बर्ट्रंड रसेलचे तत्त्वज्ञानविषयक मत

बर्ट्रंड रसेलचे तत्त्वज्ञानविषयक मत

बर्ट्रंड रसेल दर्शन: भाग ५ - ‘‘तात्त्विक चिंतन हे मित्र आणि शत्रू, उपयुक्त आणि उपद्रवी, चांगले - वाईट या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन सार्‍या विश्वाला गवसणी घालते. असे स्वतंत्र आणि निःपक्षपाती विचार करणारे मन हेच रोजच्या कृतीमध्ये आणि भावनिक व्यापारांमध्ये स्वातंत्र्य, निःपक्षपातीपणा, न्याय यांचा आविष्कार घडविते. असे मन स्वतःला ‘जगाचा नागरिक’ बनविते. ’’ -- रसेल

तत्त्वज्ञानाचा नकाशा कसा वापरावा?
“…..चे तत्त्वज्ञान”
तत्त्वज्ञानात्मक चिंतन

‘‘बर्ट्रंड रसेलचा लेखनसंसार’’ या मागील लेखात आपण रसेलने किती आणि काय अफाट लेखन केलेले आहे, याचा धावता परामर्ष घेतला. या लेखनाचे (1) तत्त्वज्ञानात्मक लेखन (2) आर्थिक निकडीतून झालेले लेखन (3) स्वान्तसुखाय साहित्यिक लेखन असे वर्गीकरण करता येईल, असेही मी नमूद केले आहे. यातील प्रत्येक प्रकाराचे आणखी विस्तारपूर्वक विवेचन करणे शक्य आहे आणि आवश्यकही आहे. तो एक  मोठा प्रकल्प आहे…

रसेलचे तत्त्वज्ञानात्मक लेखन याचा अर्थ त्याचे तत्त्वज्ञानावरील ग्रंथ. त्याच्या काही मुख्य सिद्धांतांचे स्वरूप आपण यथावकाश पाहूच. पण त्या आधी त्याचे ‘तत्त्वज्ञानविषयक मत’ काय आहे, हे पाहाणे आवश्यक आहे. अर्थात, ‘रसेलचे तत्त्वज्ञान’ आणि ‘रसेलचे तत्त्वज्ञानविषयक मत’ या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यांच्यात फरक करता येतो, पण त्यांना परस्पराहून अलग करता येत नाही (Distinguishable but not Separable) हे येथे मी नमूद करतो.

रसेलने तत्त्वज्ञानया विषयबद्दल आणि संकल्पनेबद्दल त्याची मते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी व्याख्यान, मुलाखती, लिखित इत्यादी स्वरुपात व्यक्त केली आहेत. त्यांना ‘रसेलची तत्त्वज्ञानविषयक मते’ म्हणता येईल. ही मते एका व्यापक अर्थाने रसेलचे तत्त्वज्ञानच व्यक्त करतात. तत्त्वज्ञानाची पुस्तके लिहित असतानाच त्याने त्याची तत्त्वज्ञानविषयक मते मांडली आहेत.

रसेलची ही मते पाहाण्यापूर्वी येथे एक खुलासा अधोरेखित होणे आवश्यक आहे. या लेखमालेच्या ‘बर्ट्रांड रसेल दर्शन : पूर्वपीठीका’ या पहिल्या लेखात नमूद केल्यानुसार  मराठीतील ‘तत्त्वज्ञान’ ही संज्ञा आणि इंग्लिशमधील  ‘Philosophy’  ही संज्ञा यात काही मूलभूत फरक आहेत. त्यातील काही फरक असे, की : (1) दोन्ही भिन्न शब्द आहेत. ‘तत्त्वज्ञान‘ ही संज्ञा भारतीय संकल्पना आहे तर ‘Philosophy‘ ही संज्ञा ग्रीक-पाश्चात्य-युरोपीय संकल्पना आहे. (2) त्या दोन परस्परांहून भिन्न संकल्पना आहेत (3) दोन्हींचे सांस्कृतिक (Cultural) संदर्भ भिन्न आहेत (4) परिणामी दोन्हींचे तात्त्विक अर्थही भिन्न होतात. तथापि त्या अर्थांमध्ये काही प्रमाणात साम्य असल्याने मराठीत दोन्ही संकल्पना एकमेकांची भाषांतरे म्हणून आणि पर्यायवाची अर्थाने उपयोगात आणले जातात.

रसेलची ‘तत्त्वज्ञानविषयक मते’ ‘Philosophy‘ ग्रीक-पाश्चात्य-युरोपीय संकल्पनेबद्दलची मते आहेत, त्यामुळे मी त्याने वापरलेली ‘Philosophy’ हीच संज्ञा या लेखाच्या प्राथमिक परिचयात आधी वापरात आणली आहे आणि त्यानंतर ती गृहीत धरून ‘तत्त्वज्ञान’ ही मराठी संज्ञा तिचे भाषांतर म्हणून वापरात आणत आहे.

रसेलने लेखनाच्या प्रारंभीचे लेखन १८९५ ते १९०१ च्या मध्यकाळापर्यंत केले आणि ते सारे जर्मन भाषेत केलेले आहे, साधारणतः १९०१ नंतर त्याने सारे लेखन-चिंतन इंग्लिश भाषेत केले. जेव्हा तो ‘तत्त्वज्ञाना’ बद्दल बोलतो-लिहितो तेव्हा तो ‘Philosophy’ या इंग्लिश शब्दातून व्यक्त होणाऱ्या ग्रीक-पाश्चात्य-युरोपीय संकल्पनेबाबत बोलतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. भारतीय तत्त्वज्ञानासंबंधी बोलताना रसेल ‘Indian Philosophy’ असा वेगळा उल्लेख करतो.

तत्वज्ञानाविषयी गैरसमज : दोन प्रकार

आपले तत्त्वज्ञानविषयक मत स्पष्ट करण्यापूर्वी रसेल प्रथम तत्वज्ञानाविषयीच्या दोन प्रकारच्या गैरसमजाबद्दल बोलतो. पहिला प्रकार सामान्य लोकांच्या गैरसमजाचा आहे. पण तत्त्वज्ञानाविषयी खुद्द तत्त्ववेत्त्यांचेही अनेक गैरसमज असतात, हा दुसरा प्रकार आहे, असे रसेल निदर्शनास आणून देतो.

सामान्य लोकांचे गैरसमज

रसेलच्या मते, तत्त्वज्ञानाविषयी अनेकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. हे गैरसमज मुख्यतः आपल्या जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पनांमुळे निर्माण होतात. त्यात विज्ञानाचा वाढता प्रभाव, केवळ पैशाला, व्यवहाराला अन व्यावहारिकतेला आलेले महत्त्व यांची भर पडते. सामान्य लोकांची ‘व्यवहार’ या संकल्पनेचीच कल्पना चुकीची असते. त्यात परंपरेला, रूढीसंकेतांना चिकटून राहण्याची प्रवृत्तीही कारणीभूत होते. मग ‘निरर्थक’ गोष्टीची चर्चा म्हणजे तत्त्वज्ञान, असा समज पसरतो,जे पूर्णपणे चुकीचे आहे, असे रसेल दाखवून देतो.

‘जगणे म्हणजे फक्त शरीरासाठी जगणे’ हे मर्यादित उद्दिष्ट ठेवल्याने जीवनविषयक तत्वज्ञानही तसेच शरीराच्याच पातळीवरच राहते. “माणूस म्हणजे केवळ शरीर, अशी माणसाची व्याख्या करणे, चुकीचे आहे”. कारण, माणूस हा पूर्ण प्राणी नाही. पूर्ण प्राणी असणे याचा अर्थ केवळ शरीराच्याच गरजेसाठी जगणे. प्राण्यांना मन नसते आणि माणसाला मन असते, हा प्राणी व माणूस यातील मुख्य फरक आहे. माणसाच्या या मनाच्याही काही गरजा असतात. म्हणून माणसाच्या मनाचा विचार आवश्यक ठरतो. वर्ण, जाती, लिंग हे भेद आणि आर्थिक, सामाजिक, राजकीय विषमता या माणसाच्या मनाचा विचार न करता निर्माण केलेल्या शोषणाच्या, गुलामगिरीच्या व्यवस्था आहेत. त्या विरोधात विचारी मनाने संवेदनशीलता दर्शवणे, ही दार्शनिक प्रवृत्ती आहे, असे रसेलला म्हणावयाचे आहे. त्याच्या मते, रूढी – परंपरेच्या जोखडातून केवळ तत्त्वचिंतनच माणसाला मुक्ती देते.

व्यवहारी माणूस कोण?

तत्त्वज्ञानाचे मूल्य नेमके कशात आहे? प्रत्येक विचार करणार्‍या माणसाने तत्त्वज्ञानाचा अभ्यास का करावा? याचे समर्पक उत्तर रसेल त्याच्या ‘तत्त्वज्ञानातील समस्या’ (1912) या पुस्तकात देतो. तो म्हणतो, तत्त्वज्ञानाचे मूल्य निश्चित करण्यासाठी आधी एक गोष्ट निश्चित करावी लागते, ती म्हणजे ज्यांना आपण ‘व्यवहारी माणसे’ असे म्हणतो ती माणसे बाळगीत असलेल्या काही पूर्वग्रहांपासून आपण आपली सुटका करून घेतली पाहिजे.

व्यवहारी माणूस कोण? तर ज्याला केवळ माणसाच्या शरीरांना अन्नाची गरज आहे हे ओळखता येते पण मनालाही अन्नाची गरज आहे, याचा ज्याला विसर पडतो तो माणूस म्हणजे व्यवहारी माणूस. 

तत्त्वज्ञानाचे मूल्य

रसेल म्हणतो, समजा या व्यवहारी माणसाच्या म्हणण्यानुसार शरीराच्या सगळ्या गरजा भागल्या; सगळी माणसे सुखवस्तु झाली. दारिद्य्र रोगराईचे शक्य तितके उच्चाटन करण्यात आले. समाज भ्रष्टाचारमुक्तही झाला. आता, समाज सुखी होईल काय? ती शक्यता कमीच असते. दुःख पूर्णपणे नाहीसे झाले तरी मूल्यवान समाज निर्माण होईल, असे नाही. उलट मूल्यवान समाज निर्माण करण्यासाठी आणखीही बरेच काही करावे लागते. ते जे आणखीही काही करावे लागते, ते माणसाच्या मनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते आणि तेच तर मनाचे अन्न असते.

तत्त्वज्ञानाचे मूल्य अशा मनाच्या दृष्टीने श्रेयस्कर असलेल्या गोष्टीत असते. साहित्य, संगीत, गणित, तत्त्वज्ञान यासारख्या गोष्टीत हे अन्न दडलेले असते. तत्त्वज्ञान किंवा तत्त्वचिंतनाचे हेच अस्सल तत्त्वज्ञानाचे मूल्य असते, असे रसेल म्हणतो.

निर्जन निर्मानवी प्रदेश

रसेलच्या मते, Philosophy शब्दाचा वापर अचूक अर्थाने केला गेला नाही. त्याच्या History of Western Philosophy (1945) या ग्रंथाच्या ‘परिचया’ त तो म्हणतो, ‘‘ ‘Philosophy’ हा शब्द अनेकार्थी उपयोगात आणला गेला आहे, काही व्यापक अर्थाने, काही संकुचित अर्थाने त्या शब्दाचे उपयोजन झालेले आहे. मी तो खूपच व्यापक अर्थाने वापरणार आहे. तोच अर्थ आता स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी करतो. ‘Philosophy’ या शब्दाचा जो अर्थ मला समजतो त्यानुसार Theology (ईश्वरशास्त्र) आणि Science (विज्ञान) यांच्यातील‘दरम्यान’ (intermediate between theology and science) येतो. ईश्वरशास्त्राप्रमाणेच ज्यांचे अद्यापपर्यंत तरी निश्चित ज्ञान होऊ शकलेले नाही, अशा गोष्टींविषयी, तत्त्वज्ञानात स्वैरकल्पना (Speculations) केल्या जातात. पण विज्ञानाप्रमाणेच त्यांचे आवाहन एखाद्या आप्तप्रामाण्यापेक्षा (Authority) मानवी प्रज्ञेलाच अधिक असते – मग ते परंपरेचे असो वा साक्षात्कारविषयक असो. माझ्या धारणेनुसार सर्व ‘निश्चित ज्ञान’ हा विज्ञानाचा विषय असतो, तर या निश्चित ज्ञानापलीकडील गोष्टीविषयीची सर्व ‘आग्रही मते’ (Dogmas) ईश्वरशास्त्रात मोडतात, असे मला वाटते. अशा ईश्वरशास्त्र आणि विज्ञान यांच्या दरम्यान एक ‘No Man’s Land ’ (निर्जन निर्मानवी प्रदेश) आहे की ज्यावर ईश्वरशास्त्र आणि विज्ञान या दोन्ही बाजूंनी सतत हल्ले होत राहतात. हा प्रदेश म्हणजे Philosophy  (तत्त्वज्ञान). ’’

याचा अर्थ असा की, जगातील सर्व प्रश्नांवर निश्चित उत्तर देते, ते विज्ञान आणि जिच्यात केवळ आग्रही मते असतात, पण कुठलेही निश्चित ज्ञान नसते, तरीही सर्वसामान्य लोक ज्यावर विश्वास ठेवू इच्छितात तो प्रांत म्हणजे ईश्वरशास्त्र होय.

रसेल म्हणतो, ‘‘ आपण काय जाणू शकतो, हे विज्ञान आपणास सांगते. पण आपण जे जाणू शकतो ते तर अत्यल्प आहे. अन् आपण जर ‘आपण काय जाणू शकत नाही’ हे विसरलो तर अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबाबतही आपण संवदेनहीन, अंध बनतो. ईश्वरशास्त्र मात्र आपल्यामध्ये असा हट्टाग्रही विश्वास जागवते, की ‘आपणास ज्ञान आहेच’. प्रत्यक्षात मात्र आपण त्याविषयी अज्ञानी असतो ! आणि तसे करण्यातून ईश्वरशास्त्र आपल्यात अखिल चराचराविषयी एका प्रकारचा उन्मत्तपणा निर्माण करते! ’’

‘‘पण विज्ञान निश्चित उत्तर देत असले तरी चिंतनात्मक मनाचे म्हणून स्वतंत्र प्रश्न असतात, जवळपास ते सर्व प्रश्न विज्ञानात अनुत्तरीत राहातात. आणि त्याचवेळी ईश्वरवाद्यांनी गेली अनेक शतके जी उत्तरे छातीठोकपणे दिली आहेत ती उत्तरे मात्र संशयास्पद ठरू लागलेली आहेत.’’ सुस्पष्ट आशा व भीती यांच्या सांनिध्यात – ‘अनिश्चितपणा’  हा क्लेशदायी ठरतो. पण आरामदायी परिकथांच्या आधाराशिवाय जगावयाचे असेल तर अनिश्चितपणा हा सहन केलाच पाहिजे. म्हणून एका नव्या ज्ञानाच्या शोधाची, नव्या क्षेत्राची गरज आहे आणि ते क्षेत्र म्हणजे ‘तत्त्वज्ञान’. त्याची नवी निर्मिती करावयाची आहे, असे रसेलचे प्रतिपादन आहे.

सृजनशील अनिश्चितता

रसेलच्या मते, इतर अनेक विद्याशाखांप्रमाणे तत्त्वज्ञानाचे उद्दिष्टही ज्ञानसंपादन हेच आहे. तत्त्वज्ञान सर्वसमावेशक व्यापक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करते. तत्त्वज्ञान ज्या प्रकारचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करते, त्यातून विज्ञानाच्या विविध ज्ञानशाखांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे आपल्या विविध धारणा, पूर्वग्रह, दु:विश्वासाचे चिकित्सक परीक्षण केले जाते. अर्थात, विज्ञानात जशी निश्चितता असले तशी तत्त्वज्ञानात नसते. पण रसेलच्या मते, निश्चितता नसणे, ही काही तत्त्वज्ञानाची मर्यादा नाही तर ते तत्त्वज्ञानाचे मूल्य आहे.

विज्ञान आणि तत्त्वज्ञान

रसेल विज्ञान आणि तत्त्वज्ञान यातील मूलभूत फरक स्पष्ट करतो. रसेलच्या मते, तत्त्वज्ञानाने प्रश्न विचारला आणि उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला की काहीतरी उत्तर सापडतेच. असे उत्तर मिळाले की ते उत्तर तत्त्वज्ञानाच्या प्रांतात राहीलच असे नाही. असे घडत आले आहे की त्या उत्तराद्वारे नव्या विज्ञानाचा उदय होतो. किंवा कोणत्यातरी आधीच अस्तित्वात असलेल्या ज्ञानाच्या एखाद्या सिद्धांताला, किंवा विचारप्रणालीला निश्चितता येते. अशी निश्चिती आली की ती ते ज्ञान, तो सिद्धांत किंवा ती प्रणाली तत्त्वज्ञानापासून अलग होते. मग ते जे काही ‘ज्ञान’ आधी ‘तत्त्वज्ञान’ म्हणून प्रतिष्ठित झालेले असते ते आता ‘तत्त्वज्ञान’ राहत नाही; तर ते ‘विज्ञान’ म्हणून प्रस्थापित होते. उदाहरणार्थ या दृश्य विश्वाचे कारण काय? हे विश्व म्हणजे काय? हे प्रश्न प्राचीन ग्रीक विचारवंतानी विचारले, त्यावेळी त्यांना ‘तत्त्वज्ञान’ म्हटले गेले. पण हजारो वर्षांच्या कालक्रमात अचूक उत्तरे शोधली गेली आणि त्या प्रश्नाच्या उत्तरातून ‘खगोलशास्त्र’ अस्तित्वात आले. वेगळ्या भाषेत प्राचीन काळी खगोलशास्त्राचा तत्त्वज्ञानातच समावेश होत होता, तो प्रभाव इतका दीर्घकालिन ठरला की हजारो वर्षे उलटूनही आधुनिक काळात न्यूटनने त्याच्या महान ग्रंथाला ‘‘निसर्ग तत्त्वज्ञानाची गणिती तत्वे’’ (Philosophice Naturalis Principia Mathematica- Mathematical Principles of Natural Philosophy) असे नाव दिले होते. आता विसाव्या शतकात खगोलशास्त्राचा ‘स्वतंत्र विज्ञान’ म्हणून अभ्यास केला जातो. तीच बाब मनाची. मनाचा अभ्यास पूर्वी तत्त्वज्ञानात होत असे. आता त्याचेच ‘मानसशास्त्र’ तयार झाले आहे. तीच गोष्ट ‘अणु’ या संकल्पनेची आहे. डेमॉक्रिटस (Democritus इ. स. पूर्व 460 ते इ.स.पूर्व 370) या ग्रीक तत्त्ववेत्त्याने जग अणूंनी बनलेले आहे, असा विचार मांडला. पण तो खरा शास्त्रीय दृष्टिकोन आहे, हे सिद्ध होण्यास अडीच हजार वर्षे लागली. त्यातून ‘अणु विज्ञान’ अस्तित्वात आले आणि तो प्रश्न तत्त्वज्ञानातून सुटा झाला. किंवा अ‍ॅरिस्टार्कसने (Aristarchus of Samos इ. स. पूर्व 320 ते इ. स. पूर्व 250) पृथ्वीच्या सूर्यभ्रमणाचा सिद्धांत मांडला. तेव्हा ते तत्त्वज्ञान होते, पण कोपर्निकस (Copernicus 1473-1543) ने त्याला शास्त्रीय स्वरूप दिले, नंतर ते विज्ञान झाले, तत्त्वज्ञान उरले नाही.

इथे रसेल प्रश्नांचे ‘तात्त्विक स्वरूप’ आणि ‘तत्त्वज्ञानाचा प्रश्न’ असा फरक करतो. विश्व म्हणजे काय? मन म्हणजे काय? या प्रश्नांचे स्वरूप तात्त्विक (Philosophical) आहे, पण ते तत्त्वज्ञानाचे प्रश्न विचारणारे मूलभूत ‘तत्त्वज्ञान’ (Philosophy) नाही. या तात्त्विक प्रश्नांची उत्तरे शोधली जातील तेव्हा त्या उत्तरातून जे काही गवसेल ते ‘विज्ञान’ असेल, पण ‘ईश्वरशास्त्र’ नसेल; याचा अर्थ जे काही ज्ञान गवसेल ते अर्थातच ईश्वरशास्त्रही नसेल आणि विज्ञानही नसेल; तर जे गवसेल तेच तर ‘तत्त्वज्ञान’ असेल. त्याचाच तर शोध घेणे, हे तत्त्ववेत्त्यांचे कार्य असते, असे रसेलला म्हणावयाचे आहे.

कुतूहल जागती ठेवणारी अनिश्चितता

रसेलच्या मते, तत्त्वज्ञान वस्तुतः माणसाच्या मनाशी जोडले गेले आहे. पण माणसाचे मन आध्यात्मिकतेकडे झुकणारे आहे आणि आध्यात्माचा प्रांत तर नेहमीच धूसर, अनिश्चितत असतो. तत्त्वज्ञान मात्र  निश्चित ज्ञानाच्या शोधाचा प्रवास आहे. ते मनाचे मूळ कार्य आहे, पण कोणतेही ज्ञान उगमस्थळात अनिश्चित असते. त्यात धर्म(religion), अध्यात्म (spirituality) आणि वैज्ञानिक पद्धतीची वृत्ती (attitude of scientific method) यांची बेमालूम सरमिसळ झालेली असते. त्यांना त्यांच्या प्राथमिक अवस्थेत वेगळे करता येत नाही, ते कसे करावे याविषयी सामान्य माणसाला ज्ञान नसते. म्हणूनच तो त्याच्या सहजप्रवृत्तीनुसार धर्म आणि अध्यात्म यांच्याकडे झुकतो’ उघडच तत्त्वज्ञानाकडे तो येऊ शकत नाही. धर्म, अध्यात्म आणि वैज्ञानिक पद्धतीची वृत्ती यांच्या बेमालूम सरमिसळीतूनच तत्त्वज्ञान शोधावे लागते. म्हणूनच रसेलच्या मते ‘मूलतः तत्त्वज्ञान स्वरूपाने अनिश्चित असते’ आणि या अनिश्चिततेचे दोन प्रकार करता येतील.

पहिला प्रकार असा की, ही अनिश्चितता व्यावहारिक नाही, तर ‘तात्त्विक’ असते. तिच्यातून नवी निश्चितता, म्हणजे ‘नवे भान’ निर्माण होते. संवेदनशील माणूस अनिश्चित उत्तराकडून निश्चित उत्तराकडे जातो. दुसरा प्रकार असा की मानवी जीवनातील कित्येक मूलभूत प्रश्न आपल्या आध्यात्मिक जीवनाशी निगडीत आहेत. त्या प्रश्नांचे स्वरूपच असे आहे की ज्यांची निश्चित उत्तरे देता येत नाहीत. ही आध्यात्मिक अनिश्चितता धार्मिक श्रद्धांच्या मार्फत दूर करण्याचा प्रयत्न होत असतो. पण त्यातून मिळणारी उत्तरे दिशाभूल करणारी असतात. उदाहरणार्थ, नीति म्हणजे काय? हा प्रश्न आध्यात्मिक आहे. आणि त्याचे उत्तर देणे हे मुळात नीतिशास्त्राचे (Ethics) काम आहे. पण त्याचे उत्तर देते ‘धर्मशास्त्र!’ (Theology). धर्मशास्त्राच्या मते धार्मिक असणे म्हणजे नैतिक असणे. पण हे उत्तर तर चुकीचे, गैरसमज निर्माण करणारे आहे, हे निरीक्षणांती कळते. याचे कारण व्यवहारात आपण असे पाहातो की धार्मिक माणूस अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करतो. मग तो माणूस नैतिक कसा?

येथे ‘नैतिक असणे म्हणजे काय?’ हा तत्त्वज्ञानाचा प्रश्न आहे, धर्माचा नाही; त्याचे उत्तर तत्त्वज्ञानच देऊ शकते, ते तत्त्वज्ञानाकडूनच मिळवायचे असते. धर्माकडून दिली जाणारी उत्तरे किंवा धार्मिक समर्थन तात्त्विक समस्यांमधील अनिश्चितता दूर करत नसते.

मग ही अनिश्चितता कायम राहते का? तर रसेलच्या मते, आपण निश्चित उत्तराच्या शोधात असतोच, पण समजा या अनिश्चिततेतून निश्चिततेकडे जरी वाटचाल झाली नाही तरी उत्तरांच्या अनेक शक्यता निर्माण होतात. प्रश्नाविषयीचे आपले कुतुहल त्या शक्यता जागे ठेवतात. त्यामुळे आपल्या विचारांच्या कक्षा विस्तृत होतात. त्यामुळे विश्वाविषयीचे कुतूहल जागे होते. अशी अनिश्चितता हेच तत्त्वज्ञानाथे एक मूल्य मानता येईल, असे रसेलचे मत आहे.

जगाचा नागरिक

याहीपेक्षा जास्त रसेलच्या मते तत्त्वज्ञानाचे मूल्य आणखी एका गोष्टीत आहे. ती अशी की, तत्त्वज्ञानामुळे आपण आपल्या संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडू शकतो. निरपेक्षपणे, निःपक्षपातीपणे सारे विश्व आपल्या विचाराच्या कक्षेत आणू शकतो. तात्त्विक चिंतन हे मित्र आणि शत्रू, उपयुक्त आणि उपद्रवी, चांगले – वाईट या द्वंद्वाच्या पलिकडे जाऊन सार्‍या विश्वाला गवसणी घालते. असे स्वतंत्र आणि निःपक्षपाती विचार करणारे मन हेच रोजच्या कृतीमध्ये आणि भावनिक व्यापारांमध्ये स्वातंत्र्य, निःपक्षपातीपणा, न्याय यांचा आविष्कार घडविते. असे मन स्वतःला ‘जगाचा नागरिक’ बनविते, असे रसेल म्हणतो.

तत्त्ववेत्त्यांचे तत्त्वज्ञानाबद्दलचे गैरसमज

रसेलच्या मते, तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक गैरसमजांनी दोन प्रकारचे घोटाळे केले.

रसेल त्याच्या  History of Western Philosophy (1945) शेवटच्या भागात एक निरीक्षण नोंदवताना तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक गैरसमजांचा थोडक्यात आढावा घेतो. तो म्हणतो की, ‘तत्त्वज्ञानाच्या संपूर्ण इतिहासाचे अवलोकन करता, अतिशय चमत्कारिकरित्या परस्पर सुमेळ साधणारे नव्हे तर जवळपास पूर्ण कुमेळ वाटेल अशा दोन घटकांनी हे तत्त्वज्ञान बनले आहे, असे दिसेल. एका बाजूला विश्वविषयक सिद्धांत आहेत तर दुसऱ्या बाजूला नैतिक किंवा राजकीय सिद्धांत आहेत जे मानवी जीवन उत्तम कसे असू शकेल, याचे दर्शन देऊ पाहातात. पण या दोन्ही सिद्धांत सुस्थापित करण्यात तत्त्ववेत्त्यांना यश आले नाही. विश्वविषयक सिद्धांत आणि राजकीय सिद्धांत या दोन्हीमध्ये फरक करण्यात त्यांना आलेले अपयश हाच वैचारिक गोंधळाचा मूळ स्रोत आहे. प्लेटोपासून विलियम जेम्सपर्यंतच्या अनेक तत्त्ववेत्त्यांनी हा गोंधळ केला आहे. या साऱ्यांनी नैतिक आणि मानसिक सुधारणा करण्याच्या इच्छेने ग्रस्त होऊन विश्वाची रचना करता येईल, असा ग्रह करून घेतला होता. त्यांच्या म्हणण्यांनुसार ‘जे विश्वास माणसाला सद्गुणी बनवतात त्यांचे ‘जाणणे त्यांचे ज्ञान होणे महत्वाचे आहे’, अशी त्याची धारणा होती आणि त्या अनिवार इच्छेने त्यांनी हे विश्वास ज्यामुळे सत्य आहेत, असे सिद्ध होऊ शकतात’ अशा अनेक युक्तिवादांचा नव्याने शोध लावला. ते युक्तिवाद अतिशय विद्वत्तापूर्ण आहेत, यात शंका नाही. तिथूनच ‘नीति म्हणजेच ज्ञान’ किंवा ‘साधू माणूस चांगले राज्य करु शकतो’ असे सिद्धांत मांडले गेले. पण पण रसेलच्या मते ही सारी पूर्वग्रहदूषित मते आहेत. तो त्यांची चिकित्सा करतो. तो पुनर्परीक्षण करु इच्छितो : नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही परिप्रेक्ष्यातून.

नैतिकदृष्ट्या जो तत्त्ववेत्ता त्याच्या व्यावसायिक कौशल्याचा वापर सत्याचा निर्हेतुक शोध घेण्याशिवाय अन्य कारणाकरता करतो, तो एका प्रकारच्या विश्वासघातासाठी दोषी आहे. तात्त्विक अन्वेषण करत असताना तो जसजसा प्रगती करत जाईल त्या प्रवासात काही विश्वास- मग ते सत्य असो वा असत्य – ते चांगले वर्तन करण्यास प्रवृत्त करतात, असे तो तत्त्ववेत्ता समजत असेल तर, त्याने त्याचे मुक्त तात्त्विक कल्पनाविचार केवळ ‘तत्त्वज्ञानाला  क्षुल्लक पातळीवर’ आणण्यासाठीच वापरले आहेत, असे म्हणावे लागते. ‘अस्सल तत्त्ववेत्ता’ सदैव परीक्षणासाठी तयार असतो, आपल्या प्रत्येक पूर्वधारणा चिकित्सेसाठी तयारीत ठेवतो. पण इतिहासात असे घडले नाही, विशेषतः चैतन्यवादी (Idealist) तत्त्ववेत्त्यांनी स्वतःला चिकित्सेच्या बाहेर ठेवले. पण अशी मर्यादा तत्त्वज्ञानावर आलीच, अगदी जाणता-अजाणता आली तरी, ‘तत्त्वज्ञानाला भयाने पक्षाघात’ होतो. आणि मग जणूकाही ‘धोकादायक विचार उच्चारणाऱ्या कोणावरही सेन्सॉरशिप लादून शिक्षा देण्याच्या राजसत्तेच्या पार्श्वभूमीची तयारीच केली जाते, ते श्रेय अशा ‘स्वयंघोषित तत्त्ववेत्त्या राजा कडेच जाते. अशा रीतीने तत्त्ववेत्त्याने स्वतःच अशी सेन्सॉरशिप स्वतःच त्याच्या संशोधनावर ओढवून घेतलेली असते.

रसेल पुढे म्हणतो, “बौद्धिकदृष्ट्या पाहाता तत्त्वज्ञानातील चुकीच्या नैतिक विचारांच्या स्वीकृतीने तत्त्वज्ञानातील प्रगतीवर अतिशय व्यापक असामान्य विपरीत परिणाम घडून आला आहे. धार्मिक कर्मठ धारणांची सत्यता तत्त्वज्ञान सिद्ध करते की नाही, यावर मी तरी विश्वास ठेवत नाही, पण प्लेटोपासूनच्या बहुतेक तत्त्ववेत्त्यांनी अमरत्व आणि ईश्वराचे अस्तित्व याविषयीचे ‘पुरावे’ देणे हे आपल्या कामाचा अनिवार्य हिस्साच मानला आहे. पण त्यात अनेकांना आपल्या पूर्वसूरींच्या सिद्धींमध्ये अनेक दोष सापडले आहेत- सेंट थॉमस अॅक्विनास (Thomas Aquinas 1225–1274)  सेंट अॅन्सेल्म (Saint Anselm of Canterbury 1033–1109) ची सिद्धी झिडकारली आणि इमान्युएल कान्ट (Immanuel Kant 1724-1804) ने रेने देकार्त (René Descartes 1596-1650) ला अव्हेरले, -पण त्यांनी त्याचवेळेस त्यांचे स्वतःचे सिद्धांत पुढे केले. आपले पुरावे वैध असल्याचे सिद्ध दर्शवण्याच्या हेतूने त्यांना तर्कशास्त्रालाच चूक ठरवावे लागले, गणिताला गूढ बनवावे लागले आणि त्यांच्यात खोलवर रुतलेले पूर्वगृह थेट स्वर्गातूनच अवतरलेल्या अंतःप्रज्ञाधारित ज्ञान आहे, असा देखावा करावा लागला.”

रसेल स्पष्ट करतो की ‘काही क्षेत्रात वैज्ञानिक चिकित्सेचा पाठपुरावा करणे म्हणजे तात्त्विक चिकित्सा करण्याची गोष्ट असू शकत नाही. पण तात्त्विक चिंतनाचा एक मार्ग विज्ञानात आढळू शकतो. जेव्हा आपण सर्वसाधारणपणे “हे काय आहे?” (what it is) या प्रश्नाचा विचार करु जातो तेव्हा सकृतदर्शनी वैज्ञानिक प्रश्न भासत असला तरी आपण प्रत्यक्षात तात्त्विक प्रश्नाशी भिडत असतो. वैज्ञानिक पद्धतीच्या आधारभूत तत्त्वांचा अभ्यास हा वस्तुतः तात्त्विक अभ्यास असतो. ‘हे जग कशासारखे आहे?” (what the world is like) हा तत्त्ववेत्त्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक तात्त्विक प्रश्नांपैकी एक उचित प्रश्न आहे. पण इथे एक फरक करण्याची काळजी घेतली पाहिजे. विज्ञान ज्याप्रमाणे वस्तुस्थितीचे वर्णन करते तसे काही करणे हा तात्त्विक चिंतनाचा खरा हेतू नाही. नेमकी हीच मर्यादा चेतनावादी तत्त्ववेत्त्यांनी समजून-उमजून न घेतल्यामुळे ते तात्त्विक मार्गापासून जणू पदच्युत झाले. तत्त्वज्ञान जे काही देऊ शकते ते हे की विज्ञानाकडून लाभणारा अनुभवजन्य तपशीलाचे अवलोकन करून त्याला एक चौकट पुरविणे, त्या साऱ्याला एक विशिष्ट तऱ्हेची पद्धती देणे, तिला ज्ञानात्मक शिस्त उपलब्ध करून देणे. वस्तुतः आपण जेव्हा कोणत्याही वैज्ञानिक कृती करु पाहातो तेव्हा आपण आपल्याही नकळत तत्त्वज्ञानाच्या प्रांतात पाऊल ठेवलेलेच असते, तात्त्विक चिंतनाच्या प्रक्रियेत आपण सहभागी झालेलोच असतो. ह्याच अर्थाने प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाने उपस्थित केलेले जग काय आहे? ते कशाने बनले आहे?इत्यादी प्रश्न वैज्ञानिक होतेच, पण ते उपस्थित करण्याची वृत्ती ‘तत्त्वज्ञान’ निर्माण करणारी होती. ‘विज्ञान आणि तत्त्वज्ञान’ या दोन ज्ञानात्मक वृत्ती आणि त्यानुसारच्या कृती जगात केवळ ग्रीक संस्कृतीत घडल्या, तिच्यावरच पाश्चात्य संस्कृती विकसित झाली. विज्ञान त्याच संस्कृतीत निर्माण झाले, म्हणून रसेल केवळ ‘ग्रीक-पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञाना’ ला ‘शहाणपण’ म्हणतो. तिचा इतिहास तो मांडतो.

रसेलच्या मते, हे सारे तत्त्वज्ञान दिशाभूल करणारे ठरले आहे, तत्त्ववेत्त्यांच्या या तत्त्वज्ञानांनी अनेक गैरसमजांचा उदय झाला. म्हणून त्याच्या मते ‘तार्किक विश्लेषण’ (Logical Analysis) हाच तत्त्वज्ञानाचा खरा कार्यक्रम आहे, हे मानणाऱ्या विसाव्या शतकातील तत्त्ववेत्त्यांनी हे सारे प्रतिपादन, हे सारे तत्त्वज्ञान नाकारले. त्यांनी अतिशय खुल्या मनाने जाहीर केले की मानवजातीला गंभीर व महत्वाच्या वाटणाऱ्या अनेक प्रश्नांना निर्णायक उत्तरे शोधणे मानवी बुद्धीला अशक्य आहे, पण त्याचवेळी त्यांनी हेही नाकारले की ज्ञानाची ‘उच्च म्हणून काही पद्धती आहे की जिच्याने विज्ञानापासून आणि बुद्धीपासून लपलेली सत्ये शोधता येतात. या तत्त्ववेत्त्यांनी नेमकी अचूक उत्तरे आणि तीही वस्तुनिष्ठ पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न केला, त्यातून त्या तत्त्ववेत्त्यांच्या ‘समजून घेण्याच्या वृत्तीचे दर्शन होते, अन्य काहीही परिचित होत नाही. उदाहरणार्थ काही प्रश्न घ्या: संख्या म्हणजे काय? अवकाश आणि काल म्हणजे काय? मन म्हणजे काय, आणि जडद्रव्य म्हणजे काय? या प्रश्नांचा त्यांनी तार्किक विश्लेषण पद्धतीने विचार केला, पण ते गूढगुंजनात फरफटले गेले नाहीत, हे रसेल लक्षात आणून देतो. तो म्हणतो, “मी असे म्हणत नाही की आपण आत्ता आणि इथे या सनातन प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो, पण मी हे म्हणेन की अशी एक पद्धती शोधली गेली आहे, (जशी विज्ञानात शोधली गेली आहे) की ज्या पद्धतीत सत्याप्रती यशस्वी होत जाणारी अनुमाने आपण केली आहेत आणि जिथे प्रत्येक नव्या टप्प्यावर आधी जे घडून गेले आहे त्यात नवी सुधारणा आहे, कोणताही नकार नाही.”

रसेलच्या मतानुसार प्राचीन ग्रीक अन मध्ययुगीन पाश्चात्य-युरोपीय तत्त्ववेत्त्यांनी मांडलेल्या दिशाभूल करणाऱ्या तत्त्वचिंतनामुळे एकूणच तत्त्वज्ञानाविषयी सामान्य लोकात अप्रीति निर्माण झाली, त्यांचे अनेक गैरसमज झाले. माणसे तात्त्विकदृष्ट्या संपृक्त होण्याऐवजी तथाकथित व्यावहारिक माणसे बनली. हे जगाचे, समाजाचे व मानवजातीचे नुकसान आहे. जगात विषमता, शोषण, युद्धे, वर्णभेद, वंशभेद इत्यादी दुरिते  निर्माण होण्यामागे ही महत्वाची कारणे आहेत.

एक प्रश्न

येथे एक प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. तो असा की, रसेलने केवळ ग्रीक-पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानच विचारात घेतले आहे, इतर तत्त्वज्ञाने तो विचारात घेत नाही. त्याने असे का केले असावे?

तात्त्विकदृष्ट्या पाहाता, जगातील केवळ तीन देशांना आणि तीनच सभ्यता व संस्कृतींना तत्त्वचिंतनाची प्राचीन परंपरा आहे. भारत, ग्रीस आणि चीन. भारताची चिंतन परंपरा इ. स. पूर्व किमान 1200 वर्षे पासून सुरु होते. ग्रीक परंपरा इ. स. पूर्व किमान 600 वर्षे पासून सुरु होते. आणि भारतीय साहित्याप्रमाणे चिनी साहित्यास जवळपास ४,००० वर्षांची अखंड परंपरा आहे. कन्फ्युशियस (इ. स. पूर्व 551—479) चे तत्त्वज्ञान, लाओत्से (इ. स. पूर्व सहावे शतक) चे तत्त्वज्ञान आणि प्राचीन बौद्ध तत्त्वज्ञान अशी तीन तत्त्वज्ञाने आणि या तिन्ही तत्त्वज्ञानांनी पुरस्कृत केलेले त्यांचे धर्म, या साऱ्यांनी मिळून ह्या चिनी संस्कृति साकारली गेली. हे समग्र साहित्य एका पिढीने दुसऱ्या पिढीला मौखिक परंपरेने दिल्याने त्यातील बहुतेक भाग आजही उपलब्ध आहे. कागद, छपाई, बंदुकीची पावडर आणि कंपास हे चीनचे चार शोध म्हणजे प्राचीन चीनने मानवी संस्कृतीला दिलेले वैचारिक व भौतिक योगदान आहे.

ही तीन तत्त्वज्ञाने आणि तीन सभ्यता व संस्कृतींना रसेलने त्याच्या इतिहासात जागा दिलेली नाही, याचे कारण काय असावे? हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ग्रीकपाश्चात्य शहाणपण

‘Philosophy’ = Love of Wisdom ही प्राथमिक मूलभूत व्याख्या लक्षात घेऊन रसेलने “Wisdom Of The West” (१९५९) हा ग्रंथ लिहिला. पण या ग्रंथात The West म्हणजे केवळ ‘पाश्चात्य’ असा अर्थ रसेलला अपेक्षित नाही. रसेलच्या मते Wisdom Of The West म्हणजे ग्रीक-पाश्चात्य-युरोपीय या तिन्ही संकृतीमधील शहाणपण होय. तो ‘Wisdom’ चे- ‘शहाणपण’ चे स्वरूप उलगडून सांगतो.

रसेलने येथे ‘केवळ ‘ग्रीक-पाश्चात्य शहाणपण’ हीच संकल्पना निवडली आहे, ‘पौर्वात्य शहाणपण’ (Wisdom Of The East”) ही संकल्पना निवडलेली नाही. त्याने असे का केले, त्याचे निकष कोणते, याचा खुलासा देतो.

रसेलच्या मते, पहिली गोष्ट अशी की ‘ग्रीक-पाश्चात्य जगत’ आणि  ‘पौर्वात्य जगत’ दोन्ही जगे एकमेकांपासून पूर्ण स्वतंत्रपणे विकसित झाली आहेत. दुसरी गोष्ट अशी की ग्रीक संस्कृती आणि सभ्यतेत तत्त्वज्ञानात्मक चळवळ आणि वैज्ञानिक परंपरा  या दोन्ही बाबी हातात हात घालून निर्माण झाल्या आणि विकसित झाल्या, अन्य कोणत्याही सभ्यतेत असे घडलेले नाही. दोन ज्ञानात्मक चळवळी एकत्र निर्माण होणे, हे ग्रीकांशिवाय अन्य कोणत्याही संस्कृतीचे वैशिष्ट्य नाही.

रसेलच्या मते, हे दुसरे कारण म्हणजे पौर्वात्य मनाच्या चिंतनशीलेतेहून ग्रीक-पाश्चात्य तात्त्विक परंपरा मूलतः भिन्न आहे, ही वस्तुस्थिती पौर्वात्य चिंतन नावाची गोष्ट निर्माण करते. विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन्हींचा उदय केवळ प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात झाला आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाने ती पुढे विकसित केली. त्यामुळे ग्रीक बौद्धिक उद्यमशीलतेला ‘शहाणपणाच्या इतिहासात’ एवंगुणवैशिष्ट्यपूर्ण अवकाश प्राप्त होतो. विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या एकत्रित परंपरेने तर पाश्चात्य सभ्यतेला सुबक आकार दिला आहे. त्याच्या मते, ‘गर्भितार्थाने पाहाता ग्रीक तत्त्वज्ञान म्हणजेच पाश्चात्य तत्त्वज्ञान’ आहे. (Wisdom Of The West, 1953, viii) जणू रसेलच्याच मताचा विस्तार करावा, अशा आशयाचे विधान नंतर त्याचा गुरु-मित्र व्हाईटहेडने केले. ‘युरोपीय तत्त्वज्ञानात्मक परंपरा प्लेटोच्या तत्त्वज्ञानाला दिलेल्या तळटीपांच्या मालिकांनी भरलेली आहे, हे या परंपरेचे सर्वात सुरक्षित सर्वसाधारण वैशिष्ट्य आहे” (The safest general characterization of the European philosophical tradition is that it consists of a series of footnotes to Plato….”Alfred North Whitehead, Process and Reality, CHAPTER I FACT AND FORM SECTION p. 39 Free Press, 1979) असे वर्णन व्हाईटहेडने केले.

अर्थातच या मताला रसेलची सहमती नाहीच. कारण व्हाईटहेड प्लेटोच्या प्रभावाखाली असला तरी रसेलवर तो प्रभाव नव्हता, उलट प्लेटोच्या तत्त्वज्ञानाला त्याचा तीव्र विरोध होता, प्लेटोच्या अनेक चुका त्याने दाखवून दिल्या. ‘प्लेटो गणितप्रेमी असला तरी गणित ज्याचा आधार आहे त्या विज्ञानाचा तिरस्कार करत होता’ ही प्लेटोची मोठी चूक प्रथम रसेलनेच जगापुढे आणली. परिणामी प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा विज्ञानच्या विकासाला काहीच आधार लाभू शकला नाही. व्हाईटहेडने केवळ प्लेटोचे तत्त्वज्ञान विचारात घेतले आणि केवळ युरोपीय तत्त्वज्ञानाचे वर्णन केले. रसेलने प्लेटोचे तत्त्वज्ञान विचारात घेतलेच पण प्लेटोपूर्व संपूर्ण प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान विचारात घेतले. ही रसेलची अधिकची व्यापक दृष्टी होती.

पाश्चात्य तत्त्वज्ञान (Western Philosophy) आणि युरोपीय तत्त्वज्ञान (European Philosophy) यात काही सूक्ष्म भेद आहेत, तरीही दोन्हींचा समावेश ‘पाश्चात्य तत्त्वज्ञान’ याच संकल्पनेत केला जातो. काही वेळेस संदर्भानुसार युरोपीय तत्त्वज्ञानाचे इंग्लंडमधील व्यावसायिक तत्त्ववेत्त्यांनी ‘आंग्लेतर तत्त्वज्ञान’ (Continental Philosophy) असे वर्गीकरण केले आहे. रसेलने हे सूक्ष्म फरक लक्षात घेऊन प्लेटोपूर्व संपूर्ण प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान विचारात घेऊन त्या समग्र ज्ञानसाठ्याला पाश्चात्य तत्त्वज्ञान बनवले. रसेलचा हा दावा सत्य आणि युक्त आहे, असे म्हणणे भाग पडते.

पौर्वात्य म्हणजे काय

रसेलने ‘पौर्वात्य’ (East) म्हणजे काय, हे गृहीत धरले आहे किंवा ते त्याने पुरेसे स्पष्ट केलेले नाही. त्याच्या  History of Western Philosophy (1945) मधील लेखनावरून असा अंदाज लावता येतो की त्याच्या मते, ‘पौर्वात्य’ मध्ये बायझन्टीन साम्राज्य, पर्शियन साम्राज्य (किंवा हखामनी साम्राज्य), कन्फ्युशियसप्रभावित चीन किंवा शिंतोधर्म  संप्रदायप्रभावित चीन, तसेच रशिया, जपान, इस्लामी खिलाफत प्रदेश आणि भारत अशा प्रदेशांचा समावेश होता. जगाच्या सर्वच भूप्रदेशात कोणती ना कोणती सभ्यता होतीच, प्रत्येक सभ्यतेने मानवी संस्कृती (Culture) मध्ये काहीएक महत्वाची भर टाकली आहे, त्यामुळे सभ्यता (Civilization) म्हणजे केवळ पाश्चात्य-युरोपीय सभ्यता आहे, असे समजणे पूर्ण चुकीचे आहे, असे रसेल या ग्रंथात स्पष्ट करतो.

या साऱ्या सभ्यतांमध्ये ‘विज्ञान’ ही शोधले गेले, अनेक सिद्धांतही मांडले गेले, पण त्यांच्यातून ‘वैज्ञानिक दृष्टी’ मात्र विकसित होऊ शकली नाही. याची अनेक उदाहरणे रसेल देतो. जसे की ‘भारतीय गणित’ जगातील अनेक देशात व संस्कृतीत विविध भाषांतरातून पोहोचले, पण खुद्द भारतात ‘वैज्ञानिक व गणिती दृष्टी’ विकसित होऊ शकली नाही. साहजिकच ‘पौर्वात्य शहाणपण’ या संकल्पनेत त्याच्या मते या साऱ्या भूप्रदेशातील ‘शहाणपण’ चा समावेश आहे.

भारतीय व चिनी तत्त्वज्ञान परंपरांनी केवळ अमूर्त चिंतनावर भर दिला, पण त्यातून विज्ञान अथवा वैज्ञानिक रीती विकसित होऊ शकल्या नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्यात वैज्ञानिक विचारांची बीजे नव्हती, ती होती; पण धर्म आणि धर्मसंस्थांचा म्हणजे इस्लाम, ज्यू, ख्रिस्ती, वैदिक हिंदू, श्रमण बौद्ध व जैन धर्मांचा इतका भीषण पगडा होता की त्यांच्या विचारात असलेली मूलभूत वैज्ञानिक वृत्ती पूर्णपणे मारली गेली.

ज्यास आज आपण वैज्ञानिक पद्धती म्हणतो तिची मुळे प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात आढळतात. त्यामुळे प्रारंभीचे (इ.स. पू. ६२५ ते ४८० या काळातील) ग्रीक तत्त्वज्ञान म्हणजे एका अर्थाने विश्वशास्त्रीय तत्त्वज्ञान (Ancient Greek Astronomy) होते. या काळातील तत्त्वज्ञ खरे तर भौतिक-शास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रश्न विचारले ते विश्वाविषयीचे वैज्ञानिक स्वरूपाचे होते. ‘निसर्गातील आंधळ्या शक्ती सोडल्या तर जगात चलनवलन करणारे असे काही नाही की त्याचा उगम ग्रीसमध्ये नाही’, अशी दर्पोक्ती सर हेन्री मेन (Sir Henry James Sumner Maine१८२२-१८८८) या ब्रिटिश इतिहासकाराने केली. तथापि ‘प्रश्न उपस्थित करणे’ ही कृतीच माहीत नसण्याच्या काळात ‘प्रश्न विचारणे’ ही मूलत: तात्त्विक कृती मानली गेली. त्यामुळे ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या शास्त्रीय प्रश्नांना आणि त्यांच्या अशास्त्रीय उत्तरांना तत्त्वज्ञान हा दर्जा मिळाला. हान्स रायशेनबाख (Hans Reichenbach  १८९१- १९५३) या जर्मन विज्ञान तत्त्ववेत्त्याच्या मते ‘प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान म्हणजे योग्य प्रश्नांना दिलेली चुकीची उत्तरे होती.’

ज्यास वैज्ञानिक पद्धती म्हणता येईल तिचा प्रारंभ अ‍ॅरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४-३२२) केला. मूर्त, इंद्रियगोचर वस्तूंचे बनलेले विश्व हेच खरेखुरे विश्व होय, अशी अ‍ॅरिस्टॉटलची धारणा होती. वस्तूंचे व विश्वाचे स्वरूप समजून घ्यायचे, तर त्यांचे निरीक्षण करून त्यांचे गुण, त्यांचे वर्तन याविषयी विश्वसनीय माहितीचा आधार घ्यावा लागतो, असे तो समजत होता. पद्धतशीर निरीक्षण ही त्याची वैज्ञानिक संशोधन पद्धती होती.

विज्ञानवादाचे दावे 

“आमच्याकडे विज्ञानही होते आणि वैज्ञानिक पद्धतीही होती” असा दावा विद्यमान काळातील अनेक देश पर्यायाने अनेक संस्कृतींनी केला आहे. भारतातही हे दावे केले जात आहेत, विशेषतः हिंदुत्ववाद राजकीय सत्तेवर आल्यानंतर हे दावे तीव्र झाले आहेत. उदाहरणार्थ Hindu Wisdom  या संकेतस्थळावर याची मांडणी आढळेल. पण त्याचवेळेस जातीव्यवस्थेचे अवैज्ञानिक मिथ्या समर्थनही तेथे आढळते. ज्यामुळे ‘केला जाणारा दावा वैज्ञानिक आहे, हे निश्चित होण्यासाठी जो मूलाधार लागतो तोच नेमका देण्यास हे संबंधित दावेदार असमर्थ ठरतात. असा ‘दावा वैज्ञानिक आहे’ हे सिद्ध करण्यासाठी त्या दाव्याठायीचं जी ‘वैज्ञानिक पद्धती’ अंगभूत असली पाहिजे, तीच नेमकी तिच्यात उपलब्ध नसते. निरीक्षण, अभ्युपगम, पडताळणी, प्रयोग, सिद्धता इत्यादी वैशिष्ट्ये असणारी वैज्ञानिक पद्धती आणि त्यातून निर्माण झालेली वैज्ञानिक परंपरा यांच्या अस्तित्वाचे यथार्थ पुरावे हे संबंधित दावेदार देऊ शकत नाहीत. मुख्य म्हणजे ‘विज्ञान सर्वांसाठी उपलब्ध असते’ ही विज्ञानाची सार्वत्रिकता ते दाखवू शकत नाहीत. राजकीय भाषेत ‘विज्ञान व वैज्ञानिक पद्धती लोकशाही स्वरुपाची असते’ हे सिद्ध करु शकत नाहीत. निर्मिती, वितरण, प्रशिक्षण, प्रसार-प्रचार, शिक्षणपद्धती इत्यादीमार्फत विज्ञान जनसामान्यांपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय ते झिरपले आहे, याचे पुरावे ते देऊ शकत नाहीत. फार तर प्राचीन काळी असलेल्या काही सिद्धांतांचा दाखला देऊ शकतात, पण तो निर्णायक नसतो. त्यामुळे असे दावे निकाली निघतात. उदाहरणार्थ आपण भारतीय असल्याने ‘भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती’ चे स्वरूप आपण पाहू:

भारतीय तत्त्वज्ञानातील वैज्ञानिक बीजे

उदाहरणार्थ, भारतीय साहित्यातील ‘नासदीयसूक्त’ (ऋग्वेद मंडल १०,सुक्त १२९) हे अतिशय प्राचीन आणि आद्यतम तत्त्वज्ञानात्मक सूत्र मानले जाते आणि त्यात अज्ञेयवाद आणि वैज्ञानिक वृत्तीचा आढळ व्यक्त होतो. सभोवतालचे दृश्य, इंद्रियगोचरविश्व, म्हणजे आपल्या इंद्रियांना जाणवणाऱ्या जगाची, सृष्टीची निर्मिती किंवा उत्पत्ति कशी झाली? हा नासदीयसूक्ताचा विषय आहे. त्यामुळे त्यास सृष्टयुत्पत्ति सूक्त– ‘सृष्टीची उत्पत्ति स्पष्ट करणारे सूत्र’ असे म्हणतात. या सूक्तात व्यक्त होणारी तत्त्वज्ञांची ‘कल्पनाशक्ती व अज्ञाताचा शोध घेऊ पाहणारी त्यांची प्रतिभा’ यासाठी हे सूक्त नावाजलेले आहे. “विश्व कसे निर्माण झाले ?” हे कुतुहल हा या सूक्ताचा गाभा आहे.

या सूक्तात व्यक्त झालेल्या वैज्ञानिक विचारांच्या बीजांची आधुनिक वैज्ञानिक परिभाषेतील चर्चा अतिशय सोप्या मराठीत प्र. वि. पाठक यांनी ‘नासदीयसूक्ताचे परिशीलन’ या लेखात केली आहे. हे सूक्त भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेत शीर्षकगीत म्हणून वापरले गेले होते. या सूक्ताचा उल्लेख प्रसिद्ध नासाचे वैज्ञानिक कार्ल सेगन यांनी त्यांच्या Cosmos  ह्या दूरदर्शन मालिकेत केला आहे.

पण या सूक्ताचा आधार घेऊन प्राचीन काळापासून भारतात विज्ञानाची व वैज्ञानिक पद्धतीची परंपरा विकसित झाली, असे घडलेले नाही. उलट ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांचे तात्त्विक शिरकाण केले गेले.

विज्ञान वैज्ञानिक पद्धतीचे भावनिक धार्मिक अर्थ

भारतात विज्ञान व वैज्ञानिक पद्धती या संज्ञा भावनिक व धार्मिक अर्थाने येतात. उदाहरणार्थ, बौद्ध दर्शनात विज्ञान शब्द येतो, हा आधुनिक अर्थ नाही. त्याचा अर्थ मानवी जाणीव. पण यात वैज्ञानिक पद्धतीही उपलब्ध आहे, असाही काही जणांचा दावा आहे. उदाहरणार्थ, पाश्चात्य विद्यापीठात प्रोफेसर होणारा पहिला भिक्कू असा बहुमान प्राप्त करणारे अभ्यासक वालपोला राहुला ( Walpola Rahula Thero) यांच्या What the Buddha Taught  या  पुस्तकात असा दावा केला आहे.   आता हेही खरे आहे की, रसेल, आइनस्टाइन, ओपेनहायमर, नील्स बोर या सारख्या दिग्गजांनी बौद्ध तात्त्विक विचारात वैज्ञानिक विचाराची बीजे शोधली, पण ‘बौद्ध विचार हे आधुनिक अर्थाने विज्ञान आहे’ असे त्यांनी म्हटलेले नाही. विपश्यना गुरू सत्यनारायण गोएंकासुद्धा यात विज्ञान शोधतात, पण ते कोणत्या अर्थाने हे तपासले पाहिजे, असे करणे हीच वैज्ञानिक दृष्टी आहे.

योगविद्या हे विज्ञान आहे, असा योग शिक्षकांचा आणि योग व निसर्गोपचार केंद्र मालकांचा आवडता सिद्धांत आहे. पण योग हे परंपरेनुसार भारतीय मानसशास्त्र समजले जाते, तरीही पाश्चात्त्य मानसशास्त्र ज्या रीतीचे मानसशास्त्र आहे तसे ते विज्ञान नाही.

ज्या सांस्कृतिक अभिसरणाने पाश्चात्त्य विज्ञान व वैज्ञानिक पद्धती सर्वमान्य झाली, तशी भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती का होऊ शकली नाही, याचा शोध घेणे आवश्यक आहे. आणि असा प्रयत्न चालू आहे.

देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांचे योगदान

देबीप्रसाद चट्टोपाध्याय (१९१८-१९९३) या भारतीय तत्त्ववेत्त्याच्या मते भारतीय दर्शन परंपरेत एक अतिशय बलशाली भौतिकवादी विज्ञानवादी विचार होताच, पण विज्ञान परंपरा होती. त्यांच्या मते आयुर्वेद म्हणजे चरकसंहिता हाच केवळ एकमेव प्राचीन ग्रंथ असा आहे, की जो खऱ्या अर्थाने इहवादी आणि आधुनिक अर्थाने ज्यास विज्ञान म्हणता येईल, अशा क्षमतांचा आहे. देबीप्रसाद यांनी प्राचीन भारतीय विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती या विषयासाठी सारे आयुष्यच वाहून घेतले. या संदर्भातील ‘ Lokayata A Study in Ancient Indian Materialism’ आणि Science and Society in Ancient India ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. तथापि त्यांच्या मते वर्ण-जाती-लिंगभेदभाव हाच विज्ञान विकासातील मुख्य अडथळा ठरला. What is Living and What is Dead in Indian Philosophy या त्यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘भारताच्या विद्यमान तात्त्विक गरजा समोर ठेवून आपल्या दार्शनिक परंपरांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे’ आणि ‘आपल्या विद्यमान तात्त्विक गरजा म्हणजे इहवाद, बुद्धिवाद आणि विज्ञाननिष्ठा.’

देबीप्रसाद यांचे मत लक्षात घेता प्राचीन भारत म्हणजे विद्यमान नकाशात दिसणारा भारत असा नसून भारतीय उपखंड असे समजणे योग्य आहे. अश्मयुगीन काळापासून भारतीय उपखंडात जीवन जगण्याची रीत म्हणून काही एक विज्ञान होतेच. मेहेरगढ(आता पाकिस्तानात)पासून मानवी वस्ती आढळते, याचा अर्थ काहीएक निश्चित विज्ञान होते. बौधायन, आपस्तंभ, लगद, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, कणाद, वराहमिहिर, नागार्जुन, सुश्रुत, चरक, पतंजली, लल्ला गोविंदस्वामी, गणेशोपाध्याय, पक्षधर, नारायण पंडित नीलकंठ हे प्राचीन व मध्ययुगीन तत्त्ववेत्ते आणि श्रीनिवास रामानुजन, श्रीराम अभ्यंकर, वसिष्ठ नारायण सेठ, दिवाकर विश्वनाथ, रामन, नरेंद्र करमरकर, जगदीशचंद्र बोस, सी. चंद्रशेखर, प्रसंतचंद्र महालनोबीस, डी. के. रायचौधरी, शकुंतलादेवी, जयंत नारळीकर, यशपाल यांच्यापर्यंत विज्ञान विचाराची परंपरा आहेच. व्याकरण, भाषाशास्त्र, तर्कशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशात्र, अर्थशास्त्र, एवढेच काय पण कामशास्त्रही प्राचीन काळापासून भारतात प्रचलित आहे. पण या साऱ्यांमधून विज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, वैज्ञानिक पद्धती अशी ज्ञानरचना विकसित झाली आहे, असे दिसत नाही. शिवाय भारतात हिंदू, बौद्ध, जैन हे तीन प्राचीन आणि शीख हा अर्वाचीन धर्म मिळून चार धर्म आहेत. त्यांची प्रत्येकाची स्वतंत्र धार्मिक अधिसत्ता आहे. तिचा प्रभाव सर्वाधिक आहे.

भारतीय परंपरेचे पुनर्मूल्यांकन  

विज्ञानमूलक विचार अस्फुट रूपात असणे आणि त्या विचारांची प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धती बनणे यात फरक आहे. विज्ञानाच्या जवळ जाणारा अथवा विज्ञानाची बीजे असणारा विचार असणे आणि वैज्ञानिक पद्धती बनविणारा अस्सल वैज्ञानिक विचार असणे, या संकल्पनांमध्ये फरक केला पाहिजे. म्हणूनच पाश्चात्त्य विज्ञान तत्त्ववेत्त्यांनी मिथ्या विज्ञान आणि अस्सल विज्ञान असा फरक केला. गेल्या काही दशकांपासून भारतीय परंपरेचे पुनर्मूल्यांकन होत आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच्या राजकीय व सामाजिक सुधारणांपेक्षा हे पुनर्मूल्यांकन वेगळ्या रीतीचे व भिन्न उद्दिष्टांचे आहे. परंपरेचे पुनर्मूल्यांकन नेहमीच तात्त्विक असावे लागते, त्यानुसार Indian Council for Philosophical Research या संस्थेने संशोधन प्रकल्प राबविला आहे.(पण ही संस्थाही सध्या हिंदुत्ववादी सत्तेच्या अमलाखाली गेली आहे.) देबीप्रसादांच्याच संपादनाखाली आयसीपीआरतर्फे History of Science, Philosophy and Culture in Indian Civilization‘ हा ५० खंडांचा प्रकल्प भारत सरकारने राबविला आहे. यातील काही खंड केवळ भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती या विषयावरील आहेत.

विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत विज्ञान शिकविले जाते म्हणजे सिद्धांत शिकविले जातात; पण वैज्ञानिक दृष्टी दिली जात नाही. प्रत्येक भारतीय नागरिकात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, हे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार (विभाग ४ अ, कलम ५१ अ) सरकारी धोरणांचे कर्तव्य आहे. (पण आपली तत्त्वज्ञानातील प्राचीन वैज्ञानिक पद्धती प्रश्न विचारण्यापासून सुरू होते, पण आपली विद्यमान परीक्षा पद्धती मुलांचे प्रश्न विचारणे बंद करून टाकते. पाठांतरावर भर देणारे पोपट तयार करणे, हे शालेय पोपटविज्ञान शिक्षण व्यवस्था आणि पालक मंडळीही पाळतात.)

या सगळ्या ज्ञानामुळे रसेलचे गैरसमज किती मिटले असते कोण जाणे!? पण नसते मिटले, असे म्हणावे लागेल. त्याची दोन कारणे दिसतात, पहिले हे सारे संदर्भ पुरातन आणि प्राचीन संदर्भ आहेत. भारतात वैज्ञानिक विचारांची बीजे होती, ती बीजेचं राहिली, त्यांचा विज्ञानवृक्ष होऊन त्याची फळे सामान्य भारतीय समाजाला ‘इंग्लिश विद्या’ भारतात येईपर्यंत कधीही चाखता आली नाहीत, हे मात्र सत्य आहे.

आजचे भारतीय विज्ञान हे पाश्चात्य विज्ञानावर बेतलेले आहे. असे नाही की, एकूणच ‘विज्ञान’ या ज्ञानाच्या साठ्यात भारतीय वैज्ञानिकांचे योगदान नाही, ते आहेच, यात शंका नाही. पण भारतात पाश्चात्य अर्थाने विज्ञानाचा विकास झाला, असे म्हणावे असे पुरावे देता येणे कठीण आहे. दुसरे कारण, सध्या वर्णजातीलिंगभेद अतिशय तीव्र होत आहे, हिंदुत्ववादी शक्ती सर्व प्रकारच्या बौद्धिक क्षेत्रांवर कब्जा करण्याचा प्रयत्नच करत आहे, असे नसून त्यांनी त्या साऱ्याच संस्था ताब्यात घेतल्या आहेत. Indian Council for Philosophical Research संस्था हिंदुत्ववादी सत्तेच्या अमलाखाली गेली आहे. त्यांचा अग्रक्रम लोकशाहीप्रधान आणि विज्ञानवादी नाही.

रसेल त्याच्या “The Impact of Science on Society” (1951) या दीर्घ निबंधात एक निरीक्षण नोंदवतो, रसेल म्हणतो,” सुदैवाने पाश्चात्त्य देशात औद्योगीकीकरण व लोकशाही या व्यवस्था एकत्रपणे अंमलात आल्या आहेत . आज जर लोकसंख्य योग्य प्रमाणात राखली गेली तर नवीन तंत्रज्ञानाने एका माणसाने केलेले उत्पादन त्याच्यासह इतर अनेकांना पुरेल इतके होऊ शकते व समृद्धीचे वाटप होऊ शकते . जर देशामध्ये सुबुद्ध व्यवस्था असेल व ताठर पंथशाही नसेल तर आज सर्वांचे जीवनमान यशस्वी प्रयत्न करणे शक्य झाले आहे . ब्रिटन व अमेरिकेत असे प्रयत्न मोठ्या प्रमाणात यशस्वी सुद्धा झाला आहेत . आणि युद्धे झाली नसती तर हे प्रयत्न आणखी यशस्वी झाले असते.”

” जीवनमान उंचावण्याचा विज्ञानाचा प्रयत्न तीन घटकांवर अवलंबून असतो. निकोप लोकशाही व्यवस्था, चांगली कामगार चळवळ आणि संतति नियमन. अर्थात या तीनही व्यवस्था जगातील श्रीमंत वर्गाच्या आवडत्या व्यवस्था नाहीत. जर हे तीन घटक जगात पसरले तर आणि युद्धे वारंवार घडली नाहीत तर जगातील गरिबी हटविणे , आणि माणसांचे अतिरेकी कष्ट कमी करणे आज विज्ञानाने शक्य केले आहे. पण हे तीन घटक नसताना विज्ञान जगात जास्त अनागोंदी अवस्था निर्माण करू शकेल. सध्याच्या प्रमाणात जर लोकसंख्या वाढत गेली तर जगातील दारिद्र्य व कष्ट हे दोन शाप नाहीसे करणे अशक्य होईल.”

रसेलचे हे निरीक्षण सुमारे ७० वर्षांपूर्वीचे आहे, पण भारतीय समाजस्थितीला आज लागू आहे, म्हणजे एका अर्थाने भारत आज ७० वर्षे मागे आहे, असाही होऊ शकतो. भारत विज्ञानवादी देश आहे, लोकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती आहे असे म्हणावे तर विज्ञानाचा रसेल म्हणतो तसा जीवनमान उंचावण्याचा विज्ञानाचा प्रयत्न आढळून येत नाही. लोकसंख्या हा वैज्ञानिक विषय न होता, राजकीय विषय बनला आहे. निकोप लोकशाही लोप पावत जाते आहे…

नवे गैरसमज

सामान्य लोकांचे तत्त्वज्ञानविषयक गैरसमज आणि तत्त्ववेत्त्यांचेही तत्त्वज्ञानविषयक गैरसमज, या दोन्ही प्रकारच्या गैरसमजांनी अनेक प्रकारच्या सामाजिक घटनांवर परिणाम केलाच पण शुद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रांतातही अनेक चुका केल्या, असे रसेल म्हणतो. भारतीय तत्त्वज्ञानाने तर प्राचीन काळापासूनच अनेक गैरसमज निर्माण केले आहेत. देबीप्रसाद यांचे तत्त्वज्ञान आज जवळपास अस्तित्वात नाही. या संबंधात मी राज्यातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास : एक विलापिका हा लेख लिहिला, त्याचा अजूनही कोणीही प्रतिवाद केलेला नाही, ही बौद्धिक अनास्था म्हणावी लागले.

भर्तृहरीचापशु

रसेलच्या ‘व्यावहारिक माणूस’ या संकल्पनेशी जुळणारा विचार प्राचीन भारतीय महाकवी राजा भर्तृहरिने (अंदाजे पाचवे शतक) एका अर्थाने मांडला होता. तो उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य याचा थोरला सावत्र भाऊ होता. नीतिशतक, शृड्गारशतक व वैराग्यशतक या नावाने ओळखल्या जाणार्‍या ‘शतकत्रयम्’ या संस्कृत भाषेतील ग्रंथसंग्रहाचा रचनाकार म्हणून भर्तृहरी प्रसिद्ध आहे. या काव्यातील ‘नीतिशतकम्’ या भागात (श्लोक 12 वा) केवळ शरीरालाच महत्त्व देणार्‍या माणसाला भर्तृहरीने ‘पशु’ म्हटले आहे.

साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः।

तृणं खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम्

(साहित्य-संगीत-कला-विहीनः पुच्छ-विषाण-हीनः साक्षात् पशुः तृणम् न खादन् अपि जीवमानः, तद् पशूनाम् परमम् भाग-धेयं।)

याचा अर्थ, साहित्य, संगीत, कला यात रस नसणारा, त्यात कसलीही रुची घेणारा माणूस म्हणजे बिनशेपूटाचे आणि बिनशिंगाचे साक्षात जनावर असते. हे जनावर गवत सुध्दा खाता जगू शकते. त्याचे असे जगणे, हे इतर प्राण्यांचे नशीबच समजावे. म्हणजे त्यांनी जर गवत खाल्लेच असते तर बिचारे प्राणी उपाशी मेले असते! म्हणून ही बिनशेपटीची, बिनशिंगी जनावरे गवत खात नाहीत, हे प्राण्यांचे नशीबच मानले पाहिजे.

श्रीनिवास हेमाडे, हे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

(मुक्तसंवाद’, ०१ ऑगस्ट २०२१ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा पुनर्लिखित विस्तृत आणि संपादित लेख.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0