कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती?

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती?

विषाणू जितका लोकांमध्ये पसरेल तितकेच त्यामध्ये म्युटेशन होईल व नवीन स्ट्रेनची निर्मिती होईल. लसीकरण अधिक प्रभावी ठरण्यासाठी व विषाणूचा खात्मा करण्यासाठी नवीन स्ट्रेनची निर्मिती टाळणे खूप महत्वाचे आहे.

राज्यात नवे निर्बंध लागू
राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर
संपूर्ण राज्य बंद

आज जगातील ३० देशांनी कोरोना लसीकरण सुरू केले आहे. लवकरच जगाला कोरोना संकटापासून मुक्ती मिळेल अशा आशा पल्लवित होत असताना एक चिंतेची बाब समोर आली ती म्हणजे ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ब्रिटनमधील नवीन स्ट्रेन –B.1.1.7 ४० देशांमध्ये तर दक्षिण आफ्रिकेतील नवीन स्ट्रेन – 501Y.2 सहा देशांमध्ये सापडला आहे. कोरोना विषाणू (SARS-CoV-2) मध्ये झालेल्या म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तनामुळे या नवीन स्ट्रेनची निर्मिती झाली आहे.

काय आहे हे म्युटेशन? नक्की जुन्या विषाणूमध्ये काय घडलं व नवीन विषाणूची निर्मिती का झाली? या  प्रश्नांची  उत्तरे  आपण सदरच्या लेखात समजून घेणार आहोत. उत्परिवर्तनमध्ये विषाणूच्या जनुकीय पदार्थ – डीएनए किंवा आरएनएमधील रायबोन्यूक्लिओटाइडचा क्रम बदलतो व परिणामी विषाणूची एकूण रचना बदलून नवीन विषाणू कणांची निर्मिती होते. या नवीन विषाणू कणांना ‘स्ट्रेन’ असे म्हणतात.

प्रत्येक सजीव पेशीमध्ये त्या पेशीचे कार्य व रचना एका विशिष्ट   पदार्थाकडून नियंत्रित केली जाते. हा पदार्थ म्हणजेच जनुकीय पदार्थ.   बहुतांश सजीवांमध्ये डीएनए हा जनुकीय पदार्थ आढळतो. विषाणूंच्या बाबतीमध्ये डीएनए किंवा आरएनए हे जनुकीय पदार्थ आढळतात. कोरोना विषाणू हा आरएनए विषाणू आहे, म्हणजेच या विषाणूमध्ये आरएनए हा जनुकीय पदार्थ आहे. आरएनएची रचना एखाद्या धाग्यासारखी असून तो चार प्रकारच्या रायबोन्यूक्लिओटाइड – अडेनिलेट (A), ग्वानिलेट (G), युरीडीलेट (U) व सायटीडीलेट (C) पासून बनलेला असतो.

रायबोन्यूक्लिओटाइड एका  विशिष्ट  क्रमात  जोडून  आरएनएची निर्मिती केली जाते. अधिक सोप्या रीतीने समजून घ्यायचे झाले तर  रायबोन्यूक्लिओटाइड हे अक्षरांसारखे असून त्यांच्या विशिष्ट क्रमातील जोडणीमधून जसे वाक्य तयार होते त्याप्रमाणे आरएनए तयार केला जातो. एखाद्या सजीव पेशीच्या किंवा विषाणूच्या जनुकीय पदार्थामध्ये असणारा न्यूक्लिओटाइटचा असणारा क्रम हा त्या पेशीसाठी किंवा विषाणूसाठी ठरलेला असतो.

जेव्हा  कोरोना विषाणू  कण  मानवी पेशीमध्ये शिरकाव करतो त्यावेळी त्याच्या मधील आरएनए बाहेर येतो. सर्वप्रथम या आरएनएच्या हुबेहूब बऱ्याचशा प्रती तयार केल्या जातात. त्यानंतर आरएनएमधील

रायबोन्यूक्लिओटाइडच्या क्रमांमध्ये साठवलेल्या माहितीचा वापर करून  विषाणूच्या विविध प्रथिनांची निर्मिती केली जाते. तयार झालेली विषाणू  प्रथिने व आरएनएची एक प्रत मिळून विषाणूचा एक नवीन कण तयार केला जातो. याप्रमाणे विषाणूची अनेक प्रथिने व अनेक आरएनएए मिळून  विषाणूचे अनेक नवीन कण तयार होतात. आरएनएच्या हुबेहूब प्रती तयार करण्याची पद्धत ही नकला (फोटोकॉपी) काढण्यासारखी असते. यामध्ये एका मूळ आरएनएपासून अनेक प्रती तयार केल्या जातात. या प्रक्रियेदरम्यान काही चुका घडतात. यामुळे आरएनएमधील रायबोन्यूक्लिओटाइडचा क्रम बदलतो व परिणामी काही प्रमाणात वेगळा असणारा आरएनए तयार होतो. हा आरएनए मूळ आरएनएच्या तुलनेत वेगळा असल्याकारणाने त्यापासून तयार होणारी विषाणूंची प्रथिने व इतर भाग हे मूळ विषाणूपेक्षा वेगळे असतात.

ब्रिटनमधील नवीन कोरोना विषाणूमध्ये एकूण १७ म्युटेशनची नोंद झाली आहे. या पैकी ८ म्युटेशन विषाणूच्या  स्पाईक  प्रथिनांमध्ये  झालेली आहेत. स्पाईक प्रथिने ही आकाराने लहान मुलांच्या आवडत्या असणाऱ्या लॉलीपॉप या गोळीसारखी असून ती विषाणूच्या पृष्ठभागावर आढळतात. याच स्पाईक  प्रथिनांचा वापर करून विषाणू मानवी पेशीमध्ये शिरकाव करत असतात. आरएनए विषाणूच्या जनुकीय पदार्थांमध्ये म्युटेशन होण्याचा वेग हा सर्वात जास्त आहे. त्यामुळेच वर्षभरात एखाद्या आरएनए विषाणूपासून दोन ते तीन नवीन प्रकारचे विषाणू तयार होत असतात.

कोरोनाविषाणूचा जगभरात झालेल्या संसर्ग व म्युटेशनमुळे नव्याने तयार होणाऱ्या आरएनए विषाणूंच्या स्ट्रेनचा विचार केल्यास या विषाणूंपासून  मानवी आरोग्य असणारे संभाव्य धोके अगदी ठळकरित्या अधोरेखित झाले आहेत. गरज आहे ती आरएनए विषाणूंवरवरील सखोल संशोधनाची व त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची. भविष्यामध्ये आरएनए विषाणूंचा सर्व सजीवांसाठी असणारा संभाव्य धोका ओळखून वैज्ञानिकांनी अधिक सावध असण्याची नितांत आवश्यकता आहे.

B.1.1.7  व  501Y.2 या स्ट्रेनमधील स्पाईक प्रथिनांमध्ये म्युटेशनमुळे बदल झाले आहेत. स्पाईक प्रथिनांमध्ये झालेला बदल विषाणूची संसर्ग क्षमता वाढवू शकतो. असे बदल झालेले नवीन विषाणू मानवी प्रतिरक्षा प्रणालीस (इम्यून सिस्टीम) चकवा देऊ शकतात. त्यामुळे स्पाइक प्रथिनांमध्ये होणारे म्युटेशनन्स अधिक चिंताजनक आहेत.

ब्रिटनमधील B.1.1.7  या  स्ट्रेनमधील स्पाईक प्रथिनांमध्ये झालेल्या म्युटेशनमुळे विषाणूची संसर्ग क्षमता मूळ विषाणूच्या तुलनेत ७० टक्क्यांनी वाढली असल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील 501Y.2 या स्ट्रेनमधील स्पाईक प्रथिनांमध्ये झालेले  म्युटेशन  अधिक चिंताजनक आहेत.  ही प्रथिने इतकी बदलली आहेत की मूळ कोरोना विषाणू विरोधातील प्रतिपिंडे (अंटीबॉडी) या विषाणूंना निष्क्रिय करू शकत नाहीत. वैश्विक महामारीच्या काळात स्पाईक प्रथिनांमध्ये ४००० म्युटेशनची नोंद झाली आहे पण यापैकी कोणतीही मुटेशन फारसे चिंताजनक नव्हते. नव्याने उदयास आलेल्या कोरोना विषाणूच्या या नवीन स्ट्रेनमुळे कोरोना लस निर्मिती व जागतिक पातळीवर सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसमोर काही नवीन आव्हाने उपस्थित केली आहेत.

आव्हाने

  • सध्याची लस नवीन स्ट्रेन विरुद्ध उपयुक्त ठरेल काय?
  • उपयुक्त ठरत असल्यास ती नवीन स्ट्रेन विरुद्ध कितपत संरक्षण देईल?
  • नवीन स्ट्रेन विरुद्ध नव्याने लस निर्मिती करावी लागेल काय?
  • नवीन लस निर्मितीसाठी लागणारा वेळ, खर्च व पर्यायाने किंमतीवर होणारा वाढीव परिणाम लोकांस परवडणारा आहे काय?
  • म्युटेशनमुळे पूर्णपणे वेगळा विषाणू तयार होण्याची शक्यता जरी असंभव असली तरी अशक्य नाही. अशा नवीन विषाणूंचा मुकाबला आपल्याला नव्याने करावा लागेल.

वैज्ञानिक उपलब्ध असणार्या लसींची कार्यक्षमता या नवीन स्ट्रेनविरूद्ध तपासत आहेत. अभ्यासाअंती लवकरच माहिती समोर येईल. या आव्हानांनबरोबर काही जमेच्या बाजू देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

जमेच्या बाजू

  • नवीन स्ट्रेनमधील स्पाईक प्रथिने ही पूर्णतः बदललेली नसून त्यामध्ये काही ठिकाणी बदल झाला आहे. याचाच अर्थ असा की विषाणू पूर्णतः बदलेला नाही.
  • सध्याच्या लसी  या स्पाईक प्रथिनांच्या वेगळ्या भागांपासून तयार केलेल्या असल्याने त्या पूर्णतः निरूपयोगी ठरतील असे होणार नाही. कदाचित त्यांची कार्यक्षमता कमी होईल पण शून्य होणार नाही.
  • म्युटेशनमुळे पूर्णतः नवीन विषाणू तयार होण्यासाठी बरीच वर्षे जावी लागतील. त्यामुळे सध्याची लस या नवीन स्ट्रेन विरूद्ध पूर्णपणे निष्क्रिय ठरेल असे होणार नाही.
  • विषाणूमधील झालेल्या म्युटेशनचा अभ्यास करून डीएनए व आरएनए लसी अगदी कमी कालावधीत नव्याने तयार करता येतील.
  • मानवी प्रतिरक्षा प्रणाली एखाद्या विषाणूच्या नवीन – नवीन स्ट्रेनविरुद्ध लढण्यास सक्षम आहे.

विषाणू जितका लोकांमध्ये पसरेल तितकेच त्यामध्ये म्युटेशन होईल व नवीन स्ट्रेनची निर्मिती होईल. लसीकरण अधिक प्रभावी ठरण्यासाठी व विषाणूचा खात्मा करण्यासाठी नवीन स्ट्रेनची निर्मिती टाळणे खूप महत्वाचे आहे. नवीन स्ट्रेनची निर्मिती टाळण्यासाठी कोरोना विषाणूचा होणारा प्रसार नियंत्रित करणे गरजेचे आहे यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे, नव्या स्ट्रेननी बाधित रुग्णांचे विलगीकरण करणे व त्यांच्यावर योग्य व पुरेपूर उपचार करणे आवश्यक आहे. विषाणू म्युटेशनमुळे अधिक स्मार्ट बनत जात आहे, त्याच हा स्मार्टनेस आपण योग्य  काळजी घेऊन नक्कीच नियंत्रित करू शकतो.

विनायक सुतार, हे सांगली चिखली येथील दे.आ. ब. नाईक कला व विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0