उ. प्रदेशः काँग्रेसच्या पहिल्या यादीत ४० टक्के उमेदवारी महिलांना

उ. प्रदेशः काँग्रेसच्या पहिल्या यादीत ४० टक्के उमेदवारी महिलांना

लखनऊः उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुकांसाठी काँग्रेसने आपली १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीत ४० टक्के उमेदवारी महिलांना देण्यात आली

सोशल मीडियाः मनाला ओळखणारे माध्यम
भाजपवर निवडणूक आयोग मेहेरबान
ग्रामपंचायत पोटनिवडणुकाः २१ डिसें.ला मतदान

लखनऊः उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुकांसाठी काँग्रेसने आपली १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीत ४० टक्के उमेदवारी महिलांना देण्यात आली आहे. त्या नुसार लखनऊ सीएए आंदोलनात भाग घेतलेल्या सदफ जफर यांना उमेदवारी देण्यात आली असून उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेच्या आईलाही उन्नाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उ. प्रदेश निवडणुकांत पक्ष ४० टक्के उमेदवारी महिलांना देईल अशी घोषणा केली होती. या घोषणेचा पुनरुच्चार करत गुरुवारी काँग्रेसने १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ४० महिलांना उमेदवारी दिली आहे.

लखनऊ येथील सीएए विरोधी आंदोलनात सदफ जफर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांना या प्रकरणी २० दिवस तुरुंगातही ठेवण्यात आले होते. तुरुंगात त्यांना मारहाण करण्यात आली होती. आंदोलनामुळे शहरात जे नुकसान झाले त्याची भरपाई करण्यासाठी उ. प्रदेश सरकारने सदफ जफर यांच्या छायाचित्रांची भित्तीपत्रके शहरभर लावली होती.

जफर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने लखनऊमधील लढत चुरशीची ठरेल अशी शक्यता आहे. कारण येथे सदफ जफर यांचा थेट मुकाबला भाजपचे आमदार व सध्याचे उ. प्रदेशचे कायदा मंत्री बृजेश पाठक यांच्याशी होणार आहे.

पक्षाने उमेदवारी दिल्यासंदर्भात सदफ जफर यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. आपण पहिल्यापासून धाडसी होतो आजही आहोत, मुलेही धाडसी आहेत, घटनात्मक मुल्यांच्या समर्थनार्थ आपण या पुढेही उभे राहू असे त्या म्हणाल्या. जे नेते निवडणुका पाहून पक्ष सोडत आहेत त्यांच्यावर जफर यांनी टीका केली. हे लोक स्वतःचा फायदा करण्यासाठी पक्षबदल करतात. गेले पाच वर्षे काँग्रेस व आमच्या नेत्या प्रियंका गांधी जमिनीवर संघर्ष करत आल्या आहेत, त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी आपण निवडणूक लढवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत माजी केंद्रीय मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्या फरुखाबाद येथून निवडणूक लढवणार आहेत.

उ. प्रदेशात एकूण ४०३ विधानसभा जागा असून तेथे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च व ७ मार्चला मतदान होणार असून १० मार्चला निकाल घोषित होणार आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0