विस्कटलेल्या, पोळलेल्या कौटुंबिक वातावरणाचा मुलांवर होणारा परिणाम हा हिरोशिमा-नागासाकीवर पडलेल्या बॉम्ब इतकाच भयानक व भीषण असतो. पडलेल्या बॉम्बचे दुष्परिणाम पुढील कित्येक पिढ्यांवर झालेले आहेत. तसेच कुटुंबात वारंवार होणाऱ्या कलहाचे परिणाम देखील पुढे संक्रमित होतात. त्याचे अनिष्ट परिणाम कुटुंबसंस्कृतीवर पर्यायाने समाजावर होत असतात.
मकां से क्या मुझे लेना मकां तुमको मुबारक हो
मगर ये घास वाला रेशमी कालीन मेरा है.. (बशीर बद्र)
मध्यरात्री एक स्त्री (अॅलेक्स) आपला नवरा (सॅम) निर्धास्त झोपला आहे, हे बघून दबक्या आवाजात शूज घालते. अगदी थोडं सामान आणि झोपलेल्या आपल्या तीन वर्षांच्या मुलीला (मॅडी) उचलते. घरातल्या विखुरलेल्या काचा आणि सामान यातून वाट काढत गाडीपाशी जाते. आपल्या लहानग्या मुलीला मागील सीटवर व्यवस्थित झोपवते आणि गाडी सुरू करते. तितक्यात तिचा नवरा बाहेर येऊन “तू हे काय करते आहेस. थांब! थाब!!” असा आरडाओरड करत असतांना, अॅलेक्सची गाडी रस्त्याला लागलेली असते. गाडीच्या दिव्याच्या उजेडात लांबलचक अंधाऱ्या रस्त्यातून मार्ग काढत अॅलेक्सची गाडी घरापासून दूर, दूर जात असते. इथून सुरू होते नेटफ्लिक्स वरील ‘मेड’ या वेबसिरीजची गोष्ट.
‘चिऊचं घर मेणाचे, काऊचं घर शेणाचे’…याच लयीत आणि आपलं घर?? या प्रश्नावर अडखळणाऱ्या स्त्रियांच्या घुसमटीच्या गोष्टी आजही जगासमोर मांडल्या जातात, ही खेदजनक बाब आहे. घरंच जेव्हा जगातली सर्वात असुरक्षित जागा बनतं, तेव्हा घराबाहेरील बेभरवशाच्या अफाट दुनियेत एक सुरक्षित कोपरा शोधण्याची वेळ येते. असाच एक कोपरा शोधायला निघालेल्या एका नायिकेची म्हणजे अॅलेक्सची कहाणी.
अमेरिका या प्रगत देशातले हे कथानक दाखवले आहे. अनेक ठिकाणी स्त्री म्हणून, आई म्हणून अॅलेक्स आपल्याच पठडीतील वाटते. कौटुंबिक हिंसाचार हा विषय कथेचा मूळ गाभा आहे. मुलीला घेऊन घर सोडण्याच्या निर्णयानंतर जगण्यासाठीची, मुलीला चांगलं आयुष्य देण्याची तिची धडपड दाखवत असतांना स्त्री हक्क, सरकारी सवलती, तरतुदी, सपोर्ट सिस्टीम, शेल्टर होम याबद्दलची माहितीवजा प्रसार असा थोडा डॉक्युमेंटरी पद्धतीचा भाग कथेत आहे. २५ नोव्हेंबर हा International Day for the Elimination of Violence against Women म्हणून घोषित केला आहे. अशावेळी ‘मेड’सारख्या मालिका मनोरंजनाबरोबर उभारी देण्याचे उत्तम काम करतील.
अॅलेक्स घर नेमकं का सोडते? एरवी चांगला वागणारा तिचा नवरा दारू पिऊन घरी आल्यावर कायम आरडाओरड, सामानाची आदळआपट, तोडफोड करत असतो. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर सॅमला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत असे. परत असे वागणार नाही, याची ग्वाही देत असे. पण ते फार काळ टिकत नसे.
त्या रात्री केवळ जेवणानंतरच्या सिंकमध्ये राहिलेल्या भांड्यांचा वास येतोय, म्हणून पिऊन आलेल्या सॅमचा राग अनावर होतो. त्या भरात तो बेफाम होऊन सामानाची तोडफोड करत असतांना, एक काचेचा तुकडा उडून मॅडीच्या केसात अटकतो. इथेच धोक्याची घंटा अॅलेक्सच्या मनात वाजते. अशा वातावरणात आपल्या मुलीला वाढवण्यात अर्थ नाही, हे उमजल्यानंतर अॅलेक्स कोणताच विचार न करता घर सोडते.
पुरुष हे असे वागतातच. ही काही बाऊ करण्यासारखी गोष्ट नाही. असं अनेकांना वाटतं. ही काही कौटुंबिक हिंसा वगैरे नाही हं! असा अनेक स्त्रियांचा समज असतो. अगदी अॅलेक्सला देखील असेच वाटत असते. बेघर योजनेत सध्या जागा उपलब्ध नसल्याने तिथली समुपदेशक तिला डोमेस्टिक वायलेंस शेल्टरमध्ये जाण्याचा सल्ला देते. तेव्हा अॅलेक्स म्हणते, “जिच्यावर खरा अत्याचार झाला आहे. अशा कोणाची जागा मी घेऊ इच्छित नाही.” त्यावर समुपदेशक विचारते, “खरा अत्याचार कसा असतो?” अॅलेक्स म्हणते, “मारहाण, शारीरिक इजा केल्याने”. समुपदेशक विचारते, “मग खोटा अत्याचार कसा असतो? धमकावल्याने, ओरडण्याने, घाबरून टाकल्याने??
अॅलेक्सला आपली चूक लक्षात येते.
मुलीला अशा भयप्रद वातावरणात ठेवायचे नाही. या निर्णयामागे देखील अॅलेक्सच्या बालपणीच्या काही घटना कारणीभूत असतात.
All happy families are alike; each unhappy family is unhappy in its own way. – (लियो टॉलस्टॉय)
विस्कटलेल्या, पोळलेल्या कौटुंबिक वातावरणाचा मुलांवर होणारा परिणाम हा हिरोशिमा-नागासाकीवर पडलेल्या बॉम्ब इतकाच भयानक व भीषण असतो. पडलेल्या बॉम्बचे दुष्परिणाम पुढील कित्येक पिढ्यांवर झालेले आहेत. तसेच कुटुंबात वारंवार होणाऱ्या कलहाचे परिणाम देखील पुढे संक्रमित होतात. त्याचे अनिष्ट परिणाम कुटुंबसंस्कृतीवर पर्यायाने समाजावर होत असतात.
विभक्त झाल्याने मुलांसमोर कौटुंबिक चित्र उभे करतांना, मुलांची गोंधळली अवस्था कशी करायला नको, या बद्दलचा ‘मेड’ मधला एक प्रसंग खूप विचारात टाकणारा आहे. ‘थँक्स गिव्हिंग’च्या वेळी मॅडी आपल्या वडिलांसोबत असते. तिला सोडायला आलेला सॅंम अॅलेक्सला म्हणतो, “तू येशील असं वाटलं होतं.” त्यावर ती उत्तर देते, “मॅडीला गोंधळात टाकायचे नाहीये की आपली आई नेमकी कोठे राहते म्हणून”.
मॅडीचे बालमन जपण्याच्या नादात जर आपण तात्पुरता दिखाऊपणा केला तर त्याचे रूपांतर तिच्या मानसिकतेसाठी घातक ठरू शकते, याची स्पष्ट कल्पना असलेली अॅलेक्स खूप परिपक्व आई दाखवली आहे. तिला मॅडीची द्विधा मनस्थिती करायची नसते. त्यापेक्षा आपले पालक विभक्त आहेत, हे सुस्पष्ट चित्र तिच्यासमोर असणे, जास्त योग्य.
आपल्या मुलीला एक उबदार आयुष्य देण्यासाठी घर सोडल्यानंतर लगेचच हाऊस क्लिनिंग सेंटरमध्ये कशीबशी नोकरी मिळते. लग्न लवकर केल्यामुळे कॉलेजला जाऊ शकलेली नसते. कोणत्याही स्वरूपाचे स्पेशल स्किल्स तिच्याकडे नसतं. या पूर्वी कधी नोकरी केलेली नसते. त्यामुळे मिळणारे मेडचे काम ती स्वीकारते. कामाचे स्वरूप असे असते की मागणीनुसार वेगवेगळ्या घराची साफसफाई करणे. घरातील फर्निचर, खिडक्या- दारे, फरशा, फ्रीज, ओट्यापासून पार टॉयलेट, बाथरूम या सगळ्याची सफाई करणे.
मग सुरू होते दुहेरी कसरत नोकरी, मुलीचे संगोपन. तिचा या संघर्षमय प्रवासाच्या जोडीला अनेक गोष्टी घडत असतात. अॅलेक्सला आई आणि वडील दोघेही असतात. पण खूप आधीच ती दोघे विभक्त झालेले असल्याने अॅलेक्स स्वतः या सर्वातून गेलेली असते. वडिलांनी दुसरं लग्न केले असते. त्यांना अजून दोन मुली असतात. वडिलांबद्दल अॅलेक्सच्या मनात बालपणापासून अढी असते. आई चित्रकार असते. ती कायम वेगळ्याच धुंदीत असते. अत्यंत विचित्र, लहरी कारभार असलेली आणि मुक्त जीवन जगणारी आई देखील आपल्या मुलीला नवऱ्याकडे परत जाण्याचे सल्ले देते. सॅम सुधारण्यासाठी हेल्प सेंटरमध्ये जात असतो, दारू सोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे हे प्रयत्न अॅलेक्सच्या वडिलांना देखील प्रामाणिक वाटतात. कारण ते देखील अजूनही सेंटरमध्ये जात असतात. त्यामुळे सॅम फारसा काही वावगं वागतोय, हे त्यांच्या ध्यानीमनी देखील येत नाही.
मुळात आपण काही चुकीचे वागतो आहे, आपली वागणूक हिंसक आहे, याची पुरुषांना जाणीव नसते. कौटुंबिक हिंसाचार हा जगाच्या पाठीवर सर्वत्र दिसतो. त्याला कारण पाच हजार वर्षांपासूनचा पुरुषसत्ताक व्यवस्थेचा प्रभाव पुरुषांच्या मानसिकतेवर अजून मोठ्या प्रमाणात आढळतो. करोना काळात जगभरात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण दुप्पटीने – तिप्पटीने वाढल्याचा अहवाल सांगतो. आपलं नैराश्य, वैफल्य, अपयश, नकारात्मकता हक्काच्या बायकोवर व्यक्त करण्याचा हा सोपा उपाय असतांना, स्वतःवर नियंत्रण ठेवणे, स्वतःची जबाबदारी घेणे, स्वतःवर काम करणे यावर कष्ट करायची काय गरज? मर्दांगीचे हे समीकरण सार्वत्रिक आहे. एका सर्व्हेनुसार ४०% पुरुष पारंपरिक पद्धतीच्या लिंगविशिष्ट भूमिकाच आदर्श मानतात. अल्वा मीर्दाल या नोबेल पारितोषिक प्राप्त स्वीडिश समाजसेविका यांनी यांविषयी आपले परखड मत मांडले आहे.- जोपर्यंत कोणत्याही देशाच्या समृद्धीचे मोजमाप करत असताना जंगल, जमीन, सूर्यप्रकाश समुद्रकिनारा, खनिजसंपत्ती इ.स्रोतांच्या बरोबरीने त्या देशातील ‘स्त्रिया’ या मानवी स्त्रोताची दखल घेतली जात नाही, तो पर्यंत तो देश खऱ्या अर्थाने समृद्ध होऊच शकणार नाही.’
सॅमच्या वागणुकीतला सुधार बघून आणि परिस्थितीमुळे हातातून काही गोष्टी निसटल्यामुळे अॅलेक्सला परत सॅमच्या घरी यावे लागते. काही दिवस ठीक गेल्यावर परत ये रे माझ्या मागल्या सुरू होते. सॅमचा पुरुषी अहंकार जास्त वाढीस लागतो. तो पूर्वीपेक्षा जास्त अधिकार गाजवायला लागतो. माझ्या वागण्याला, दारू पिण्याला अॅलेक्स कशी जबाबदार आहे, असा कांगावा इथे देखील आढळतो.
अॅलेक्स यावेळी पूर्ण विचारांती घर सोडते ते कायमस्वरूपी. परत सेंटरमध्ये राहायला जाते. आपली मेडची नोकरी अधिक जोमाने सुरू करते. मेडच्या कामात जीव ओतते. त्यामुळे तिला चांगली मागणी असते. तिच्या चांगल्या लोकांशी ओळखी होतात. ती डोमेस्टिक सेंटरच्या ग्रुपमध्ये सहभागी होते. तिथल्या मैत्रिणीशी हितगुज करते. त्यांना मोकळं व्हायला मदत करते. या प्रवासात मागे पडलेलं तिचे लिखाण कौशल्य परत गवसते. मेड म्हणून लोकांच्या घरात वावरतांना घराच्या ठेवणीतून, वस्तू, खाण्यापिण्याच्या सवयी यातून ती माणसांचे स्वभाव,विचारप्रक्रिया कशी असू शकते, त्याचे परस्परांशी संबंध कसे असतील, याबद्दल अतिशय संवेदनशील पद्धतीने आपल्या लेखणीतून मांडते. तिचे लिखाण हा ‘मेड’ मधला खूप भन्नाट प्रकार आहे. तो परत, परत बघण्याचा, ऐकण्याचा मोह निश्चितपणे होतो. तसेच डोमेस्टिक सेंटर मधली एक अॅक्टिव्हीटी दाखवली आहे. प्रत्येक जणी आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण सांगतात. ते क्षण ऐकत असतांना स्त्रीमनाचे सुरेख दर्शन होते. कोणी आपला असा क्षण सांगितल्यावर सर्व जणी दोन्ही हाताने चुटक्या वाजून समोरचीचे कौतुक करतात. वाईट मनस्थितीतून नुकत्याच बाहेर पडलेल्या या स्त्रियांना ही छोटी कौतुकाची पावती खूप महत्त्वाची वाटते.
पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून जात. जगण्याची लय अॅलेक्सला सापडली असते. आधी मिळालेल्या लिखाणासाठीची शिष्यवृत्तीसाठी ती परत प्रयत्न करते. त्यात तिला मिळतो मोंताना युनिव्हर्सिटीत लिखाणासाठी प्रवेश. शिष्यवृत्ती मिळते. त्याच परिसरात राहायला घर, मॅडीसाठी चांगली शाळा, फावल्या वेळेत तिथे मेडचे काम असं सर्व गणित ती जमवून आणते. परत नवरा नावाची माशी शिकते. पण सर्व गोष्टी सुरळीत होऊन अॅलेक्स आणि मॅडी मोंतानाच्या दिशेने रवाना होतात. तिथल्या एका पर्वतावर मोठ्या अक्षरात ‘M’ लिहिलेला असतो. त्या पर्वतावर आपल्या मुलीला खांद्यावर बसून नेते. तिला वरून दिसणारे मोंताना शहर दाखवते. जिथे तिला जगातली सर्वात सुरक्षित व ऊबदार जागा मिळणार असते. त्यासाठी अनेक दिव्यातून तिला जावे लागलेले असते. ती आनंदाने आरोळी ठोकते. तिच्यासाठी त्या मोठ्या ‘M’ चा अर्थ मॅडी असतो… आणि आपल्यासाठी ‘M’ चा अर्थ असतो मेड. अशी मेड जिने इतरांच्या घरांची साफसफाई करता, करता स्वतःच्या आयुष्याची जळमटे काढली असतात..
देवयानी पेठकर शॉर्टफिल्म दिग्दर्शिका आहेत.
COMMENTS