दी पॉइंट इज लव!

दी पॉइंट इज लव!

प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी अमूक एक दिवसाचा मुहूर्त पाहावा लागतो? ज्यांना असं वाटतं, ते ‘व्हॅलेंटाइन डे’ला प्रेमाचा बाजारू वर्षाव करतात. त्यात सगळं काही असतं. नसतं फक्त प्रेम. ते कृत्रिम साधनांच्या सोबतीने येतच नाही. त्याला सोबत लागते निरपेक्ष करुणेची, मायेची आणि सहवेदनेची. जिथे हा संगम घडून येतो, वेळकाळ न पाहता प्रेम आकाशभर उजळून येतं. जगण्याची उमेदही वाढवतं. जगण्यातल्या सौंदर्याची जाणीवही करून देतं...

गर्भवती सफूरा झरगरची अखेर जामिनावर सुटका
राज्यात ४ जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी दर जास्त
जेएनयूच्या चार बंडखोऱ्या

कोणे एकेकाळी वृत्तपत्र हातात आलं की, बहुसंख्य क्रीडाप्रेमी वाचक मागील क्रीडा पानापासून वाचनास सुरुवात करीत. असंच काहीसं गेल्या अनेक वर्षांपासून ‘दी इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिकाबाबत घडत आलंय. या साप्ताहिकाचा मुख्य चेहरा अर्थ-राजकीय असला तरीही जगभरातले अनेक चोखंदळ वाचक या साप्ताहिकाच्या वाचनाची सुरुवात आजही मागील पानापासून करतात. याचं एकमेव कारण, त्यावर प्रकाशित होत आलेले स्मरण-लेख आणि या पानावरील श्रद्धांजलीपर लेखाची संपादिका- लेखिका अ‍ॅन रो. त्या-त्या आठवड्यात इहलोकीची यात्रा संपवलेल्या प्रभावशाली व्यक्तींचं प्रवाही नि मनोवेधक शब्दचित्र ही या पानाची खासियत. अ‍ॅन रो याला ‘सेलिब्रेशन ऑफ लाइफ’ म्हणजेच जगण्याचा उत्सव मानते. प्रत्यक्षातली अ‍ॅन रो म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सुविद्य नि सुप्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. तिच्यातली बुद्धिमत्ता तिच्या चेहऱ्यावर सदोदित झळकत असते आणि निसर्गतः सुंदर रुप लाभलेली अ‍ॅन रो दरवेळी अधिकच सुंदर भासते.

सौजन्य - असोसिएट प्रेस.

सौजन्य – असोसिएट प्रेस.

या ‘दी इकॉनॉमिस्ट’चा १८४३ नाव असलेला जगण्यावर भाष्य करणारा (लाइफ अँड लाँग रिड) जोडअंक असतो. ते इकॉनॉमिस्टच्या जन्माचं वर्ष. म्हणून त्या आकड्याचा जोडअंक असा हा मामला. ८ वर्षांपूर्वी म्हणजेच, २५ डिसेंबर २०१४ रोजी प्रकाशित झालेला ‘इकॉनॉमिस्ट’ सोबतचा १८४३ चा अंक खास आठवणीत राहणारा होता. याचं कारण या अंकात प्रकाशित झालेलं नामवंतांचं ललितपर लिखाण आणि त्यातला अ‍ॅन रो हिचा लेख. या अंकात, जगण्याचा अर्थ काय किंवा जगण्याला काही अर्थ आहे का, या अनुषंगाने व्हॉट्स दी पॉइंट? असा प्रश्न उपस्थित करून मान्यवरांकडून लेख मागवण्यात आले होते. त्यात फिलीप पुलमन हा कादंबरीकार, मेरी मेडग्लि ही मनोविकारतज्ज्ञ, जॉन बर्नसाइड नावाचा कवी, एलिझाबेथ कोलबर्ट ही पत्रकार, युयून ली ही चिनी कादंबरीकार, स्टिफन ग्रोझ हा मनोविश्लेषक आणि स्वतः अ‍ॅन रो अशांचे लेख छापले होते. सगळ्यांचे लेख जगण्याचा तत्वज्ञानात्मक, नीतिमूल्यात्मक वेध घेणारे हजार-पाचशे शब्दांचे, अपवाद  अ‍ॅन रो हिचा. तिचा लेख अत्यअल्पाक्षरी म्हणजेच मोजून जेमतेम चार शब्दांचा होता. व्हॉट्स दी पॉइंट? या प्रश्नावर ‘दी पॉइंट इज लव’ म्हणत मानवी जगण्याचं सारं मांडून तिने आपला निबंध संपवला होता. हजारेक शब्दांच्या इतर निबंधांच्या तुलनेत अ‍ॅन रोचे हे चार शब्द वाचकांना साक्षात्काराची भावना देणारे होते.

हे सगळं आठवण्याचं कारण, फेब्रुवारी महिना आणि या महिन्यात येणारा व्हलेंटाइन डे. भांडवलशाही बाजारू व्यवस्थेने या दिवसाला चलाखीने तारुण्यापुरता ठेवला, त्यामुळे माणसामाणसांमधलं, समूहांमधलं विपरित परिस्थितीतलं स्पर्शातून, नजरेतून, मायेतून, उबेतून व्यक्त होणारं निरपेक्ष प्रेम आणि या प्रेमाचे करुणा, माया, निरपेक्ष त्याग असे नानाविध आविष्कार झाकोळलेच राहिले. काही वर्षांपूर्वी ग्रॅब्रिएल गार्सिया मार्केझने ‘लव इन दी टाइम ऑफ कॉलरा’ मधून उदात्त मानवी प्रेमभावनेचं दर्शन घडवलं होतं. गेली दोनेक वर्ष जग कोरोनाच्या संकटातून जातंय. याही काळात व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर प्रेमाची विविध रुपं पाहायला मिळाली आहेत. मुखपृष्ठावरचं छायाचित्र त्याच अनुषंगाने आलं आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस इथल्या काउण्टी म्युझियम ऑफ आर्टमध्ये ख्रिस बर्डन नावाच्या आर्टिस्टने ‘अर्बन लाइट’ ही संकल्पना घेऊन प्रदर्शन भरवलं होतं. त्या प्रदर्शनाला भेट देण्यास आलेल्या एका जोडप्याचं चुंबन घेतानाचं छायाचित्र असोसिएट प्रेसच्या छायाचिकाराने घेतलं. हे छायाचित्र पाहून अनेकांच्या मनांत आक्षेप-स्वीकाराच्या दृष्टीने अनेक विचार येतीलही. पण या छायाचित्रात जे दिसतंय, ते शारिरीक अंगाने अभिव्यक्त होत असलं तरीही ते नखशिखांत प्रेमच आहे आणि जगात प्रेमाइतकं अहिंसक आणि सुंदर दुसरं काही नाही, यावर कुणाचं दुमत असू नये.

(मूळ लेख मुक्त संवादच्या १ फेब्रुवारी २०२२च्या अंकातून साभार.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0