जो बायडेन निवडीवर पुतीन, जिनपिंग, बोल्सोनारोंचे मौन

जो बायडेन निवडीवर पुतीन, जिनपिंग, बोल्सोनारोंचे मौन

अमेरिकेचे अध्यक्षपदी जो बायडन व उपाध्यक्षपदी कमला हॅरिस यांची निवड जवळपास नक्की झाल्यानंतर या दोहोंचे अभिनंदन करणारे संदेश जगभरातील बहुसंख्य देशांकडून

म्यानमारः लष्करशाहीचा थयथयाट
शोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली
कांचन ननावरेच्या तुरुंगातील मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटिस

अमेरिकेचे अध्यक्षपदी जो बायडन व उपाध्यक्षपदी कमला हॅरिस यांची निवड जवळपास नक्की झाल्यानंतर या दोहोंचे अभिनंदन करणारे संदेश जगभरातील बहुसंख्य देशांकडून येत असले तरी चीन, रशिया, ब्राझील, तुर्की या देशांच्या प्रमुखांनी अद्याप बायडेन व कमला हॅरिस यांना अभिनंदनपर संदेश पाठवलेले नाहीत, असे वृत्त सीएनएनने दिले आहे. या देशातील प्रमुखांशी विद्यमान अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांचे सलोख्याचे संबंध होते. या देशांत अधिकारशाही असल्याने ट्रम्प प्रशासनाने त्यांना झुकते माप दिले होते. खुद्ध ट्रम्प यांचे वर्तनच अधिकारशाहीचे असल्याने त्यांनी अशा राजवटींशी फारसे तणावाचे संबंध ठेवले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर या नेत्यांच्या मौनामागील राजकीय भूमिका लक्षात येते.

व्लादिमीर पुतीन

२०१६मध्ये ट्रम्प निवडून आल्यानंतर काही तासांतच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प यांना त्यांचे अभिनंदन करणारा संदेश पाठवला होता. पण बायडेन यांच्या निवडीवर अद्याप शिक्कामोर्तब न झाल्याने रशियाने संदेश पाठवला नाही, असे उत्तर क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिले आहे.

गेली चार वर्षे ट्रम्प रशिया संबंधांवरून टीकेचे धनी झाले होते. रशियाने निवडणुकीत मदत केल्याने ट्रम्प निवडून आले असा आरोप करण्यात आला होता. आता बायडन निवडून आल्याने ते रशियाशी तसे गोडीगुलाबीचे संबंध ठेवण्याची शक्यता कमी असल्याने रशिया सावध झाला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये बायडन यांनी सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत रशिया हा अमेरिकेला धोका असल्याचे विधान केले होते. या विधानाचा रशियाने निषेध केला होता. भविष्यात आंतरखंडीय क्षेपणास्त्रबंदी करार हा आता दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.

शी जिनपिंग

२०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात ट्रम्प यांनी चीनवर मोठ्या प्रमाणात टीका केली. पण ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिका व चीन यांच्यातील संबंध स्थिर व शांततापूर्ण राहतील असे मत व्यक्त केले होते. पण ट्रम्प व जिनपिंग यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित झाले नाहीत. गेल्या ४ वर्षांत व्यापार, तंत्रज्ञान, मानवाधिकार, चीनचे विस्तारवादी धोरण व कोविड-१९ या विषयांवर अमेरिका चीनविरोधात आक्रमक राहिली.

पण असे असतानाही बायडेन निवडून आल्यानंतर जिनपिंग यांनी त्यांचे अभिनंदन करणारा संदेश पाठवलेला नाही. चीनच्या सरकारने या प्रश्नावर अद्याप उत्तर दिलेले नाही. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार चीन प्रतिक्रिया देईल, असे उत्तर चीनच्या परराष्ट्र खात्याने दिले आहे.

तय्यीप एर्दोगन

एका सार्वमत चाचणीत तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी एर्दोगन यांचे कौतुक केले होते. एर्दोगन यांच्याविरोधात उठाव झाला होता, तो उठाव मोडून काढल्यानंतरही ट्रम्प यांनी एर्दोगन यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी चार वर्षांत तुर्कीच्या राजकारणात हस्तक्षेप टाळला असल्याने तेथे एर्दोगन यांनी अनिर्बंध सत्ता निर्माण झाली व त्यांचे स्थान अधिक बळकट होत गेले. आता बायडन आल्यामुळे अमेरिका-तुर्की संबंधांत बदल होतील, तरीही बायडन यांना अध्यक्ष झाल्याबद्दल एर्दोगन यांनी अभिनंदनाचा संदेश पाठवलेला नाही.

जैर बोल्सोनारो

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचे व्यक्तीवादी व लोकानुयायी राजकारण हा द. अमेरिकेतील एक महत्त्वाचा राजकीय व चिंतेचा मुद्दा आहे. ट्रम्प यांचे कुटुंबिय जसे राजकारणात, प्रशासकीय धोरणांत काम करत आहेत तसेच बोल्सोनॅरो यांचे कुटुंबियही ब्राझीलच्या राजकारणात आपले पाय रोवून उभे आहेत. बोल्सोनारो व ट्रम्प यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. बोल्सेनारो यांनी आपल्या टोपीवर ‘ट्रम्प-2020’ असे लिहून आपण ट्रम्पचे समर्थन करत असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी गेल्या आठवड्यात बायडन यांना मिळालेल्या मतावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ट्रम्प जसे ध्रुवीकरण, वंशवादाला उत्तेजन देणारे, स्त्रियांविषयी बुरसट विचार व्यक्त करतात तशीच बोल्सोनारोंही यांची जाहीर भूमिका आहे. त्यांनीही ट्रम्प प्रमाणे कोविड-१९ संदर्भात गांभीर्याने पावले उचलली नव्हती. त्यामुळे अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये कोविडने हाहाकार माजवला होता. बोल्सेनारो यांनी बायडन यांना अभिनंदनपर संदेश पाठवलेला नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0