इराकमधून दररोज एक दोन विमानं निघतात आणि बेलारूसची राजधानी मिन्स्क या शहरात पोचतात. विमानात इराक,सीरिया, अफगाणिस्तान अशा ठिकाणची माणसं असतात. त्या द
इराकमधून दररोज एक दोन विमानं निघतात आणि बेलारूसची राजधानी मिन्स्क या शहरात पोचतात.
विमानात इराक,सीरिया, अफगाणिस्तान अशा ठिकाणची माणसं असतात. त्या देशात जगणं अशक्य झालय. त्या देशात सरकारं असून नसल्यासारखी असतात. ती सरकारं आपल्याच नागरिकांना ठार मारतात, त्यांचा छळ करतात. ती सरकारं टोळी सरकारं आहेत.
विमानात बसलेल्या माणसांनी टीव्हीवरच्या दृश्यात जर्मनी पाहिलेलं असतं, युरोप पाहिलेलं असतं. तिथलं वैभव त्याना भुरळ पाडतं. तिथं काम मिळालं तर आयुष्याची चांदी होईल असा विचार त्यांच्या डोक्यात घोळत असतो. त्यांना सांगितलं गेलेलं असतं की त्यांना जर्मनीत पोचवलं जाईल. भीक मागून, नातेवाईक मित्रांकडून उसने घेऊन, घरदार विकून जमा झालेले पैसे यांनी ट्रॅव्हल एजंटला (ट्रॅव्हल एजंट? नव्हे स्मगलर, माणसांचं स्मगलिंग करणारे) दिलेले असतात. त्यानं तिकीट काढून दिलेलं असतं. मिन्स्कमधे पोचल्यावर पुढ काय ते त्यांना माहित नसतं, ते त्यांचं त्यांनी पहायचं असतं.
इस्तंबुल, दुबई या ठिकाणावरूनही विमानं मिन्स्कमधे पोचतात.
बेलारूसननं त्यांना बेलारूसचा व्हिसा दिलेला असतो.
खरं म्हणजे बेलारूसनं त्यांना आमंत्रणच दिलेलं असतं.
हज्जारो माणसं मिन्स्क विमानतळावर उतरतात. तिथं बेलारूसचे हत्यारबंद सैनिक त्यांचं स्वागत करतात. विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या लष्करी गाड्यांत त्या माणसांना कोंबलं जातं. गाड्या थेट बेलारूसच्या पोलंड आणि लाटविया या शेजारी देशांच्या हद्दीवर पोचतात.
माणसांना गाडीबाहेर काढलं जातं, हद्दीवर उतरवलं जातं. माणसांना तिथंच सोडून गाड्या निघून जातात.
या माणसांकडं पोलंड, लाटविया, लिथुआनिया या देशांचा म्हणजेच युरोपियन युनियनचा व्हिसा नसतो.
पलिकडं पोलंड, लाटवियाचे पोलिस असतात. ते लोकांना अडवतात. त्यांच्याकडं व्हिसा नसल्यानं त्यांना प्रवेश करू दिला जात नाही. पाच दहा, वीस पंचवीस, शेपाचशे, हजार पाच हजार माणसं गोळा झाल्यावर गोंधळ होतो. माणसं हद्द पार करायचा प्रयत्न करतात, पोलीस त्यांना बंदुकीच्या नळ्या- दस्त्यांनी हुसकून लावतात.
दररोज हा उद्योग व्हायला लागल्यावर पोलंड, लाटविया यांच्या पोलिसांनी हद्दीवर काटेरी कुंपण घातलं. माणसं ते तोडायचा प्रयत्न करू लागली, पोलिस त्यांना झोडपू लागले.
या हज्जारो लोकांना बेलारूस आपल्या देशात ठेवायला तयार नाही आणि युरोपियन देश त्यांना आपल्या देशात घ्यायला तयार नाहीत. माणसं हद्दीवर अडकून पडली. उघड्यावर. अन्न पाणी नाही. मरणाच्या थंडीत आजारी पडली. बेलारूस त्यांना औषधपाणी करायला तयार नाही.
वीस पंचवीस हजार माणसं अशा रीतीनं अडकून पडली.
लाटवियाची लोकसंख्या १९ लाख. मुंबईची लोकसंख्या आहे सव्वा कोटी. विचार करा. काही हजार माणसं लाटविया कशी सांभाळू शकणार. पण आंतरराष्ट्रीय कायदा तर सांगतो की बाहेरून आलेल्या स्थलांतरीतांना थारा देण्याचं बंधन देशावर असतं.
लाटविया, लिथुआनियानं बेलारूसच्या राजधानीत आपले दूतावास उघडून व्हिसाचे अर्ज पडताळून पहायची तयारी दाखवली. जेणेकरून योग्य ती माणस व योग्य तेवढी माणसं देशात घेता येतील. पण त्याला बेलारूसची परवानगी नाही.
ही दुरवस्था बेलारूसनं मुद्दाम तयार केलीय. बेलारूसचे प्रेसिडेंट लुकाशेंको यांनी युरोपला छळण्यासाठी हा उद्योग आरंभलाय. इराक, सीरिया, इस्तंबूल, दुबई इथून त्यांनी ही माणसं पैसे खर्च करून गोळा केलीत. ही माणसं पोलंडमधे किंवा लाटवियात थांबणार नाहीत. ती जर्मनीच्या दिशेनं जाणार. जर्मनी किती लोकांना सामावून घेणार. मग जर्मनी इतर युरोपीय देशांना सांगणार की यातली काही माणसं तुम्ही घ्या. ते देश तयार होणार नाहीत. कारण त्याची तेवढी क्षमताच नाही. शिवाय कोविडनं अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेत. जर्मनी व इतर युरोपीय देश आपसात भांडणार. थोडक्यात असं की ही माणसं युरोपला छळणार.
बेलारूसचं आणि युरोपचं भांडण चाललंय. म्हणून युरोपला छळण्यासाठी बेलारूसनं ही आयडिया काढलीय.
बेलारूस आणि युरोपीय देशांत भांडण चाललंय, कारण युरोपीय देशांनी बेलारूसवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. बेलारूसचे प्रेसिडेंट, मंत्री व अनेक व्यक्तींना युरोपात प्रवासाला परवानगी नाही, त्यांनी युरोपात साठवलेले पैसे युरोपीय बँकांनी, सरकारांनी गोठवले आहेत. कारण बेलारूसचं सरकार लोकशाही पाळायला तयार नाहीये. बेलारूसचा प्रेसिडेंट हुकूमशहा झालाय.
प्रेसिडेंट लुकाशेंको १९९४ पासून प्रेसिडेंट आहे. त्याच्या दादागिरी व भ्रष्टाचाराला वैतागून गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत लोकांनी त्याला पाडायचं ठरवलं. तर या पठ्ठ्यानं विरोध करू पहाणाऱ्या उमेदवारांना उभं रहायला परवानगी नाकारली आणि तरीही उभं रहाणाऱ्या उमेदवाराला तुरुंगात टाकलं. नागरीकांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिलं गेलं नाही. मतपत्रिकांवर लुकाशेंकोच्या नावावर शिक्के मारण्यात आले आणि ८० टक्के मताधिक्यानं निवडून आल्याचं त्यांनी स्वतःच जाहीर केलं.
गेली दोन वर्षं जनता शांततामय विरोध करत आहे. पोलिस त्यांना तुरुंगात ढकलत आहेत.
परवाचीच एक घटना. लुकाशेंकोचा मुलगा ऑलिंपिक कमीटीचा प्रमुख आहे. ऑलिंपिक कमीटीनं टोकियो ऑलिंपिकमधे भाग घेतलेल्या खेळाडूना चांगलं वागवलं नाही. एका खेळाडूनं त्या बद्दल नाराजी व्यक्त केली. सरकारनं त्या खेळाडूचा इतका छळ केला की त्या खेळाडूनं देशात न परतायचा निर्णय घेतला.
लुकाशेंकोच्या छळापासून सुटका करण्यासाठी विरोधक युरोपातल्या इतर देशात आश्रय घेतात. असाच एक युरोपात राजाश्रय घेतलेला विरोधक ग्रीसमधून लिथुआनियात जात होता. हे विमान काही काळ बेलारूसवरून उडत असताना बेलारूसच्या लढाऊ विमानांनी त्या विमानाला घेरलं आणि जबरदस्तीनं विमान मिन्स्कच्या विमानतळावर उतरवलं. कारण सांगितलं की म्हणे त्या विमानात बाँब होता. विमानतळावर पोलिस विमानात घुसले. त्या विरोधकाला पकडून विमानाबाहेर उतरवलं आणि नंतर विमान जाऊ दिलं.
युरोप आणि अमेरिकेनं राजकीय आणि आर्थिक निर्बंध लादले पण त्याचा काहीही परिणाम लुकाशेंकोवर होत नाही. कारण लुकाशेंकोला रशियाची मदत आहे. मदत कसली, लुकाशेंको रशियाकडून मिळणाऱ्या पैशावरच चालतो. रशिया बेलारूसला वायू आणि कच्चं तेल पडत्या भावात, जवळ जवळ फुकटच देतं. बेलारूस नंतर तो वायू व तेल इतर देशांना चढ्या भावात विकून पैसा मिळवतं.
सोवियत युनियन फुटल्यानंतर मोकळा झालेला बेलारूस रशियाचा मित्र राहिला. रशियाबरोबर तो एक सहयोगी देश झाला. पुतीन यांचा अमेरिकेवर राग आहे. अमेरिकेनं आपल्याला चांगलं वागवलं नाही असं पुतीन यांचं मत आहे. अमेरिका व युरोपीयन देशांशी पुतीन सतत मारामारी करत असतात. या मारामारीत त्यांना बेलारूसचा उपयोग होतो. युरोपात स्थलांतरीतांना घुसवून युरोपीय अर्थव्यवस्था आणि अंतर्गत संबंध बिघडवून युरोपला धडा शिकवण्याचा डाव लुकाशेंको खेळत आहेत. माझ्यावर निर्बंध लादता काय, मग द्या तोंड या संकटाला असं लुकाशेंको म्हणतात. पुतीन या बद्दल काही बोलत नाहीत याचा अर्थ त्यांचा या उद्योगाला पाठिंबा आहे. लुकाशेंको पुतीन यांची परवानगी घेतल्या शिवाय काहीही करणं शक्य नाही.
शेजारी देशाशी युद्ध करण्याची ही एक अजब आणि नवी तऱ्हा लुकाशेंकोनी निर्माण केलीय. युरोप हैराण आहे. बाहेरून येणारी माणस कशी थांबवायची ते त्यांना कळत नाहीये.
आर्थिक कोंडी करून बेलारूस ऐकणार नाही.
लुकाशेंकोना निवडणुकीत हरवणं हा एक उपाय आहे. रशियानं तो उद्योग अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीत निवडणुकीत ढवळाढवळ करून अजमावला. जमलं नाही. तो उद्योग युरोपला बेलारूसमधे करून पहावा लागेल. पण तो उपाय अंमलात येऊन प्रभावी ठरायला वेळ लागेल. त्यामुळं सध्याची कोंडी कशी सुटणार ते कळत नाहीये.
निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS