दिल्लीतील सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक विश्वातील अभिजनांचा वावर असलेले‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’(आयआयसी) हे अशाच सळसळत्या स्थापत्याचे उदाहरण आहे. कदाचित ते आर्किटेक्ट जोसेफ अॅलन स्टाइन यांनी साकारलेले स्वातंत्र्योत्तर नवी दिल्लीतील सर्वांत परिपूर्ण स्थापत्यदेखील असावे. माझ्या दृष्टीने इंडिया इंटरनॅशनल सेंटरला ५० वर्षे पूर्ण होणे, हे स्टाइन यांच्या कामाचा गाभा असलेल्या मूल्यांबाबत विचार करण्याचे आणि भारतातील स्थापत्यशास्त्राच्या प्रवासातील त्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्याचे निमित्त होते...
जे कायमस्वरुपी जिवंत राहते ते महान साहित्य असे म्हटले जाते. हेच महान स्थापत्याबद्दलही म्हणता येईल. ते कायम जिवंत राहते, याचा अर्थ अनेक पिढ्यांना त्याबद्दल आकर्षक वाटत राहते. अशा स्थापत्यातून त्याचे मूळ दिसत राहते, बदलांना सामावून घेताना कालौघात बदलत गेलेले अर्थही त्यातून उलगडत राहतात. बदलांच्या केंद्रस्थानी असलेले स्थापत्य आपल्या गतेतिहासाची आठवण करून देते आणि नववर्तमानाच्या दृष्टीने आपल्या मूल्यांचे, दर्जाचे अन्वयार्थ लावण्याची मुभाही देते.
मी यासंदर्भात ज्या स्थापत्याचा विचार करत आहे, ते जिवंत स्थापत्य आहे. गतवैभवाची जाणीव करून देणारे किंवा नॉस्टॅल्जिया निर्माण करणारे स्मारकांच्या स्वरूपातील स्थापत्य नाही. जिवंत स्थापत्य म्हणजे, ऐतिहासिक स्मृती म्हणून जतन केलेले स्थापत्य नव्हे, तर ज्याचा सातत्याने, सर्जनशीलतेने बदलत्या संस्कृतींमध्ये उपयोग केला जात आहे, असे स्थापत्य. दिल्लीतील सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक विश्वातील अभिजनांचा वावर असलेले ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’(आयआयसी) हे अशाच सळसळत्या स्थापत्याचे उदाहरण आहे. कदाचित ते आर्किटेक्ट जोसेफ अॅलन स्टाइन यांनी साकारलेले स्वातंत्र्योत्तर नवी दिल्लीतील सर्वांत परिपूर्ण स्थापत्यदेखील असावे. माझ्या दृष्टीने ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ला ५० वर्षे पूर्ण होणे, हे स्टाइन यांच्या कामाचा गाभा असलेल्या मूल्यांबाबत विचार करण्याचे आणि भारतातील स्थापत्यशास्त्राच्या प्रवासातील त्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्याचे निमित्त होते. म्हणूनच मी २०१२ मध्ये ‘इंडिया इंटरनॅशनल क्वार्टरली’ स्मरणिकेसाठी लिहिलेल्या लेखाला उजळा देण्याची आणि त्यात भर घालण्याची संधी या लिखाणाद्वारे घेत आहे.
स्टाइन यांची वैश्विक दृष्टी
त्या काळातील आशावादी वैश्विक दृष्टिकोनाला एका नव्याने स्थापन झालेल्या लोकशाही राष्ट्रातील उगवत्या सर्जनशील संधींची जोड मिळाल्याने स्टाइन भारताकडे आकर्षित झाले. आणि ‘जगाच्या विविध भागांतील प्रचलित सांस्कृतिक संचितांच्या’ पुनर्मांडणीची इच्छा सेंटरच्या संस्थापकांनी व्यक्त केल्यामुळे विविध विचारसरणींच्या खुल्या संयोगातून स्टाइन यांच्या स्थापत्य संकल्पनेचा पाया घातला गेला. स्टाइन यांच्यावर जबाबदारी होती, ती आधुनिकतेची वैश्विक तत्त्वे, त्यांच्या विशिष्ट सांस्कृतिक संदर्भातील विधानाद्वारे व्यक्त करण्याची. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर रचनेबाबत आव्हान होते, ते एखाद्या विशिष्ट सांस्कृतिक संदर्भाच्या कल्पना आधुनिक स्थापत्यकलेच्या वैश्विक तत्त्वांमध्ये सामावून घेण्याचे.
स्टाइन यांनी या द्वैताबद्दल म्हटले आहे: “सगळे जग एकच आहे यावर आता माझा विश्वास बसला आहे… आपण सगळे एकाच भाषेत संवाद साधू शकू या बिंदूवर मात्र मी अद्याप पोहोचलेलो नाही असे मला वाटते. तरीही मला असे वाटते की, आधुनिक स्थापत्यकलेने तर्काच्या एकात्मीकरणाच्या विकासाचा जो प्रयत्न केला आहे, त्याच्या चौकटीमध्ये, सत्याचा हा शोध अजिबात विसंगत नाही. हा शोध स्थळाप्रती संवेदनशील राहून, पर्यावरणाविषयी जागरूकता राखून आणि संस्कृतीच्या अनेक पदरांबाबत संवेदनशीलता ठेवून घेतला जाणारा शोध आहे.”
नेहरूवादी विचारांचे अनुसरण
इंटरनॅशनल सेंटरच्या रचनाकेंद्री तत्त्वज्ञानाची दिशा व निर्देश नेहरूवादी विचारांचे अनुसरण करणारे होते, असा सारांश यावरून काढला जाऊ शकतो. या विचारांची भाषा, परंपरांमधून उत्क्रांत होत जाण्याच्या प्रक्रियेपेक्षाही परंपरा व इतिहासाच्या मर्यादांचे रूपांतर आधुनिकतेत करण्याची होती. तरीही जटील व व्यामिश्र सांस्कृतिक वारशाच्या कल्पनेचा अर्क असलेली नवआधुनिकता निर्माण करण्याचा अनोखा प्रयत्न यात होता. भारतातील संधी व समृद्धीपासून प्रेरणा घेऊ पाहणाऱ्या स्टाइन यांच्यासारख्या स्थलांतरितासाठी ही अत्यंत वास्तव भूमिका होती. त्यांना त्यांच्या काळाचे चैतन्य मांडायचे होतेच, पण कदाचित त्याहून अधिक आपल्या स्थापत्यातून व्यक्तिगत श्रद्धा व अंतर्मन व्यक्त करायचे होते.
लोकशाही आणि मानवी प्रतिष्ठा ही स्टाइन यांच्या विश्वासाची पहिली स्थाने होती. इंडिया इंटरनॅशनल सेंटरचा विचार एक सार्वजनिक इमारत म्हणून करण्यात आला होता. सर्वांसाठी खुली व सर्वांना आमंत्रण देणारी एक स्वागतोत्सुक इमारत. याचमुळे इमारतीच्या आवाराच्या एका बाजूला पसरलेल्या लोधी गार्डनशी परिसराच्या टोकाच्या भागांचे एकात्मीकरण झाल्यासारखे वाटते. या सेंटरकडे पोहोचवणाऱ्या रस्त्यांच्या दिशेने परिसर खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कमी उंचीच्या दगडी भिंतींमधील फाटकांद्वारे सर्व बाजूंनी परिसरात प्रवेश करता येतो. महात्मा गांधी व मार्टिन ल्युथर किंग यांचे स्मरण करून देणाऱ्या स्मृतिस्थळांची (मेमोरिअल प्लाझा) रचना एक चिंतनस्थळ म्हणून करण्यात आली आहे. पांथस्थांना छाया देण्यासाठी येथे एक विशाल वृक्ष उभा आहे. इथे मी हे आवर्जून नमूद करू इच्छितो की, स्टाइन यांनी संस्थांना तटबंदी करणे नेहमीच टाळले होते. सामाजिक दुही व जातीय तणाव हळुहळू या शहरातील लोकशाही मूल्यांना मारक ठरू लागले आहेत, याचा त्यांना एकेकाळी खूप खेदही वाटत असे.
शहरीकरणाच्या संकल्पनेचा सखोल विचार
सार्वजनिक संस्था व परिषदांच्या केंद्रांना एका संकुलामध्ये एकवटणाऱ्या आयआयसीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘इंडिया हाबिटाट सेंटर’मध्ये हेच तत्त्व शहरी अंगाने विस्तारण्यात आले आहे. इथे भल्यामोठ्या छते असलेल्या मंडपांद्वारे पादचाऱ्यांना प्रवेश खुला आहे. शहरातील सार्वजनिक स्थळांप्रतीचा हा लोकशाही दृष्टिकोन आहे. वाहनांचे ताफे तळघरात नेत या मंडपांचा विकास विषुववृत्तीय (ट्रॉपिकल) उद्यानांमध्ये करून दिल्लीच्या शहरीकरणाच्या संकल्पनेला पूर्ण रूप देण्यात आले आहे.
यातून मानवाचा निसर्गाशी संपर्क राहणे, तो निसर्गापासून न दुरावणे, किंबहुना त्याने निसर्गाचा एक अविभाज्य घटक होऊन राहणे जोसेफ स्टाइन यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते. बदलते आकाश, सूर्यकिरण व सावली, ऋतूंचे चक्र, जमिनीवरील वनस्पती व प्राणी आणि पाणी हे मानवाच्या दैनंदिन आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत. हे दैनंदिन अनुभव आपल्याला अधिक चांगला माणूस बनवत असतात. इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अखंडितपणे पसरलेल्या अनौपचारिक उद्यानांची व मंडपांची उत्कृष्ट रचना करण्यात आली आहे. इमारती अलगद उद्यानांच्या पार्श्वभूमीवर वसवण्यात आल्या आहेत. यामुळे जागा काहीशी बंदिस्त केली जाते आणि मग ही बंदिस्त जागा मुक्तपणे प्रवाहित झाल्यासारखी वाटते.त्यानंतर उपलब्ध साहित्य व कलेचा उपयोग कल्पकतेने करण्याचे नवोन्मेषाच्या स्वरूपातील आव्हान स्टाइन यांच्यापुढे होते. श्रोतृगृहावरील डोम बांधण्यासाठी प्रीकास्ट काँक्रिटच्या घटकांचा वापर, वक्राकार होस्टेल ब्लॉकवरील फरशीचे जोड, षटकोनी भोजनगृह व लाउंज आणि आयाताकृती इमारत हे सगळे भूमिती व रचनात्मक अर्थशास्त्राच्या पुरेपूर वापरातून तसेच कुशल कारागिरीतून आकाराला आले आहे. निळ्या-राखाडी दिल्ली क्वार्झाइट दगडाच्या गवंडीकामातून, सहजपणे आकार दिलेल्या नैसर्गिक दगडांची अनौपचारिकता आणि अचूक प्रमाण व भूमिती यांचा सुक्ष्म समतोल साधला गेला आहे.
उन्हाळ्यातील प्रखर सूर्यप्रकाश सौम्य करण्यासाठी करण्यात आलेल्या नवोन्मेषकारी जाळ्यांचे नमुने मुघलकालीन इमारतींमधील जाळ्यांची आठवण करून देणारे आहेत. उघड्या चौकटी आणि लयबद्ध शिंपल्यांचा खेळ, आधुनिक रचनात्मक साहित्य व तंत्रांचा उपयोग, आकाशाच्या पार्श्वभूमीवरील छायारेषांतून (सिल्हौट) तयार करण्यात आलेली छत्र्यांची आठवण करून देणारी छते, या वास्तूला शोभा आणत आली आहे.
स्थापत्यकलेस मानवी चेहरा
बांधकाम व रचनेच्या प्रणालींचा शोध घेऊन अवकाशीय व सौंदर्यपूर्ण पूर्णत्व आकारास आलेले विविध प्रकल्पांत बघायला मिळते. अनेक संस्थात्मक इमारतींच्या व औद्योगिक इमारतींच्या छताच्या रचनेत हे दिसते. मात्र, पोत व नमुन्यांच्या सुक्ष्म श्रेणींपासून ते व्याप्ती व जागांच्या श्रेणींपर्यंत इमारतींच्या व्यवस्थेचे एकात्मीकरण करून स्थापत्यकलेला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न स्टाइन यांनी केला. ‘ठळक, बटबटीत आणि नाट्यमय’ रचनेहून त्यांचा भर कायमच ‘हलक्या व सौम्य’ रचनांवर होता. स्टाइन यांच्या स्थापत्यामध्ये बांधिलकीचा काहीसा अतिरेक जाणवत असला, तरी त्यातून देखणेपणाचा सौंदर्यशास्त्रीय अनुभव मिळतो आणि हे सौंदर्य सौम्य, दिमाखदार व लयबद्ध असल्याचे जाणवत राहते. याच सूक्ष्म दर्जामुळे ‘इंडिया इंटरनॅशन सेंटर’ची वास्तू खास आहे. अर्थात, याच सौंदर्यानुभवामुळे आपल्याला राजधानीतल्या या स्थळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर आकर्षण वाटते आणि त्याचा अर्थ व महत्त्व यांचा नव्याने अन्वयार्थ लावण्याची प्रेरणा मिळते. उद्याने व इमारतींच्या सौंदर्यपूर्ण रचना, ढोबळ आराखड्यापासून ते बारीक तपशिलांपर्यंत, संगीतातील एखाद्या रागासारखे आहेत. या रागांना त्यांच्यातील भावाचे स्वरूप एक ओळख देते. म्हणजे वसंत ऋतू खुलत जातो तसा रागातील श्रृंगारभावाचा अनुभव तो ऐकणाऱ्याला येऊ लागतो. तोच अनुभव या स्थापत्यातून येतो. स्टाइन त्यांच्या समकालीन आर्किटेक्ट्सच्या तुलनेत वेगळे उठून दिसतात ते त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे.
स्थापत्यकलेत स्टाइन यांचे स्थान
याउलट लॉरी बेकर आणि जोसेफ स्टाइन यांनी भारताला त्यांचे घरच बनवले. या जागेसाठी त्यांनी स्थापत्याच्या खास शैली विकसित केल्या. हे दोघे स्थापत्यकलेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांच्या दोन परस्परविरुद्ध टोकावर असले, तरी त्यांच्यात एक सामाईक बाब आहे. ती म्हणजे, दोघेही त्यांच्या आवडीच्या जागेशी भावनिकरित्या जोडलेले होते. या दोघांनीही इतिहासातून धडे घेतले आणि इतिहासाच्या हाकेला सर्जनशील व संवेदनशीलतेने प्रतिसाद दिला. त्यांची स्थापत्यकला ही येथील मातीतील स्थापत्य कला झाली. या स्थापत्य कलेने कायमच स्थानिक संस्कृतीच्या वस्त्रात विणले जाणे, हे उद्दिष्ट ठेवले. किंवा दुसरे रूपक वापरायचे झाले, तर त्यांची आधुनिक स्थापत्यकला ही ते काम करत असलेल्या प्रदेशाच्या मातीत खोलवर रुजलेली राहिली.
म्हणूनच आपण इतिहासाच्या संदर्भाने जोसेफ स्टाइन यांचा उल्लेख बालकृष्ण दोशी, चार्ल्स कोरिया, अच्युत कानविंदे आणि हबीब रहमान यांच्यासारखाच ‘भारतीय’ आर्किटेक्ट असा केला पाहिजे. या प्रत्येकाचा आधुनिक स्थापत्यकलेतील प्रवास, आपापल्या परीने, ते ज्या भागात काम करत होते, तेथील मातीत रुजलेला आहे.
कानविंदे, रहमान आणि स्टाइन एकमेकांचे मित्र होते आणि दिल्लीत कौटुंबिक सहली वगैरेंच्या निमित्ताने अधूनमधून एकमेकांना भेटत होते. त्यांचा एकमेकांवर नेमका कसा प्रभाव पडला असेल, असा विचार माझ्या मनात बरेचदा येतो. स्टाइन व रहमान यांच्या कामात सुज्ञांना ओळखता येईल, असा संबंध आहे आणि कानविंदे यांचे काम या दोघांच्या कामांहून थोडे वेगळे आहे. या सामूहिक वारशातून काही महत्त्वाचे धडे घेतले जाऊ शकतात. अर्थात तो आणखी वेगळा विषय झाला…
…
अशोक बी. लाल हे दिल्लीस्थित आर्किटेक्ट आहेत. त्यांचे स्थापत्य पर्यावरणाची शाश्वतता व सामाजिक जबाबदारीच्या तत्त्वांवर आधारित आहे. १९९० सालापासून स्थापत्यकलेच्या शिक्षणात सहभागी असलेल्या लाल यांनी पर्यावरणाच्या समस्या हाताळण्यासाठी अभ्यासक्रम तसेच अध्यापनतंत्रे विकसित केली आहेत. त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत रचनांवर त्यांनी अनेक निबंध सादर केले आहेत. इमारतींच्या शाश्वत रचनेबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या तसेच त्यात स्पर्धात्मकता आणण्यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था व समूहांचे ते सक्रिय सदस्य आहेत. सध्या ते मुंबई येथील कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट फॉर आर्किटेक्चर (केआरव्हीआयए) येथे डिझाइन अँड टेक्नोलॉजी चेअर म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या वेगवान शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत नगरविकासासाठी व्यूहरचना विकसित करण्यात विशेष रस घेत आहेत.
अनुवादः सायली परांजपे
मूळ लेख -जर्नल ऑफ दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (मे-२०२१)
साभार- ‘मुक्त संवाद’, १५ जुलै २०२१चा अंक
COMMENTS