मुंबई-दिल्लीत कोरोनाची साथ तिसऱ्या टप्प्यात!

मुंबई-दिल्लीत कोरोनाची साथ तिसऱ्या टप्प्यात!

आयसीएमआरच्या एपिडेमिओलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. गंगाखेडकर यांनी साथीसंदर्भातील सरकारचे अनेक दावे फेटाळले आहेत.

दिवसभरात अकरा लाख नागरिकांचे लसीकरण
राज्याने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा
कोरोना संकटात मोदी सरकार किती गंभीर?

“कोरोना विषाणू भारतात कमी तीव्र आहे या आरोग्यमंत्र्यांच्या दाव्याला कोणताही जीवशास्त्रीय आधार नाही,” अशा शब्दांत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) एपिडेमिओलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आरोग्यमंत्र्यांनी २३ मे रोजी केलेला दावा फेटाळून लावला आहे.

डॉ. गंगाखेडकर ३० जून रोजी आयसीएमआरच्या एपिडेमिओलॉजी विभागाच्या प्रमुखपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत त्यांनी कोरोना साथीसंदर्भातील अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केले आहे. भारतात अद्याप कोरोनाची साथ समुदाय संक्रमणाच्या टप्प्यात पोहोचलेली नाही, असा आयसीएमआर व सरकारचा दावाही काही अंशी फेटाळत, मुंबई व दिल्लीतील काही ठिकाणी ही साथ समुदाय संक्रमण टप्प्यात पोहोचल्याचेही त्यांनी मान्य केले.

‘द वायर’साठी करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत डॉ. गंगाखेडकर, कोरोना विषाणूची भारतातील तीव्रता, मृत्यूदर, कोरोनातून बरे होण्याचे सर्व देशांतील प्रमाण, आयसीएमआरने लशीबद्दल केलेली घोषणा व त्यावरून निर्माण झालेला वाद आदी मुद्द्यांवर बोलले आहेत. ही संपूर्ण मुलाखत ‘द वायर’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

भारतातील कोविड-१९ संकटावर डॉ. गंगाखेडकर यांनी या मुलाखतीत सखोल चर्चा केली आहे. नोव्हेल कोरोना विषाणूची भारतात ‘तेवढा तीव्र’ नाही, असे विधान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी २३ मे रोजी केले होते. डॉ. गंगाखेडकर यांच्या मते, भारतात आढळणारा कोरोना विषाणू कमी तीव्रतेचा आहे या विधानाला कोणताही जीवशास्त्रीय आधार नाही. रुग्णांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंच्या विविध स्ट्रेन्समध्ये ठळक असा फरक दिसून येतो याला जगभरात कोठेही ठोस पुरावा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना विषाणूची साथ हाताळण्यात भारत अन्य देशांच्या तुलनेत सरस कामगिरी करत आहे हे पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  विशेष भर दिलेल्या दोन मुद्द्यांवर डॉ. गंगाखेडकर तपशीलवार बोलले.

यातील एक म्हणजे मृत्यूदर. या मुद्दयावर ‘द वायर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्राध्यापक आशीष झा यांच्या मताशी डॉ. गंगाखेडकर यांनी सहमती दर्शवली. आपण दोन देशांतील मृत्यूदरांची तुलना करू शकत नाही, कारण, दोन देशांतील लोकसंख्येचे वेगवेगळे नमुने अभ्यासणे आपल्याला शक्य नसते, असे मत झा यांनी व्यक्त केले होते. अर्थात मृत्यूदराबाबतच्या गणनाही बेभरवशाची म्हणता येणार नाहीत, असेही डॉ. गंगाखेडकर म्हणाले.

“अखेरीस सर्व देशांमधील कोरोनातून बाहेर येणाऱ्या रुग्णांचा दर ९९ टक्क्यांच्या आसपास असेल,” या प्राध्यापक झा यांच्या विधानाशीही डॉ. गंगाखेडकर यांनी सहमती दर्शवली. मात्र, सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतात २०० दशलक्ष कोरोना केसेस असतील या रामन लक्ष्मीनारायणन यांच्या अंदाजाशीही त्यांनी असहमती दर्शवली नाही.

डॉ. गंगाखेडकर यांच्या मते, हे सगळे अंदाज आजाराच्या त्या त्या वेळच्या आयामांवर, सामाजिक-आर्थिक स्थितीबद्दलच्या अनेकविध गृहितकांवर, लॉकडाउनसारखे अलीकडील काळातील उपाय तसेच वापरासाठी मंजुरी मिळालेली औषधे यांसारख्या अनेक मुद्द्यांवर अवलंबून असतात, असे ते म्हणाले. त्यामुळे सर्व शक्यता अस्तित्वात आहेत पण त्या सगळ्या खूपच ‘जर-तर’वर अवलंबून असलेल्या शक्यता आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. भारत १५ ऑगस्टपर्यंत सर्व क्लिनिकल चाचण्या पूर्ण करून सार्वजनिक वापरासाठी लस आणेल असे सांगणाऱ्या आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांच्या पत्रावरून सुरू झालेल्या वादाबद्दल ‘या वादामुळे आयसीएमआरची विश्वासार्हता पूर्णपणे धोक्यात येईल असे वाटत नाही,’ असे म्हणत डॉ. गंगाखेडकर यांना ही विश्वासार्हता काही प्रमाणात धोक्यात आल्याचे मान्य केले.

‘असे काही बोलणे खूप सोपे आहे पण आयसीएमआरची विश्वासार्हता एवढी कमकुवत नाही. या एका छोट्या मुद्द्यामुळे आयएमआर वाईट संस्था ठरत नाही. आयसीएमआरच्या दीर्घकालीन विश्वासार्हतेवर काहीही परिणाम होणार नाही.”

दिल्ली व मुंबईतील काही ठिकाणी समुदाय संक्रमणाला (कम्युनिटी ट्रान्समिशन) सुरूवात झाली आहे, हेही डॉ. गंगाखेडकर यांनी मान्य केले. भारतातील संक्रमण अद्याप समुदाय स्तरावर पोहोचलेले नाही, असा दावा आयसीएमआर व सरकारी अधिकारी करत आहेत. डॉ. गंगाखेडकर यांनी त्यांचा दावा एक प्रकारे फेटाळला आहे. मात्र, आपण त्याला ‘स्थानिक संक्रमण’ म्हणण्यास प्राधान्य देऊ पण त्यामुळे त्याला प्रतिसाद देण्याचे धोरण बदलत नाही, असेही ते म्हणाले.

भारतातील जयप्रकाश मुलियिल आणि टी. जेकब, ब्रिटन व अमेरिकेमधील सुनेत्रा गुप्ता व आशीष झा आदी अग्रगण्य साथरोगतज्ज्ञांनी याबाबत परस्परविरोधी विधाने केली आहेत हे लक्षात आणून दिले असता, ‘विज्ञानामध्ये मतांतरे सामान्य आहेत’ असे डॉ. गंगाखेडकर म्हणाले. ग्रामीण भागातील लॉकडाउन शहरी भागाच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरत असताना, शहरातील लक्षावधी स्थलांतरित कामगार आपल्या गावांमध्ये प्रादुर्भाव घेऊन परतत आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे याची चिंता सर्वांना वाटत आहे, हेही डॉ. गंगाखेडकर यांनी मान्य केले. ग्रामीण भागात परतणाऱ्या स्थलांतरितांपासून आपले रक्षण करण्यासाठी अनेकांनी ‘तात्पुरच्या विलगीकृत झोपड्या’ तयार केल्या असल्याचे ते म्हणाले.

आयसीएमआरने सेवाकाल विस्तारण्याची तयारी दर्शवूनही कोरोना साथ भरात असताना निवृत्ती का घेतली असा प्रश्नही डॉ. गंगाखेडकर यांना विचारण्यात आला असता, कुटुंबाला प्राधान्य देण्यासाठी निवृत्ती स्वीकारल्याचे ते म्हणाले. आयसीएमआरने आपल्याला प्रोफेरसीयल चेअर प्रदान केली असून, याचा अर्थ आपण आता प्राध्यापक गंगाखेडकर आहोत आणि आपला संस्थेची संबंध कायम आहे, असेही त्यांनी सांगितले.

ही संपूर्ण मुलाखत एक तासाची असून, यामध्ये कोरोना साथीचा भारतातील कळस, वाढत्या रुग्णसंख्येमुळे येणारा ताण, विलगीकरणाची धोरणे, आजाराशी निगडित कलंकाची भावना, सामुदायिक सेवाकेंद्रांमधील समस्या, आयसीएमआरचे वादग्रस्त सिरॉलॉजिकल सर्वेक्षण, विषाणूचा देशातील प्रत्यक्ष प्रसार यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा करण्यात आली आहे.

भारतातील कोरोनाविषाणूची साथ आणि त्याच्याशी निगडित सर्व मुद्दयांवर एवढ्या तपशिलांसह व स्वेच्छेने चर्चा करणारे डॉ. गंगाखेडकर हे आयसीएमआरशी संबंध असलेले पहिलेच अधिकारी आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1