मुंबईः प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची येथे भेट घेतली.
मुंबईः प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची येथे भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ममता बॅनर्जी यांनी भाजपला विरोध करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यात त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरही टीका केली. यूपीए कुठे आहे, परदेशात राहून काहीच मिळणार नाही, असा टोला त्यांनी काँग्रेस पक्षाला व गांधी घराण्याचे नाव न घेता दिला. भाजपला हटवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. भाजप हटाओ व देश बचाओची वेळ आली, असे त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष उ. प्रदेश निवडणुका लढवणार नाही, असेही स्पष्ट केले.
या वेळी शरद पवार यांनी नेतृत्व हा काही सध्याच्या प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत समविचारी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगेच उत्तर दिले. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार पटोले म्हणाले, एका राज्यापुरता मर्यादित असलेला राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे. सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भाजपने लोकशाही आणि राज्य घटनेला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुलजी मोदी सरकारविरोधात लढले, असे पटोले म्हणाले.
ममतांची सिविल सोसायटीशी भेट
आपल्या मुंबई भेटीत ममता बॅनर्जी यांनी सिविल सोसायटीतील काही मंडळींशी चर्चा केली. यात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, चित्रपट दिग्दर्शक निर्माते महेश भट, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, अभिनेत्री रिचा चढ्ढा, हास्य कलाकार मुनव्वर फारुखी आदी उपस्थित होते. भारत हे सर्वसमावेश संस्कृतीचा देश आहे. विविधतेत एकता हे आपले मूळ आहे, असे त्या म्हणाल्या. आपण या घडीला क्रूर, लोकशाहीला धाब्यावर बसवणार्या शक्तींचा सामना करत असल्याचे त्या म्हणाल्या.
जावेद अख्तर, शाहरुख खान यांना ठरवून टार्गेट केले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.
मूळ बातमी
COMMENTS