नवी दिल्लीः कट्टरवादी हिंदू संघटना व पोलिसांच्या दबावानंतर प्रसिद्ध हास्यकलावंत मुनव्वर फारुखी याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. गेल्या ३० दिवसांत त्या
नवी दिल्लीः कट्टरवादी हिंदू संघटना व पोलिसांच्या दबावानंतर प्रसिद्ध हास्यकलावंत मुनव्वर फारुखी याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. गेल्या ३० दिवसांत त्याचा रद्द करण्यात आलेला हा चौथा कार्यक्रम आहे. तर गेल्या दोन महिन्यात त्याचे १२ कार्यक्रम कट्टरवादी हिंदू संघटनांच्या धमक्यांमुळे बंद करावे लागले आहेत.
आपला कार्यक्रम रद्द करावा लागत असल्याचे कळाल्यानंतर फारुखी याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्याने ‘मत्सराचा विजय झाला, एका कलावंताचा पराभव झाला. माझे काम झाले, अलविदा.. अन्याय..’ असे उद्वेगाने लिहिले. या पुढे आपण असे कार्यक्रम करणार नाही, असेही फारुखीने जाहीर केले.
बंगळुरूच्या गूड शेफर्ड ऑडिटोरियममध्ये फारुखीचा कार्यक्रम होणार होता. पण त्याच्या कार्यक्रमाला हिंदू जागरण समिती या कट्टर हिंदू धार्मिक संघटनेने विरोध करण्यास सुरूवात केली होती. समितीचे मोहन गौडा यांनी हा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशीही धमकी दिली होती. त्यात पोलिसांनी फारुखीच वादग्रस्त व्यक्तिमत्व असून त्याच्या कार्यक्रमांना काही राज्यांमध्ये बंदी घातल्याचे कारण पुढे करत कर्टन कॉल या कार्यक्रमाच्या आयोजकांना त्याचा कार्यक्रम रद्द करावे असे सांगितले. पण पोलिसांनी आयोजकांना दिलेल्या पत्रात अनेक तपशीलात चुका केल्या आहेत. हे पत्र घाईगडबडीत पाठवल्याचे लक्षात येते.
कर्नाटक पोलिसांच्या पत्रात म्हटलेय की, काही संघटना मुनव्वर फारुखींच्या कार्यक्रमाला विरोध करत असल्याचे खात्रीलायक माहिती असून कार्यक्रमास परवानगी दिल्यास परिस्थिती बिघडू शकते. समाजातील सार्वजनिक शांतता व सौहार्दाचे वातावरण बिघडू शकते, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्यामुळे आपण हा कार्यक्रम रद्द करावा असा पर्याय आपण देत आहोत.
पोलिसांच्या पत्रात इंदूरमधील घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. इंदूरमध्ये एका भाजप आमदाराच्या मुलाच्या तक्रारीनंतर फारुखी याच्यावर धार्मिक भावना भडकावल्याचे आरोप लावले होते व त्याचा कार्यक्रम होण्याआधी त्याला अटक करण्यात आली होती. फारुखीला एक महिना तुरुंगात राहावे लागले होते, अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता.
या आधी म. प्रदेश उच्च न्यायालयाने फारुखी सारख्या व्यक्तींना माफ करता कामा नये, असे सांगत त्याचा जामीन अर्ज दोन वेळा फेटाळला होता.
नोव्हेंबरमध्ये फारुखीचा गोवा येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला काही कट्टरवादी संघटनांनी विरोध केल्यानंतर कार्यक्रम रद्द करावे लागले. छत्तीसगडमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने फारुखीचे कार्यक्रम होऊ दिले नव्हते.
त्या आधी मुंबईत बजरंग दलाच्या धमकीमुळे फारुखीचे कार्यक्रम होऊ शकले नव्हते.
मूळ बातमी
COMMENTS