मानवी मनाचे रेखाटन

मानवी मनाचे रेखाटन

रुटगर ब्रेगमन यांचं Human Kind, A Hopeful History हे पुस्तक सध्या जगभर गाजतंय. ब्रेगमन व्यवसायानं पत्रकार आहेत, अकॅडमिक इतिहासकार नाहीत. तरीही या पुस्

आरोग्य क्षेत्रामधल्या हितसंबंधांचा संघर्ष
‘माझा बाप कुठं जन्माला आला, मला माहीत नाही, मी जातीच्या दाखल्यासाठी वंशावळ कुठूनआणू’
मुस्लिम वृद्धावरील हल्ला धार्मिक द्वेषातूनच: कुटुंबियांचा आरोप

रुटगर ब्रेगमन यांचं Human Kind, A Hopeful History हे पुस्तक सध्या जगभर गाजतंय. ब्रेगमन व्यवसायानं पत्रकार आहेत, अकॅडमिक इतिहासकार नाहीत. तरीही या पुस्तकात त्यांनी रेखाटलेला मानवी समाज जगभरच्या अकॅडमिक लोकाना विचार करायला लावत आहे. टेड टॉक, बीबीसी, अनेक युनिव्हर्सिट्या यांत त्यांचा विचार ऐकून घेतला जात आहे.

ब्रेगमन यांची पुस्तक लिहिण्याची धाटणी सध्या गाजत असलेल्या युवाल हरारी यांच्या शैलीशी मिळती जुळती आहे. जगभरचे बायॉलॉजिस्ट, आर्किऑलॉजिस्ट, सायकॉलॉजिस्ट इत्यादींचे अभ्यास यांचा आधार ब्रेगमन घेतात. लेखकानं आपली बाजू वाचकांना पटवण्यासाठी किती तरी प्रयोग, किती तरी विचारवंत, किती तरी बातम्या आणि पुस्तक यांचे निष्कर्ष आणि अवतरणं वापरली आहेत.

ब्रेगमन यांच्या कथनाचा मुख्य धागा आहे मानवी मन. ब्रेगमन म्हणतात की माणूस decent आहे, तो मुळात इतर माणसांशी चांगले संबंध ठेवून चांगलं जगण्याचा विचार करणारा आहे. माणसाचा चांगुलपणा हे केंद्र ठेवून ब्रेगमन यांनी त्यांचं पुस्तक रचलं आहे.

जोवर माणूस शिकारी आणि अन्न गोळा करून जगणारा होता तोवर म्हणजे कित्येक हजार वर्षं तो हिंसक नव्हता, इतर माणसांचा जीव घेत नव्हता. तो शेती करू लागला तिथपासून तर थेट विसाव्या शतकापर्यंत तो हिंसक होत गेला, इतर माणसं मारू लागला. ब्रेगमनच्या मते शेती सुरु झाल्यापासून त्यानं सिविलायझेशन निर्माण केलं. तिथं गडबड झाली.

आपल्या निष्कर्षाला आधार देण्यासाठी ते पुरातत्व शोधांचा आधार घेतात. ते म्हणतात की माणूस जेव्हां भटका होता त्या काळात त्यानं गुहांमधे काढलेली चित्रं पहा. त्यात कुठही युद्धाचं चित्रण नाही. माणसं हातात भाले किवा त्यासारखी शस्त्रं घेऊन जनावरांचा पाठलाग करताना दिसतात.

हॉब्स, रुसो या प्रख्यात विचारवंतांचे दाखले देत ब्रेगमन म्हणतो की माणसानं केलेल्या हिंसाचाराचा अर्थ या विचारवंतांनी असा काढला की माणूस स्वार्थी आहे. रुसोचं म्हणण होतं की माणसानं खाजगी संपत्ती, खाजगी मालकी  नावाची आयडिया काढली आणि त्यातूनच मानवी सिविलायझेशन निर्माण झाली. ब्रेगमनचं म्हणणं असं की सिविलायझेशनच्या आवरणाखाली माणसाचा स्वार्थी स्वभाव लपलेला आहे. माणूस पापी आहे हा तर ख्रिस्ती विचाराचा पायाच आहे.

ब्रेगमन प्रत्येक तत्वज्ञानाचा उल्लेख करून ती तत्वज्ञानं कशी चुकीची आहेत किंवा चुकीची मानावीत हे सांगत जातात. हॉब्स म्हणत की माणूस स्वार्थी आहे, तो युद्ध करत असे. ब्रेगमन पुरातत्व संशोधनाचा दाखला देऊन ते म्हणणं खोडतात. रुसोनं सिविलायझेशनच्या निर्मितीमुळं मानव स्वार्थी झाला असं लिहिलं; ब्रेगमन म्हणतात की आधुनिक काळात सिविलायझेशननं अनेक वाटा शोधून काढून प्रगती केली, ते सरकारनं निर्माण केलेल्या करपद्धतीचा पुरस्कार करतात आणि अतीश्रीमंत माणसांच्या संपत्तीतला भाग करांच्या रुपानं समाजाकडं वळवला पाहिजे असं म्हणतात.

ब्रेगमन उत्साही कार्यकर्त्यासारखे आहेत. माणसानं परोपकारीपण हा आपला गुण टिकवून त्याच्या आधारे पुढल्या मानवी समाजाची रचना करावी या आग्रहापोटी ते हिरीरीनं पुस्तक मांडतात. या खटाटोपात त्यांच्या मांडणीत अनेक विसंवाद असल्यासारखं वाटतं.

माणूस जर सुस्वभावी आहे, परोपकारी आहे तर त्याच माणसानं साठ लाख ज्यू कां मारले? कांपुचियात काही लाख माणसं कां मारली? रवांडात आणि रशियात लाखोंच्या मापात नरसंहार कां झाले? याबद्दल ते म्हणतात की त्यांच्या मांडणीत अंतर्विरोध जरूर आहे, पण असे अनेक अंतर्विरोध मानवी समाजात आहेतच आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायला हवा.

ब्रेगमन अनेक अभ्यास आणि संशोधनांचा हवाला देत सांगतात की माणूस  क्रूर होतो  कारण तो मनातूनच क्रूर असण्यापेक्षा सभोवतालचा प्रभाव हे कारण असतं. पेपरातल्या बातम्या वाचून, सोशल मिडिया इत्यादी गोष्टीमुळं माणूस बिघडतो असं ब्रेगमन म्हणतात. पेपरात निराशाजनक, दुःखद बातम्या देतात.

रुटगर ब्रेगमन

रुटगर ब्रेगमन

एक उदाहरण पुस्तकात आहे. अमेरिकेत एका स्त्रीचा खून झाला, आसपासच्या माणसांनी बघ्याची भूमिका घेतली अशा बातम्या पेपरांनी छापल्या. रीपोर्ताज लिहीणारा पत्रकार काही दिवसांनी घटनास्थळी गेला. त्याला आढळलं की परिसरातल्या लोकानी जीव धोक्यात घालून खुन्याला पकडून दिलं होतं. पेपरांनी ही बातमी छापली नाही. संकटवेळी आसपासची माणसं आपणहून मदत करतात अशी अनंत उदाहरणं असतात पण पेपर त्यावर बातम्या देत नाहीत.

ट्विटर, फेसबुक,दैनिकं इत्यादी माध्यमं ही खरी माध्यमंच नाहीत असं ब्रेगमन म्हणतात. माणसं प्रत्यक्ष भेटून बोलतात, बरेच वेळा न बोलताही माणसं व्यक्त होत असतात, प्रेम व्यक्त करत असतात. पण बोलबाला आणि प्रभाव सोशल मिडियाचा असल्यानं निगेटिव बातम्यांवर माणसं अधिक विश्वास ठेवतात. ब्रेगमन म्हणतात की लोकांचा कल निगेटिव गोष्टींवर विश्वास ठेवण्याकडं असतो.

पेपर, पत्रकार, सोशल मिडिया ही माध्यमं उथळ आहेत, ताज्या गोष्टी घाईघाईत रचून वाचकांसमोर ठेवणे या गरजेतून त्यांचा उथळपणा आणि लोकांमधे गैरसमजूत पसरवणं या गोष्टी घडतात असं त्यांचं म्हणणं आहे.

बेटावर रहाणाऱ्या माणसांनी आपसात मारामाऱ्या केला, निसर्ग नष्ट केला आणि माणसंही नष्ट झाल्याच्या नोंदी अनेक पुस्तकांमधे आहेत. अशी पुस्तकं माणूस स्वार्थी आहेत असं सांगत असतात. ब्रेगमन या पुस्तकांचा अभ्यास करतात आणि या पुस्तकातलं संशोधन कसं बोगस आहे ते पुराव्यानिशी सिद्ध करतात. एका बेटावरच्या मोठ्या मूर्ती आणि शिल्पं नष्ट झाल्याची नोंद पुस्तकात असते पण मूर्ती बेटावर आक्रमण करणाऱ्या लोकांच्या तोफगोळ्यांमुळं झाल्या असं ब्रेगमन दाखवून देतात. एका बेटावरची झाडं नाहिशी झाल्याचं दाखवून त्या पुस्तकाचा लेखक म्हणतो की स्थानिक लोकांनी जंगलं नष्ट केली. ब्रेगमन दाखवून देतात की झाडं तोडून तिथल्या लोकांनी शेती केल्यानं झाडं नष्ट झाली.

ब्रेगमननी मानवी मनाचा अभ्यास या पुस्तकात मांडला आहे. ब्रेगमन म्हणतात की सैनिक एकाद्या विचारधारेसाठी, देशासाठी वगैरे लढत नसतात. ते लढतात ते सहकारी सैनिकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी. जर्मन सैनिकांची असंख्य संभाषणं ब्रेगमननी तपासली आणि दाखवून दिलं की त्या सैनिकांना नाझी विचारधारा अजिबात माहीत नव्हती आणि आर्यन रक्त आणि ज्यू वगैरे गोष्टीही त्यांना माहीत नव्हत्या. सैन्यातली शिस्त, नियम, आदेश, घेतलेली शपथ यांचा परिणाम म्हणूनच सैनिक लढत होते.

माणूस स्वार्थी नाही या सिद्धांताचा शोध घेत ब्रेगमन जगभर फिरले. अनेक अभ्यासकांना भेटले, पुस्तकं वाचली. गोळा झालेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांचं म्हणणं पक्क झालं. पुरावे गोळा करण्याचा प्रवास पुस्तकात आहे. पुस्तकाच्या शेवटी नव्यानं समजानं कसं वागावं याचा निर्देश ब्रेगमन करतात. ते म्हणतात की आता नवा वास्तववाद स्विकारा. उदार व्हा. माध्यमाच्या कचाट्यातून मोकळे व्हा. सीनिक होऊ नका, आशावादी होऊन कामाला लागा.

ब्रेगमन यांच्या पुस्तकाचा एक विचार करायला लावणारा भाग म्हणजे इतिहास, विचारधारा या गोष्टी घडण्याच्या प्रक्रियेतल्या त्रुटी त्यानी दाखवून दिल्या आहेत. पुस्तकं लिहिणारी, निरीक्षणांचे अहवाल लिहिणारी माणसं निरीक्षणांसाठी त्या त्या काळात उपलब्ध असणारी उपकरणं आणि तंत्रज्ञानं वापरतात. काळाच्या ओघात नवी उपकरणं आणि तंत्रज्ञानं आली की आधीचे पुरावे चूक ठरू लागतात. तसंच पुस्तकं लिहिणाऱ्या माणसांची एक समजूत असते, एक अजेंडा असतो. कळत न कळत ती समजूत पुस्तकाचा आशय ठरवते. गुलाम मिळवण्यासाठी, वस्तू मिळवणं विकणं यासाठी माणसं जगाचा शोध घेत फिरली, ही माणसं युरोपीय होती, ख्रिस्ती होती. त्यांचा एक पक्का दृष्टीकोन होता. त्यामुळं काहीही वेगळं दिसलं की ते चुकीचं, अपवित्र, कनिष्ठ आहे अशा नोंदी ती माणसं करत होती. अशा निरीक्षणांवर आधारलेले सिद्धांत नंतर निराधार सिद्ध झाले याची अनेक उदाहरण ब्रेगमननी पुस्तकात दिली आहेत.

ब्रेगमन यांचा आशावाद सध्या जग अनुभवत आहे.

जगभरचे देश ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी एकमेकांशी सहकार्य करत आहेत. कोविड विषाणूचा अभ्यास आणि त्यावरची लस या दोन्हीचं संशोधन जगभरच्या संस्था एकत्रीतपणे करत आहेत.

प्रत्येक देशात कमी अधिक प्रमाणात विषमता आहे आणि गरीबांची संख्याही लक्षणीय आहे. सर्व देश आपापल्या देशात सर्वाना लस उपलब्ध करून देत आहेत, महामारीमुळं निर्माण झालेली आर्थिक चणचण निवारण्यासाठी सर्व देशांतली सरकारं पैसा खर्च करत आहेत. अमेरिकेत गरीबांना काहीही मदत करायला, फुकट गोष्टी द्यायला नेहमी विरोध असतो. त्याच अमेरिकेनं गरीबांना लस मोफत दिलीय आणि भरघोस आर्थिक मदत केलीय.

या आधी ब्रेगमननी युनिवर्सल बेसिक इन्कम ही कल्पना मांडणारं पुस्तक लिहिलं. गरीबी हा दोष नसून ती अडचण आहे, या तत्वावर त्यांनी प्रत्येक व्यक्तीला काही ठरावीक रक्कम देऊन टाकावी असा विचार मांडला. पैसे मिळाले की बहुतांश माणसं त्याचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी करतात, कोणी अभ्यास करतं, कोणी संशोधन करतं, कोणी कलेकडं वळतो, कोणी आपल्या मुलांकडं पाहू लागतं अशी निरीक्षण त्यानी काही सिद्ध झालेल्या प्रयोगांचे दाखले देत मांडली.

एक उत्साही धडपड्या माणूस जग बदलू पहातोय असं त्यांच्या पुस्तकांवरून दिसतं.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0