यशवंत सिन्हा यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन तृणमूलने आपण भाजपचे केवळ बंगालमधील प्रतिस्पर्धी नसून या पक्षाविरोधात देशव्यापी संघर्ष करण्यास आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
नवी दिल्लीः पूर्वीश्रमीचे भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाचा प्रत्यक्ष बंगालमध्ये होणार्या मतदानावर परिणाम होणार नाही पण राजकीयदृष्ट्या त्यांचा प्रवेश महत्त्वाचा आहे.
यशवंत सिन्हा यांनी या पूर्वी एनडीए सरकार केंद्रात असताना केंद्रीय मंत्रीपद भूषवले होते. पण २०१४मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ते मोदी यांचे कट्टर टीकाकार बनले. मोदींचा पक्षातील वाढता प्रभाव व त्यांच्या व्यक्तीकेंद्री राजकारण पक्षाकडून मिळणारी साथ यामुळे ते भाजपवर सतत टीका करू लागले. सिन्हा यांची टीका त्या पलिकडे जाऊ भारताच्या परराष्ट्र नीती व अर्थनीतीवर सतत केंद्रीत होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोदी सरकारच्या ३ शेती कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली. शिवाय ते अनेक ठिकाणी निदर्शनात सामील झाले होते.
यशवंत सिन्हा यांच्या मागे प. बंगालमध्ये मोठे जनमत नाही पण त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने अनेक विरोधी पक्ष वा गट ममता बॅनर्जी यांच्या मागे उभे राहतील याची शक्यता नाकारता येत नाही. बंगालमधील निवडणुका तिरंगी होत आहे, त्या भाजप विरुद्ध तृणमूल अशा दुरुंगी व्हाव्यात असा सिन्हा यांचा प्रयत्न दिसत आहे. मध्यंतरी समाजवादी पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तृणमूलला साथ देण्याची घोषणा केली होती हे लक्षात घ्यायला हवे.
एआयएमआयएमचे असाउद्दीन औवेसी यांनी प. बंगालमध्ये सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार नसल्याचे सूचित केले आहे. त्यांच्या या निर्णयाचा तृणमूलला फायदा होऊन बंगालमधील मुस्लिम मतदार तृणमूलकडे जाऊ शकते.
वास्तविक वर उल्लेख केलेल्या पक्षांना बंगालमध्ये फार मोठा जनाधार नाही. पण ते पक्ष भाजपविरोधी असल्याने त्यांनी तृणमूलला पाठिंबा देऊ केलेला आहे. राजद व राष्ट्रवादीने काँग्रेसशी आपली मैत्री असूनही तृणमूलच्या बाजूने उभे राहण्याचे ठरवले आहे. त्यांची ही भूमिका भाजपच्या एकूण राजकारणावर ते नाराज असल्याचे सूचन आहे.
यशवंत सिन्हा या पार्श्वभूमीवर अटल बिहार वाजपेयी यांचे सरकार व मोदी सरकार यातील फरक स्पष्ट करतात. वाजपेयी आघाडीतील व विरोधातील राजकीय पक्षांना एकत्र घेऊन राजकारण करत होते पण मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप देशातील सर्व लोकशाहीवादी राजकीय पक्ष नेस्तनाबूत करून स्वतःची अधिकारशाही प्रस्थापित करत आहेत असे सिन्हा यांचे म्हणणे आहे. अशीच भूमिका तृणमूलच्या साथीला आलेल्या राजकीय पक्षांची आहे. म्हणून सिन्हा यांचा तृणमूल प्रवेश हा बंगालच्या निवडणुकांपुरता मर्यादित नाही त्याचे व्यापक हेतू आहेत.
द ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीत सिन्हा म्हणतात, ‘वाजपेयी यांचे सरकार व आताचे मोदींचे सरकार यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. वाजपेयी सहमतीचे राजकारण करत असतं व त्यावर त्यांचा विश्वास होता पण आताच्या सरकारला कोणताही विरोध नकोसा आहे. वाजपेयींच्या सरकारमध्ये पंजाबमधून अकाली दल, महाराष्ट्रातून शिवसेना, आंध्रातून तेलुगू देसम, तामिळनाडूतून अण्णाद्रमुक, द्रमुक, ओदिशातून बिजू जनता दल, बंगालमध्ये तृणमूल, आसाममधून आसाम गण परिषद, बिहारमधून जनता दल संयुक्त, काश्मीरातून नॅशनल कॉन्फरन्स असे पक्ष होते. अटलजींनी एका रितीने केंद्रात राष्ट्रीय पक्षांची आघाडी स्थापन केली होती. त्यांनी कधीही विरोधकांना नेस्तनाबूत करून ती पोकळी भरण्याचा प्रयत्न केला नाही.’
सिन्हा यांचे हे वक्तव्य पाहता ममता बॅनर्जींच्या मदतीने ते देशव्यापी भाजपविरोधी आघाडी स्थापन करत असल्याचे दिसत आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांनी देशव्यापी दौरे करून भाजपविरोधी आघाडी बनवण्याची क्षमता तृणमूलमध्ये असल्याचे संदेश दिले होते. याच काळात काँग्रेस राहुल गांधी यांना पुढे करत ते देशाचे पंतप्रधान असतील अशी प्रतिमा तयार करत होते.
याच दरम्यान ममता बॅनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला होता. बिहारमध्ये त्यांनी राजद-काँग्रेस युतीला, तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीला, महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. भाजपला टक्कर द्यायची असेल तर देशातील सर्व विरोधी पक्षांनी आपले पूर्वीचे हेवेदावे विसरून पुढे येण्याची गरज आहे, असे ममता म्हणाल्या होत्या.
पण हा फॉर्म्युला व्यवस्थित रूजू शकला नाही. २०१९मध्ये भाजपने पुन्हा बहुमत पटकावले. पण ममताही भाजपच्या एक कट्टर विरोधक म्हणून देशव्यापी नेत्या म्हणून प्रस्थापित झाल्या.
ममतांचा रोख मोदी सरकारवर होता. त्याला बळ देत त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनीही मोदी सरकारच्या धोरणांवर कडक प्रहार करण्याच्या संधी सोडलेल्या नाहीत. संसदेत तृणमूल व भाजपमधील खडाजंगी अनेक वेळा पाहिली गेली आहे. ममता यांनी अशा विरोधातून एक भाजपविरोधी वैचारिक मतप्रवाह उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे सिन्हा यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन तृणमूलने आपण भाजपचे केवळ बंगालमधील प्रतिस्पर्धी नसून या पक्षाविरोधात देशव्यापी संघर्ष करण्यास आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. सिन्हा यांचा तृणमूलमधील प्रवेश हा राष्ट्रीय पातळीवर तयार होणारी विरोधकांची एक नवी आघाडीची नांदी आहे, असे समजण्यास हरकत नाही.
मूळ लेख
COMMENTS