सरकारसाठी इटालियन राष्ट्रवाद महत्वाचा होता. राष्ट्राचा उत्सव साजरा करण्यात कोणतीही अडचण येऊ नये असे मानले गेले. त्यासाठी विरोधात बोलणाऱ्यांना डावे, समाजवादी, अराजकवादी, देशद्रोही मानले गेले. सर्व माध्यमांवर कॉलेऱ्याच्या बातम्या देण्यावर बंदी घातली गेली.
साधारण १८९० नंतर युरोपातुन कॉलरा हद्दपार झाला असे मानले जाई. त्यानंतर कॉलरा या आजाराच्या मोठ्या साथीची कोणतीही अधिकृत नोंद नाही. पण फ्रॅंक स्नोडेन या इतिहासकाराला ‘इटलीमधील विसाव्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिकरणाचा परिणाम म्हणून संपत गेलेला कृषिउद्योग’ या विषयाचा अभ्यास करत असताना असे लक्षात आले, की साधारण १९१०-११ मध्ये इटलीतील नेपल्स या त्या काळच्या मोठ्या व्यापारी शहरात कॉलऱ्याची मोठी साथ येऊन गेली आहे. तो चकित झाला. कारण या घटनेची इतिहासात कुठेच नोंद नव्हती. इटलीच्या आरोग्यव्यवस्थेत, जागतिक आरोग्य संघटनेच्या रेकॉर्डस् मध्ये कुठेही याचा साधा उल्लेख नव्हता. मग त्याने एखाद्या गुप्तहेराप्रमाणे या घटनेचा माग घ्यायचे ठरवले.
सर्वप्रथम तो नेपल्सच्या दफनभूमीत गेला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे १९११ च्या उन्हाळ्यात तिथे नेहमीपेक्षा खूप जास्त मृत्यू नोंदवलेले दिसले. शिवाय तिथल्या नियमानुसार प्रत्येक मृत व्यक्तीच्या नोंदीबरोबर त्याच्या शेजारच्या व्यक्तीचे नाव लिहलेले असे. पण १९११ च्या उन्हाळ्यात हे न लिहिता मृत्यू नेपल्स मधील सर्वात मोठ्या साथरोगांच्या दवाखान्यात झाला अशी नोंद होती. ‘डॉ. फ्रॅंक स्नोडेन’चा अंदाज खरा होता. १९११ च्या उन्हाळ्यात नेपल्स मध्ये कोणतीतरी मोठी साथ नक्की आली होती.
मग ते नेपल्स मधील कॉंटूजिओ (contugio) हॉस्पिटलमध्ये गेले. तिथेही त्यांना १९११ मधील रुग्णाचे कोणतेही रेकॉर्डस् मिळाले नाहीत. १९०८ पासून प्रत्येक रुग्णाचे केसपेपर आदी नोंदी व्यवस्थित जतन करून ठेवल्या होत्या. मात्र १९११ च्या गायब होत्या. त्यानंतरच्या सर्व वर्षातल्या नोंदी अचूक होत्या. तथापि या हॉस्पिटलचे स्वतःचे जर्नल होते. १९१०-११ मध्ये त्यातले जवळजवळ सर्व शोधनिबंध कॉलरा व त्याचे उपचार यांच्याशी संबंधित होते. म्हणजेच या काळात या दवाखान्यात सर्वाधिक रुग्ण कॉलऱ्याचे होते. पण कॉलऱ्याची साथ येऊन गेल्याचे कोणतेही प्रत्यक्ष पुरावे नव्हते.
मग त्यांना इटलीतील त्या काळच्या एका चमत्कारिक गुन्ह्याचा शोध लागला. इटलीच्या पंतप्रधानांनी १९११ मध्ये सॅनिटरी डीफिटीझम (sanitary deafitism) हा एक नवाच कायदा आणला होता. पोलिसांकडे त्याची नोंद होती. या कायद्यानुसार पोलीस डॉक्टरांचे फोन टॅप करत असत. सर्व डॉक्टरांचा पत्रव्यवहार तपासला जाई. कॉलरा हा शब्द सुद्धा उच्चारायला बंदी होती. जो डॉक्टर याबद्दल बोलेल त्याला त्याचा व्यवसाय बंद करायची धमकी दिली जात असे. व्हेनिस मेडिकल सोसायटी या डॉक्टरांच्या संघटनेने कॉलरा व त्यापासून वाचण्याचे उपाय याबद्दल पत्रके छापली, पोस्टर्स बनवली. पण पोलिसांनी ती हजारो पोस्टर्स, पत्रके जाळून टाकली. याची नोंद पोलीस रेकॉर्डस् मध्ये मिळाली. म्हणजेच कॉलऱ्याची साथ येऊन गेली हे नक्की होते.
डॉ. स्नोडेन नि मग नेपल्समधून त्या काळात हजारो लोक समुद्रप्रवास करून अमेरिकेत जात, त्यांचा मागोवा घेतला. तेव्हा असे लक्षात आले की एलिस या नेपल्सहुन निघाल्यावर नुयॉर्कच्या आधीच्या बेटावर कॉलऱ्याची साथ १९१० ते १९११ या काळात वारंवार येऊन गेली आहे. त्याची नोंद आहे. शिवाय नेपल्सहुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवस क्वारंटाइन होणे सक्तीचे होते. हेन्री गिडिंग या अमेरिकेच्या नेपल्समधील दूतावासातील अधिकाऱ्याने वारंवार अमेरिकन सरकारला नेपल्स मधील साथीबद्दल कळवले होते. मात्र अमेरिकन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
याच काळात १९०८ मध्ये डॉ. लिओनॉर्ड रॉजर्स यांनी भारतात कॉलरा झाला असता सलाईन म्हणजेच विशिष्ट प्रमाणात साखर, मीठ, पाणी शिरेतून दिले असता मृत्युदर १५ टक्यांपर्यंत खाली आणता येतो हे सिद्ध केले होते. नाहीतर कॉलऱ्याचा मृत्युदर ५० टक्के होता. त्यांनी इटलीच्या सरकारकडे कॉलऱ्याच्या रुग्णांना उपचार करण्याची तयारी दाखवली, पण इटालियन सरकारने त्यांना सिसिली बेटांवर फक्त २ आठवडे काम करण्याची परवानगी दिली. तिथे त्यांनी इटलीच्या डॉक्टरांना कॉलरा उपचाराचे प्रशिक्षण दिले. पण सरकारने त्यांना नेपल्समध्ये येऊ दिले नाही. अशाप्रकारे लोकांना उपलब्ध उत्तम उपचार मिळण्यापासून वंचित ठेवले.
हळूहळू मिळत गेलेल्या पुराव्यानुसार १९१०-११ मध्ये नेपल्स मध्ये जवळजवळ अठरा हजार मृत्यू झाले होते. पण सरकार ही साथ आहे हेच नाकारत राहिले. शासनाकडे विविध शहरातून येणाऱ्या मृत्यू नोंदीमध्ये कॉलरा होऊन मृत व्यक्तींची नोंद असलेला डेटा चुकीचा आहे असा शेरा देऊन परत पाठविला जाई. त्या काळात इटलीच्या संसदेत किंवा नेपल्सच्या स्थानिक शासनाच्या सभेमध्ये या विषयावर एकदाही चर्चा झाली नाही. परंतु दोन्हीकडे डॉक्टर्स आणि नर्सेसची संख्या वाढवण्याची वारंवार मागणी करण्यात आली. त्यांना नियुक्ती देण्यात आली.
कॉलरा या जीवघेण्या आजाराची साथ आली आहे हे लपवून ठेवण्यात आले. त्याविषयीच्या सगळ्या नोंदी नष्ट केल्या गेल्या. पण याचे काय कारण असावे बरे? याचा खोलात जाऊन आणखी अभ्यास केला असता डॉ. फ्रॅंकना कळले, की साथ आहे हे मान्य केले की इटलीच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या समारंभावर त्याचा परिणाम होईल. त्यासाठी देश-परदेशातून हजारो लोक इटलीत येणार होते. पर्यटन हा इटलीचा प्रमुख उद्योग होता. त्यावर परिणाम होईल. शिवाय जगातील इटलीची प्रतिमा खराब होईल. सरकारसाठी इटालियन राष्ट्रवाद महत्वाचा होता. राष्ट्राचा उत्सव साजरा करण्यात कोणतीही अडचण येऊ नये असे मानले गेले. त्यासाठी विरोधात बोलणाऱ्यांना डावे, समाजवादी, अराजकवादी, देशद्रोही मानले गेले. सर्व माध्यमांवर कॉलेऱ्याच्या बातम्या देण्यावर बंदी घातली गेली.
१८८४ मध्ये नेपल्स शहरात कॉलऱ्याची भयंकर साथ येऊन गेल्यानंतर पूर्ण शहर कॉलरा होऊ नये म्हणून नव्याने बांधण्यात आले होते. ही पुर्नबांधणी मुळातच ‘मियास्मा थेअरी’वर आधारित असल्याने निरुपयोगी होती. तसेच भ्रष्टाचाराने पोखरलेल्या यंत्रणेमुळे पुनर्बांधणीमध्ये अनेक त्रुटी राहिल्या. या पुनर्बांधणीमूळे नेपल्स शहरात कॉलऱ्याची साथ येणारच नाही या गृहितकाला धक्का बसला. परंतु राष्ट्रवादाचा ज्वर चढलेल्या सरकारला हे अपयश मान्यच करायचे नव्हते.
परिणामी कॉलरा बरा करणारे उपचार उपलब्ध असतानाही लोकांना कॅफिन, बर्फ, अतिगरम पाण्याच्या टबात बसवणे, स्ट्रीचनिन सारखे विषारी द्रव्य देणे असे अघोरी उपाय केले गेले. टाळता येणारे हजारो मृत्यू झाले.
कोणत्याही देशात कोणत्याही काळात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने – सर्वेक्षण, नियमन आणि माहिती देणे हे साथरोगांच्या नियंत्रणासाठी अत्यावश्यक असते. माहिती लपविणे, नोंदी न ठेवणे, मृत्यूचे आकडे खोटे सांगणे, अवैज्ञानिक उपाय अवलंबणे ही साथरोगांच्या ढिसाळ हाताळणीची वैशिष्ट्ये आहेत. अशा सरकारी धोरणा विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबून टाकणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे हे असंवेदनशील, हुकूमशाही राजवटीचे लक्षण आहे. परिणामी जनतेला त्याची जीवघेणी किंमत चुकवावी लागते.
सध्याच्या काळातील ऑक्सिजन, लस तुटवडा, मृत्यूची अपुरी नोंद, त्याविषयी बोलले की गुन्हा दाखल करणे या घटनांचा या गोष्टीशी साधर्म्य असणे हा केवळ योगायोग असावा का?
डॉ.तृप्ती प्रभुणे, या डॉक्टर असून, वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक आहेत.
संदर्भ –
- Naples in the time of cholera – a book by Frank M snowden
- Pandemic – a book by Sonia Shah
- https://oyc.yale.edu/history/hist-234/lecture-9
COMMENTS