डाव्यांचे ‘रक्तसंकलन शिबीर’

डाव्यांचे ‘रक्तसंकलन शिबीर’

रक्तदान हा प्रचलित शब्द बदलण्याची बाब डाव्या पुरोगामी लोकांच्या विक्षिप्तपणाचा एक क्षुल्लक नमूना म्हणून सोडून द्यावी असे घडीभर वाटले पण नंतर असाही विचार आला की यानिमित्ताने डाव्या मंडळींच्या या विक्षिप्तपणाचा थोडा सविस्तर विचार करावा.

‘रक्त संकलना’मागचा डावा दृष्टिकोन
भारताने रक्तदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे
सर्वसमावेशक भारतीयत्वाचे खरे शत्रू कोण?

माझी मैत्री कडव्या हिंदुत्ववादी मंडळींपासून अगदी कडव्या पोथीनिष्ठ डाव्या मंडळींपर्यंत विविध प्रकारच्या लोकांशी आहे. अगदी आत्ताच्या सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचे तर अंधभक्त ते फुरोगामी/सिकुलर अशी ही रेंज आहे. यांना ढोबळपणे उजवे आणि डावे असे संबोधण्याची पण पद्धत आहे. श्याम मनोहर यांनी त्यांच्या कादंबरीत अशा या दोन ढोबळ वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी सप आणि गप अशी दोन पात्रे योजून या ढोबळ विभाजनाची आणि त्याबरहुकूम वागणाऱ्या लोकांची खिल्ली उडवलेली आहे.

काही दिवसांपूर्वी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर एका डाव्या संघटनेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची जी काही माहिती पाठवण्यात आली होती त्यात या कार्यक्रमाचा उल्लेख “रक्तसंकलन शिबीर” असा केला होता. मला ते वाचताक्षणीच बारीकसे टोचले होते. मी कार्यक्रम झाल्यानंतर फुरसतीत संयोजकांना विचारले की “रक्तदान” या नेहमीच्या प्रचलित शब्दाऐवजी तुम्ही “रक्तसंकलन” हा शब्द का वापरला? मुद्दा तसा छोटाच होता पण मला राहवले नाही. संयोजकांने रेडिओवर या कार्यक्रमाविषयी माहिती सांगताना “रक्तसंकलन” हा वेगळाच शब्द वापरण्याविषयी जे स्पष्टीकरण दिले होते ते मला पाठवले. हे ऐकल्यानंतर मात्र माझ्या लक्षात आले की ह्या शब्द बदलामागे संयोजकांची (नेहमीप्रमाणे) गंभीर भूमिका होती. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर “ मुळात रक्त देणारा आणि रक्त घेणारा अशी उतरंड तरी का असायला पाहिजे? रक्तदानाच्या जाहिरातीत असे चित्र असते की रक्ताचा थेंब असतो एक हात देतोय आणि दुसरा हात झेलतोय. समजा मी आज रक्त देण्यासाठी पात्र असेल तर काही काळानंतर मला रक्त घेण्याची गरज भासू शकते. त्यामुळे देणारा आणि घेणारा अशी उतरंड असता कामा नये. आपण भारत या लोकशाही देशातले नागरिक आहोत. आपण सगळे समान आहोत. आपल्यात जातधर्म भेद कुठलाही असता कामा नये…” इत्यादि.

हे स्पष्टीकरण ऐकल्यावर मात्र, डावी मंडळीसुद्धा “नैमित्तिक विधायक कामांमार्फत संघटन” ही एरव्ही उजव्यांची मक्तेदारी असलेली पद्धत वापरत आहेत हे पाहून झालेल्या माझ्या आनंदावर विरजण पडले. हे लोक नेहमीप्रमाणे हे एरव्हीचे साधे काम करतानादेखील High Moral Ground घेऊन अज्ञ जनास उपदेश करण्याच्या विकारावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत असा विचार मनात आला. रक्तदान या आधीपासून वापरात असलेल्या समर्पक शब्दामध्ये उतरंड, लोकशाही या अनुषंगाने “भेद”क विचार करून रक्तसंकलन नावाचा नवाच रंगहीन शब्द आणण्याची ही खटपट बघून एकीकडे हसू आले आणि दुसरीकडे खंत वाटली.

निव्वळ तर्कप्रधान आणि विवेकनिष्ठ पद्धतीने विचार केला तरी रक्तसंकलन या शब्दात संकलनाची क्रिया प्रधान ठरते. खरं तर रक्तदानाच्या उपक्रमात संकलन करणारा दुय्यम असतो. देणारा महत्त्वाचा असतो. त्यामुळे या उपक्रमाला रक्तसंकलन असे नाव दिले तर त्यामुळे रक्त गोळा करणाऱ्या माणसाच्या बाजूने भेदभाव केला जातोय असा अर्थ निघू शकतो. विशेष म्हणजे blood donation हा जगभर वापरला जाणारा शब्द आहे. तो या प्रक्रियेतला जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे “देणारा”, त्याला महत्त्व देणारा, त्याच्या कामाची नोंद घेणारा असा सर्वज्ञात शब्द आहे.

मला पु. भा. भावे या प्रसिद्ध हिंदुत्ववादी लेखकांची आठवण झाली. “दुकान” हा फारसी शब्द नको म्हणून “विकान” हा नवाच मराठी शब्द ते वापरत असत. यात विकणे ही क्रिया पण येते असे त्यांचे म्हणणे असे. तो शब्द नाही रुळला तो भाग वेगळा. भाषाशास्त्र शिकवणाऱ्या यास्मिन शेख मॅडमनी आम्हाला हा किस्सा ऐकवला होता. तर या बाबतीत उजवे आणि डावे हे टिपिकल गमती जमती करतात असे यावरून सिद्ध होते.

रक्तदान हा प्रचलित शब्द बदलण्याची बाब डाव्या पुरोगामी लोकांच्या विक्षिप्तपणाचा एक क्षुल्लक नमूना म्हणून सोडून द्यावी असे घडीभर वाटले पण नंतर असाही विचार आला की यानिमित्ताने डाव्या मंडळींच्या या विक्षिप्तपणाचा थोडा सविस्तर विचार करावा. भारतीय समाजातील सांस्कृतिक वैशिष्ट्यांना समजून घेण्यात कुचराई करणे, पठडीबद्ध विचार करणे, सर्वसामान्य लोकांचे मन समजावून न घेता सतत त्यांना शहाणे करून सोडण्याची भूमिका बाळगणे यासारख्या सवयींमुळे ही मंडळी सर्वसामान्य लोकांपासून कशी तुटत चाललेली आहेत हे दाखवून देण्यासाठी हे गरजेचे आहे.

इंग्रजीतल्या donation या शब्दापेक्षा दान हा भारतीय शब्द जास्तीचे पैलू असलेला आणि वेगळा आहे. हा कुठल्याही एका धर्मापुरता मर्यादित नसलेला असा खास भारतीय शब्द आहे. यात उतरंड तर नाहीच उलट भारतीय विचारानुसार दान ही देणार्‍याचीच गरज असते. देणारा वरती आणि घेणारा खालती असा काही प्रकार नसतो. उलट घेणाऱ्याला सुद्धा मान असतो. ज्या गोष्टी करणे भाग आहे आणि ज्या गोष्टी केल्याने देणाऱ्यालाच काहीतरी (पुण्य वगैरे) मिळणार आहे अशा गोष्टी दानात येतात. एखादी गोष्ट दुसऱ्या कुणाला कायमची देऊन टाकताना भारतीय माणसाच्या मनात अगदी सहजपणे दानाची भावना उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे आधुनिक पाश्चात्य समाजात खऱ्या अर्थाने ऐहिक वर्तुळात मोडणारी “एखादी वस्तू देण्याची” कृती भारतीय माणसासाठी केवळ ऐहिक न राहता काहीतरी अधिक असू शकते. या “काहीतरी अधिका”चा त्याग करून प्रत्येक कृतीमध्ये इहवादी विचाराचा आग्रह धरणे भारतीय समाजाच्या संदर्भात तरी विपरीत म्हणावे लागेल.

भारतीय व्यक्तींच्या जीवनाचा आशय, त्यांची नैतिक मुल्ये, जीवनाची साध्ये, आदर्श त्यांच्या धार्मिक श्रद्धेने घडविलेले असतात हे सामाजिक वास्तव आहे. गांधीजींनी त्यांच्या कामात भारतीय माणसाच्या खास भारतीय आध्यात्मिक धाटणीचा विशेष विचार केला होता. मग ती उपवासाची कृती असो किंवा यात्रा काढण्याची. त्या कृतींना असणारे खास भारतीय रंग गडद करून त्यांनी त्याद्वारे अधिकची ऊर्जा जागवली होती. भू”दान’ चळवळ निर्माण करताना दान शब्द वापरून विनोबा सुद्धा तेच साधू पाहत होते. असे असताना रक्तदानासारख्या कृतीला असलेला प्रचलित भारतीय रंग वगळण्याचा प्रयत्न करंटेपणाचा म्हणावा लागेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0