मुंबईः देशातील वाहन निर्मितीतील अग्रगण्य कंपनी बजाज उद्योगसमुहाचे माजी संचालक राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. ते कर्
मुंबईः देशातील वाहन निर्मितीतील अग्रगण्य कंपनी बजाज उद्योगसमुहाचे माजी संचालक राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते. गेल्याच वर्षी एप्रिलमध्ये राहुल बजाज यांनी बजाज उद्योग समुहाच्या मुख्य संचालकपदावरून निवृत्ती घेतली होती.
देशातील जे भांडवलदार ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्य लढ्याला मदत करत होते, त्या मध्ये जमनालाल बजाज यांचे नाव अग्रणी म्हणून घेतले जाते. त्या जमनालाल बजाज यांचे राहुल बजाज हे नातू होते.
राहुल बजाज यांचा जन्म कोलकात्यात १० जून १९३८ साली झाला. वडील कमल नयन बजाज यांच्याकडून त्यांनी उद्योगाचे धडे गिरवले. अर्थशास्त्र व कायद्याची पदवी मिळवलेल्या राहुल बजाज यांनी प्रतिष्ठित हॉर्वर्ड विद्यापीठातून एमबीए पदवी मिळवली होती. पुढे
१९६५ मध्ये बजाज वाहन समुहाची जबाबदारी राहुल बजाज यांच्यावर आली, ती पुढे ४० वर्षे त्यांनी सांभाळली.
गेल्या सहा दशकात देशातील वाढता मध्यमवर्ग, शहरांचा वाढता विस्तार व रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी यामध्ये बजाज समुहाच्या दुचाकीचा मोठा वाटा आहे. ९०च्या दशकात बजाज ऑटोमोबाइलने कात टाकत दुचाकी वाहन निर्मिती स्पर्धेत आपले वेगळेपण जपले. त्यांच्या कंपनीचे ‘यू जस्ट कान्ट बीट ए बजाज’ हे घोषवाक्य व ‘हमारा बजाज’ ही जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. बजाज उद्योग समुहाने कालानुरुप दुचाकी वाहनांमध्ये बदल आणले, आपल्या घरात किफायतशीर किमती एक तरी दुचाकी असावी असे स्वप्न बाळगणाऱ्या मध्यम वर्गाचे स्वप्न बजाज समुहाने पूर्ण केले. त्याचे श्रेय राहुल बजाज यांना जाते.
राहुल बजाज यांच्या कार्यकाळात बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटी रु.वरून १२ हजार कोटी रु. पर्यंत पोहचली. २००१ मध्ये उद्योग जगतात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राहुल बजाज यांना पद्मभूषण या तिसऱ्या क्रमांकाच्या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. २००५ साली त्यांनी आपला मुलगा राजीव बजाज यांच्याकडे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपद सोपवले होते. ते २००६ ते २०१० या दरम्यान राज्यसभेचे सदस्यही होते.
राहुल बजाज यांची पत्नी रुपा बजाज यांचे पूर्वीच निधन झाले आहे.
राहुल बजाज यांच्या निधनावर सर्व थरातून शोक प्रकट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राहुल बजाज यांचे मित्र असलेल्या शरद पवार यांनी राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक असणाऱ्या जमनालाल बजाज यांचे राहुल बजाज नातू होते. बजाज कंपनीच्या दुचाकींमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात मोठा बदल झाला, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राहुल बजाज यांच्या निधनावर शोक प्रकट केला आहे. राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते. राहुल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हटले आहे.
COMMENTS