपासून तुटत चालले’ असल्याचे मत कायम राखण्याचा अधिकार लेखकाला आहेच. ‘डाव्यांना लोकांमध्ये स्थान नाही’ हे नॅरेटिव्ह निर्माण करणे, ही कोणाची गरज असते, ते वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. लेखकाने त्यामुळे प्रभावित का व्हावे, हा खरा प्रश्न आहे.

भाषा ही जातीय, वर्गीय, पितृसत्ताक, वांशिक इ. पूर्वग्रहांपासून मुक्त नसते. त्यामुळेच, जगभरच्याच शोषित-वंचितांच्या चळवळींनी, तसेच समाजशास्त्राच्या अभ्यासकांनीही भाषेची, त्यामागच्या ‘टोन’ची चिकित्सा केली आहे. साहित्याचीही अशी चिकित्सा होत असते. उदा. विनोदी मानल्या गेलेल्या साहित्यात स्त्रियांच्या स्थूलपणाची किंवा एकूणच स्त्रियांचीही, ‘पुरुषी’ नजरेतून, स्त्री हे ‘विनोद’निर्मितीचे पात्र मानून कशी खिल्ली उडवली आहे याचीही समीक्षा झाली आहे. ‘काळा दिवस’, ‘काळा बाजार’ यासारख्या शब्दांना काळ्या लोकांच्या चळवळीने आक्षेप नोंदवला आहे. ‘वाईट, गैर गोष्टींचे वर्णन करण्यासाठी ‘काळा’ हा शब्द विशेषण म्हणून का वापरला जावा?’ हा त्यांचा निरुत्तर करणारा प्रश्न आहे. इंग्रजीतल्या Strategy या शब्दाला मराठीत ‘रणनीती’ असा शब्द अनेकदा वापरला जातो. युद्ध, लढाईचा संबंध नसताना, ‘रणनीती’ या शब्दाची गरज नाही, असा मुद्दा उपस्थित करून आता पर्यायी शब्द म्हणून ‘कार्यनीती’ हा शब्द वापरतात. या सगळ्या प्रक्रियेतून भाषा अधिकाधिक समतावादी होत असते. हे लक्षात न घेता लेखक त्यावर भाष्य का करतात?

उजवे लोक फारसी-अरबी शब्द मराठी भाषेत असू नयेत या द्वेषभावनेतून भाषा‘शुद्धी’चा आग्रह धरत पर्यायी शब्दनिर्मिती करतात, तर डाव्यांचे पर्यायी शब्द सुचवणे हे भेदभावाला-तुच्छतावादाला विरोध आणि समानतेचा आग्रह यातून येते, हे लक्षात न घेता उजव्यांबरोबरच डाव्यांनाही हास्यास्पद ठरवणे अप्रस्तुत आहे. मात्र, लेखकाने उदाहरण दिलेल्या व्यक्तींप्रमाणेच लेखकालाही तसे करण्याचे स्वातंत्र्य आहेच.

डाव्यांचा ‘रक्तसंकलन’ शब्द लेखकांनी वाचताक्षणीच त्यांना ‘बारीकसे टोचले’ आणि त्यांनी थेट डाव्यांना झोडणारा लेखच लिहिला! मग, उजव्यांचा देशात सुरू असलेला हैदोस तर त्यांना ‘खूपच टोचत’ असणार आणि लेखकाची डाव्यांप्रमाणेच उजव्यांशीही मैत्री असल्याने, त्यावर लेखमाला लिहिण्याचाच त्यांचा मानस असणार! ‘डाव्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण उजव्यांच्या डोळ्यातलं मुसळही दिसत नाही’ असा आरोप लेखक स्वत:वर होऊ देणार नाहीत, अशी अशा आहे.

मिलिंद चव्हाण, हे लोकशाही आंदोलनाचे संयोजक असून, समाज प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0