सौर व पवनउर्जेला काही वर्षानंतर चांगले दिवस येणार आहेत. पण सध्यातरी अणुऊर्जेला टाळायचं म्हटलं तरी टाळता येणार नाही. अणुकेंद्रातली ऊर्जा स्वच्छ व पर्यावरणाला हानी न पोहोचवणारी असते.
फुकुशिमा अणुकेंद्राच्या अपघातानंतर जगभर अणुऊर्जेबाबतीतच्या विचारावर मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली आहे. ते मंथन अजूनही सुरु आहे. आपल्याला ते माध्यमातील छोट्या रकान्यातील बातम्यांमुळे जाणवलेलं नाही. पण जगाची जी एकूण ऊर्जा गरज आहे त्यातील १३% ऊर्जा अणुउर्जेतून भागवली जात होती. पण २०२० सालात ही ऊर्जा १० टक्क्यांवर आलेली आहे. त्याचे उत्पादन इतके कमी झाले आहे. त्याला जबाबदार आहेत अनेक गोष्टी. पण महत्वाचे कारण आहे फुकुशिमाचा अपघात, व त्याआधीचे अपघात सुद्धा.
अणुऊर्जेला विरोध का?
हिरोशिमा-नागासाकीवर जे अणुबॉम्ब टाकले गेले त्याच्यामुळे तिथे भयंकर जीवित व वित्त हानी झाली. नंतर विद्रुप झालेली शरीरं, हात व पायाविना जन्मलेली मुलं यांची छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर, ती पाहिल्यानंतर, समाजमनात एक प्रकारची अजब भीती घर करून बसलेली आहे. त्यावेळी जो नरसंहार झाला त्याचे भयावह चित्र अजूनही लोकं विसरलेली नाहीत. त्यातच चेर्नोबिल व फुकुशिमा सारख्या अपघातानंतर लोकांना अधिकच भीती वाटू लागली आहे. अशा अपघातात जीवितहानी तर होतेच, पण फार मोठ्या प्रमाणावर पैशांचे सुद्धा नुकसान होते. चेर्नोबिल अपघातामुळे तत्कालीन सरकार व त्यानंतरच्या प्रशासनाला सुमारे १५००० अब्ज रुपये खर्च करावे लागले. आणि फुकुशिमात चेर्नोबिलपेक्षा दुप्पट रुपयांची हानी झाली आहे.
अपरंपरागत ऊर्जास्रोत
पण सध्या कार्बन फूटप्रिंट व हरितगृह वायू कमी करण्याचा जमाना आहे. तापमान व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे व ते कमी करण्याचे व टाळण्याचे उपाय रोज शोधले जात आहेत. पेट्रोल-डिझेल किंवा कोळसा जाळल्यामुळे वातावरण दूषित होते. त्यामुळे वातावरणाचे प्रदूषण कमी करणे हे आपले कर्तव्य ठरते. हरितगृह वातावरणातून कमी करण्यासाठी व समूळ उच्चाटनासाठी काही अपरंपरागत ऊर्जास्रोतांचा विकास करणे सुरु आहे. सौर व पवनउर्जेला काही वर्षानंतर चांगले दिवस येणार आहेत. पण सध्यातरी अणुऊर्जेला टाळायचं म्हटलं तरी टाळता येणार नाही. जर अणुकेंद्रात सारे व्यवस्थित सुरु असेल तर तिथून निघणारी ऊर्जा खरोखरच स्वच्छ व पर्यावरणाला हानी न पोहोचवणारी असते. अणुकेंद्रातून निघणाऱ्या किरणोत्सारी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता येते. त्यामुळे ही ऊर्जा तुलनेने स्वच्छ आहे. म्हणूनच, ती कधीही पूर्णपणे बंद होणार नाही.
अणुऊर्जेला उतरती कळा सुरु झाली आहे का?
उच्च उत्पन्न असणाऱ्या देशात अणुऊर्जेचे उत्पादन कमी होताना दिसत आहे. त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. जपानमध्येच १२ अणुकेंद्र कायमपणे बंद करण्यात आली आहेत, तर आणखी २४ तात्पुरते बंद करण्यात आली आहेत. यांची सुरक्षेबाबत बृहत व व्यापक तपासणी केल्यानंतरच ही अणुकेंद्र सुरु होणार आहेत. त्याचाच अर्थ असा होतो की जर काही अपघात झाले तर ते निस्तरण्यासाठी फार मोठ्या रकमेची तरतूद आधीच करून ठेवावी लागणार आहे. मगच नवीन अणुकेंद्र सुरु करण्याची योजना आखणे गरजेचे आहे.
१९५१ साली पहिले अणुकेंद्र सुरु करण्यात आले होते व त्यानंतर ६०-७०च्या दशकात दरवर्षी २० ते ३० अणुकेंद्र कुठेनाकुठे स्थापली जात होती. पण १९७९चा पेनसिल्वेनियाच्या थ्री माईल आयलँड अणुकेंद्र अपघातानंतर नवीन अणुकेंद्र स्थापण्याची गती थोडी शिथिल झाली. फुकुशिमानंतर जर्मन संसदेने २०२२ पर्यंत संपूर्ण अणुऊर्जा केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे ठरवलं आहे. स्वित्झरलँडनेही असेच ठरवले आहे. इटली व स्वीडननेही अणुकेंद्र बंद करायचे ठरवले होते. पण या साऱ्यांनी नंतर आपले निर्णय फिरवले होते. अमेरिकेतही अणुऊर्जेसंबंधी विचारमंथन सुरु आहे. फुकुशिमानंतर त्यांनीही सुरक्षेसंबंधी तपासणी सुरु केली. अणुऊर्जेसंबंधी ते कटिबद्ध आहेत. मात्र सुरक्षेचे सारे उपाय अवलंबण्यात ते कसलीच कुचराई करणार नाहीत असे दिसते. सध्या जगातल्या १६ वेगवेगळ्या देशात ५० अणुकेंद्रांचे काम सुरु आहे. त्यात १६ अणुकेंद्रांच्या स्थापनेच्या साहाय्याने चीन आघाडीवर आहे. त्यानंतर भारताचा व दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो.
या साऱ्या पार्श्वभूमीचा अन्वयार्थ असा आहे कि अणुऊर्जेबरोबर राहणे जितके जिकिरीचे आहे तितकेच ते जरुरीचे सुद्धा आहे. वैश्विक तापमानवाढीची समस्या आ वासून आपल्यासमोर उभी आहे. गेले वर्षभर औद्योगिक गती तशी शिथिलच आहे. तरीसुद्धा तापमानवाढीचे संकट कमी झाले नाही. नैसर्गिक कारणांमुळे गेल्यावर्षी सुद्धा तापमान प्रमाणापेक्षा जास्त वाढले होते. तापमान कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने अनेक उपाय सुचवले आहेत. त्यातील एक आहे अणुऊर्जा. आजच्या घडीला तर या ऊर्जेशिवाय इतकी विपुल व स्वच्छ ऊर्जा आपल्याला मिळणार नाही. तापमानवाढीला आळा घालण्यासाठी अणुऊर्जा एक चांगला पर्याय निश्चितच ठरू शकतो.
पण अणुकेंद्रात घडणाऱ्या अपघातापासून बचाव करण्यासाठी, व त्यातून कमीतकमी नुकसान होण्यासाठी, साऱ्या जगभर संशोधन सुरु आहे. कोणतातरी सक्षम तोडगा मिळेपर्यंत हे संशोधन असेच सुरु राहील. एक आशादायी बाब म्हणजे या संशोधनातून एक नवीन तंत्रज्ञान विकसित होऊ पाहत आहे. लहान अणुकेंद्र उभारणे हा एक उपाय योजला जात आहे. या छोट्या केंद्रातून सुमारे २ लाख घरांना ऊर्जा पुरेल इतकी ऊर्जा उत्पन्न करणे शक्य होईल. अशी उपकरणे सध्या प्रयोगाच्या विविध टप्प्यावर आहेत. पण अमेरिकेत येत्या काही वर्षात ही उपकरणे व्यावसायिकरित्या कार्य करण्यास तयार होतील. काय सांगावे एकदोन दशकानंतर आपल्या कॉलनीसाठी किंवा एखाद्या बिल्डिंगचेही स्वतंत्र ऊर्जाकेंद्र उभे राहिलेले असेल. ते अगदीच शक्य आहे.
डॉ. प्रवीण गवळी, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन कार्यरत नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.
COMMENTS