वाघ हल्ल्यात मृत वनरक्षकाच्या कुटुंबाला १५ लाख

वाघ हल्ल्यात मृत वनरक्षकाच्या कुटुंबाला १५ लाख

मुंबई: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इंडिया आर्ट फेअरमध्ये इक्बालच्या ओळी आणि पोलिसांची कारवाई
‘असत्याचे राजकारण करणाऱ्यांना गांधी कसे समजणार?’
मुल्ला ओमरचे युद्धग्रस्त जग

मुंबई: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले. मृत स्वाती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या पतीला वनविभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक स्वाती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांनी मृत ढुमणे यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच स्वाती ढुमणे यांच्या पतीला वनविभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देश दिले आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा वन परिक्षेत्रात शनिवारी सकाळी माया नावाच्या वाघिणीच्या हल्ल्यात वनरक्षिका स्वाती ढुमणे या ठार झाल्या. या घटनेने वनविभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. देशभरामध्ये सध्या वाघांच्या गणनेचे काम सुरू असून, त्याची पूर्वतयारी म्हणून स्वाती आणि इतर तीन वनकर्मचारी ट्रान्झॅक्ट लाईनचे काम करत असताना ही घटना घडली.

ट्रान्झॅक्ट लाईनचे काम सुरु असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ‘माया’ ही वाघीण दिसली होती. वाघीण त्या ठिकाणावरून निघून जाईल, म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अर्धा तास वाट पाहिली. मात्र माया वाघीण न गेल्याने स्वाती ढुमणे यांनी कामगारांसोबत दुसऱ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. कामगार जात असताना माया त्यांच्या मागे धावली. वनरक्षकाला वाचवण्यासाठी कामगार प्रयत्न करत असताना मायाने स्वातीवर हल्ला केला. माया वाघिणीने त्यांना जंगलात ओढत नेले आणि मारले. ही घटना सफारीसाठी आलेल्या पर्यटकांसमोर घडली. हे दृश्य पाहून पर्यटक घाबरले. या घटनेनंतर ट्रान्झॅक्ट लाईनचे काम थांबवण्यात आले आहे.

वाघिणीच्या हल्ल्यात वनरक्षिका ठार झाल्याची ही सर्व घटना परिक्षेत्र वन अधिकारी प्रदीप चौहान यांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले. स्वातीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिमूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आला.

वनविभागाच्या वतीने स्वाती यांचे पती संदीप सोनकांबळे यांना ५ लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. त्यांना आरुषी नावाची ४ वर्षांची मुलगी आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0