तत्त्वज्ञानाचा नकाशा

तत्त्वज्ञानाचा नकाशा

बर्ट्रंड रसेल दर्शन: भाग ८ - ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ज्ञान, अस्तित्व/सत्ता, तर्क, शिव (चांगले), सौंदर्य या 'पाच मूलभूत संकल्पना', त्यांच्यातून उद्भवणारे 'ज्ञान म्हणजे काय? , 'अस्तित्व/सत्ता म्हणजे काय?', 'तर्क म्हणजे काय?' 'चांगले म्हणजे काय?' आणि 'सौंदर्य म्हणजे काय?' हे मूळ पाच प्रश्न आणि त्या अनुषंगाने तत्त्वज्ञानाच्या पाच ज्ञानशाखा काही दशकांपासून ग्रीक-पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानाच्या विकसन प्रक्रियेत स्थिर झाल्या. पारंपरिक अर्थाने या पाच शाखांना 'शाखा' (branches or disciplines) म्हटले जाते.

“…..चे तत्त्वज्ञान”
तत्त्वचिंतनाचे शत्रू
बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली

रसेलच्या मते, ईश्वरशास्त्र (Theology) आणि विज्ञान (Science) यांच्या मध्ये (intermediate) किंवा ‘दरम्यान’ (between) चा ‘निर्जन निर्मानवी प्रदेश’ (No Man’s Land) ला तत्त्वज्ञानआहे. ईश्वरशास्त्र आणि विज्ञान या दोघांच्या ‘निर्जन निर्मानवी प्रदेश’ प्रदेशावरील सततच्या हल्ल्यामुळे तत्त्वज्ञान विकसित झाले, म्हणजेच विविध प्रकारची सामाजिक विज्ञाने, निसर्ग विज्ञाने आणि आजच्या आधुनिक भाषेतील मानव्य विज्ञाने, अनेक उपयोजित विज्ञाने व कला यांचा उगम तत्त्वज्ञानातून झाला. प्रश्न विचारला आणि उत्तर मिळाले की त्याचे विज्ञान होत गेले, असे घडल्यामुळे प्रत्येक विज्ञान व कला यांना आणि धर्मज्ञानालाही चिकित्सक स्वरूपाच्या तत्त्वज्ञानाचेच अधिष्ठान आहे, याचा अर्थ तत्त्वज्ञान सर्व ज्ञानविज्ञान शाखांना पाच संकल्पनांच्या व्यापक व समान वैचारिक पातळीवर आणते, तिथून त्यांचा विस्तार होतो.

मध्ये किंवा ‘दरम्यान’ म्हणजे काय? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधतच ह्या पाच संकल्पना निर्माण होतात. त्यामुळे त्यांची स्थाननिश्चिती करताना त्यांचा नकाशा तयार करता येतो.

‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (

तत्त्ववेत्त्यांचा नकाशा

तत्त्ववेत्त्यांचा नकाशा

) या संकल्पनेचे सर्वसाधारण सैद्धांतिक स्वरूप परिपूर्ण नाही. विशेषतः प्रत्येक तत्त्वचिंतक त्याच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानानुसार ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ संकल्पनेची रचना करतो आणि त्याचे तत्त्वज्ञान मांडतो. त्याचे तत्त्वज्ञान या पाच प्रदेशांनी बनते. म्हणून त्या प्रदेशांच्या नकाशाच्या आधारे तत्त्ववेत्त्यांचाही नकाशा बनवता येईल. परिणामी कोणता तत्त्ववेत्ता कोणत्या प्रदेशाचा अधिकारी आहे किंवा राजा-सम्राट, अध्वर्यू आहे, हे समजू शकते. या पाच शाखांकडे अत्याधुनिक आधुनिक परिभाषेत तत्त्वचिंतकाच्या चिंतनाच्या ‘वर्गीकरणाचे तत्त्व’ (the principle of classification) म्हणूनही पाहाता येईल.

  • ज्ञानशास्त्र Epistemology

ज्ञान म्हणजे काय ? हा प्रश्न प्राचीन भारतीय आणि प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्यांनी उपस्थित केला आणि विविध सिद्धांत मांडले. ज्ञान म्हणजे काय ? या प्रश्नाशी झगडणे म्हणजे ज्ञानशास्त्र निर्माण करणे.

मानवी ज्ञानाचे स्वरूप, त्याची व्याप्ती, मर्यादा, प्रमाणे, प्रामाण्याचे निकष आणि समग्र अस्तित्वाचा ज्ञानाशी असलेला संबंध ,या प्रश्नांचा विचार तत्त्वज्ञानाच्या ज्ञानशास्त्र या शाखेत केला जातो. पुढे जाऊन ‘ “आपण जाणतो” हेच कसे आपण  जाणतो ? म्हणजे’ एखाद्या गोष्टीचे ज्ञान होते, याचेच ज्ञान कसे होते ? याचाही विचार ज्ञानशास्त्रात होतो.

इंग्लिशमधील Epistemology या संज्ञेचे भाषांतर म्हणून ‘ज्ञानशास्त्र’ ही संज्ञा उपयोगात आणली जाते. Epistemology ही संज्ञा जेम्स फेरीएर (James Frederick Ferrier जन्म: १६ जून १८०८, मृत्यू: ११ जून १८६४) या स्कॉटीश तत्त्ववेत्त्याने प्रथम सुव्यवस्थितपणे प्रचारात आणली. ग्रीक भाषेतील episteme म्हणजे ज्ञान आणि logos म्हणजे शास्त्र म्हणून Epistemology चा अर्थ ज्ञानशास्त्र. ही संज्ञा फेरीएरने प्रचलित केली तरी तिचा तात्त्विक आणि शास्त्रीय पाया जर्मन तत्त्ववेत्ता इमान्युएल कान्ट (Immanuel Kant, जन्म: २२ एप्रिल १७२४, मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४) याने घातला.

ग्रीक भाषेत episteme = science आणि logos = knowledge or explanation, असा अर्थ होतो, म्हणून “The Science of Knowledge is Epistemology ” अशी व्याख्या होते. “the science of” म्हणजेच “theory of knowledge”. Logos चा मूळ अर्थ माणसाच्या ‘आतील विचार करणारे तत्त्व, उदाहरणार्थ मन, आत्मा, बुद्धि इत्यादी. माणसाला ज्ञान कसे प्राप्त होते ? याचा विचार करताना ‘मन’, ‘आत्मा’ आणि ‘बुद्धि’ अशी तत्त्वे माणसाने शोधून काढली. ही तत्त्वे म्हणजे ज्ञानाचा मार्ग ठरला होता.

तीन पातळ्या

ग्रीक-पाश्चात्य धारणांनुसार ज्ञानशास्त्र तीन पातळ्यांवर काम करते.

(१) प्राथमिक पातळीवर मूलभूत मानवी ज्ञानाचे वर्णन  करणे आणि त्या संकल्पनेचे ज्ञान, भ्रम, प्रत्यक्षज्ञान, अनुमान, विधान, सत्य इत्यादी ज्ञानशास्त्रीय संकल्पनांचे विश्लेषण करणे, त्यांचा आशय स्पष्ट करणे आणि त्यांचा परस्परसंबंध निश्चित करणे हे कार्य करते.

(२) दुसऱ्या पातळीवर विविध विज्ञानांचे ज्ञानविषय, त्यांची ज्ञानविषयक उद्दिष्टे, त्यांची ज्ञानसाधने, त्यातून घडणारे त्यांचे स्व-रूप; आणि त्यानुसार त्या त्या विज्ञानाची पद्धती आणि एकूण ‘विज्ञान’ या ज्ञानरचनेची सामान्य पद्धती, तिचे प्रामाण्याचे निकष निश्चित करणे, हे काम ज्ञानशास्त्र करते.

(३) तिसरी पातळी म्हणजे, एखाद्या प्रस्थापित विज्ञानाच्या पद्धतीमध्ये व उद्दिष्टामध्ये गरजेनुसार बदल करण्याचे काम ज्ञानशास्त्र करते.तसेच अनुषंगाने वेगवेगळ्या विज्ञानांची गृहीतकृत्ये, त्यांच्या पद्धतीचा आधार असलेल्या मूलभूत संकल्पनांचा परस्परसंबंध स्पष्ट करून त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्याचे काम ज्ञानशास्त्र करते

तत्त्वज्ञानाचा नकाशा

तत्त्वज्ञानाचा नकाशा

या त्रिस्तरीय कार्यविभागणीमुळे विविध विज्ञानांची एक सुसंगत व्यवस्था लागते. साहजिकच “विज्ञान म्हणजे सुव्यवस्थित ज्ञान”, अशी व्याख्या शक्य होते. याचा अर्थ या सर्व कार्यक्रमातून ‘विज्ञान’ ही एक व्यापक रचना बनते;  तिचे नियम तयार होतात, त्यातून वैज्ञानिक पद्धती विकसित होते. नंतर विविध विज्ञानांची रचना होताना त्या त्या विज्ञानाचे अंतर्गत नियम बनतात. हे नियम बदल करवून घेण्यास नेहमीच तयार असतात. नवा शोध आला की त्यातून लाभणारे निष्कर्ष  ‘विज्ञान’ ही संकल्पनाही बदलू शकतात. परिणामी वैज्ञानिक पद्धतीही ‘बदलू शकते’. या साऱ्या परिवर्तनांची दखल ज्ञानशास्त्र घेत असते. तेच त्याचे ‘कार्य’ असते.

(२) सत्ताशास्त्र   Metaphysics

संस्कृतमधील  ‘सत्’ पासून ‘सत्ता’ शब्द होतो.  ‘सत्’ म्हणजे अस्तित्वात’ असणे. तोच अर्थ मराठी इत्यादी भारतीय भाषेत येतो. पर्यायाने ‘सत्ता म्हणजे ‘अस्तित्वात’ असणे. म्हणून सत्य हीच सत्ता. अशा रीतीने ‘अस्तित्व’ (existence) हा ‘सत्य’ या शब्दाचा समांतर शब्द मानला गेला.

सत्य म्हणजे जे ‘आहे, असतेच’ (“जे नाही, असे म्हणता येत नाही”) असे अस्तित्व’. सत्याचे असणे म्हणजे सत्तावत्, सत्तावान असणे. या सत्तेच्या ज्ञानाची सुव्यस्थित रचना करणे, म्हणजेच  सत्ताशास्त्र रचणे.

इंग्लिशमधील  “existence” हा शब्द लॅटीन भाषेतील existere या शब्दापासून बनतो . existere चा अर्थ “प्रकट होणे, वास्तवात येणे, अस्तित्वात येणे”. खरे तर existere या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे “to stand out”, “कशाच्या तरी – बाहेर येणे”.

पाश्चात्य परंपरेत सत्ताशास्त्राला Metaphysics अशी संज्ञा आहे. ती ऱ्होडचा अँड्रोनिकस  (Andronicus of Rhodes  इ.स.पू.६०) या ग्रीक पंडित ग्रंथपालाने ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाला उद्देशून प्रचारात आणली. अॅड्रोनिकस हा अॅरिस्टॉटलने स्थापन केलेल्या ‘येरझाऱ्या पंथा’ चा (The Peripatetic school) अकरावा प्रमुख आणि संपादक-ग्रंथपाल होता. स्वतः अ‍ॅरिस्टॉटल त्याच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख  ‘आदितत्त्वज्ञान’ (The First Philosophy) किंवा ‘प्रज्ञान’ (Wisdom) अथवा ‘ईश्वरविद्या’ असा करतो.

अ‍ॅरिस्टॉटलच्या मृत्युनंतर सुमारे शंभर वर्षांनी त्याच्या साऱ्या लेखनाचे, निबंधांचे वर्गीकरण अँड्रोनिकसने केले. त्यात आधी इतिहास, राज्यशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रविषयक लेखन रचले गेले, नंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादी नैसर्गिक शास्त्रे रचली गेली. त्यात भौतिकशास्त्र शेवटी रचले गेले. त्यानंतरही ज्यांचे असे वर्गीकरण शक्य नाही असे ईश्वर, कार्यकारण, प्रेम, सद्गुण, प्लेटोवरील टीका इत्यादी विषय आले. हे सारे लेखन क्रमवारीत भौतिकशास्त्रा ‘नंतर’ आले, त्यामुळे या ग्रंथांना After the Physics म्हणून Metaphysics असे नाव मिळाले . (ta meta ta physika biblio किंवा the books that come after the [books on] physics. ग्रीक भाषेत Meta म्हणजे ‘नंतर’ (beyond, upon or after) आणि physikā म्हणजे Physics. त्यामुळे अँड्रोनिकसने या लेखनसंग्रहाचे नाव ‘metaphysics’ असे केले असावे, असे म्हंटले जाते. आधुनिक अभ्यासानुसार हे सारे वर्गीकरण त्याने कसे केले, इत्यादीची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही.

Metaphysics या इंग्रजी शब्दाचे संस्कृत, मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये अतिभौतिकी, अस्तित्वशास्त्र, तत्त्वमीमांसा, आध्यात्मशास्त्र, सत्ताशास्त्र, सद्वस्तूशास्त्र या संज्ञा उपयोगात आणल्या जातात. (यातील आध्यात्म आणि आध्यात्मशास्त्र या विषयी भारतीय मनाचे बरेच स्वतंत्र समज-गैरसमज आहेत आणि तो स्वतंत्र लेखाचा मोठा विषय आहे).

सत्तेचे/अस्तित्वाचे तीन प्रकार

सत्ताशास्त्र तीन सत्ता स्वीकारते:

(१) मूर्त जग : भौतिक वास्तव आणि माणसासह सर्व प्राणिजात

(२) अमूर्त संकल्पना : मन, सत्य, भ्रम, भौमितिक आकृत्या, गणिती संख्या, कारण कल्पना, ज्ञान, तर्क,

प्रेम, शहाणपण, समाज, राज्य, खुद्द या जगाचे अस्तित्व, इत्यादी.

(३) अमूर्त परतत्त्वे : आत्मा, जन्म, पुनर्जन्म, पूर्वस्मृती, पाप-पुण्य, मृत्यू, स्वर्ग, नरक, ईश्वर, अंतिम सत्य, शिव, इत्यादी.

अॅनॅक्झिमेंडर

अॅनॅक्झिमेंडर

आता, जग आणि जीव निश्चितपणे ‘सत्य’ आहेत, म्हणजे अस्तित्वात आहेत-सत्तावान आहेत. त्यांच्या जगण्याचे नियम निश्चित झालेले आहेत. ते निसर्ग नियम आणि सामाजिक नियम या स्वरूपाचे आहेत. जन्म-मृत्यू, जगाचे गूढ अस्तित्व इत्यादी पाहाता जगतबाह्य तत्त्वांची संकल्पना सुचते; म्हणून परतत्त्वे आहेत. ही सारी तत्त्वे म्हणजे अमूर्त संकल्पना असतात.

आता, प्रश्न उपस्थित होतात ते असे की समजा या तत्त्वांना मान्यता दिली, त्यांचे अस्तित्व स्वीकारले किंवा नाकारले तर काय होईल ? या संकल्पनांना, परतत्त्वांना खरेच ‘अस्तित्व’ आहे काय? ‘अस्तित्व’ संकल्पनेचा नेमका काही अर्थ होतो का? त्यांच्या असण्या-

 

नसण्याचा समाजावर परिणाम काय होईल ? यांचा अभ्यास सत्ताशास्त्र करू पाहते आणि निष्कर्ष मांडते.

या तिन्ही प्रकारच्या सत्तांच्या परस्परसंबंधातून त्यांचे स्वरूप सत्ताशास्त्र उलगडू पाहाते. या सर्वांचा अभ्यास, चिकित्सा हा सत्ताशास्त्राचा विषय आहे.

(३) तर्कशास्त्र Logic

“माणूस हा विचार करणारा प्राणी आहे”, (Man is a Rational Animal) ही व्याख्या अॅरिस्टॉटलने दिली असा एक समज आहे.  अॅरिस्टॉटलचे  मूळ शब्द zoon logikon असे आहेत. Zoon हा शब्द zoo पासून बनतो. Logikon चा अर्थ ‘विचारशील’ असा होतो की नाही, हे निश्चित नाही. कारण Logikon या संकल्पनेत मन, आत्मा, विश्वातील सुव्यवस्था राखणारी नियंत्रक शक्ती, वैश्विक बुद्धी इत्यादी अर्थ सामावलेले आहेत.

अॅरिस्टॉटलच्या मते माणसाकडे अशी एक बौद्धिक शक्ती आहे किंवा अशी काही तत्त्वे आहेत की ज्यांच्या साह्य़ाने माणूस जीवनात सुसंगत प्रकल्प राबवितो. ती बौद्धिक शक्ती logikon शब्दाने सूचित होते. त्या शक्तीची-logikon ची सुव्यवस्थित रचना करणारे शास्त्र म्हणजे Logic..

Logic हा प्रत्यय लागूनच biology, anthropology, sociology, psychology, astrology, philology, morphology, technology, bio-technology, nano-technology असे नवे शब्द किंवा विषयाची नावे बनतात. प्रत्येक ज्ञानशाखा आपले Logic विकसित करूनच आपला संसार करते. तर्काचे साधे नाव अंदाज किंवा अनुमान. कौटुंबिक, सामाजिक व राजकीय घडामोडी किंवा सूर्यग्रहण, हवामान, पाऊसपाणी, दुष्काळ या नैसर्गिक  घटनांचे अंदाज आणि महागाई, बाजार, गुन्हेगारी इत्यादी त्यास जोडले गेलेले इतर घटक या विषयी अंदाज व्यक्त केले जातात. पण प्रत्येक अंदाज हा योग्य तर्क असतो, असे नाही. तर्काला वास्तवाचा, सत्य घटनांचा आधार असतो. अंदाज व्यक्तिगत भावना, इच्छा, वासना यांनी प्रभावित असतो. तर्क शास्त्रीय असतो तर अंदाज भावनिक, अशास्त्रीय असतो.

या ‘बौद्धिक शक्ती’ च्या साह्याने ‘विचार करणे’ ही कृती घडते, म्हणजेच दृश्य अनुभवक्षम जग आणि जगाचे विविध घटक, घटना, नियम, त्यांचा परस्परसंबंध  समजावून घेणे असते. याचा अर्थ माणूस केवळ निरीक्षण करतो असे नाही, तर जगातील वस्तुस्थितीविषयी ‘विचार’ करून काही निष्कर्ष काढतो. पण ‘बेशिस्त विचार म्हणजे विचार नव्हे’. विचार करणे, विचाराचे नियम पाळून सत्य व युक्त विचार करणे, योग्य निष्कर्षाला येणे; ही बाब निश्चित कृतीसाठी आवश्यक असते. त्यावेळी ‘विचार कसा करावा’, हाच एक विचार होतो आणि त्याचाही ‘विचार’ करावा लागतो. अशा विचारांच्या नियमांचे शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र.

इंग्लिशमधील Logic या शब्दाचे  भाषांतर म्हणून भारतीय भाषांमध्ये तर्कशास्त्र हा शब्द वापरला जातो.

तर्कशास्त्र हे सत्य आणि युक्त अनुमानांची रचना करणारे  शास्त्र असते. साधारणतः  अनुमानात काही विधाने सत्य म्हणून स्वीकारलेली असतात किंवा तात्पुरती सत्य मानलेली असतात आणि त्यांच्यापासून इतर काही विधाने आपण निष्पन्न केली जातात. सत्य म्हणून स्वीकारलेल्या विधानांना आधारविधाने म्हणतात आणि आधारविधानांपासून निष्पन्न केलेल्या विधानास निष्कर्ष म्हणतात. अनुमानाचे काही नियम असतात. त्या नियमांचा भंग झाला, तर त्याला ‘तर्कदोष’ म्हणतात. तर्कशास्त्रात अनुमानांच्या वेगवेगळ्या प्रकारांचे वर्गीकरण करून त्यांच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात येते आणि ही वेगवेगळ्या प्रकारची अनुमाने प्रमाण कधी असतात, प्रामाण्याच्या अटींचे कोणत्या याची चिकित्सा करण्यात येते.

तर्कशास्त्राचे साधारणतः तीन प्रकार करता येतात.

  • अॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र (Traditional Logic)
  • मध्ययुगातील लॉर्ड फ्रान्सिस बेकनचे (Francis Bacon, जन्म: २२ जानेवारी १५६१, मृत्यू: ०९ एप्रिल १६२६), नवे तर्कशास्त्र (Scientific Method or Induction) आणि
  • आकारिक तर्कशास्त्र (Formal Logic): एकोणिसाव्या शतकातील आधुनिक तर्कशास्त्र.

बेकनच्या तर्कशास्त्राने ‘विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती’ ला जन्म दिला. आधुनिक आकारिक तर्कशास्त्रात प्रामुख्याने गणितात वापरण्यात येणाऱ्या अनुमानांचे विश्लेषण केले जाते. चिन्हांचाही सढळ वापर करण्यात येतो. त्यास ‘गणिती तर्कशास्त्र’ किंवा ‘चिन्हांकित तर्कशास्त्र’ म्हंटले जाते.

या नव्या तर्कशास्त्राच्या तुलनेत अॅरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राला ‘पारंपरिक तर्कशास्त्र’ असे नाव दिले गेले. हे सगळे पाश्चात्य तर्कशास्त्र आहे. इंग्रजी विद्येचा एक भाग म्हणून पाश्चात्य तर्कशास्त्राचा प्रवेश भारतीय शिक्षणव्यवस्थेत विसाव्या शतकात झाला.

(४) नीतिशास्त्र  Ethics

नीतीला इंग्रजीत Ethics किंवा Moral Philosophy असा शब्द आहे. Ethics हा प्राचीन ग्रीक भाषेतील ethos या शब्दापासून बनतो.  Ethos म्हणजे सामाजिक चालीरीती, सर्वमान्य वर्तन. तोच Moras या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे माणसाच्या समान वागण्याच्या नियमांना moral म्हटले जाते. संस्कृत किंवा मराठीत नीती म्हणजे नेणे, नेणारी. पर्यायाने, एका विशिष्ट मार्गाने घेऊन जाणारी नियमावली म्हणजे नीती.

“चांगले (शिव) म्हणजे काय?” ही नीतिशास्त्राची मूलभूत समस्या आहे. नीतिशास्त्राचे स्वरूप आणि प्रयोजन याविषयी तत्त्ववेत्त्यांमध्ये मूलभूत मतभेद असतात. नीती, नैतिकता, नीतिमत्ता या आणि अशा काही संकल्पना माणसाच्या आयुष्यात अतिशय वादग्रस्त ठरत आल्या आहेत.कर्तव्य,

जोसेफ डी. नोव्हाक

जोसेफ डी. नोव्हाक

जबाबदारी, बंधन, बांधिलकी, त्याग, न्याय, समता, निष्ठा, देशप्रेम, धर्म, धार्मिकता, प्रेम, मैत्री, करुणा या काही नैतिक संकल्पनाविषयी सुसंगत, तार्किक  विचार करणे म्हणजे नीतिशास्त्र रचणे असते. नीती हा केवळ आचरणाचा विषय नाही, तो ज्ञानाचाही विषय असतो, याचे भान जागे करणे, ते विकसित करणे, त्याबद्दल सातत्याने चिंतन करणे, नीतिशास्त्रावर संशोधन करणे, हा समाज आणि ज्ञान या दोन्ही क्षेत्रांच्या विकासाचा पाया असतो.

माणसाचे कल्याण आणि त्याची कर्तव्ये यांच्यातील परस्परसंबंधाचे ज्ञान करून देणे, हा नीतिशास्त्राचा हेतू आहे, असे पाश्चात्त्य परंपरेत मानले जाते. एखाद्या विशिष्ट माणसाने विशिष्ट प्रसंगी काय करावे याविषयीचा सल्ला देणे, उपदेश करणे हे नीतिशास्त्रज्ञाचे काम असते, असा याचा अर्थ नाही. तर या प्रकारचे निर्णय ज्या मूलभूत सामान्य तत्त्वांना अनुसरून घेतले पाहिजे, ती विशिष्ट तत्त्वे स्पष्ट करणे आणि त्यांचे प्रामाण्य सिद्ध करणे, हे नीतिशास्त्राचे कार्य आहे.

एखादा नीतिमान प्रेषित किंवा प्रतिभावंत कवी माणसाच्या नैतिक समस्यांचे मर्म उघड करणारा दृष्टिकोन प्रभावी रीतीने मांडताना अनेकदा आढळतो. पण प्रेषित, कवी आणि नीतिशास्त्रज्ञ यांच्या कार्यात फरक आहे. नीतिशास्त्रज्ञ नैतिक तत्त्वांची व्यवस्था लावण्यासाठी पद्धतशीर तार्किक  युक्तिवाद करतो. प्रेषित किंवा कवी असे युक्तिवाद करीत नाहीत. या फरकामुळे ‘प्रेषिताचा संदेश’ किंवा ‘कवीची नैतिक शिकवण’ यापेक्षा तात्त्विक नीतिशास्त्राचे स्वरूप वेगळे ठरते. नैतिक संकल्पनांचा इतिहास पाहता, नीतिशास्त्राचे चार प्रकार मानले गेले.

(१) वर्णनात्मक नीतिशास्त्र (Descriptive Ethics) : नीती लोकांच्या नैतिकतेच्या श्रद्धा, विश्वास व संकल्पना कोणत्या व कशा स्वरूपाच्या असतात, याचे ‘वर्णन करणे’ ही वर्णनात्मक नीती. धर्मशास्त्र, धर्मग्रंथ अशी आयती नीतिशास्त्र आणि त्या प्रकारच्या श्रद्धा देतात. कोणती कृती केली असता लोक आपणास सज्जन म्हणतील, म्हणजेच चांगल्या जीवनाचे स्वरूप कसे असते, याचे वर्णन या  नीतिशास्त्रात  स्पष्ट करते, ते व्यक्तिस्वातंत्र्य देत नाही; तर फक्त आज्ञापालन करण्यास प्रवृत्त करते.

(२) आदर्शवादी  नीतिशास्त्र (Prescriptive Ethics): ‘लोकांनी कसे वागले पाहिजे’, ‘जीवनात काय प्राप्त केले पाहिजे’, याचे नियम (Norms)  बनविणे, व्यक्तिगत व सामाजिक आदर्श (Ideal) देणे आणि त्यानुसार लोकांचे आचरण होते आहे किंवा नाही,  हे पाहणे, ही’ आदर्शवादी नीती’ असते. “कोणीतरी सांगितले म्हणून…”(Prescription) ती नीती पाळणे, असा अर्थ अभिप्रेत आहे. यातही व्यक्तिस्वातंत्र्य नसते.

(३) अधिनीतिशास्त्र (Meta-ethics or Casuistry): ‘चांगले, ‘कर्तव्य’, ‘सद्गुण’, इत्यादी नैतिक संकल्पनांचे तार्किक विश्लेषण करून नैतिक संकल्पनांचे स्वरूप स्पष्ट करणारे ते अधिनीतिशास्त्र Meta-ethics. नैतिक निर्णय घेताना, स्वत:च्या व इतरांच्या वर्तनाचे मूल्यमापन करताना आपण ज्या संकल्पना वापरतो त्यांचे विश्लेषण करणे व त्यांची व्याख्या करणे,  त्या संकल्पनांचे परस्परांमधील संबंध स्पष्ट करणे, त्या संकल्पनांचे स्वरूप व प्रयोजन निश्चित करणे आणि ते काम  करताना इतर क्षेत्रांतील (विज्ञान, कला) संकल्पनांहून त्या भिन्न कशा आहेत, याचा शोध घेणे, हे अधिनीतिशास्त्राचे  कार्य असते.

थोडक्यात, नैतिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या ‘भाषेचे तर्कशास्त्र’ स्पष्ट करणे हे अधिनीतिशास्त्र कार्य असते. ते रूढ वर्णनात्मक आणि आदर्शवादी नीतीच्या ‘पलिकडे’ जाते आणि केवळ वर्णनात्मक आणि आदर्शवादी नीती मानत नाही, तर ती” नैतिक तत्त्वे, ते नियम का मानावेत?”, याची जाऊन चर्चा करते, म्हणून तिला ‘अधिनीतिशास्त्र’ म्हणतात. ‘meta’ म्हणजे पलिकडे किंवा ‘च्या विषयी’. मराठीत ‘अधि’ – म्हणजे अधिक वरच्या पातळीवर जाणे. नीतिविषयीची नीति (Ethics about ethics) म्हणून ते ‘अधिनीतिशास्त्र’.  यात पूर्ण  व्यक्तिस्वातंत्र्य असते.

(४) उपयोजित नीतिशास्त्र (Applied-ethics): दुसऱ्या महायुद्धाने युद्ध, आंतरराष्ट्रीय संबंध, नववसाहतवाद, रासायनिक-आण्विक प्रकल्प आदी प्रश्नांना वाचा फोडली. गर्भपात, दयामरण, फाशी, आत्महत्या, कामसंबंध, विवाह, वेश्याव्यवसाय, अमलीपदार्थ,युद्ध, माहिती तंत्रज्ञान, संगणक, राजकारण, समाजकारण, प्राणिमुक्ती आंदोलन, मोठय़ा धरणाचे महाप्रकल्प, कामगार संघटना, तसेच वकिली, डॉक्टरी, पोलिस-लष्करी, गुन्हेगारी-संघटीत गुन्हेगारी, सनदी सेवा, शिक्षण, मुख्य म्हणजे राजकारण ही सारी क्षेत्रे नैतिक चिंतनाच्या प्राधान्यक्रमावर थेटपणे आली.मुख्य म्हणजे समाजकारण, राजकारणतसेच बिगरसरकारी संस्था या खऱ्याच ‘राष्ट्रसेवा’ आहेत  की गुप्तपणे चालणारा ‘व्यापार’ अथवा ‘धंदा’ आहेत?, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात ‘जागल्या’ (Whistle Blower) का हवा, हे प्रश्न नैतिकतेच्या अग्रक्रमावर आले.

हे प्रश्न आणि असे सारे  शुद्ध चारित्र्य, सद्हेतू, सदसद्विवेकबुद्धी, परोपकार, आत्मबुद्धी इत्यादींनी सोडविता येत नाहीत, हे उघडच आहे. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व नीतीचे अभ्यासक, व्यावसायिक तत्त्ववेत्ते, तत्त्ववेत्ते यांच्या एकत्रित सहकार्याने सोडवावे लागतील, अशी जाणिव निर्माण करणारी नीतिशास्त्राची अत्याधुनिक नवी शाखा म्हणजे ‘उपयोजित नीतिशास्त्र'(Applied-ethics).

या नीतिशास्त्राने जैववैद्यकीय नीतिशास्त्र (Bio-Medical Ethics), व्यावसायिक नीतिशास्त्र (Professional Ethics) आणि पर्यावरण नीतिशास्त्र  (Environmental Ethics) या नव्या तीन ज्ञानशाखांना जन्म दिला. नीतिशास्त्र अशा तऱ्हेने ‘आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा’ बनले. यातून माध्यमांचे, उद्योगसमूहाचे, व्यवस्थापनाचे नीतिशास्त्र निर्माण झाले. अशा सगळ्यांना मिळून ‘उपयोजित नीतिशास्त्र’ म्हटले जाते.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचे आज व्यावसायिकीकरण झाल्यामुळे ‘उपयोजित नीतिशास्त्र’ विद्यमान काळात  मूलभूत चिंतनक्षेत्र ठरले आहे. आर्थर हॅडली (Arthur Twining Hadley जन्म: २३ एप्रिल १८५६, मृत्यू:०६ मार्च १९३०)  या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ तत्त्ववेत्त्याच्या, १९०७ सालच्या ‘सार्वजनिक नीतीची पातळी’ (The Standards of Public Morality) या ग्रंथाने उपयोजित नीतिशास्त्राचा पाया रचला. त्याने नैतिक जीवनाचा विचार करताना व्यक्तीचे खासगी जीवन आणि सार्वजनिक जीवन यात फरक केला पाहिजे, त्यानुसार नैतिक निकष बनविले पाहिजेत, असा सिद्धांत त्याने मांडला.

(५) सौंदर्यशास्त्र Aesthetics

सौंदर्यशास्त्र (Aesthetics) ला सद्भिरुचिशास्त्र, आभिरौचिकीशास्त्र, ललितकलांविषयी तत्त्वज्ञान, कलेचे तत्त्वज्ञान (Philosophy of Art) अशी नावे आहेत. सौंदर्यशास्त्राच्या साधारणतः दोन ग्रीक-पाश्चात्य आणि भारतीय सौदर्यशास्त्र अशा दोन परंपरांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. विद्यमान काळात त्यात अनेक उपक्षेत्रांचा समावेश केला जात आहे.

ग्रीक भाषेतील aesthesis किंवा aesthanomai या ग्रीक शब्दांपासून अलेक्झांडर बाऊमगार्टन (Alexander Gottlieb Baumgarten जन्म: १७ जुलै १७१४, मृत्यू: २७ मे १७६२)   या जर्मन तत्वज्ञाने १७३५ साली त्याच्या Reflection on Poetry या पुस्तकातील एका विभागाला नाव देण्यासाठी Aesthetics हा शब्द बनविला. aesthesis आणि aesthanomai या दोन्ही शब्दांचा अर्थ ‘इंद्रियांमार्फत मिळणाऱ्या संवेदना’ असा होतो. aesthetikos असाही आणखी एक तिसरा शब्द आहे.

‘सुंदर’ या शब्दाने एखाद्या गुणधर्माचा निर्देश होतो का? असल्यास त्याची व्याख्या करता येते का? त्याचे निकष देता येतात का? म्हणजे (१) कोणत्या गोष्टी सुंदर आहेत? कोणत्या गुणांमुळे त्या सुंदर ठरतात? सौंदर्याचे निकष कोणते? (२) सौंदर्य या संकल्पनेची तार्किक वैशिष्टय़े कोणती? सौंदर्यविधानाचे स्वरूप काय? हे सौंदर्यशास्त्राचे प्रश्न आहेत.

कला आणि ज्यात सौंदर्यानुभव आणि सौंदर्यमूल्ये यांचा संबंध येतो त्या परिस्थितीचा अभ्यास सौंदर्यशास्त्र करते. म्हणजे कलेची तात्त्विक चिकित्सा आणि सौंदर्यात्मक प्रतिक्रिया आणि सौंदर्य विधानांचे तार्किक विश्लेषण यांचा अभ्यास यात होतो. कला म्हणजे काय? कलाकृती किंवा निसर्गदृश्य पाहताना ज्या अभिवृत्तीने आपण प्रेरित होऊन पाहतो त्या अभिवृत्तीचे स्वरूप काय? सौंदर्यानुभव म्हणजे नेमका कोणता अनुभव? त्याचे निकष कोणते? कलावस्तूच्या स्वरूपाचे आणि कलास्वादाचे, रसग्रहणाचे स्वरूप व निकष कोणते? स्थलकालसापेक्ष असते की निरपेक्ष असते? कला व नीती, कला व धर्म यांचा संबंध असतो का? याचा अभ्यास सौंदर्यशास्त्रात होतो.

हे प्रश्न समीक्षात्मक विधानांच्या व त्यात वापरल्या गेलेल्या संकल्पनांच्या तार्किक स्वरूपाविषयीचे प्रश्न आहेत, हे लक्षात घेतले तर सौंदर्यशास्त्राचे स्वरूप असे होईल : कलाकृती व इतर सुंदर वस्तू यांच्याबद्दल विधाने ही सौंदर्यविधाने असतात. त्यांची चिकित्सा करताना जी विधाने केली जातात, त्यात वापरल्या गेलेल्या संकल्पनांचे तार्किक विश्लेषण करणे हे सौंदर्यशास्त्राचे एक प्रमुख कार्य आहे.

सौंदर्यशास्त्र हे विज्ञान नाही, त्याचप्रमाणे ते तंत्रविद्याही नाही. म्हणून सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाने माणसाला कलाकृती निर्माण करण्याचे तंत्र कळेल, असे नाही. त्याचप्रमाणे अरसिक माणसाला रसिक बनविण्याचे कार्यही सौंदर्यशास्त्राचे नाही.

सौंदर्यशास्त्र हे समीक्षाव्यापारात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांचे, संज्ञांचे, मूल्यविधानांचे, सौंदर्यादी संकल्पनांच्या निकषांचे शास्त्र आहे. ज्या संकल्पनाव्यूहामुळे आपले समीक्षाव्यापार सिद्ध होतात त्याचा संपूर्ण नकाशा आपल्यापुढे उभा करणे हे सौंदर्यशास्त्राचे कार्य आहे. सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते शिकविण्यासाठी अभ्यासकाला साहित्याचे ज्ञान, समीक्षेचे ज्ञान असणे आवश्यक आहेच; पण वस्तुनिष्ठ संकल्पनात्मक चिकित्सेसाठी तत्त्वज्ञानाचे ज्ञान अनिवार्य असते, याचे भान विसरले गेले.

आधुनिकोत्तर काळात सौंदर्यशास्त्राबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला. सौंदर्यशास्त्राचा सुंदर चेहरा बिघडला! विशेषत: मिशेल फुको (Michel Foucault, जन्म: 15 ऑक्टोबर १९२६, मृत्यू: 26 जून १९८४) या फ्रेंच विचारवंताने “सौंदर्यशास्त्र हा राजकीय सत्तेचा खेळ आहे”, हे सिद्ध केल्यामुळे सौंदर्यशास्त्र वैचारिक राजकारणाचा विषय बनला.

स्त्रीवादी सौंदर्यशास्त्र

स्त्रीवादानेही एकूण जागतिक सौंदर्यशास्त्रावर मोठा आक्षेप घेतला. त्यातून Womanism ही स्वतंत्र स्त्री चळवळ अस्तित्वात आली. Womanism म्हणजे काळा स्त्रीवाद. ‘काळे तेच सुंदर’ ही यांची घोषणा आहे. Feminism म्हणजे गोरा स्त्रीवाद. ‘गोरे तेच सुंदर’ ही यांची घोषणा आहे, पण तिलाच आव्हान दिले गेले. काळा स्त्रीवाद काळ्या स्त्रीचे दु:ख मांडतेच पण तो काळ्या पुरुषाचेही दु:ख चव्हाटय़ावर आणतो, असा दावा काळा स्त्रीवाद करतो. गोरा स्त्रीवादाच्या विरुद्ध काळा स्त्रीवाद विकसित झाला. भारतीय विचारविश्वात हा आक्षेप १९८०च्या दशकात ‘दलित सौंदर्यशास्त्रा’चे आव्हान या रूपात आला. ज्ञान, विचार, नीती आणि सौंदर्य या मुख्य तत्त्वांसंदर्भात सूक्ष्म हिंसेचे राजकारण करून वर्णवादी  नेहमी जिंकत राहतात, हा ‘दलित सौंदर्यशास्त्रा’ ची मांडणी करणाऱ्यांचा मुख्य आक्षेप आहे.

मूल्यशास्त्रे (Axiology)

नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र यांना मूल्यशास्त्रे (Axiology) म्हंटले जाते. नीति व सौंदर्य यांना व्यापक अर्थाने मूलभूत ‘मूल्ये’ (Values) मानली जातात. तात्त्विक दृष्टिकोनातून अज्ञानी असणारा किंवा अतार्किक वर्तन करणारा माणूसही ‘नीति आणि सौंदर्य’ ह्या गोष्टी आचरणात आणतो. उदाहरणार्थ अडाणी, अशिक्षित,कष्टकरी व्यक्ति किंवा अविकसित समजला जाणारा आदिवासी माणूस. अशा कोणत्याही माणसाची-व्यक्तिची तिला तिच्या परंपरेने लाभलेल्या काही संस्थात्मक तर काही त्याने स्वतःच विकसित केलेल्या ‘नैतिक धारणा, समजुती, कल्पना’ असतात. त्यानुसार संगीत, कला, शेती पिकविण्याच्या-अन्न शिजविण्याच्या पद्धती, आणि ह्या साऱ्या गोष्टी व्यक्त करण्याच्या त्यांचा आविष्कार करण्याच्या रीतीभाती विकसित झालेल्या असतात. तीच त्या व्यक्तिची अथवा समूहाची ‘मूल्ये’ बनतात. नीति व सौंदर्य ही धर्म-वर्ण-जात-वंश आणि लिंगनिरपेक्ष मूल्ये आहेत.

नकाशाचे तत्त्वज्ञान  

हा नकाशा का केला पाहिजे? याचे कारण स्पष्ट करतो. हे कारण तत्त्वज्ञानात्मक आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. नकाशा निर्माण करण्याबाबतही वरील पाच संकल्पना, पाच प्रश्न आणि पाच ज्ञानशाखा यांचा संबंध पोहोचतो. तोच नकाशाचा तात्त्विक विचार असतो.

खरे पाहाता नकाशा तयार करणे, हीच मुळात एक तत्त्वज्ञानात्मक कृती आहे. तत्त्वज्ञान निर्माण करणे, ही केवळ अमूर्त गोष्ट आहे, असे नाही. जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी नकाशे बनवले गेले. नकाशाबाबत तात्त्विक विचार यासाठी महत्वाचा ठरतो की नकाशा म्हणजे काय? (ज्ञानशास्त्र), विविध नकाशे कसे निर्माण करतो (सत्ताशास्त्र), नकाशाचा विचार कसा करतो (तर्कशास्त्र), नकाशाचा वापर कसा करतो, कशासाठी करतो? (नीतिशास्त्र), उत्तम नकाशे कसे बनवतो? (सौंदर्यशास्त्र) हा नकाशाचा तात्त्विक विचार आहे.

युद्धभूमीचा शोध, खजिन्याचा शोध, जमिनीचा-पर्यायाने अन्नपाणी यांचा शोध  घेण्यासाठी नकाशे बनवले गेले. त्यातून जगाची भौगोलिक म्हणजे भौतिक रचना समजली. ‘जग जाणणे’ ह्या तात्त्विक जिज्ञासेचाच प्रकार होता. ज्या जगात आपण राहातो, ते जर सुव्यस्थितपणे जाणावयाचे असेल तर त्या जगाचा नकाशा करणे आवश्यक आहे, याची सर्वप्रथम जाणिव ग्रीकांनाच झाली.

नकाशाचा जनक 

जगाचा पहिला नकाशा बनविण्याचे श्रेय प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता, भूगोलतज्ज्ञ, जीववैज्ञानिक अॅनॅक्झिमेंडर (Anaximander इ. स. पूर्व ६१० ते इ.स .पूर्व ५४६) याचेकडे जाते. बंदिस्त जगाच्या कल्पनेला तिलांजलि देऊन खुल्या ब्रह्मांडाची संकल्पना मांडून जणू जगतचिंतनच मुक्त केले!

कागदावर नकाशा उतरवणे हे अडीच हजार वर्षांपूर्वी अतिशय धाडसाचे काम होते. कारण जगाची निर्मिती ईश्वराने केली आहे, जग शुभस्वरूप आहे इत्यादी ईश्वरशास्त्रीय कल्पना ख्रिश्चन,, इस्लाम इत्यादी धर्मसंस्थांनी लादलेल्या होत्याच; पण विचारवंतांच्या मते ‘जग पाण्यावर तरंगते, पृथ्वी सपाट आहे’ अशा संकल्पना होत्या. वैदिक-अवैदिक तत्त्वज्ञानातील पुराणकथांमध्येही ब्रह्म्याने जग निर्माण केले, किंवा दशावतार कथाही जगाच्या धार्मिक व पुराणकथात्मक कल्पना मांडतात. ह्या साऱ्या अशास्त्रीय कल्पना होत्या, त्या पार्श्वभूमीवर जगाचा नकाशा प्रत्यक्ष कागदावर उतरवणे म्हणजे अशा धर्मसंस्थांना, धर्मसंसदांना आणि धर्मगुरूंना आव्हान देण्यासारखे होते, ती बंडखोरी होती, ते सारे जीवावर बेतणारे होते. पण ही सारी जोखीम उचलण्याचे अतुलनीय भौतिक आणि ज्ञानात्मक धाडस अॅनॅक्झिमेंडरने केले. असे धाडस नंतरच्या काळात ग्रीक नवप्लेटोवादी तत्त्ववेत्ती, गणिती आणि खगोलशास्त्रज्ज्ञा हायपेशियाने (Hypatia जन्म: इ. स. ३५० किंवा ३७० ते मृत्यू: इ. स. ४१५)

हायपेशिया

हायपेशिया

दाखविले. तिने ग्रहगोलांच्या परिभ्रमणाचा नकाशा रेखाटला होता! तिच्या जीवनावर २००९ साली Agora हा चित्रपट आला. तिच्या एकूण बंडखोरीची शिक्षा तिला मिळाली, तिचा भरदिवसा ‘माथेफिरू टोळक्याने खून केला!’ अशा रीतीने ती ‘तत्त्वज्ञानातील हुतात्मा’ (Martyr for Philosophy) ठरली (पहिला हुतात्मा सॉक्रेटीस).

प्राचीन काळापासून ते विद्यमान काळापर्यंत ज्ञात जगाचे नकाशीकरण करणे याचा अर्थ  ‘भूगोला’ चे नकाशीकरण करणे होते. नकाशाला इ. स. पूर्व २५००० ते इ. स. पूर्व ६५० वर्षांचा इतिहास आहे. मात्र कागदावर नकाशा उतरवण्याचे जगातील पहिले काम अॅनॅक्झिमेंडरने केले, त्यामुळे त्याला ‘नकाशाचा जनक’  किंवा ‘भूगोलाचा जनक’ म्हंटले जाते.

त्याच्यानंतर अनेकांनी जगाचे नकाशे तयार केले. भूगोलाचे नकाशीकरण हे ज्ञानशास्त्राचे आणि शिक्षणाचे उदाहरण आहे. नकाशा तयार करणे हे गेल्या काही शतकात राजकीय आणि माध्यम तत्त्वज्ञानाचा अनिवार्य हिस्सा बनला आहे. नकाशा म्हणजे राज्यविस्तार आहे आणि नकाशा हे एक राजकीय माध्यम आहे, असे विश्लेषण गेल्या काही विसाव्या शतकात, विशेषतः दुसऱ्या महायुद्धापासून जोर धरत आहे.

विसाव्या शतकात मात्र ‘नकाशाचे तत्त्वज्ञान’ ( Philosophy of Maps) ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा निर्माण करण्यास शुभारंभ झाला, तिची पायाभरणी १९६८ साली अमेरिकेत झाली.

थोडक्यात, ‘आपण भवतालचे जगत् कसे जाणू शकतो आणि या जगाचे मोजमाप कसे करतो, त्यांची तंत्रे कोणती तसेच त्याचे सौंदर्यशास्त्र, नीतिशास्त, त्यामागील विचारसरणी कोणती आहे याबाबतच्या आपल्या गृहीतकांना आकार देण्याचे काम नकाशे करतात. नकाशे जगात नेमके काय काम करतात आणि नकाशा बनवण्यात आपण कसे व्यग्र होतो, हेही नकाशे उलगडून दाखवितात. नकाशे बनवणे हे सत्ताशास्त्रीय (epistemological) काम आहेच पण ते जास्त करून अस्तित्वशास्त्रीय (ontological) काम आहे. दोन्ही परिप्रेक्ष्यातून जगाचा अनुषंगिक विचार केला जातो. नकाशा तयार करण्याची क्षमता असल्याचा दावा हाच मुळात ज्ञानात्मक दावा आहे आणि तो प्रत्यक्षात कलात्मकरीत्या उतरवणे व व्यवहारात आणणे या दोन्ही कृतीत येथे केलेला तात्त्विक फरक हाच एका अर्थाने कोणत्याही ज्ञानाच्या वस्तूच्या नकाशाकरणामागे ही बौद्धिक कामगिरी आहे.

नकाशा जणू सांगत असतो की, “मला काळजीपूर्वक वाचा, माझा काटेकोर मागोवा घ्या, माझ्यावर संशय घेऊ नका. मी तुमच्या तळहातावर विसावलेली पृथ्वी आहे. माझ्यावाचून तुम्ही केवळ एकाकी आणि कुठेतरी गायब झालेले असाल!”

संकल्पना नकाशा

तत्त्वज्ञानाचा नकाशा करणे म्हणजे संकल्पना नकाशा निर्माण करणे असते.

‘संकल्पना नकाशा’ (A concept map) ची संकल्पना अमेरिकेन शिक्षणतज्ज्ञ जोसेफ डी. नोव्हाक (Joseph D. Novak जन्म: १९३२, हयात) आणि बॉब गोविन (Bob Gowin, जन्म: ११ डिसेंबर १९२५, मृत्यू: १४ नोव्हेंबर २०१६) यांनी मांडली. ‘संकल्पना नकाशा’ किंवा संकल्पनात्मक चित्रकृती आपल्याला अनेक संकल्पनांमधील नाते उलगडून दाखवते. संकल्पना विविध प्रकारचे अभियंते, अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा रचनाकार, वास्तुविशारद, तांत्रिक परिभाषा लेखक आणि इतर बहुक्षेत्रीय ज्ञानरचनाकर्ते, अध्यापक इत्यादी तज्ज्ञांना संकल्पना नकाशाची गरज असते. गोल, चौकोन, बाण, कंस, चढत्या-उतरत्या शिड्या इत्यादी वापरून संकल्पनांचे परस्पर संबंध आरेखले जातात. ‘संकल्पना नकाशा’ चा उगम अध्यापन क्षेत्रातील ‘रचनावाद’ (constructivism) शी जोडला गेलेला आहे, या रचनावादाचा गेल्या दशकभरात महाराष्ट्रात जोर आहे.

श्रीनिवास हेमाडे, हे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

(मुक्तसंवाद’, १६ ऑक्टोबर २०२१ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा पुनर्लिखित विस्तृत आणि संपादित लेख.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0