“भुकेल्याला एक मासा दिला तर त्याचा एक दिवस जाईल, पण त्याला मासेमारी शिकवली तर त्याचे आयुष्यभर पोट भरेल”, अशी एक चीनमधील म्हण आहे. तोच प्रयत्न या मॉडेलमधून करण्यात आला असून, ताडीवाला रोडच्या छोट्या व्यावसायिकांना उभे केले जात आहे.
ताडीवाला रोड परिसरात राहणाऱ्या उषा अशोक पवार या ७१ वर्षांच्या आजी. त्यांचे सायकल दुकान कोरोना काळामध्ये पार बसले. सायकल भाड्याने देऊन, पंक्चर काढून, त्या दिवसाला दोन-तीनशे रुपये मिळवायच्या. कोरोनामुळे २०२० सालात पहिला लॉकडाऊन लागला आणि सगळेच ठप्प झाले. त्यात उषाबाईंचे दुकानही! मात्र काही ‘मित्र’ आयत्यावेळी मदतीला धावून आले आणि उषाबाईंनी नव्याने गोळ्या-बिस्किटे विकण्याचे दुकान सुरू केले. त्यांना ‘मित्रांनी’ १५ हजार रुपये दिले. आता त्या दिवसाला चारशे-पाचशे रुपये मिळवू लागल्या आहेत. दूसरा लॉकडाऊन आला तरी त्या आता उभ्या आहेत.
३६ वर्षे वयाचे संदीप गायकवाड पुणे रेल्वे स्टेशन येथे वृत्तपत्र विकण्याचा व्यवसाय करायचे आणि घरोघर फिरून वृत्तपत्र टाकायचे. त्यांच्यावर घरातील ६ सदस्य अवलंबून आहेत. पाहिल्या लॉकडाऊनमध्ये वृत्तपत्र विक्री बंद झाली. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणी कर्ज देईना. मात्र काही ‘मित्र’ मदतीला आले. त्यांनी १५ हजार रुपये दिले आणि भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. वृत्तपत्र विक्रीमुळे लोकांशी संबंध होतेच. त्याचा या नव्या व्यवसायाला उपयोग झाला.
लक्ष्मी रमेश म्हेत्रे या ४० वयाच्या महिला. त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय लॉकडाऊनमध्ये बंद पडला होता. त्यांना २० हजार रुपयांची मदत झाली. त्यांनी एक मशीन आणि दोन मोटर विकत घेतल्या आणि त्यातून पुन्हा व्यवसाय उभा केला.
मीनाक्षी राजगुरू, वैशाली वाघमारे, पुष्पा तुपारे, क्रांती संसारे, आयरीन फ्रान्सिस अशा एकूण २६ जणांच्या थोड्याफार फरकाने याच कहाण्या आहेत. ताडीवाला रोड परिसरात राहणारे हे सगळे अगदी छोटे व्यावसायिक. कोरोनाची साथ आली. लॉकडाऊन लागला आणि प्रत्येकाचे व्यवसाय बंद झाले. या सगळ्यांना ‘मित्र’ नावाच्या मॉडेलमधून मदत मिळाली आणि आता प्रत्येकजण सावरत आहे.
“भुकेल्याला एक मासा दिला तर त्याचा एक दिवस जाईल, पण त्याला मासेमारी शिकवली तर त्याचे आयुष्यभर पोट भरेल”, अशी एक चीनमधील म्हण आहे. तोच प्रयत्न या मॉडेलमधून करण्यात आला असून, ताडीवाला रोडच्या छोट्या व्यावसायिकांना उभे केले जात आहे.
ताडीवाला रोड परिसरामध्ये पेंटर, वेल्डर, भाजी विक्रेते, हातगाडीवर व्यवसाय करणारे, असे हातावरचे पोट असणारे अगदी छोटे व्यावसायिक राहतात. त्याचबरोबर घरकामगार, सफाई कामगार, बांधकाम मजूर राहतात. या सगळ्यांना कोरोना काळामध्ये प्रचंड हाल सोसावे लागले. तुटपुंजी बचत संपत गेली. अनेक संस्थांनी मदतीचे हात पुढे करून अन्न-धान्याचे किट वाटले. पण हे किती दिवस चालणार, काहीतरी कायमस्वरूपी उपाय योजना हवी होती. त्यांना आता ‘मित्र’ मॉडेलचा आधार झाला आहे. त्यामुळे दुसरे लॉकडाऊन लागल्यावर त्यांना त्याचा खूप मोठा फटका बसला नाही.
या मॉडेलमध्ये अगोदर व्यवसाय करीत असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यांची संपूर्ण माहिती घेऊन, प्रत्येकाच्या व्यवसायाच्या गरजेनुसार प्रत्येकाला ५ ते २० हजार रुपयांची मदत करण्यात आली. ही मदत कोणत्याही तारणाशिवाय, कोणतीही कागदपत्रे न घेता करण्यात आली. प्रत्येक व्यक्तीवर विश्वास टाकण्यात आला. परतफेडीची अपेक्षा आहे, पण कोणतीही जबरदस्ती नाही. ५ ते १० जणांचा एक असे गट तयार करण्यात आले आहेत. परत आलेल्या रकमा गटामध्येच इतर कोणाला गरज असल्यास देण्यात येतात. अन्यथा दुसऱ्या गटाला मदत केली जाते. पैसे तिथेच फिरत राहतात आणि वाढत जातात आणि दुसऱ्याला त्यातून मदत होते. हे आहे ‘मित्र’ मॉडेल !
मेळघाटमध्ये अनेकवर्षे काम करणाऱ्या पुण्यातील ‘मैत्री’ या स्वयंसेवी संस्थेच्या भक्कम आर्थिक मदतीवर ‘युवा मित्र फाऊंडेशन’ने हा प्रकल्प आकाराला आणला आहे.
समाज संशोधक केशव वाघमारे यांनी ‘मैत्री’ आणि ‘युवा मित्र फाऊंडेशन’ यांच्या मध्ये दुवा म्हणून काम केले. ते म्हणाले, “अनेकांनी धान्याचे किट या काळात लोकांना वाटले. ते गरजेचे होतेच, पण ती तात्पुरती उपाययोजना होती. यासाठी कायमस्वरूपी उत्तर शोधणे गरजेचे होते. ‘मैत्री’चे विश्वस्त अनिल शिदोरे यांच्या बरोबर अनेक चर्चा झाल्या आणि त्यातून माणूस उभे करणारे एक मॉडेल पुढे आले.”
‘मैत्री’ या संस्थेचे महाराष्ट्रामध्ये एक स्थान आहे. गेली २४ वर्षे अनेक क्षेत्रामध्ये ‘मैत्री’ने काम केले असून, मेळघाटमध्ये सातत्याने ‘मैत्री’ काम करत आहे. ‘मैत्री’कडे ३० जणांची प्रशीक्षित टीम आहे. वेगवेगळ्या १३ राष्ट्रीय आपत्तींमध्ये काम करण्याचा ‘मैत्री’ला अनुभव आहे. कोरोना महासाथ सुरू झाल्यावर लगेचच पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांना ‘मैत्री’ने पत्र दिले आणि आपण काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. ‘मैत्री’नेही ठिकठिकाणी अन्न-धान्याची किट वाटली. सोलापूरमध्ये भटकंती करत जगणाऱ्या समूहाला मोठी मदत केली.
‘मैत्री’चे विश्वस्त अनिल शिदोरे म्हणाले, की ही आपत्ती इतकी मोठी आहे, की यामध्ये समाजाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. आमच्या दर मंगळवारी साप्ताहिक बैठका होतात. त्यामध्ये अनेक दिवस चर्चा करून हे मॉडेल तयार झाले. तळात जाऊन लोकांच्या जगण्यासाठी (लाईव्हलीहुड)
प्रयत्न करावेत, असे ठरले. यासाठी मायक्रो क्रेडीट, ग्रामीण बँक, सेवा प्रकल्प या सगळ्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी सहानुभूतीदार आणि समाजामध्ये निधी देण्याचे आवाहन करण्यात आले. ‘मैत्री’ कॉर्पोरेटसकडे जाण्यापेक्षा सामान्य देणगीदारांच्या देणगीला जास्त महत्त्व देते. थोड्या लोकांकडून अधिक रक्कम देणगी म्हणून घेण्यापेक्षा अधिक लोकांकडून थोड्या थोड्या रकमा देणगी म्हणून घेण्यावर ‘मैत्री’चा भर आहे. त्यातून अनेकांनी १५० ते ५० हजार अशा रकमा देणगी म्हणून दिल्या. जमलेल्या रकमेतून आत्तापर्यन्त या मॉडेलसाठी साडेचार लाख रुपये देण्यात आले आहेत. अजूनही लोकांना यापुढे अशी मदत दिली जाणार आहे.”
शिदोरे म्हणाले, की शहरी गरिबांसाठी (अर्बन पुअर) अशी योजना उत्तम आहे. पुढील वर्षी या मॉडेलचा आढावा घेऊन तो अनेक आर्थिक संस्था आणि बँका यांना सादर केला जाईल.
ताडीवाला रोड परिसरामध्ये राहणारे आनंद जाधव यांनी २०१७ साली आपल्या सहकाऱ्यांबरोबर ‘युवा मित्र फाऊंडेशन’ची स्थापना केली. परिसरातील तरुणांमध्ये कौशल्य विकसीत व्हावीत यासाठी फाऊंडेशन काम करते. पुण्यात कोरोनाचा दूसरा रुग्ण ताडीवाला रोड परिसरामध्ये आढळला होता. त्यानंतर परिसरात पत्रे लावून परिसर बंद करण्यात आला होता. तेंव्हा ‘युवा मित्र फाऊंडेशन’ने अनेकांना अन्न-धान्याची मदत केली. त्यासाठी ‘मैत्री’नेही मदत केली होती.
‘युवा मित्र फाऊंडेशन’चे अध्यक्ष आनंद जाधव म्हणाले, “ताडीवाला रोड परिसरामध्ये रिक्षावाले, वडापाव विकणारे असे अनेक लोक आहेत, की ज्यांचे व्यवसाय ठप्प झाले होते. अन्न-धान्य वाटताना असे लक्षात आले, की हे केवळ पुरेसे नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर अनेक लोक आले आणि त्यांनी काम द्या म्हणून मदत मागितली. पुढे केशव वाघमारे आणि अनिलदादा यांच्याशी चर्चा झाली आणि हे मॉडेल पुढे आले. आम्ही परिसराचे सर्वेक्षण केले. अगोदर ११ लोक निवडण्यात आले. त्यांची माहिती घेतली. प्रत्येकाशी बोलणे झाले. प्रत्येकाची गरज अधिक होती. पण कागदपत्रे नव्हती. मात्र
लोकांवर विश्वास टाकला. महिलांना प्राधान्य दिले आणि प्रत्येकाला मदत दिली. ‘मैत्री’च्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.”
जाधव पुढे म्हणाले, की या सगळ्या लोकांमध्ये आपसांत आता एक घट्ट नाते तयार झाले आहे. ते सगळे एकमेकांना मदत करतात आणि व्यवसायासाठी परस्परांची मदत घेतात. त्यातून व्यवसाय वाढतो. अजूनही २० लोकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना आता मदत दिली जाईल. पुढच्या वर्षी पर्यंत एकूण १०० जणांना मदत देऊन त्यांचे व्यवसाय उभे करण्याचे उद्दिष्ट आहे. कोणावरही परतफेडीसाठी दबाव टाकला जात नाही. कोणाला कसल्याही सूचना केल्या जात नाहीत. फक्त ठराविक अंतराने बैठका घेतल्या जातात. त्यामध्ये अनेकांना बोलावले जाते आणि व्यवसाय उभा करण्यासाठी उद्युक्त केले जाते. त्यातून लोक आता परतफेड करून एकमेकांना मदत करीत आहेत.
पहिले लॉकडाऊन संपल्यानंतर हे मॉडेल उभे राहिले, मात्र लगेच दूसरा लॉकडाऊन आला. पुन्हा व्यवसायाला फटका बसला. पण लोक खचले नाहीत. आता अनेकांचे व्यवसाय पुन्हा बंद झाले आहेत. पण या मदतीवर ते आता पुन्हा उभे राहण्यासाठी आश्वस्त आहेत आणि इतर अनेकजण पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले आहेत.
COMMENTS