नवी दिल्लीः योग गुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने १९ फेब्रुवारीला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन व केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी य
नवी दिल्लीः योग गुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने १९ फेब्रुवारीला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन व केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपल्या कंपनीचे कोविड-१९ला प्रतिकार करणारे औषध कोरोनीलची पुन्हा घोषणा केली. यावेळी त्यांनी आपल्या कोरोनील औषधाला आयुष मंत्रालयाकडून मंजुरीही मिळाल्याचे जाहीर केले.
जागतिक आरोग्य संस्थेने आखून दिलेल्या प्रमाणकांनुसार कोरोनील गोळ्यांना आयुष मंत्रालय व कोविड-१९चा उपचार म्हणून सहाय्यकारी औषध म्हणून मंजुरी मिळाल्याचे पतंजली आयुर्वेदचे म्हणणे होते.
पण प्रसारमाध्यमांमध्ये वेगळेच वृत्त आले. काही वृत्तवाहिन्यांनी रामदेव बाबा यांची मुलाखत घेत जागतिक आरोग्य संस्थेने कोविड-१९ वर उपचार म्हणून कोरोनील औषधाला परवानगी दिल्याचे सांगितले.
१९ फेब्रुवारी रोजी कोरोनीलच्या औषधाच्या घोषणेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदेव बाबा यांनी आपले कोरोनील औषध वैज्ञानिक चाचण्यांवर आधारलेले असून ते आपल्या प्रयोगशाळेत विकसित केल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ एक संशोधन अहवालाचा दाखला दिला. हा अहवाल पतंजलीची वेबसाइट बरोबर आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या वेबसाइटवरही असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.
द वायरने पतंजलीच्या वेबसाइटवर हा संशोधन अहवाल शोधला पण तो मिळाला नाही.
रामदेव बाबा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपले कोरोनील औषध इम्युनिटी बुस्टर नाही तर ते कोरोना प्रतिबंधित असून आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेसह अन्य काही संस्थांनी त्यांना ‘सर्टिफाय’ केल्याचे सांगितले.
तो पर्यंत सोशल मीडिया व काही वृत्तवाहिन्यांमधून कोरोनीलला आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेची मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येऊ लागले.
राकेश भारत नावाच्या एका ट्विटर खात्याने असे दावे लिहिले पण नंतर त्यांनी काही ट्विट आपल्या खात्यावरून काढून टाकले. काही ट्विट त्यांच्या खात्यावर दिसत आहेत.
न्यूज नेशन या वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक दीपक चौरसिया यांनी रामदेव बाबांशी चर्चा करताना म्हटले की, गेल्या जूनमध्ये कोरोनीलवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते पण आता त्यांना डब्लूएचओने मंजुरी दिली आहे.
या कार्यक्रमात चौरसिया यांनी रामदेव बाबांनी डब्लूएचओने आपल्या औषधाला मंजुरी कशी दिली, असा प्रश्न विचारला असता, रामदेव बाबा यांनी डब्लूएचओची एक टीम आली होती व त्यांनी कोरोनीलला परवानगी दिली. आमच्या औषधाला १५० देशांमध्ये परवानगी देण्यात आली असे सांगितले.
चौरसिया यांच्यासारखा दावा इंडिया टीव्हीचे प्रमुख रजत शर्मा यांनीही केला होता.
पण मीडिया रिपोर्टनुसार ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन म्हणून हे ट्विट नंतर काढून टाकण्यात आले.
अल्ट न्यूजनुसार नेटवर्क 18चे पत्रकार किशोर अजवाणीही असेच बोलत होते.
मग सत्य काय आहे?
कोरोनीलच्या दाव्यावर लगेचच डब्लूएचओचे आग्नेय आशियाच्या ट्विटर हँडलवरून कोरोनीलला अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
दुसरीकडे सोशल मीडियावर वादळ उफाळल्यानंतर पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनीलला डब्लूएचओ जीएमपी कॉम्पलिएंट सीओपीपी भारत सरकारच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडून मान्यता मिळाल्याचे सांगितले.
जीएमपी व सीओपीपी काय आहे?
औषधांचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुकर व्हावा म्हणून डब्लूएचओ आपल्या सदस्य देशांना एखाद्या औषधाच्या परवानगीसाठी किंवा एखादे औषध आयात करायचे झाल्यास त्यासाठी संबंधित औषध कंपन्यांकडून सीओपीपी सर्टिफिकेट मागत असते. हे सर्टिफिकेट भारतात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून दिले जाते.
जीएमपी (गूड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस) हे औषधांची गुणवत्ता पाहून त्यांना प्रमाणपत्र देते. हे प्रमाणपत्र डब्लूएचओच्या निर्धारित मानकांवर दिले जाते. थोडक्यात आयुष मंत्रालयाने कोरोनील जीएमपी स्वीकृत सीओपीपी दिले आहे, याचा प्रत्यक्ष डब्लूएचओशी संबंध नाही. पण तरीही मीडियामध्ये कोरोनीलला डब्लूएचओची मंजुरी मिळाल्याचे सतत सांगितले जात होते.
या संदर्भात न्यूज़लॉन्ड्री वेबसाइट या वेबसाइटने डब्लूएचओशी संपर्क साधला असता त्यांच्या एक पदाधिकारी शर्मिला शर्मा यांनी डब्लूएचओने कोविड-१९ रोखण्यासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाला परवानगी दिली नसल्याचे व हे औषध प्रमाणित केले नसल्याचे पुन्हा सांगितले. या औषधाला दीडशे देशांमध्ये विक्रीची परवानगी देण्यात आल्याचा दावाही त्यांनी फेटाळला.
दीडशे देशांमध्ये कोरोनीलला परवानगी मिळाल्याचा पतंजलीचा दावा अजूनही संशय निर्माण करणारा आहे. पतंजलीच्या वेबसाइटवर असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर अद्याप आलेले नाही.
आयएमए चक्रावले, आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागितले
पतंजलीच्या कोरोनील औषधाला डब्लूएचओने मंजुरी दिली या दाव्यावरून इंडियन मेडिकल एज्युकेशनने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागितले.
पतंजलीचा दावा कोणत्या आधारावर आहे, याची माहिती द्यावी असे आयएमएचे म्हणणे आहे. सोमवारी आयएमएने एक पत्रक जाहीर करत देशाचे आरोग्यमंत्री असल्यामुळे देशात जर खोट्यावर आधारित अवैज्ञानिक पद्धतीचे औषध विकले जात असेल तर ते न्यायसंगत आहे का, या औषधाने किती क्लिनिकल ट्रायल केल्या असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
मागेही रामदेव बाबा, बाळकृष्ण आचार्यांची बनवाबनवी उघड झाली होती
गेल्या वर्षी जूनमध्ये हरिद्वारमध्ये योगविद्यापीठात पतंजली ग्रुपचे संस्थापक बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कंपनीने कोरोना विषाणूंना रोखणारे ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ अशी दोन आयुर्वेदिक औषधे शोधल्याचे जाहीर केले होते. त्यांनी या दोन आयुर्वेदिक औषधांचे कीटही सर्वांना दाखवले होते.
यावेळी ते म्हणाले, देशभरातील २८० कोरोना बाधित रुग्णांवर या औषधांच्या चाचण्या घेतल्या असून आमचे हे औषध गुणकारी ठरले आहे व त्याने दोन क्लिनिकल ट्रायलमध्ये १०० टक्के परिणाम दिले आहेत. या चाचण्या दिल्ली, अहमदाबाद व अन्य शहरात केल्या असून १०० कोरोनाबाधित रुग्णांमधील ६७ टक्के रुग्ण पहिल्या ३ दिवसांत तर उर्वरित रुग्ण ४ दिवसांत १०० टक्के खडखडीत बरे झाले आहेत.
रामदेव बाबांनी असाही दावा केला होता की, सगळे जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक देश कोरोनावरचे औषध शोधण्यात गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या आयुर्वेदिक औषधाची घोषणा करताना आनंद होत आहे. हे औषध पतंजली रिसर्च सेंटर व जयपूर येथील निम्स युनिव्हर्सिटीने संयुक्तपणे तयार केले असल्याची त्यांनी माहिती दिली.
हे औषध तयार करताना गिलोय, तुलसी, अश्वगंधा व श्वासरी रस यांचा उपयोग केल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले. या औषधाची किंमत ५४५ रु. असून या आठवड्यात ते पतंजलीच्या दुकानात विक्रीस उपलब्ध होईल तसेच या औषधाच्या विक्रीसाठी एक ऍप लवकरच उपलब्ध होणार असून त्याद्वारे ऑनलाइन मागणी करता येईल, असेही रामदेव बाबांनी सांगितले होते.
पण आयुष मंत्रालयाने मात्र या औषधाचा शास्त्रीय अभ्यास आम्हाला सादर केलेला नाही असे स्पष्ट केले आणि पतंजली ग्रुपला या औषधावरील संशोधन कार्य, औषधातील रासायनिक घटक व त्याचा नमूना सादर करायचे आदेश दिले होते. पतंजलीचे दावे जोपर्यंत शास्त्रीय कसोट्यांवर उतरत नाहीत तोपर्यंत या औषधाचे वितरण व त्याची जाहिरात करू नये असेही आदेश दिले होते.
त्याचवेळी बनवाबनवी सिद्ध झाली होती
योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने कोरोना या विषाणूजन्य आजारावर कायमस्वरुपी मात करणारे ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ हे औषध विकसित केल्याचा दावा केला असला तरी खुद्द या कंपनीने उत्तराखंड सरकारकडे या औषधाच्या परवानगीसाठी जो अर्ज पाठवला होता, त्या अर्जात त्यांनी कोरोना या साथरोगाचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता हे दिसून आले.
पतंजलीने आपल्या अर्जात आपले ‘हे रसायन प्रतिकारक शक्ती (इम्युनिटी बूस्टर) वाढवणारे असून ते प्रामुख्याने श्वसन मार्गात जंतू संसर्ग झाल्यास आणि जीवाणू व विषाणूपासून होणार्या सर्व तापांवर गुणकारी असल्याचे नमूद केले होते.
दिव्य फार्मसीचे औषधाची परवानगी मागणारे पत्र.
म्हणजे कोरोनावरचे औषध शोधल्याचा जो दावा पतंजलीने प्रसार माध्यमाद्वारे केला तो सरकारची व जनतेची दिशाभूल करणारा होता. त्यांनी सरकारकडे सादर केलेली माहिती व प्रत्यक्षात लोकांपुढे दिलेली माहिती यात तफावत असल्याचे दिसून आले होते.
पतंजलीच्या दाव्यानंतर उत्तराखंडच्या आयुर्वेदिक व युनानी विभागाचे लायसेंस अधिकारी डॉ. यतेंद्र सिंह रावत यांनी पतंजलीने विकसित केलेले औषध कोरोनावरचे नव्हे तर शरीरात प्रतिकारक शक्ती वाढवणारे, खोकला, तापावरचे असल्याचे स्पष्ट केले होते. डॉ. रावत म्हणाले, पतंजलीने आम्हाला पाठवलेल्या अर्जात त्यांची ही औषधे कोरोनावरची आहेत याचा उल्लेख कुठेच केला नव्हता. हे औषध केवळ इम्युनिटी बूस्टर, खोकला व तापावर असल्याने त्याची परवानगी कंपनीने मागितली होती ती आम्ही दिली. पण आता आम्ही कीट बनवण्याची परवानगी कुणी दिली याची नोटीस त्यांना पाठवणार आहोत, असे ते म्हणाले होते.
परवाना विभागाचे दिव्य फार्मसीला पाठविण्यात आलेले पत्र.
कोरोना महासंकट देशापुढे नव्हे तर जगापुढे एवढे आ वासून उभे असताना रामदेव बाबा व त्यांचे सहकारी बालकृष्णन यांनी आपल्या औषधाबद्दल सरकारकडे जी माहिती दिली आहे ती माहिती त्यांनी जनतेपासून लपवून ठेवली.
त्यांनी उत्तराखंड सरकारला पाठवलेल्या पत्रात त्यांचे औषध केवळ कोरोनाच्या विषाणूंवर गुणकारी ठरत नसून ते जीवाणूंमुळे होणार्या अन्य आजारावरही गुणकारी ठरू शकते, असे म्हटले होते. म्हणजे मानवी आजाराला कारणीभूत ठरणार्या विषाणू व जीवाणूंवर मात करणारी शक्ती त्यांच्या एकाच औषधात असल्याचा त्यांचा दावा होता.
कोरोना हा विषाणूजन्य आजार असल्याची वैज्ञानिक माहिती होती व त्या अनुषंगाने जगभर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असताना पतंजलीची ही दोन औषधे कोरोना विषाणूंवर नव्हे तर जीवाणूजन्य आजारांवरही मात करतात असे दोघांचे म्हणणे आजही आहे. म्हणजे पतंजलीचे एक औषध जीवाणू व विषाणूजन्य आजारांवर मात देऊ शकते असा त्याचा निष्कर्ष निघू शकतो.
दरम्यान मंगळवारी महाराष्ट्र सरकारने कोरोनीलच्या विक्रीस मनाई केली आहे. ‘आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना, आयएमए व इतर संबंधित मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय कोरोनील या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही,’ असे राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
मूळ लेख
COMMENTS