वृत्तपत्रांच्या संपादकीयांमध्ये दिल्ली पोलिसांचा निषेध

वृत्तपत्रांच्या संपादकीयांमध्ये दिल्ली पोलिसांचा निषेध

द हिंदू, हिंदुस्तान टाईम्स आणि टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिल्लीतील दंगलींबद्दल त्यांच्या संपादकीयांमध्ये मत व्यक्त केले, इंडियन एक्स्प्रेसने मात्र या विषयावर मौन बाळगले.

घाणीचेच खत होईल!
‘काश्मीर दुःखात आणि देश आनंदात’
‘ये लो आझादी’ म्हणत युवकाचा आंदोलकांवर गोळीबार

नवी दिल्ली:दिल्लीच्या उत्तरपूर्व भागातील दंगली अजूनही चालूच आहेत आणि किमान २० लोकांचा त्यात मृत्यू झाला आहे. महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी बुधवारी सकाळी या विषयावर आपले मत व्यक्त केले. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी संपादकीयांचा उपयोग केला.

इंडियन एक्स्प्रेसने मात्र या विषयाबाबत मौन बाळगले.

अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहिजे:द हिंदू

प्रशासनाची परीक्षा: दिल्ली हिंसाचार”, या शीर्षकाच्या संपादकीयामध्येद हिंदूने दंगलींबद्दल निश्चित भूमिका घेतली. त्यांनी दिल्ली राज्याचे पोलिस आणि गृहमंत्री अमित शाह यांना संयुक्तपणे या दंगलींना जबाबदार धरले, तसेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही यातून वेगळे राहू शकत नाहीत असे सुचवले.

या वृत्तपत्राने अलिकडच्या काळात राजधानीमध्ये घडलेल्या अनेक घटनांची साखळी अधोरेखित केली, ज्यामध्ये जामिया मिलिया इस्लामियाच्या आसपासच्या क्षेत्रांमध्ये १६ डिसेंबर रोजी झालेली जाळपोळ आणि हिंसा, ५ जानेवारी रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरचा हल्ला आणि ३० जानेवारी रोजी जामिया परिसराजवळ सीएए विरोधी निदर्शकांवर एका बंदूकधाऱ्याने केलेला गोळीबार या घटनांचा समावेश होतो.

त्याने तीनही मोठ्या घटनांमध्ये दिल्ली पोलिसांची “निष्क्रियता आणि अकार्यक्षमता” यांची दखल घेतली आणि झालेल्या हिंसाचाराच्या प्रति गृहमंत्रालयाच्या प्रतिसादाचा निषेध केला. दंगली “अनेक आठवड्यांपासून हळूहळू घडत होत्या” यावर त्याने भर दिला. पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची “कार्यक्षमता आणि प्रशासकीय कौशल्य” सिद्ध करण्यासाठी कठोर पावले उचलावीत असे आवाहनही त्याने केले.

दिल्ली पोलिस आयुक्तांनी उत्तर दिले पाहिजे: हिंदुस्तान टाईम्स

दिल्लीला गरज एका सशक्त पोलिस प्रमुखाची…”, या शीर्षकाच्या संपादकीयामध्ये हिंदुस्तान टाईम्सने बहुतांश दोष दिल्ली पोलिसांचे सध्याचे आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्या माथी मारला. या वृत्तपत्राने सीएएविरोधी आणि सीएए समर्थकांची निदर्शने, सर्व छटांचे राजकीय पक्ष आणि अधिक प्रमाणात भारतीय जनता पक्ष यांनाही दोष दिला.

परंतु पोलिसांचे परिस्थितीचे चुकीचे आकलन आणि खराब नियोजन अधोरेखित करत सर्वात जास्त दोषी राज्य पोलिसदलच असून, काही दोष गृहमंत्रालयाचाही आहे असे त्यांनी म्हटले. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी नियंत्रणात आणता आली असती असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शाहीन बागचे त्यांच्या शांततेत चाललेल्या आंदोलनाकरिता कौतुक केले आणि “ही जगातील सर्वात यशस्वी ‘ऑक्युपाय’ चळवळ”असल्याचेही म्हटले मात्र पहिल्याच दिवशी निदर्शकांना पर्यायी जागी न हलवल्यासाठी पोलिसांना जबाबदार धरले.

भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला धक्का: टाईम्स ऑफ इंडिया

दिल्ली दंगली, पुन्हा: भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर वाईट परिणाम. दिल्लीची आग पसरण्याआधी विझवा,”, या शीर्षकाच्या आपल्या संपादकीयामध्ये टाईम्स ऑफ इंडियाने दंगलींचा भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर होणाऱ्या वाईट परिणामांवर भर दिला आहे. शहराच्या काही भागात हिंसाचार चालू असताना डोनाल्ड ट्रम्प भारताच्या “सांप्रदायिक एकतेची” कशी स्तुती करत होते याबद्दलही त्यात लिहिले आहे.

या वृत्तपत्राने दिल्ली पोलिसांवर थेट हल्ला चढवला आहे. “पोलिसांनी दंगलखोरांना काबूत आणण्याकरिता फारच थोडे बळ लावले होते, तसे करून त्यांनी आपल्याच लोकांचे जीवन धोक्यात घातले,” असे त्याने म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आपली जबाबदारी झटकून टाकू शकत नाही असेही त्याने म्हटले आहे.

हिंसेचा निषेध करताना त्याने भाजप नेता कपिल मिश्रा याच्या “चिथावणीखोर वक्तव्यानंतर” त्याने सीएए समर्थकांच्या जमावाचे नेतृत्व करणे यातून “भविष्यसूचक” चिन्हे दिसून येत होती असे म्हटले आहे. पोलिसांच्या “आश्चर्यकारक अक्षमतेबद्दल” त्यांच्यावर टीका करत, अधिक “व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या पोलिस दलाने” अधिक चांगली कामगिरी केली असती असेही नमूद केले आहे. १९८४ च्या सांप्रदायिक हिंसाचाराचा इतिहास उद्धृत करत त्यांनी राजकारण्यांनी अपयशासाठी आत्मपरीक्षण करावे, जेणेकरून भारताला जगापुढे मान खाली घालण्याची वेळ येणार नाही असेही त्याने म्हटले आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0