‘द रोड’ – विनाशाच्या उंबरठ्यावरील जगासाठी पूर्वसूचना

‘द रोड’ – विनाशाच्या उंबरठ्यावरील जगासाठी पूर्वसूचना

काही पुस्तकं वाचकाला गुंतवून ठेवतात. चांगलं काही वाचल्याचं, अनुभवल्याचं समाधान देतात. अशी पुस्तकं वाचून पूर्ण होईतो खाली ठेवणं वाचकाला जड जातं. त्यांचा प्रभाव काही काळ वाचकावर टिकून राहतो. कालांतराने ती विस्मृतीतही जातात. याउलट काही पुस्तकं वाचताना विलक्षण त्रासदायक वाटतात. वाचकाला अस्वस्थ करतात. अशी पुस्तकं नेटाने वाचून पूर्ण करावी लागतात. मात्र ती पुस्तकं कालांतराने विविध संदर्भात पुन्हा पुन्हा आठवत राहतात. वाचत असताना न जाणवलेलं असं सत्य अनेक प्रसंगात अचूक दाखवून देतात. आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करत असतात. 'कॉरमॅक मकार्थी' या अमेरिकन लेखकाची 'द रोड' ही कादंबरी दुसऱ्या प्रकारात मोडणारं पुस्तक आहे गेल्या अनेक दिवसांत ही कादंबरी अनेक संदर्भात पुन्हा पुन्हा आठवत राहिली.

भाजपच्या घोडदौडीला बंगालमध्ये लगाम कसा बसला?  
हवामान बदलाने शहरे बुडण्याची भीती
कोविड-१९ वर परिणामकारक एचसीक्यूएसचा तुटवडा

अलीकडच्या काही दिवसांत, विशेषतः काश्मीर मध्ये 370 कलम रद्द केल्यापासून न्यूज चॅनेल्सनी विखारी युद्धज्वर पसरवायला सुरवात केली. न्यूज रूम मधील चर्चा केवळ भारत-पाकिस्तान तणाव आणि युद्धसदृश्य परिस्थिती इथवर मर्यादित झाल्या. त्याचं लोण नागरिकांत न पसरेल तरच नवल होतं. समाजमाध्यमांवर तर अनेकांना स्वतःच्या अकारण शौर्याचा साक्षात्कार होऊन आता युद्ध अटळ आहे असं वाटू लागलं. त्यात काही सिनेमांनीही भर टाकली. संपूर्ण देशालाच युद्धज्वराने ग्रासल्यासारखे झाले.

इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांना युद्धाचं आकर्षण वाटणं ही नक्कीच शहाणपणाची गोष्ट नाही. पण नागरिकांना युद्धाचं आकर्षण वाटू लागलं हे तर खरं. ते नाकारता येणार नाही. विशेषत: तरुण वर्गाला. याची कारणं काय असावीत हे लक्षात घेणं फारसं कठीण नाही. एकतर युद्धाची भयावहता यांना थेट भिडलेली नाही. आधुनिक काळात भारत आणि शेजारी राष्ट्र यांच्यात ज्या लढाया झाल्या त्या लढायांचं मोल संपुर्णपणे सीमेवरील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चुकविलं.  सामान्य नागरिकांना युद्धाची झळ बसू दिली नाही. त्यामुळे युद्धज्वर जडलेल्या नागरिकांपर्यंत त्याची संपूर्ण भयावहता पोचली नाही.

याच काळात अनेक पाश्चात्य देशांतही अशी यूद्धसदृश्य निर्माण झाली होती. मात्र तेथील नागरिक (युद्ध झालंच तर ते देश जिंकण्याची भक्कम खात्री असतानाही) युद्धला थेट विरोध करत राहिले. सरकारवर युद्धविरोधी पावलं उचलायला लावण्यात यशस्वी झाले.

याची कारणंही तपासून पाहणं फारसं कठीण नाही. युद्धाला विरोध करणारे हे देश दोन विध्वंसक महायुद्धांना सामोरे गेले होते. आज विरोध करणारे नागरिक जरी थेट त्यातून गेले नसले तरी, या महायुद्धांची भयावहता इतकी प्रचंड होती की विध्वंसाच्या कहाण्या तेथील हवेत त्यांना अजून जाणवते. युद्ध म्हटलं की त्यांच्या पूर्वसूरींनी भोगलेल्या साऱ्या व्यथा पुन्हा जिवंत होतात. त्यामुळे निकराने युद्धाला विरोध करणं त्यांची निकड बनते. या सारयांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात न पडेल तरच नवल. कॉरमॅक मकार्थी यांच्या ‘द रोड’ या कादंबरीत ती अधिक ठळकपणे व्यक्त झाली आहे.

कादंबरीत संपूर्ण बेचिराख आणि उध्वस्त झालेल्या अमेरिकेतून दोघे (बाप आणि मुलगा) वाट काढत दक्षिणेकडे निघाले आहेत. येणारा प्रत्येक दिवस आधीच्या दिवसाहून अधिक थंड, अधिक भयाण आणि काळोखा होत चालला आहे. अन्नाची वानवा आहे. धड पुरेसे कपडे नाहीत. साऱ्या इमारती, घरे रिकामी पडली आहेत. विध्वंसातून फार कुणी बचावलेलं नाही. जे थोडे लोक जगले वाचले त्यांना हिंस्र टोळ्यांनी संपवलं. या साऱ्यातून दोघे बाप आणि मुलगा बचावले आहेत. दक्षिणेला कदाचित परिस्थिती चांगली असेल, जगणं शक्य होईल अशा आशेने प्रवास करत आहेत. दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरं कुणी नाही. केवळ एकमेकांसाठी जगत, एकमेकांना धीर देत रस्ते तुडवत आहेत.

मात्र प्रवास करत राहणं सोपं नाही. अन्नाच्या शोधात अनेक शस्त्रधारी हिंस्र टोळ्या भटकत आहेत. जे जगले वाचलेले आहेत त्यांच्याकडेही खायला काही नाही. त्यामुळे या टोळ्या सापडेल ती माणसंच खात आहेत. जिवंत असणारा प्रत्येक माणूस एकतर नरभक्षक तरी आहे अथवा त्यांचं भक्ष्य तरी आहे. या साऱ्यांना चुकवत दोघांना दक्षिणेला पोहोचायचं आहे. वाटेत त्यांना भेटतायत मानवी हाडांचे सापळे, नरभक्षकांनी खाऊन टाकून दिलेले सडत पडलेले मृतदेह, इथे तिथे विखुरलेले मानवी देहाचे अवयव. पण हे इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी पाहिलं आहे की, त्यांची घृणाही वाटेनाशी झाली आहे. दोघांपैकी बापाला तर थंडीपासून बचाव करण्यासाठी मृताच्या अंगावरील कपडे घेतानाही काही वाटेनासे झाले आहे.

दोघांच्या मनात नरभक्षकांचं प्रचंड भय आहे. बापाकडे एक बंदूक आहे. त्यात दोनच गोळ्या आहेत. त्याने मुलाला ते कसं चालवायचं ते सांगितलं आहे. दुसऱ्यावर नव्हे तर स्वतःवरच. नरभक्षकांच्या तावडीत सापडण्यापेक्षा स्वतःवर गोळी झाडून मरणं केव्हाही चांगलं. एक गोळी मुलासाठी, एक स्वतः साठी.

वाटेत त्यांची नरभक्षकांशी गाठ पडते. त्यांच्या हाती लागू नये म्हणून बाप मुलावर गोळी झाडण्याची तयारी करत असतानाच त्यांना निसटण्याची संधी मिळते आणि दोघे पळूनही जातात. असे जीवावर येणारे अनेक प्रसंग. आणि सोबतीला प्रचंड भूक. पण दोघांनाही खात्री आहे. ते चांगले लोक आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आपलं चांगुलपन त्यांना जपायचं आहे.  ते दोघेही त्यांच्या अंतरात एक ज्वाला सांभाळत आहेत. ही अंतरीची ज्वालाच त्यांचं चांगुलपन टिकवून ठेवत आहे. भुकेने अर्धमेले झाले तरी नरमांस खाण्यापासून दोघांना वाचवत आहे. अन्नाबरोबर पाण्याचीही वानवा आहे. मुबलक आहे ती केवळ हवा. विषारी हवा. जी आत घेऊन घेऊन बाप रक्त ओकू लागला आहे. मरणपंथेला लागला आहे.

वाटेत त्यांना त्यांच्यासारखेच काही लोक भेटतात. नव्वद वर्षांचा एक म्हातारा, त्यांचे कपडे आणि इतर वस्तू चोरून नेणारा इसम. दोघे जमेल तसे त्यांना मदत करतात. आपल्या अंतरीच्या ज्वालेचं स्वतःलाच स्मरण करून देत राहतात. मात्र ज्या वाटेवर दोघे निघाले आहेत, तिथे पोहोचत मात्र नाहीत. त्याआधीच बाप मरून जातो.

बाप मेल्यानंतर एक भटकणारं कुटुंब मुलाला मदतीचा हात पुढे करतं. खरेतर हे कुटुंब खूप आधीपासून बाप आणि मुलाच्या मागावर येत असतात. कुटुंबातील स्त्रीला मुलाची काळजी वाटत असते. त्यांच्या दोन मुलांना त्याच्याशी मैत्री जोडावीशी वाटते.

हे कुटुंबही दक्षिणेकडे निघालं आहे. त्यांच्यासोबत जावं की नाही अशा पेचात मुलगा पडतो. ते शहाणपणाचं होईल की नाही याची त्याला शंका आहे. तो केवळ त्यांना एवढेच विचारतो की, तुम्ही चांगले लोक आहात का? आणि तुम्ही तुमच्या अंतरीची ज्वाला जपत आहात का? ते खरेच चांगले आहेत याची त्याला खात्री वाटते आणि पाच लोकांचं कुटुंब दक्षिणेकडे मार्गस्थ होतं. हा कादंबरीचा शेवट.

‘द रोड’ या कादंबरीचं वाचन एकाचवेळी विषण्ण करतं आणि विचार करायला भाग पाडतं. कादंबरीतील विश्व नेमकं कशामुळे उध्वस्त झालं असावं? अणूयुद्धामुळे, कसल्याशा नैसर्गिक आपत्तीमुळे, की महाकाय उल्का पृथ्वीवर येऊन आदळल्यामुळे ते स्पष्ट नाही. मात्र या विश्वातील क्रौर्य आणि हिंसाचार यांतून ते मानवनिर्मित आहे हे सतत सूचित होत राहतं. आधुनिक शस्त्रं आणि न्यूक्लियर वेपन यांनी सज्ज असलेल्या या जगात युद्धाची भयावहता किती विनाशक रूप धारण करू शकते हे वाचकांवर बिंबविण्यात मकार्थी यशस्वी झाले आहेत.

संपूर्ण कादंबरीत एक सूत्र ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्या ‘अंतरीची ज्वाला’ जपण्याचं सूत्र. असह्य थंडी, मरणाची भूक, आजारपण आणि भिती यांनी हतबल होऊनही दोघे पिता पुत्र या अंतरीच्या ज्वालेमुळेच तग धरून राहतात.

काय होतं ते पपा?
काही नाही. सगळं ठीक आहे. झोप.
सगळं ठीक होईल ना पपा?
हो. सगळं ठीक होईल.
आणि काहीच वाईट घडणार नाही.
बरोबर. तसंच.
कारण आपण अंतरीची ज्वाला जपतोय.
बरोबर. कारण आपण अंतरीची ज्वाला जपतोय.

ही अंतरीची ज्वाला एक प्रतीक आहे- मानवतेचं, चांगुलपणाचं, अतिखडतर परीस्थितीतही आपलं सत्व जपण्याचं. अंतरीची ही ज्वालाच बाप आणि मुलाला आपलं सत्व हरवू देत नाही आणि ती ज्वालाच अखेरीस मुलाला दुसऱ्या कुटुंबाशी जोडणारा धागा बनते. खरंतर लेखकाला सूचित करायचं आहे की, आपण सारेच अंतरीची ज्वाला जपत असू तर कादंबरीत निर्माण झाली तशी स्थितीच उद्भवणार नाही.

पण अंतरीची ज्वाला जपणं ही गोष्ट सोपी नाही. ग्रीक पुराणांत एक कथा आहे. प्रॉमिथियसने झ्यूसपासून अग्नी चोरला आणि तो मानवाकडे सुपुर्त केला. या चोरीची शिक्षा म्हणून प्रॉमिथियसला एका खडकाला बांधलं जातं. एक महाकाय गरुड रोज  प्रॉमिथियसचं यकृत खाऊन टाकतो. पण तो मरत नाही. उलट त्याचं यकृत पुन्हा वाढत जातं आणि दुसऱ्या दिवशी गरुड ते पुन्हा खाऊन टाकतो. असं अनंतकाळ. प्रॉमिथियस आपल्या अंतरात मानवतेसाठी ही ज्वाला जपत होता, म्हणून त्याच्या वाट्याला अपार वेदना आल्या. कादंबरीतील पिता-पुत्रांच्या वाट्याला आलेल्या वेदना याहून निराळ्या नाहीत.

मरण्याआधीही बाप मुलाला सांगतो, “ही अंतरीची ज्वाला मी कायमच जपत होतो. तीच ज्वाला तुझ्याही आत आहे. ती नेहमीच तिथे होती. आता मला ती स्पष्टपणे दिसत्येय.” आपल्या मरणानंतरही मुलाची जिजीविषा उनाऊ नये; म्हणून तो मुलाला त्याच्या अंतरीच्या ज्वालेचं समरण करून देतो.

कादंबरीत सातत्याने येणारं दुसरं एक सूत्र म्हणजे देवाचं नास्तित्व. अनेक आधुनिक कादंबऱयांत हे सूत्र ठळकपणे जाणवत राहतं. कुठलाही नियंत्रक नसलेल्या या जगात आपल्याला अतिशय क्रूरपणे फेकून देण्यात आलेलं आहे. या जगाचं काय करायचं, याची संपूर्ण जबाबदारी केवळ मानवाची आहे. त्याच्या सोबतीला आहे ईश्वराच्या नसण्याने आलेलं एकटेपण. भयाण एकटेपण. या एकटेपणाला, देवाच्या नास्तित्वाला कसं सामोरं जायचं? उत्तम मनुष्य बनून (लेखकाच्या शब्दात Good guy) आणि आपल्या अंतरीची ज्वाला सांभाळून. मानवतेवरील ही ज्वालारूपी श्रद्धाच एका माणसाला दुसऱ्याशी जोडण्यास साहाय्यभूत होणार आहे. देवाच्या नास्तित्वाची उणीव भरून काढणारी आहे. अन्यथा विनाश अटळ आहे आणि त्याची तीव्रता कशा प्रकारची आहे, ते मकार्थी यांनी ‘द रोड’ या कादंबरीत यशस्वीरित्या दाखवून दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0